नरतुरंग: (सेंटॉरस, सेंटॉर). दक्षिण खगोलातील एक मोठा तारकासमूह. टॉलेमी यांनी केलेल्या यादीत हा आहे. वासुकीच्या (हायड्राच्या) दक्षिणेस व नौकेच्या (आर्गोच्या) पूर्वेस दक्षिण ध्रुवाभोवतीच्या भागात हा दिसतो. हा आग्नेयीस उगवून नैर्ऋत्येला मावळतो. याच्यात सहाव्या प्रतीपर्यंतचे [→ प्रत] ७१ तारे असून त्यांपैकी अनेक तेजस्वी तारे आणि सुंदर तारकागुच्छ आहेत. या समूहातील आल्फा म्हणजे मित्र (रीजिल केंटॉरस) हा प्रतीच्या दृष्टीने व्याध व अगस्त्य यांच्या नंतरचा आकाशातील तिसऱ्या क्रमांकाचा तारा आहे. हा तारा ४·३५ प्रकाशवर्षे अंतरावर असलेले ताऱ्यांचे त्रिकूट आहे. या तीन ताऱ्यांपैकी दृश्य तारकायुग्माचा आवर्तकाल (एका प्रदक्षिणेला लागणारा काळ) ८० वर्षे, अंतर २४ ज्यो. ए. (ज्योतिषशास्त्रीय एकक, ज्यो. ए. = पृथ्वी व सूर्य यांतील सरासरी अंतर) व प्रत ०·१ ते १·४ आहे. या दोघांपैकी अधिक तेजस्वी तारा हा तेजस्विता, तापमान व वस्तुमान यांच्या दृष्टीने सूर्यासारखा आहे. त्रिकूटातील तिसरा तारा ११·३ प्रतीचा व सूर्य सोडल्यास पृथ्वीला सर्वांत जवळचा (अंतर ४·२८ प्रकाशवर्षे) तारा आहे. त्यामुळे या तिसऱ्या ताऱ्याला ⇨ निकटतम नरतुरंगीय (प्रॉक्झिमा सेंटॉरी) म्हणतात. याचे इतर दोघांपासूनचे अंतर १०,००० ज्यो. ए. एवढे जास्त असले, तरी हे त्रिकूट गुरुत्वीय दृष्ट्या स्थिर असावे व त्यांची उत्पत्ती एकाच प्रकारची असावी. नरतुरंगातील बीटा म्हणजे मित्रक (हाडार) तारा १ प्रतीचा व २८० प्रकाशवर्षे अंतरावर आहे. मित्र व मित्रक हे तारे दिक्‌सूचक आहेत कारण यांना जोडणारी रेषा स्वस्तिक (क्रक्स) तारकासमूहाकडे जाते, यामुळे त्यांना सदर्न पॉइंटर्स म्हणतात. नरतुरंगातील गॅमा हा सुंदर युग्मतारा असून त्यातील दोन्ही ताऱ्यांची प्रत ३·१ आहे, तर टी हा ९० दिवसांचा आवर्तकाल असणारा चलतारा (ज्याची दीप्ती ठराविक कालावधीने बदलते असा तारा) असून त्याची प्रत ५·२ ते १० आहे. बीटा व एप्सिलॉन यांच्या रेषेत पुढे तितक्याच अंतरावर ओमेगा (एनजीसी ५१३९) हा ४ प्रतीचा गोलाकार तारकागुच्छ असून तो सर्वांत सुंदर आहे आणि त्यात ६,००० हून जास्त तारे आहेत. हा तारकागुच्छ २०,००० प्रकाशवर्षांपेक्षाही दूर आहे. नरतुरंगाच्या दक्षिण टोकास सु. २०० ताऱ्यांचा एनजीसी ३७६६ हा तारकागुच्छ आहे, तर सेंटॉरस-ए (५३ एस ४ ए) हा रेडिओ उद्‌गमही (रेडिओ तरंग बाहेर टाकणारा उद्‌गमही) नरतुरंगात आहे. हा उद्‌गम एनजीसी ५१२८ या दीर्घिकेशी (तारामंडळाशी) निगडित आहे. १८९६ साली या समूहात नवतारा (अचानकपणे ज्या ताऱ्याची तेजस्विता हजारो वा लक्षावधी पट वाढते असा तारा) आढळला होता.

ईजिप्शियन कथेनुसार सेंटॉरस हा प्रलयात सापडलेला नोआ आहे तर ग्रीक पुराणकथेनुसार तो धड, हात व डोके मानवाचे आणि पाय व इतर शरीर घोड्याचे असलेला (अश्वमानव) प्राणी होय.

ठाकूर, अ. ना.