धुळे जिल्हा : महाराष्ट्र राज्याचा वायव्य सीमावर्ती जिल्हा. क्षेत्रफळ १३,१४३ चौ. किमी. लोकसंख्या १६,६२,१८१ (१९७१). विस्तार २०° ३८′ उ. ते २२° ३’ उ. आणि ७३° ४७′ पूर्व ते ७५° ११′ पू. या दरम्यान याच्या नैर्ऋत्येस पश्चिमेस व वायव्येस गुजरात राज्याचे सुरत, डांग व भडोच जिल्हे, उत्तरेस मध्य प्रदेश राज्याचा नेमाड जिल्हा, पूर्वेस महाराष्ट्राचा जळगाव जिल्हा व दक्षिणेस नासिक जिल्हा हे आहेत. जिल्ह्याची लांबी सु. १०० ते १३० किमी. व रूंदी सु. ५२ ते १२२ किमी. असून उत्तरेस अक्कलकुवा व तळोदा आणि दक्षिणेस नंदुरबार या तालुक्यांदरम्यान गुजरात राज्याची एक चिंचोळी पट्टी तापी खोऱ्यात घुसलेली आहे. जिल्ह्याच्या उत्तर व दक्षिण सीमांवरील बराचसा भाग डोंगराळ असला, तरी मध्यभाग तापी नदीच्या खोऱ्यात मोडत असल्यामुळे काहीसा सपाट आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ राज्याच्या क्षेत्रफळाच्या ४·१०% असून लोकसंख्या राज्याच्या लोकसंख्येच्या ३·२% आहे.
भूवर्णन : जिल्हा काहीसा डोंगराळ असून त्यात डोंगरांच्या दोन प्रमुख मालिका आहेत. उत्तरेकडील अक्कलकुवा तालुक्याचा उत्तर भाग धडगाव (अक्राणी महाल) शहादे व शिरपूर तालुके हे भाग सातपुड्याच्या कुशीत असून तोरणमाळ हे अक्राणीमधील प्रसिद्ध पर्यटन केंद्र आणि गिरिविश्रामस्थान आहे. सातपुडा मालिकेची सलगता गोमाई, अनेर यांसारख्या तापीच्या उपनद्यांना दऱ्यांमुळे भंग पावली आहे. जिल्ह्याच्या नैऋत्य सरहद्दीवर सह्याद्री पर्वत असून जिल्ह्याच्या दक्षिण भागात सातमाळा रांगेतील गाळण्याचे डोंगर, धानोऱ्याचे डोंगर इ. नावांनी त्याच्या शाखा पूर्व-पश्चिम पसरल्या आहेत. या भागात असंख्य भित्ती व उर्वरित टेकड्याही आढळतात. या दोन डोंगराळ भागांदरम्यान तापीची सुपीक खचदरी आहे. नवापूर आणि पश्चिम नंदुरबार हे सह्याद्रीच्या पश्चिमेस तापीकडे उतरत गेले आहेत.
सातपुड्याच्या रांगा एकामागे एक ६०० मी.पर्यंत चढत जातात व मग नर्मदेकडे एकदम उतरतात. त्यांपैकी एका रांगेत १००० मी. पेक्षा उंच अनेक शिखरे असून त्यांपैकी खाई नदीच्या उत्तरेचे १,०१७ मी. व तोरणमाळचे १,१५५ मी. उंचीची ही शिखरे लक्ष वेधक आहेत. याच्या दक्षिणेकडील रांगेत गुलीअंबाच्या उत्तरेचा १२०८ मी. उंचीचा बोक्सा डोंगर, नांदवणच्या पूर्वेस व पश्चिमेस अनुक्रमे १,२३३ मी. १,२०० मी. उंचीची शिखरे व १,३२५ मी. उंचीचा अस्तंभा डोंगर आहेत. अस्तंभा डोंगर जिल्ह्यात सर्वांत उंच असून अश्वत्थाम्याशी संबंधित असल्यामुळे पवित्र मानला जातो.
