धूर्जटि : (सोळावे शतक). कृष्णदेवरायाच्या दरबारातील अष्टदिग्ग्जांपैकी एक नामवंत तेलुगू कवी. कृष्णदेवराय ह्या वैष्णव सम्राटाच्या दरबारात हा शैव कवी मान्यता पावला हे विशेष होय. माता-पिता सिंगम्मा व नारायणामात्य. शृंगाराऐवजी भक्तीला प्राधान्य, राजसेवेविषयी प्रतिकूल मत आणि ईश्वरदत्त प्रतिभेचा ईशसेवेसाठीच उपयोग करण्याची प्रवृत्ती, ही धूर्जटी कवीची वैशिष्ट्ये होत.

श्रीकाळहस्तिक्षेत्र माहात्ममु काळहस्तीश्वर शतकमु हे त्यांचे दोन ग्रंथ होत. हे दोन्हीही ग्रंथ त्यांतील मधुर अभिव्यक्ती, तरल संवेदनशीलता आणि उत्तुंग कल्पकतेसाठी प्रसिद्ध आहेत. यांतील पहिला ग्रंथ म्हणजे प्रबंध (महाकाव्य) शैलीत लिहिलेले स्थलपुराण होय. श्रीकाळहस्ती हे तिरुपतीजवळील एक शैवतीर्थ असून त्यावर कवीने हे काव्य लिहिले आहे. यातील कथा स्कंदपुराणातून घेतली आहे. ज्ञानावाचूनही दृढ भक्ती सफल होते, हे या काव्याचे सूत्र आहे. श्री म्हणजे कोली कीटक, काळ म्हणजे सर्प आणि हस्ती म्हणजे हत्ती हे प्राणी तसेच व्याधयुवक तिन्ना, कवी नत्कीर, वेश्या इ. मानव यांच्या कथांच्या द्वारा वरील सूत्र वाचकांच्या मनावर त्यात बिंबविले आहे. यातील प्रत्येक कथा एखाद्या लहानशा प्रबंधाप्रमाणे रंगविली आहे. सवपुराणानंतर याच काव्याने शिवभक्तीचा दक्षिणेत प्रभावी प्रचार केला. या काव्यातील काही भागात करुण रसाचा परमोत्कर्ष साधला आहे. अनुरूप भाषेची योजना करण्याचे चातुर्य कवीने त्यात दाखविले आहे. काही ठिकाणी संस्कृत समासयुक्त शब्द असूनही काव्याची आकर्षकता त्यामुळे कमी झालेली नाही.

त्याचा काळहस्तीश्वर शतकमु हा ग्रंथ तेलुगू साहित्याचा एक अमूल्य ठेवा मानला जातो. धूर्जटीच्या मृदुमधूर भाषेची कृष्णदेवरायाने प्रशंसा केली आहे. धूर्जटीचा नातू कुमार धूर्जटी हाही एक थोर कवी म्हणून प्रसिद्ध असून त्याने १५५० च्या सुमारास कृष्णदेवराय विजयमु हे कृष्णदेवरायाच्या एका स्वारीचे व तीत त्याने मिळविलेल्या विजयाचे वर्णन करणारे प्रसिद्ध काव्य लिहिले. ऐतिहासिक दृष्ट्या व काव्यदृष्ट्या ते महत्त्वाचे मानले जाते.

टिळक, व्यं. द.