नभोनाट्य: रेडिओवरून प्रसारित केला जाणारा नाट्यप्रकार. रंगभूमीवरील नाट्याप्रमाणे तो ‘दृश्य’ नसून केवळ ‘श्राव्य’ असतो. त्याचे माध्यम व दृश्यपरिणाम करणारे साधन शब्द वा ध्वनी असते.
नभोनाट्य केवळ ऐकण्यापुरतेच मर्यादित असल्याने त्यात पात्रे, त्यांचा मुद्राभिनय, त्यांची रंगभूषा व वेषभूषा, देश, काल, परिस्थिती यांच्या प्रत्यक्ष दृश्यातून निर्माण होणारे वातावरण इत्यादींच्या प्रत्यक्ष दर्शनाला वाव नसतो. त्यामुळे नभोनाट्याला काही मर्यादा पडतात. त्यात पात्रांची संख्या कमी असावी लागते आणि त्यांची ओळख सहज व ताबडतोब पटवावी लागते. प्रसंगांची खिचडी वा गुंतागुंत चालत नाही. संविधानक चटकन लक्षात येईल असे असावे लागते. नभोनाट्याचा कालावधी तुलनेने कमी म्हणजे दहापंधरा मिनिटांपासून फार तर एखाद्या तासापर्यंत चालतो. शब्दोच्चारांतील चढउतार, पार्श्वसंगीतातील आरोहावरोह व ध्वनिसंयोजनातील बारकावे यांमधूनच हर्ष-शोक, प्रेम-द्वेष यांसारख्या भावनांचे खेळ परिणामकारकपणे व्यक्त करून अभिनयाची उणीव कल्पक ध्वनियोजनेद्वारा साधावी लागते.
नभोनाट्याच्या या मर्यादांतूनच त्याला काही सामर्थ्येही लाभली आहेत. श्रोत्याच्या ठायी कल्पनाशक्ती असते व नाटक हे संकेतनिष्ठ असते, या परिस्थितीचा फायदा घेऊन नभोनाट्याचे कित्येक संकेत रूढ झालेले आहेत. उदा., नभोनाट्यात निवेदक किंवा प्रवक्ता योजता येतो आणि तो संविधानकाचे दुवे जुळवू शकतो. त्यासाठी संगीताची धून, विशिष्ट ध्वनींची योजनाही उपयुक्त ठरते. सनईवादन, पाखरांची किलबिल म्हणजे सकाळ असे प्रतीकात्मक अर्थही ध्वनींच्या आधारे सूचित करता येतात. आगगाडी, वादळ, लाटांचे तांडव, तोफेचा आवाज, दाराची उघडझाप, मारामारी, पावसाची रिमझिम समुद्राची गाज, विविध वाद्ये, घुंगरांचा मंजुळ नाद, टेलिफोनची वा दारावरची घंटी, मंदिरातील घंटानाद, हसण्यारडण्याचे प्रकार यांचे विविध ध्वनी हुबेहुब काढून श्रोत्यांच्या मनश्चक्षूंसमोर अपेक्षित दृश्याचा आभास उभा करता येतो. सारांश, श्रुतिगुणांचा कल्पकतेने उपयोग करून आणि श्रोत्यांच्या मानसप्रतिमांना जागवून शब्द, कंठसंगीत, वाद्यसंगीत, ध्वनियोजना यांद्वारा नभोनाट्य सूचक दृश्यपरिणाम साधू शकते. नभोनाट्यात अंकविभागणीला महत्त्व नसते तसेच स्थलैक्य व कालैक्य डावलता येते. स्थलकालविषयक संपूर्ण स्वातंत्र्य त्यात लाभू शकते. स्थानांतर व दृश्यांतर प्रायः ध्वनियोजनेतून, वाद्यसंगीतातून, निवेदकाच्या भाषणातून वा स्तब्धतेतूनही उत्तम रीतीने दर्शवता येते.
नभोनाट्याचा श्रोता स्वस्थचित्ताने ते ऐकत असतो. तो व्यक्तिगत अवधानाने आणि जवळिकेने कथौघाशी संवाद साधीत असल्याने नभोनाट्यात मनोविश्लेषणपर व वैचारिक निवेदनपर भागही खपतो. मात्र नाना अभिरुचींचे आबालवृद्ध श्रोते एकाच वेळी विविध स्थळी बसून ते ऐकत असतात. त्यांच्या अभिरुचींशी संवाद राखावा लागत असल्याने नभोनाट्यावर मर्यादा पडतात. प्रचलित समस्या या लोकांच्या जिव्हाळ्याच्या विषयीचे असणारे नभोनाट्य अधिक लोकप्रिय ठरते. संगीतप्रधान नभोनाट्यही परिणामकारक ठरू शकते पण कृतिप्रधान, अभिनयप्रधान व विचारप्रधान नभोनाट्ये यशस्वी होणे कठीण असते. रेडिओवरून मुख्यतः एकांकिकाच सादर केल्या जात असल्याने, नभोनाट्य म्हणजे एकांकिका असा एक समज रूढ असतो. पण एकांकिकेबरोबरच कादंबरी-महाकाव्यांची नाट्यरूपांतरे, एकोक्ती (मोनोलॉग), कल्पित रचना ( फँटसी), संगीतिका, संगीत नाटके इ. विविध प्रकार नभोनाट्यात मोडतात. पुष्कळदा नभोनाट्य आणि श्रुतिका या दोन्ही संज्ञा एकाच अर्थी वापरण्यात येत असल्या, तरी कोणताही सुविहितपणे सादर केलेला खास माहितीपूर्ण कार्यक्रम श्रुतिकेमध्ये मोडतो. जेव्हा कथानक, पात्रे यांऐवजी एखादे स्थळ (उदा., किल्ले रायगड) वा एखादी विशिष्ट जमात (उदा., लोकसंस्कृतीचा उपासक : वासुदेव) या संबंधीचा कार्यक्रम ध्वनिक्षेपित केला जातो, तेव्हा त्याला अनुबोध श्रुतिका (डॉक्युमेंटरी फीचर) म्हणतात.
