धोलपूर : राजस्थान राज्याच्या भरतपूर जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे ठिकाण व पूर्वीच्या धोलपूर संस्थानची राजधानी. लोकसंख्या ३१,८६५ (१९७१) आग्र्याच्या दक्षिणेस सु. ५५ किमी. वर मुंबई–आग्रा या राष्ट्रीय हमरस्त्यावरील व मध्य लोहमार्गावरील स्थानक. अकराच्या शतकात धोलन देव राजाने हे शहर वसविले असावे. १५०१ व १५२६ मध्ये अनुक्रमे सिकंदर लोदी व बाबराने हे आपल्या ताब्यात घेतले होते. शहराच्या पश्चिमेस ५ किमी. वर तांबड्या दगडांची खाण असून शहरातील घरेही या दगडांनीच बांधलेली आहेत. पूर्वी शहर चंबळ नदीकाठीच वसले होते परंतु नदीच्या पुरामुळे हल्लीचे शहर नदीपासून उत्तरेस ४ किमी. वर वसले आहे. सभोवती मंदिरे असलेला पवित्र मचकुंद तलाव जवळच असून तेथे दरवर्षी यात्रा भरते. याच्या आसमंतात पिकणाऱ्या मका, कापूस, गहू, हरभरा यांचे तसेच तांबड्या दगडांचे हे व्यापारी केंद्र आहे. दळणवळणाच्या उत्तम सोयी, मोठी बाजारपेठ व कच्च्या मालाचा स्थानिक पुरवठा यांमुळे येथील काच कारखान्याचा विशेष विकास झालेला असून येथे गालिचे तयार करण्याचा व्यवसायही चालतो. येथे नगरभवन, घंटाघर, अनाथालय, राजवाडा, तांबड्या वालुकाश्माचा किल्ला, बीबी झरीनाची कबर व नदीजवळील प्राचीन किल्ल्याचे अवशेष इ. वास्तू, तसेच दवाखाने, उद्याने, कर्मशाळा, प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविद्यालय वगैरे सोयी आहेत. लोकांचे होणारे स्थलांतर आणि चोऱ्या व दरोडे यांमुळे येथील लोकसंख्या सर्वसाधारण स्थिर आहे.
चौधरी, वसंत