पं. नेहरूंसमोर पं. नेहरू : नकलाकार सदानंद जोशी

नकला : एक पारंपरिक रंजनप्रकार, नक्कल (मिमिक्री) म्हणजे अनुकरण-कला. माणूस हा स्वभावतःच अनुकरणप्रिय असल्याने तो कळतनकळत दुसऱ्याचे अनुकरण करीत असतो. तथापि नक्कल म्हणजे केवळ असे अनुकरण नव्हे. नकलांमध्ये अनुकरण जाणीवपूर्वक केलेले असते व ते कलेच्या पातळीवर पोहोचवलेले असते. या दृष्टीने नक्कल हा नाटकाप्रमाणेच दृक्‌श्राव्यात्मक कलाप्रकार मानता येईल. मात्र नकलांतील अभिनय आणि नाटकातील अभिनय यांत मूलतःच फरक आहे. नाटकातील अभिनय सापेक्ष असतो. लेखकाने निर्माण केलेली भूमिका नटाला अभिनयाद्वारे साकार करावयाची असते. नाटकातील अभिनय नाटककाराने कथासूत्राच्या अनुरोधाने जे पात्रांचे स्वभावविशेष योजले असतील, त्यांना अनुरूप असतो. शिवाय नाटकातील भूमिकाप्रकटन नटसापेक्ष असते. नाटककाराने निर्माण केलेली एकच भूमिका अनेक नटांच्या आविष्कारांतून त्यांच्या भिन्न आकलनक्षमतेमुळे व दृष्टिकोणांमुळे वेगवेगळी रूपे धारण करते. त्या भूमिकेचा अन्वयार्थ व आविष्कार यांबाबत नट कल्पकतेने स्वतःचा दृष्टिकोण अंमलात आणू शकतो. हे कल्पनाविष्काराचे स्वातंत्र्य नकलाकाराला नसते. अस्सलाची हुबेहुब प्रतिकृती निर्माण करणे हेच नकलांचे उद्दिष्ट असल्याने, नकलांद्वारा ज्या व्यक्तीचे व्यक्तिदर्शन घडवावयाचे, तिचे सहीसही अनुकरण करण्यातच नकलांचे यश सामावलेले असते. असा अनुकरणात्मक अभिनय छायाचित्राप्रमाणे प्रतिकृतिदर्शक असावा लागतो. नकलेमध्ये केवळ बाह्यांगसदृशताच असते असे नव्हे, तर त्या व्यक्तीच्या अंतरंगाचा, अभ्यंतरानुकरणाचा अंतर्भावही तीत असावा लागतो. ज्या व्यक्तीची नक्कल करावयाची, त्या व्यक्तीची चर्या, आविर्भाव, बोलणेचालणे, पोषाखपद्धती, वर्तनविशेष आदी बाह्यांगांबरोबरच त्या व्यक्तीच्या अंतरंगाची, म्हणजे स्वभाववैशिष्ट्यांची नक्कल नकलाकार घडवत असतो. अनुकरण-कलेच्या बळावर तो व्यक्तिव्यक्तींतील नैसर्गिक प्रकृतिभिन्नता व स्वभावभेद यांवर मात करतो. मर्यादित अर्थाने हा जसा परकायाप्रवेश, तसाच परचित्तप्रवेशही म्हणता येईल. त्यासाठी नकलाकाराला स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा लोप घडवून मूळ व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व सर्वांगाने साकार करण्याची कला साधावी लागते. काही कसबी नकलाकार हे इतक्या उत्कृष्ट रीतीने करतात, की प्रेक्षकांना आपण नक्कल पाहत नसून मूळ व्यक्तीच पाहत आहोत, असा यथार्थ भास होतो. भोवतालच्या व्यक्ती वा प्रसंग यांतील मर्मदशीं वैशिष्ट्ये टिपून घेण्याची भेदक निरीक्षणशक्ती व मानवी स्वभावाचे मार्मिक अवलोकन, ही नकलाकाराची सामग्री. शरीर व आवाज ही त्याची माध्यमे. ही माध्यमे त्याला अत्यंत लवचिकपणे हाताळता येण्यावरच नकलाकार म्हणून त्याचे यश अवलंबून असते. नक्कल ही एकाच व्यक्तीची म्हणजे ‘एकेरी’ जशी असू शकते त्याप्रमाणे अनेक व्यक्तींची एकाच वेळी संवादात्मक शैलीने ‘बहुरूपी’ नक्कलही सादर केली जाते [→बहुरूपी खेळ]. पूर्वीच्या काळी महाराष्ट्रात नकलाकार ही संस्था ⇨ बहुरूपी या स्वरूपात अस्तित्वात होती. बहुरूपी वा हरदास-पुराणिक आपल्या कथा-पुराणांतूनज्या हरदासी नकला सादर करीत, त्यांचा उद्देश केवळ घटकाभर रंजनापुरताच मर्यादित होता. कलात्मक व्यक्तिदर्शनाचे गांभीर्य त्यात नव्हते. व्यक्तिदर्शनाप्रमाणेच पशुपक्ष्यांचे हुबेहूब ध्वनी काढणे, हाही नकलांचा एक प्रकार आहे. अशा प्रकारच्या नकलांमध्ये कित्येकदा ध्वनिसाधर्म्य एवढे परिणामकारक साधलेले असते, की ते पशुपक्षीच प्रत्यक्षात रंगमंचावर आल्याचा भास होतो. काही नकलाकार कावळ्यांचा ध्वनी इतका हुबेहूब काढतात, की तो ऐकून कावळे आकाशात जमा होऊन नकलाकाराच्या डोक्यावर घिरट्या घालू लागतात. प्राचीन मूकनाट्य (माइम) या प्रकारातही अनुकरणकलेचा आद्य आविष्कार आढळतो. ‘माइम’ याचा शब्दशः अर्थच ‘अनुकरण’ असा आहे. प्राचीन ग्रीक युद्धनृत्यामध्ये युद्धाचा अनुकरणात्मक अभिनय केला जात असे. पशुपक्ष्यांचा अनुकृतिदर्शक अभिनयही त्या काळात रूढ होता. ढगांचा गडगडाट, घोड्यांचे खिंकाळणे अशा प्रकारचे ध्वनी अनुकरणाने निर्माण केले जात. ग्रीक डोरिक जमातीतील कलाकार अशा नकलांमध्ये, तसेच आंगिक हावभाव व मुद्राभिनय यांत पारंगत होते.