जिल्ह्याच्या इतर भागांतून अक्राणी महालात जाण्यास सातपुडा पर्वतात चार खिंडी आहेत. त्यापैकी तीन खिंडीतून रस्ते आहेत. या खिंडीमार्गे गुजरातमधील लोक व शहाद्याचे वंजारी व्यापारी या भागातील धान्य व चारोळ्या मोहाची फुले, मध, मेण, डिंक, लाख, राळ इ. जंगल उत्पन्नांचा मोठा व्यापार करतात. सह्याद्रीत निझामपूरच्या पश्चिमेची कोंडईबारी व नैऋत्येची कळंबजवळची अशा दोन प्रमुख खिंडी आहेत. सह्याद्रीत पिंपळनेरच्या दक्षिणेस १,२९१ मी. १,३२४ मी. व १,३३१ मी. उंचीची मंगीतुंगीची शिखरे आहेत. सह्याद्रीच्या या गाळणा डोंगराच्या पूर्वेच्या शेलबारी खिंडीतून पिंपळनेर-सटाणा-नासिक रस्ता जातो. पूर्वेस धुळे शहराजवळचे डोंगर फक्त ६०० मी. उंच आहेत.
तापी नदीचे खोरे गाळाने तयार झाले असून अनेक उपनद्यांनी झीज केल्यामुळे त्यामध्ये घळ्या पडल्या आहेत. अशा प्रकारच्या घळ्या वाहतुकीच्या दृष्टीने अडथळे ठरतात. गाळमैदानावर डोकावणाऱ्या टेकड्या उर्वरित प्रकारच्या असाव्यात. उत्तर भागातही अनेक ठिकाणी भित्ती आहेत.
पश्चिमवाहिनी तापी ही जिल्ह्यातील मुख्य नदी असून जिल्ह्यात तिची लांबी सु. ८६ किमी. आहे. तापी ही तिच्या दक्षिणेकडील शिंदखेड व नंदुरबार आणि उत्तरेकडील शिरपूर व शहादे या तालुक्यामधील सीमा आहे. ती तापी-अनेर संगमाजवळ जळगाव जिल्ह्यातून धुळे जिल्ह्यात शिरते आणि तापी-गोमाई आणि तापी-वाकी संगमांदरम्यान जिल्ह्याबाहेर गुजरातच्या सुरत जिल्ह्यात जाते. जिल्ह्यात तापीशिवाय इतर अनेक लहान नद्या असून त्या सर्व तापीलाच येऊन मिळतात. उत्तरेकडून येणाऱ्या नद्यांमध्ये अनेर, बालेर, अरुणावती, गोमाई व वाकी या मुख्य असून वाकी सातपुड्यातून बाहेर पडते. तेथे अनकदेव येथे गरम पाण्याचा झरा आहे. दक्षिणेकडील उपनद्यांत बोरी, पांझरा, बुराई, अमरावती, भद, शिवा, नागन, रंगवल्ली, पाताळगंगा, सानपान, नेसू इ. नद्यांचा समावेश होतो. अमरावतीला मिळणारी नाई ईशान्यकडे वळते, तेथे इंदवे येथे गरम पाण्याचा झरा आहे. उत्तरेकडून येणाऱ्या नद्या सातपुड्यात उगम पावतात व त्यांना खालच्या भागात जवळजवळ बाराही महिने पाणी असते. दक्षिणेकडील नद्या सह्याद्रीमध्ये उगम पावतात व त्या प्रथम भित्तींच्या कडेकडेने पूर्वेस व भित्ती संपल्यावर किंवा तिच्यात फट असेल तेथे एकदम उत्तरेकडे तापीस मिळावयास जातात. या नद्या उत्तरेकडील नद्यांच्या मानाने मोठ्या आहेत. या सर्व नद्यांचा सिंचनासाठी शक्य तेवढा उपयोग करून घेतलेला आहे.
जिल्ह्याच्या उत्तर सीमेच्या पश्चिमेकडील सु. ७० किमी. लांबीवरून नर्मदा वाहते. तिला सातपुड्याच्या उत्तर उतारावरून अरूंद घळ्या मधून वाहणाऱ्या झारकल, उदाई, खाई, सांबर, देवगंगा या प्रमुख उपनद्या मिळतात. त्यांचा शेतीसाठी फारसा उपयोग होऊ शकत नाही. जिल्ह्यात डेडरगाव, मुक्ती, गोंदूर, नकाणे, तोरणमळ इ. १३ लहान-मोठे तलाव असून त्यांचे क्षेत्र सु. ८१० हे. आहे.
