ध्यानचंद : (१९०५ –    ). जगप्रसिद्ध भारतीय हॉकीपटू. तो वयाच्या पंधराव्या वर्षापासून हॉकी खेळू लागला. या खेळातील नैपुण्यामुळेच ‘पंजाब रायफल्स’ पलटणीत त्याला नोकरी मिळाली. १९२६ मध्ये हिंदी-सैनिकी हॉकी संघाबरोबर न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया येथील हॉकी सामन्यांत तो ‘सेंटर फॉरवर्ड’ म्हणून खेळला व त्याने १२५ पेक्षा अधिक गोल केले त्यामुळे त्याला विशेष लोकप्रियता लाभली. १९२८ साली ॲम्स्टरडॅम येथील ऑलिंपिक सामन्यासाठी भारतीय हॉकी संघातून त्याची निवड झाली, त्यावेळी त्याने वैयक्तिक १०० पेक्षा जास्त गोल केले. १९३२ च्या लॉस अँजेल्सच्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी त्याची पुन्हा निवड झाली. या दोन्ही ऑलिंपिक सामन्यामध्ये भारताला हॉकीमध्ये अजिंक्यपद मिळवून देण्यात त्याची कामगिरी विशेष मोलाची ठरली. त्याच्या नेतृत्वाखाली १९३५ मध्ये भारतीय हॉकी संघ न्यूझीलंडला गेला. तिथे खेळले गेलेले सर्व म्हणजे ४८ सामने भारताने जिंकले व एकूण ५८४ गोल केले त्यांपैकी ध्यानचंदने ४३ सामन्यांमध्ये व्यक्तिगत २०१ गोल करून एक आगळा उच्चांक प्रस्थापित केला. १९३६ मध्ये बर्लिन ऑलिंपिकसाठी त्याच्या नेतृत्वाखाली गेलेल्या भारतीय हॉकी संघाने लागोपाठ तिसऱ्यांदा अजिंक्यपद मिळवून हॉकीक्षेत्रात एक उज्ज्वल परंपरा निर्माण केली. या ऑलिंपिकच्या अंतिम सामन्यात जर्मनीचा ८–१ असा पराभव करताना एकट्या ध्यानचंदने ६ गोल करून विक्रम केला. ध्यानचंद हा आंतरराष्ट्रीय हॉकीविश्वात सर्वश्रेष्ठ ‘सेंटर फॉरवर्ड’ खेळाडू मानला जातो. गोल करण्याची आर्श्चयजनक क्षमता त्याला लाभली होती व त्यामुळेच हॉकीक्षेत्रातील ‘जादूगर’ (विझर्ड) असे त्याला गौरवाने संबोधण्यात येत असे. भारतीय हॉकीला जगामध्ये अजिंक्य स्थान मिळवून देण्याचे श्रेय बव्हंशी त्याला आहे. तीन ऑलिंपिक सामन्यात (१९२८, १९३२ व १९३६) त्याने ओळीने ऑलिंपिक सुवर्णपदके मिळविली. १९३६ नंतर ग्वाल्हेर संस्थानात तो लष्करी अधिकारी म्हणून होता. तेथून निवृत्त झाल्यानंतर भारतीय हॉकी संघाला प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्याचे कार्य त्याने केले. १९५२ मध्ये गोल  या शीर्षकाने त्याने आपल्या आठवणी प्रसिद्ध केल्या.

शहाणे, शा. वि.