नंदुरबार : धुळे जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ५४,०७० (१९७१). हे धुळ्याच्या वायव्येस सु. ५१·५ किमी. असून खानदेशातील प्राचीन शहरांपैकी एक आहे. तिसऱ्या शतकातील कान्हेरी लेण्यातील कोरीव लेखांत उल्लेखिलेले ‘नंदीगृह’ म्हणजेच आधुनिक नंदुरबार होय. स्थानिक दंतकथेनुसार याची स्थापना नंद या गवळी राजाने केली. गवळी राजांच्या (यादवांच्या) हाती हे बराच काळ होते. पूर्वी हे ‘सुंदर शहर’ म्हणून प्रसिद्ध होते. सुमारे १३४२ मध्ये इब्न बतूतानेही या शहरास भेट दिली होती. १९४२ च्या चळवळीतील गोळीबारात स्वातंत्र्यासाठी ज्याने आपले प्राणार्पण केले, तो शिरीषकुमार येथीलच. ज्या चौकात त्याने आपले रक्त सांडले, तेथे त्याचे स्मारक उभारले आहे.
तापी व्हॅली लोहमार्गामुळे नंदुरबारला व्यापारी दृष्ट्या अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे. येथून मिरची, तूर, उडीद, मूग, अंबाडी, तीळतेल आणि इमारती लाकूड इ. वस्तू मुंबई, अहमदाबाद, सुरत इ. ठिकाणी पाठविल्या जातात. येथील मिरच्यांची बाजारपेठ महाराष्ट्रात मोठी आहे. शहरात शेती उत्पादन बाजार समिती असून अनेक लघुउद्योग आहेत. जुना किल्ला, जामा मशीद, राम मंदिर, विठ्ठल मंदिर आणि तलाव ही येथील प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. येथे १८६७ पासून नगरपालिका आहे. शहरात प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालये, एक कला-वाणिज्य महाविद्यालय असून चार ग्रंथालये आहेत.
कांबळे, य. रा.
“