जिल्ह्यात जमिनीचे सर्वसाधारणपणे तीन प्रकार आढळतात : (१) रेताड भुसभुशीत जमीन, (२) काळी मध्यम प्रकारची जमीन आणि (३) काळी कसदार जमीन. काळी कसदार जमीन सर्वात सुपीक असून ती तापी नदीच्या दोन्ही बाजूंस १५ किमी.पर्यंत आढळते. येथे ही जमीन तापी नदीने वाहून आणलेल्या गाळाने तयार झालेली असल्याने तिची सुपीकता अधिक असून ती कायम टिकण्यास दरवर्षी येणाऱ्या पुरांची मदत होते. या जमिनीत जिल्ह्यातील लागवडी खालील क्षेत्राच्या एकूण ३५% क्षेत्र असून त्यात कपाशी, गहू, भुईमुग यांसारखी पिके काढली जातात. काळी मध्यम प्रकारची जमीन तापीच्या उपनंद्यांच्या खोऱ्यात आढळते व तीत दादर (रब्बी ज्वारी), ज्वारी, कापूस, भुईमूग यांसारखी पिके काढली जातात. रेताड जमीन डोंगराळ भागात आढळते. शेतीच्या दृष्टीने ती सुपीक नसली, तरीदेखील, लागवडीखालील सु. निम्मे क्षेत्र या जमिनीत विखुरले आहे. बाजरी, ज्वारी, नाचणी व भुईमूग ही येथील महत्त्वाची पिके होत. या भागातील शेतीच्या पद्धती निकृष्ट असल्यामुळे उत्पादनाचा उतारा कमी आढळतो.
जिल्ह्याचे हवामान विषम असून वार्षिक सरासरी तपमानकक्षा सु. ११° से. आहे. वर्षाचे कमाल तापमान सु. ४५° से. असून ते मे महिन्यात आढळून येते. तर किमान तापमान सु. १२° से. डिसेंबर-जानेवारी महिन्यांत आढळते. जिल्ह्यात उन्हाळी सरासरी तापमान ३०° से. ते ३५° से. असते, तर हिवाळी सरासरी तपमान २३° ते २५° से. इतके आढळते. सबंध जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६७·४ सेमी. असून पश्चिमेकडे नवापूर येथे ते १०९·७ सेमी. आहे, तर पूर्वेकडे धुळे येथे ६०·९ सेमी. शिरपूर येथे ६१·६ व साक्रि येथे ४९·३ सेंमी. आहे. उन्हाळ्यात बंगालच्या उपसागरावरून आणि त्यानंतर नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या काळात अरबी समुद्रावरून येणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे व आवर्तामुळे गडगडाटी वादळी पाऊस बराच पडतो. पाऊस सर्वसाधारण जूनच्या मध्यास सुरू होतो व ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पडत असतो. पाऊस बराचसा अनियमित असल्यामुळे जिल्ह्याचा पूर्वभाग दुष्काळपीडित आहे.
धुळे जिल्हा जंगलसंपत्तीसाठी प्रसिद्ध असून जंगलाखालील जमिनीचे क्षेत्र सु. ३६·६७% आहे. त्यापैकी ८३·२५% राखीव आणि बाकीचे खाजगी आहे. बरेचसे जंगल साहजिकच डोंगराळ भागात आहे. येथे झाडांचे अनेक प्रकार आढळत असले तरी आर्थिक दृष्ट्या साग, सादडा, खैर, शिसव, पळस, सलाई, अंजन, ऐन, धावडा, बांबू इ. झाडे महत्त्वाची आहेत. धुळे, साक्री, पिंपळनेर यांजवळच्या प्रदेशात गवताळ कुरणे व काटेरी झुडुपे आढळतात. येथे होणाऱ्या गवताच्या अनेक प्रकारांपैकी ‘रोशा’ हे गवत औषधीसाठी आणि सुंगधी मालासाठी महत्त्वाचे आहे. डिंक, मध, मेण, राळ, लाख, चारोळ्या, मोहाची फुले इ. इतर जंगली पदार्थ या जिल्ह्यात