नरसिंहशास्त्री, नोरि : (६ फेब्रुवारी १९०० –    ). आधुनिक काळातील एक प्रसिद्ध अष्टपैलू तेलुगू लेखक. जन्म आंध्र प्रदेशात गुंतूर येथे. मद्रास विद्यापीठातून १९११ साली बी.ए. व १९२५ साली बी.एल्. झाल्यावर त्यांनी १९२५ पासून गुंतूर जिल्ह्यात रेपल्ले या गावी वकिली सुरू केली. लहानपणापासून संस्कृत, तेलुगू व इंग्रजी साहित्यांचा त्यांचा व्यासंग अव्याहतपणे चालू आहे. त्यांना तेलुगू भाषा समितीने १९४७ मध्ये ‘कविसम्राट’ ही पदवी दिली. १९७३ साली आंध्र प्रदेश साहित्य अकादमीचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांची निवड झाली. त्याच संस्थेचे ते ८ वर्षे फेलो होते. आतापर्यंत त्यांनी जवळजवळ ७ कादंबऱ्या, २० लघुकथा, १०० च्यावर निबंध, ३० एकांकिका व गीतिनाट्ये लिहिली आहेत. त्यांच्या सोमनाथविजयमु (१९२४, नंतर तीन आवृत्त्या), तेनेतेट्‌टे (४ एकांकिका, १९५०), शब्दवधी (१९६२) या एकांकिका तेलुगू साहित्यात फारच प्रसिद्ध आहेत. नरसिंहशास्त्री यांनी तेलुगू साहित्यात ‘ऐतिहासिक कादंबरी’ चे क्षेत्र फारच समृद्ध केले. प्रमुख कवींची चरित्रे त्यांनी त्यांच्या कादंबऱ्यांतून वर्णिली आहेत. ‘आंध्रवैभव हे भारतीय संस्कृतीचेच एक अलंकरण आहे’ असा विश्वास त्यांच्या कादंबऱ्यांतून ठिकठिकाणी प्रतीत होतो. नारायणभट्‌टू (१९४९) या कादंबरीत राजराज नरेंद्राच्या काळी वैदिक संस्कृती बौद्ध प्रभावातून कशी मुक्त झाली, याचे वर्णन त्यांनी नन्नयाच्या चरित्रलेखनास अनुसरून केले आहे. रुद्रम्मादेवी (१९५१) या त्यांच्या कादंबरीत वरंगळच्या काकतीय राजांची शासनव्यवस्था व तिक्कन्नाचे वर्णन आले आहे. मल्लरेड्‌डी (१९५८) या कादंबरीत रेड्डी राजांचे युद्धकौशल्य व एर्राप्रेगडा कवीचे चरित्र आले आहे. कविसार्वभौमुडु (१९६२) कादंबरीत विजयानगर साम्राज्यातील परिस्थितीचे वर्णन श्रीनाथाच्या चरित्राच्या अनुषंगाने त्यांनी केले आहे. निरनिराळ्या शास्त्रांच्या चर्चा तसेच युद्धादींचे विस्ताराने वर्णन तीत आले आहे. धूर्जटि (१९७१) कादंबरीत कृष्णदेवरायाच्या वैभवाची प्रचीती येते.

नरसिंहशास्त्रींनी अनेक ग्रंथांना विद्वत्ताप्रचुर प्रस्तावनाही लिहिल्या आहेत. प्रख्यात आंध्रकवींच्या चरित्रांच्या आधारे आंध्र संस्कृती व इतिहास यांचे उत्कृष्ट दर्शन घडवून आणणारे नरसिंहशास्त्री हे एकमेव कादंबरीकार आहेत, असे म्हटले तरी चालेल. कथा, कादंबरी, कविता, एकांकिका अशा विविध माध्यमांतून त्यांनी वैदिक संस्कृतीचे आणि आंध्र इतिहास-संस्कृतीचे संपूर्ण चित्र रेखाटले आहे.

लाळे, प्र. ग.