नव–कांट मत: (नीओ-कांटिॲनिझम). जर्मनीमध्ये १८७० ते १९२० ह्या कालखंडात विकसित झालेल्या व प्रभावी ठरलेल्या काही तात्त्विक पंथांना ‘नव-कांट मत’ ह्या नावाने ओळखण्यात येते. तत्त्वज्ञानातील अनेक समस्यांबाबत ह्या विचारपंथांनी परस्परविरोधी मतांचा पुरस्कार केला आहे. पण प्रमाण मानवी ज्ञानाचा भाग म्हणून जर तत्त्वज्ञानाला नांदायचे असेल, तर तत्त्वज्ञानाने कांटकडे परत वळले पाहिजे आणि त्याच्या विचारपद्धतीचा व दृष्टिकोनाचा अवलंब केला पाहिजे, ही त्यांची समान भूमिका होती.

एडूआर्ट त्सेलर (१८१४–१९०८) हा ग्रीक तत्त्वज्ञानाचा प्रसिद्ध इतिहासकार, कूनो फिशर (१८२४– १९०७) हा कांटचा चरित्रकार, ⇨ हेर्‌मान फोन हेल्म्‌होल्ट्झ (१८२१–९४) हा त्या काळातील सर्वश्रेष्ठ वैज्ञानिक आणि जडवादाचा इतिहास लिहिणारा फ्रीड्रिख आल्बेर्ट लांगे (१८२८–७५) ह्या विचारवंतांच्या लिखाणामुळे जर्मन अभ्यासकांचे कांटच्या तत्त्वज्ञानाकडे परत लक्ष वळले. नव-कांट मतात समाविष्ट असलेल्या विचारपंथांत (१) मारबर्ग पंथ, (२) गटिंगेन पंथ, (३) हायड्लबर्ग पंथ आणि (४) समाजशास्त्रीय नव-कांट मत हे प्रमुख होत.

हेरमान कोएन (१८४२–१९१८) हा मारबर्ग पंथाचा प्रवर्तक होता. ज्ञानाच्या क्षेत्रात विज्ञान व नीतीच्या क्षेत्रात नैतिक नियमांनी संघटित झालेला समाज ह्या गोष्टी वस्तुस्थिती म्हणून अस्तित्वात असतात. विज्ञानाची स्वतःची अशी एक वैचारिक किंवा तार्किक घडण असते अनिवार्य अशा अर्थविधांनी ती घडविलेली असते. समाजजीवनाचेसुद्धा असेच आहे. काही नैतिक नियमांनी ते बांधलेले असते आणि अनिवार्य नैतिक संकल्पनांवर हे नियम आधारलेले असतात. विज्ञानाची आणि नैतिक जीवनाची ही संकल्पनात्मक घडण स्पष्ट करणे हे तत्त्वज्ञानाचे कार्य होय, अशी कोएनची शिकवण होती. त्याच्या मते कांटने हे काम केले पण ज्ञानाची किंवा नीतीची तार्किक घडण स्पष्ट करताना व्यक्तीला लाभणारी वेदने, तिच्या मनात घडणाऱ्या वैचारिक प्रक्रिया इ. मानसशास्त्राच्या विषयात मोडणाऱ्या, तत्त्वज्ञानाशी असंबंधित असणाऱ्या प्रश्नांचाही ऊहापोह केला आणि तत्त्वज्ञान व मानसशास्त्र यांची गल्लत केली. कोएनचा अनुयायी पौल नाटोर्प (१८५४–१९२४) ह्याने विज्ञानाचे संकल्पनात्मक विश्लेषण करण्याचे कोएनचे कार्य पुढे  चालविलेच पण माणसाच्या मनाची, व्यक्तीच्या व्यक्तिनिष्ठ अनुभवाची घडण स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या मते अनुभवाचा विषय आणि अनुभवाची प्रक्रिया ही दोन भिन्न क्षेत्रे नसतात, तर एकाच अस्तित्वाची ती दोन अंगे असतात आणि त्या दोघांचाही आपापल्या दिशेने विकास होऊ शकतो. मारबर्ग पंथाचा शेवटचा श्रेष्ठ प्रतिनिधी म्हणजे ⇨ एर्न्स्ट कासीरर (१८७४–१९४५) हा होय. ह्यानेही विज्ञानाची तार्किक घडण स्पष्ट करण्याचे काम चालू ठेवले परंतु त्याबरोबरच मानवी संस्कृतीच्या सर्व अंगांची–भाषा, कला, धर्म राजकीय व्यवस्था इ. – घडण स्पष्ट करण्याचा आणि संस्कृतीच्या ह्या ज्ञानेतर अंगांच्या घडणीत वेगवेगळ्या प्रकारची प्रतीके करीत असलेल्या कार्याचे स्वरूप स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला.