मिळतात. निंबू, आंबा, जांभूळ, निर्गुडी, करंजबी, चिंच, बाभूळ इ. उपयुक्त झाडेही आहेत. जंगल कामगारांच्या सहकारी संस्था आहेत. वनसंपत्तीप्रमाणे प्राणीजीवनही संपन्न आहे. सतराव्या शतकात धुळ्याच्या उत्तरेस रानटी हत्ती होते व अठराव्या शतकात या भागात सिंहाची शिकार झाल्याचे उल्लेख सापडतात. सध्या वाघ, चित्ता, तरस, लांडगा, सांबर, ससा, कोल्हा, हरिण, अस्वल, माकड, वानर, रानडुक्कर, चितळ, काळवीट, चिंकारा, नीलगाय इ. अनेक प्रकारचे प्राणी येथे आढळतात. मात्र जंगलतोड व शिकार यांमुळे प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. जिल्ह्यात कावळा, चिमणी, कोकिळ, मैना, निळकंठ, तितर, पिंगळा, लाव्हा, शिंपोण, मोर, खंड्या, टिटवी, घुबड, वटवाघूळ, ससाणा, घार, गिधाड, सुतार इ. विविध प्रकारचे पक्षी, नाग, साप, फुरसे इ. सरपटणारे प्राणी व अनेक प्रकारचे कीटक आढळतात. जिल्ह्यातील नद्यांत व तलावात रोहू, मृगळ, सालपे, बोदाड, कटला, तेंग्रा इ. मासे सापडतात. मच्छीमारांच्या तीन सहकारी संस्था आहेत.
प्राचीन काळी हा प्रदेश ‘ऋषिक’ नावाच्या प्रदेशात मोडत असे. त्याच्या पूर्वेस विदर्भ (वऱ्हाड), उत्तरेस अनूप किंवा महिषक (माळवा) व दक्षिणेस अश्मक (मराठवाडा) हे प्रदेश होते. पूर्वी याचा बराच भाग पश्चिम खानदेश जिल्ह्यात होता. धुळे जिल्हा हे नाव १९६० मध्ये आले. यादव राजा कान्हेरदेव, सेऊणदेश किंवा खानाचा देश यांवरून खानदेश नाव पडले असावे असा तर्क आहे. अकबराच्या काळात हा दानदेश होता. जोर्वे, नेवासे, दायमाबाद, बहाळ व प्रकाशे येथील उत्खननांवरून ताम्रपाषाणयुगात येथे वस्ती असावी असे दिसते. सातवाहन, शुंग, रूद्रदामन् यांच्या सत्ता येथे इ. स. पू. दुसऱ्या शतकापासून इ. स. दुसऱ्या शतकापर्यंत होऊन गेल्या असाव्या. पाचव्या-सहाव्या शतकांत येथे आभीरांची सत्ता असावी. महाराष्ट्रात इतरत्र चालुक्यांची सत्ता आली, तरी या भागात गुप्तांचे मांडलिक वाकाटक यांची सत्ता होती. पुढे दहाव्या शतकापर्यंत राष्ट्रकूटाच्या अंमलाखालील मोठ्या भूभागास खानदेशाचा समावेश झाला. राष्ट्रकूटांनंतर चालुक्य आले. तथापि या प्रदेशावर सिन्नरच्या यादवांची सत्ता होती व सेऊणदेश म्हणून तो ओळखला जाई. देवगिरीच्या यादवांचे साम्राज्य इ. स. १३१० पर्यंत होते. अलाउद्दीन खलजीने त्यांचा पराभव केला. दिल्लीचा सुलतान फिरुझशाह तुघलक याला गुजरातवरील १३७० च्या स्वारीत मदत केली म्हणून त्याने मलिक हाज फरूकी या अरबास थाळनेर व करवंद हे सुभे बक्षीस दिले. या फरूकीने सर्व खानदेश आपल्या कबजात आणला. या काळात हा प्रदेश समृद्ध होता. सोळाव्या शतकात काही भागावर राजपुतांचीही सत्ता होती. अकबराच्या कारकीर्दीत या प्रदेशात मोगल सत्ता आली. १६३० च्या सुमारास लढाई व दुष्काळ यांनी येथील लोक जर्जर झाले होते. सतराव्या शतकाच्या मध्यास खानदेश चांगला संपन्न होता. १६७० मध्ये शिवाजी