नकलाकार भोंडे व ह. भ. प. पांगारकर यांच्या वेषात

महाराष्ट्रामध्ये गोपाळ विनायक भोंडे (१८८१—१९६४) हे आद्य व श्रेष्ठ नकलाकार मानले जातात. एकेकाळी त्यांनी बालगंधर्वाप्रमाणेच अवघ्या महाराष्ट्राला आपल्या नकलांनी वेड लावले होते. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, ह. भ. प. पांगारकर, लोकनायक अणे, भालाकार भोपटकर, बॅ. जम्नादास मेहता, रँग्लर परांजपे इ. श्रेष्ठ व नामवंत व्यक्तींच्या हुबेहूब व प्रत्ययकारी नकला वठवून त्यांनी त्या त्या व्यक्तींचे महाराष्ट्राला जणू पुनर्दर्शनच घडविले. श्रेष्ठ नाटककार राम गणेश गडकरी यांनी ‘भोंडे यांची नक्कल केवळ वरकांती नसून ते त्या व्यक्तीच्या आत्माची नक्कल करतात’, हे काढलेले उद्‌गार अगदी सार्थ आहेत. वामनराव परांजपे यांनी नकलाकार भोंडे : व्यक्ती आणि कला (१९५७) या पुस्तकात या श्रेष्ठ नकलाकाराच्या व्यक्तिमत्त्वाची व कलेची ओळख करून दिलेली आहे. भोंडे यांची परंपरा चालवणारे सदासंद जोशी, रणजित बुधकर, एच्. जी. घोडके, शाहीर नानिवडेकर इ. नकलाकार प्रख्यात आहेत. विदर्भातील एक आद्य नकलाकार दादा कोठीवान (१९०४—  ) यांच्या नकलांची टांगेवाला आणि इतर नकला (१९६९) ही पुस्तिका प्रसिद्ध आहे. ‘एच्. एम्. व्ही.’ कंपनीने त्यांच्या काही नकलांच्या ध्वनिमुद्रिका केल्या आहेत. नाना रेटर हेही विदर्भातील एक प्रसिद्ध नकलाकार होत.

इनामदार, श्री. दे.