गटिंगेन पंथाने मारबर्ग पंथाच्या, मानसिक प्रक्रियांना वर्ज्य मानाणाऱ्या ह्या भूमिकेचा प्रतिवाद केला. लेओनार्ट नेल्सन (१८८२–१९२७) हा ह्या पंथाचा संस्थापक होता. अनुभवाच्या विषयाची संकल्पनात्मक घडण आणि अनभुवात घडणाऱ्या मानसिक प्रक्रिया ह्यांची सांगड घालण्याचा नेल्सनने प्रयत्न केला. अनुभवविषयाचे विश्लेषण केल्याने प्राप्त होणारी त्याच्या घडणीची तत्त्वे आणि आपल्या अंतर्निरीक्षणाला स्वतःप्रमाण म्हणून प्रतीत होणारी तत्त्वे एकच असतात, असे त्याने दाखवून दिले. रूडॉल्फ ऑटो (१८६९–१९३७) या धार्मिक अनुभवाचे विश्लेषण करणाऱ्या प्रसिद्ध तत्त्ववेत्त्यावर नेल्सनचा प्रभाव पडला आहे.

व्हिल्हेल्म व्हिंडेलबांट (१८४८–१९१५) आणि हाइन्‍रिख रिकर्ट (१८६९–१९३६) हे हायड्लबर्ग पंथाचे संस्थापक होते. व्हिंडेलबांटच्या भूमिकेतील महत्त्वाचा भाग म्हणजे सामान्य नियम शोधू पहाणारी विज्ञाने आणि एखाद्या विशिष्ट वस्तूला – उदा., एका विशिष्ट व्यक्तीला, समाजाला, कालखंडाला–समजून घेऊ पहाणारी शास्त्रे यांच्यात त्याने केलेला भेद. ह्या भेदातून ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अनुभवाची घडण निश्चित करणाऱ्या अर्थविधांचा शोध घेण्याच्या प्रयत्नाला सुरुवात झाली व मूल्यात्मक संकल्पना ज्ञानात्मक संकल्पनांहून अधिक मूलभूत असतात, ही भूमिका पुढे आली. रिकर्टने इंद्रियगोचर वस्तूंचा अनुभव व इतर प्रकारचे अनुभव ह्यांच्यात भेद केला. इंद्रियगोचर विश्वाच्या घडणीविषयीची कांटची सर्व मते त्याने मान्य केली पण त्याचे पुढे म्हणणे असे, की ह्या व्यतिरिक्त इतर प्रकारचे जे अनुभव असतात त्यांच्या विषयाचे संवेदन जरी आपण करू शकत नसलो, तरी ह्या गोष्टी–म्हणजे इतिहास, कला, नीती–अनुभवाचे विषय असतात. त्यांचे आकलन आपल्याला असते. तेव्हा त्यांची संकल्पनात्मक घडण आपण स्पष्ट करू शकतो. शिवाय असा विशिष्ट प्रकारच्या अनुभवाचा – उदा., कलानुभव, नीतीचा अनुभव – धारक असलेला जो विषयी असतो त्याचेही स्वरूप आपल्याला समजून घेता येते. पण अनुभवाचे हे विषय आणि अनुभवाचा धारक असलेला विषयी ह्यांच्या पलीकडचे जे अस्तित्व असते–कांटची स्वरूपवस्तू–त्याचे मात्र कोणत्याही स्वरूपाचे ज्ञान आपल्याला होऊ शकत नाही ते केवळ श्रद्धेचा विषय असते.

समाजशास्त्रीय नव-कांट मताच्या तत्त्ववेत्त्यांतील सर्वांत प्रसिद्ध तत्त्ववेत्ता म्हणजे गेओर्ख झिमेल (१८५८– १९१८) होय. त्याची भूमिका अशी, की पूर्वप्राप्त संकल्पनांनी अनुभव घडविलेला असतो हा सिद्धांत सत्य आहे पण ह्या पूर्वप्राप्त संकल्पना सार्वत्रिक व चिरंतन नसतात. त्या इतिहासात विकसित होत असतात. संकल्पनांनी आकारित न केलेला असा अनुभव असू शकत नाही पण भिन्न भिन्न संस्कृती वेगवेगळ्या संकल्पनांचा उपयोग करून आपल्या अनुभवाला त्याचे विशिष्ट रूप देतात. असा एखादा विशिष्ट संस्कृतीचा विशिष्ट कालखंड घेऊन त्याच्या अनुभवात आणि व्यवहारात अंतर्भूत असलेली पूर्वप्राप्त तत्त्वे स्पष्ट करावी लागतात.

पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस नव-कांट मताचा प्रभाव ओसरला व जर्मन तत्त्वज्ञानाने ⇨ प्रत्यक्षार्थवादी आणि ⇨ रूपविवेचनवादी वळण घेतले.

पहा: कांट, इमॅन्युएल.

संदर्भ: Perry, R. B. Philosophy of the Recent Past, New York, 1926.

रेगे, मे. पुं.