महाराजांची प्रतापराव गुजर यास या भागात चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्यास पाठविले. १७०८ मध्ये शाहू राजाने हा भाग लुटला होता. निजामुल्मुल्कने खानदेश जिंकल्यावर त्याचा मराठ्यांशी संघर्ष होऊ लागला व १७५२ च्या सुमारास भालकीच्या तहाने मराठ्यानी पुन्हा खानदेश मिळविला. पुढे पेशव्यांच्या भाऊबंदकीचा परिणाम खानदेशावरही झाला. १७९५ मध्ये खानदेशाचा काही भाग होळकरांकडे व काही शिद्यांकडे गेला परंतु पुढे शिंदे, होळकर, इंग्रज आणि पेशवे यांच्या लढाया आणि भीषण दुष्काळ यांमुळे अस्वस्थता माजून लोक त्रस्त झाले. त्यात भर म्हणून पेंढाऱ्यांचा उपद्रव होऊ लागला. १८१८ मध्ये इंग्रजांनी मराठ्याचे राज्य खालसा केले. कॅप्टन ब्रिग्ज या इंग्रज अधिकाऱ्याने धुळे हे या भागाचे मुख्य ठाणे करून शांतता प्रस्थापित केली. सुमारे पाऊनशे वर्षे हैराण झालेल्या प्रजेस थोडी स्वस्थता मिळावी. मग १८५७ चा स्वातंत्र्यसंग्राम सुरू झाला. त्याचा मोड झाला आणि इंग्रजांच्या राज्याची मोहिनी काही काळ टिकली. तरी लोकांची स्वातंत्र्यप्रीती जागृत राहून १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाल्यावर हा भागही राजकीय दृष्ट्या शांत झाला.
सध्याचे धुळे व जळगाव जिल्हे व नासिक जिल्ह्यातील मालेगाव, नांदगाव व बागलाण तालुके मिळून इंग्रजी अमलात खानदेश जिल्हा होता. १८६९ मध्ये वरील तीन तालुके नासिक जिल्ह्यात समाविष्ट झाले व १९०६ मध्ये खानदेशाचे पूर्व खानदेश आणि पश्चिम खानदेश असे दोन जिल्हे झाले. पश्चिम खानदेशात धुळे, नंदुरबार, नवापेटा, पिंपळनेर, शहादे, शिरपूर, शिंदखेड, तळोदा हे तालुके राहिले. १८८७ मध्ये पिंपळनेर तालुक्याचे ठाणे साक्री येथे आले व १९०८ मध्ये तालुक्याचे नावही साक्री झाले. १९५० मध्ये अक्कलकुवा हा नवा तालुका झाला. त्याच वर्षी नासिक जिल्ह्यातील चार भडोच जिल्ह्यातील एक गाव या जिल्ह्यात घातले गेले. १९६० च्या राज्यपुनर्रचनेत नवापूरमधील ३८, नंदुरबारमधील ३८, तळोद्यातील ४३ व अक्कलकुवामधील ३७ गावे गुजरात राज्यात घातली गेली आणि जिल्ह्याचे नाव पश्चिम खानदेशाऐवजी धुळे जिल्हा असे बदलण्यात आले.
प्रशासनासाठी धुळे जिल्हाचे अक्राणी महाल आणि अक्कलकुवा, तळोदा, शहादे, नंदुरबार, शिरपूर, शिंदखेड, नवापूर, साक्री व धुळे हे नऊ तालुके असे एकूण १० विभाग केलेले आहेत. जिल्हाचे धुळे व नंदुरबार असे दोन उपविभाग असून धुळे उपविभागात धुळे, शिरपूर, शिंदखेड आणि साक्री हे तालुके येतात व बाकीचे नंदुरबार उपविभागात आहेत. धुळे जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या मुंबई विभाग आयुक्ताच्या अधिकारकक्षेत येतो. हा आयुक्त विभागीय विकास मंडळाचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. जिल्ह्यातून राज्याच्या विधानसभेवर नऊ व देशाच्या लोकसभेवर दोन प्रतिनिधी निवडून जातात.