केंद्रावर नभोनाट्याचा संयोजक म्हणून जो अधिकारी काम पहात असतो, तोच बहुधा नभोनाट्य सादर करतो. आवश्यक तर बाहेर ख्यातनाम असलेला एखादा नाट्यदिग्दर्शक तात्पुरता बोलाविण्यात येतो. आवाजाची चाचणी घेऊन आकाशवाणी केंद्राने अनुरूप आवाज असलेल्या लोकांची यादी केलेली असते. यांतून संयोजक पात्रांची निवड करतो. नभोनाट्यात काम करणाऱ्या नटांना मानधन दिले जाते. त्यांच्या तालमी होतात. ह्या तालमी म्हणजे नाट्यवाचनच असते. नभोनाट्यातील नटांना संवाद पाठ करावे लागत नाहीत. बोलण्याच्या तालमीबरोबर वेगवेगळे ध्वनी, संगीतखंड इ. कुठे कुठे द्यावयाचे आहेत, याचीही तालीम होते. आकाशवाणी–कलागृहात (स्टुडिओ) पात्रे बोलत असताना काचेपलीकडील दालनात असलेला संयोजक ध्वनी किंवा संगीतखंड यांच्या ध्वनिमुद्रित तबकड्या यथास्थळ तेथे पेरीत जातो. वादळ, पाऊस, मोटार किंवा आगगाडी यांसारखी वाहने, टेलिफोनची घंटा, पक्ष्यांचे गाणे इत्यादींचे ध्वनी तबकड्यांवर किंवा फितीवर अगोदरच ध्वनिमुद्रित केलेले असतात. अशा तबकड्यांचा आणि फितींचा संग्रह प्रत्येक केंद्राकडे असतो. यांव्यतिरिक्त अन्य ध्वनींचे आभास वेळेवर आकाशवाणी–कलागृहात तयार केले जातात. अशा रीतीने सबंध नभोनाट्य सलग ध्वनिमुद्रित केले जाते किंवा प्रथम केवळ नाटक ध्वनिमुद्रित करून हवे ते ध्वनी त्यात पुन्हा घातले जातात. दोन किंना अधिक फीतमुद्रक वापरून हे करता येते. अलीकडे बहुतेक नभोनाट्ये आधीच ध्वनिमुद्रित करतात.
भारतीय आकाशवाणीवर नभोनाट्याला १९३६ पासून स्वतंत्र स्थान मिळाले. त्या वर्षी बंगाली भाषेतील एका नाटकाच्या अनुवादाने भारतीय नभोनाट्याचा प्रारंभ झाला. त्यानंतर भारतातील विविध भाषांमधील नभोनाट्ये प्रसारित करण्यात येऊ लागली. हा नाट्यक्रम प्रसारित करताना त्याला आवश्यक असणारे असे काही खास तंत्र या प्रारंभकाळात विकसित झाले नव्हते तर परंपरागत नाटकांतील काही भागच नभोनाट्य म्हणून ध्वनिक्षेपित करण्यात येई. त्यानंतर विश्वविद्यालयांतून शिकविण्यात येणाऱ्या इंग्रजी भाषेतील एकांकिकांचे प्रयोग ध्वनिक्षेपित करण्यात येऊ लागले. तसेच ‘ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’, लंडनवरून प्रसारित होणाऱ्या लहानलहान श्रुतिका वा प्रहसने इत्यादींच्या भारतीय भाषांतील अनुवादांनी त्यांची जागा घेतली. बी. बी. सी. द्वारा तयार केलेल्या विशिष्ट ध्वनींच्या मुद्रिकांचाही सुरुवातीला वापर होई. पुढे पुढे नभोनाट्याच्या रचनेचे आणि प्रक्षेपणाचे तंत्र हळूहळू विकसित होत गेले आणि आकाशवाणीवरून एकांकिका प्रक्षेपित होऊ लागल्या. विनोदात्मक श्रुतिका, प्रहसने वा हिंदीमधील झलकियाँ ही नभोनाट्याचीच काही प्रगत रूपे होत.
स्वातंत्र्योत्तर काळात नभोनाट्याचे विषयक्षेत्र विस्तृत झाले. त्यात नवनवे तंत्रात्मक प्रयोगही करण्यात येऊ लागले. त्यातूनच पुढे रूपकाचा उदय झाला आणि अविच्छिन्न (धारावाहिक) नाट्याची प्रथा रूढ झाली. त्याचप्रमाणे विविध श्रुतिका अथवा प्रसंगचित्रांची मालिका एकत्र जुळवून एक नवीनच ‘रंगारंग’ कार्यक्रम प्रसारित होऊ लागला. १९५६ मधील अखिल भारतीय नभोनाट्याची स्पर्धा हा एक या क्षेत्रातील महत्त्वपूर्ण टप्पा होय. अशा स्पर्धांत निवडलेल्या नभोनाट्यांची विविध भारतीय भाषांत भाषांतरे होऊन ती एकाच वेळी वेगवेगळ्या भाषिक आकाशवाणी केंद्रांवरून सहक्षेपित केली जातात.
संदर्भ : 1. Abbot. W. Rider, R. L. Handbook of Broadcasting, New York, 1957.
२. भारत सरकार, प्रकाशन विभाग, रेडिओ नाटक : एक संकलन, नवी दिल्ली, १९७३.
मालशे, स. गं. जोशी, चंद्रहास