नजीरखाँ : (सु. १८५४–१९२२). हिंदुस्थानी संगीतातील एक नामवंत गायक. भेंडीबाजारवाले म्हणून प्रसिद्ध. त्यांचे वडील दिलावर हुसेनखाँ यांना चार मुलगे : छज्जूखाँ (अमरशासाहेब), नजीरखाँ, हाजी विलायतहुसेन व खादिमहुसेन. विलायतहुसेन वगळता बाकी तिघे भाऊ गाणारे. काहींच्या मते हे घराणे मूळचे सारंगियांचे. यांचे मूळ गाव उत्तर प्रदेशातील बिजनोर (मुरादाबाद) परंतु हे कलाकार बंधू मुंबईत भेंडीबाजार येथे येऊन राहिले, तिथे त्यांचे घर होते, त्यांना भरपूर शिकवण्या मिळाल्या, म्हणून ते ‘भेंडीबाजारवाले’ म्हणून ज्ञात झाले. छज्जूखाँ हे धृपद-धमार-होरी गात. सेसवानचे इनायतहुसेनखाँ यांच्याकडे त्यांचे संगीताचे थोडे शिक्षण झाले. छज्जूखाँ यांनी ‘अमर’ या टोपणनावाने ख्यालातील बंदिशी बांधल्या, पुढे त्यांचे पुत्र अमानअली यांनीही ‘अमर’ याच नावाने चिजा रचल्या. शब्दलालित्य, सुंदर सांगीतिक आशय आणि लयीची गंमत यासाठी या घराण्यातील चिजा प्रसिद्ध आहेत. नजीरखाँ यांचे शिक्षण मुख्यत्वे छज्जूखाँ यांच्याकडे झाले. नजीरखाँची गायकी मेरखंडी होती. ते बंदिश धृपद अंगाने म्हणत. खानेपुरी, मुखविलास, आलापी, बोल भरणे, खुलाबंद बोल, उचकसमेट, मींड, कणस्वर, लयीच्या अंगाने सुंदर सरगम करणे इ. त्यांचे गानविशेष म्हणता येतील.
राजा नबाबअलीखाँ (अकबरपूर) यांच्या सांगण्यावरून नजीरखाँनी पं. भातखंडे यांची भेट घेतली. पुढे सेठ काब्राजी यांनी स्थापिलेल्या ‘गायनोत्तेजक मंडळी’ या संस्थेत ते कित्येक वर्षे उत्तम प्रकारे गायन शिकवत असत. पं. भातखंडे यांच्या शास्त्राभ्यासाचा, वर्गीकरण पद्धतीचा, लक्षणगीतांचा नजीरखाँवर प्रभाव पडला. नजीरखाँ यांच्या रागज्ञानाचा, संगीतलेखनाचा पं. भातखंडे यांना उपयोग झाला. नजीरखाँच्या शिष्यवर्गात प्रसिद्ध गायिका अंजनीबाई मालपेकर यांचा समावेश होतो. ते मुंबई येथे मृत्यू पावले.
जठार, प्रभाकर