जिल्हा व सत्र न्यायधीश आणि त्यांच्या हाताखाली दोन सहाय्यक न्यायधीश आणि दोन सहाय्यक सत्र न्यायधीश जिल्ह्यातील न्याय व्यवस्था पाहतात. त्यांशिवाय दिवाणी न्यायधीश-वरिष्ठस्तर व १६ दिवाणी न्यायाधीश-कनिष्ठस्तर, प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी आहेत. जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांनाही काही दंडाधिकाऱ्याचे अधिकार आहेत. जिल्हाधिकारी हा जिल्ह्याचा सर्व प्रमुख प्रशासनाधिकारी होय. तो नगरपालिका व ग्रामपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामावर देखरेख ठेवतो व त्यांना सल्लाही देतो. जिल्हा न्यायधीश, जिल्हा पोलीस अधीक्षक, कार्यकारी अभियंता, जिल्हा शल्यचिकित्सक, दारूबंदी, शेतकी, आरोग्य, सहकारी संस्था, उपप्रबंधक इ. अधिकारी आपापल्या खात्यांची कामे पाहतात. तसेच पाटील, तलाठी, कोतवालापर्यंतच्या इतर अनेक अधिकाऱ्यांची यंत्रणा जिल्ह्यांचा एकूण कारभार पाहते.
धुळे येथे जिल्हा कारागृह असून इतर सात ठिकाणी मॅजिस्ट्रेटच्या अधिकारातील कोठड्या आहेत. जिल्ह्यातील एकूण पोलीसदल १,३७७ लोकांचे आहे.
जिल्ह्यात १९७३-७४ मध्ये एकूण ९०३ ग्रामपंचायती व गटग्राम पंचायती होत्या. जिल्हा परिषद ही स्थानिक स्वराज्य संस्था अनेकविध खात्यांचा कारभार निर्वाचित सभासदांमार्फत करते. तिचा १९७३-७४ चा एकूण आय ११,९५,०२,००० रू. व व्यय ११,८३,२३००० रू. होता. जिल्ह्यातील शहादे, नंदुरबार, शिरपूर, दोंडाइचे, तळोदा व धुळे या नगरपालिकांचा मिळून एकूण आय १,३३,४२,००० रू. व व्यय १,२८,२७००० रू. होता.
आर्थिक स्थिती : जिल्ह्याच्या डोंगराळ स्वरूपामुळे लागवडीखालील क्षेत्र एकूण क्षेत्राच्या केवळ ४५% इतके कमी आहे. शिवाय प्रादेशिक भिन्नतादेखील खूप आढळते. अक्राणीसारख्या डोंगराळ तालुक्यात लागवडीखालील क्षेत्राची टक्केवारी ८% इतकी खाली येते, तर शिंदखेडसारख्या तापीच्या खोऱ्यातील तालुक्यात तेच प्रमाण ७५% इतके वाढते. सर्वसाधारणपणे अशा क्षेत्राचे प्रमाण तापीच्या खोऱ्यात जास्त असून डोंगराळ भागात कमी होते. लागवडीखाली असलेल्या जमिनीपैकी १३·५% जमिनीत जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध असून तेथे दुबार पीक घेणे शक्य होते. जलसिंचनाखालील जमीन बव्हंशी तापी व पांझरा या नद्यांच्या खोऱ्यात आहे. जिल्ह्यातील सु. १०·६% जमीन निरूपयोगी असून २% जमीन लागवडी योग्य असूनही पडीक आहे. ३·८३% भागात गवताची कुरणे आढळतात.
शेतीमध्ये अन्नपिकांवर भर असून एकूण लागवडीखालील जमिनीच्या ७१% जमीन अशा पिकांखाली आहे. ज्वारी व बाजरी ही प्रमुख अन्नधान्ये असून तांदूळ व गहू त्यामानाने गौण ठरतात. पर्जन्यानुसार निरनिराळ्या पिकांखालील जमिनीचे प्रमाण बदलते. नागली, मका, तूर, हरभरा व इतर डाळी ही अन्य अन्नपिके होते. नगदी पिकांमध्ये भुईमूग, तीळ, इतर तेलबिया आणि कापूस ही महत्त्वाची आहेत. मिरची हे देखील या भागातील एक महत्त्वाचे नगदी पीक आहे.
अद्यापही शेतीचा भर अन्नपिकांवरच आहे. त्यांतही ही पिके ज्वारी-बाजरीसारखी कमी किंमतीची असल्यामुळे त्यांचा अर्थोत्पादनाच्या दृष्टीने फारसा उपयोग होत नाही परंतु अलीकडे गहू, कापूस, मिरची इ. पिकांखालील क्षेत्र वाढल्याने आढळून येत आहे व त्यांपासून मिळणाऱ्या रोख पैशामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळत आहे.
जिल्ह्यात १९७२-७३ मध्ये एकूण ६०,५२४ हे क्षेत्र ओलिताखाली होते. त्यापैकी ११,९२२ हे. कालव्यांखाली ३३,०२७ हे. विहिरींनी आणि बाकीचे इतर मार्गानी भिजत होते. जिल्ह्यात करवंद, मळगाव, अनेर, बुराई, पांझरा, कानोल हे मध्यम प्रकारचे सिंचनप्रकल्प आहेत.
शेती हाच जिल्ह्यातील प्रमुख व्यवसाय असून एकूण ५,९४,६९१ कामकऱ्यांपैकी ८०·६% व एकूण लोकसंख्येपैकी ३५·८% लोक शेती व्यवसायात गुंतलेले आहेत. त्यांपैकी ३७% शेतकरी व ४४% शेतमजूर आहेत. जंगलव्यवसाय, पशुपालन, मासेमारी, शिकार, मळे, बागा इ. व्यवसायात फक्त १% कामकरी आहेत (१९७१). १९७२ मध्ये जिल्ह्यात ५,७२,९७३ गाई-बैल, १,०४,०३० म्हशी, ४०,७६७ मेंढ्या, २,९७,५३६ शेळ्या, १३,६२३ इतर पशू व ३,४०,९८० कोंबड्या-बदके होती. धुळे येथे वराहवर्धन केंद्रे आहे. कुक्कुट संवर्धनासाठी ७ केंद्रातून आदिवासींना पक्षी पुरविले जातात. बोराडी व न्याहळोद येथे मेंढ्यासंवर्धन केंद्रे आहेत. पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय वर्धन यांच्या योजना कार्यान्वित आहेत. कुटिरोद्योगामध्ये तेलघाण्या, गुऱ्हाळे, सरकी काढण्याचे कारखाने, लाकूड-कटाई, तांब्यापितळेची भांडी बनविणे, डाळी तयार करण्याच्या गिरण्या, हातमाग घोंगड्या विणणे, निर्मिती प्रक्रिया सेवा, दुरुस्ती वगैरे व्यवसाय इत्यादींचा समावेश होतो. त्यात २·६% कामकरी आहेत. या छोट्या व्यवसायांखेरीज धुळे येथील कापडगिरणी, धुळे, दोंडाईचा, शिरपूर, नरडाणे, नंदुरबार येथील तेल-गिरण्या, नंदुरबार येथील कागद व पुठ्ठे तयार करण्याचा कारखाना हे मोठे उद्योगधंदे जिल्ह्यात आहेत. त्यांत ३·३५% कामकरी आहेत. दुग्धव्यवसाय हा शेतीला जोडधंदा म्हणून केला जातो व रोज हजारो लिटर दूध मुंबईला जाते. बांधकामात ५,०६०, व्यापार वाणिज्यात २६,१०० वाहतूक, साठा, दळणवळण यांत ८,०९३ व इतर सेवांत ३४,२४१ लोक होते. तसेच बिगरकामकरी लोक १०,६७,४९० म्हणजे एकूण लोकसंख्येच्या सु. ६४·२% होते (१९७१). जिल्ह्यात १९७२-७३ मध्ये एकूण विजेचा खप ५,०१,९६,००० किवॉ. तास झाला. त्यात ६६,१२,००० किवॉ. तास घरगुती वापरासाठी ३४,८२००० किवॉ. तास उद्योगधंद्यासाठी १,९६,८३,००० किवॉ. तास शेतीसाठी व बाकी इतर कामासाठी वापर झाला. मार्च १९७४ अखेर ५३४ गावांस व ७ शहरांस वीज पुरविलेली होती.
जिल्ह्यातील वाहतुकीच्या अनेक मार्गांपैकी भुसावळ-सुरत आणि चाळीसगाव-धुळे हे मार्ग मिळून १७१·६१ किमी. लोहमार्ग आणि मुंबई-आग्रा, सुरत-नागपूर, अंकलेश्वर-इंदूर इ. रस्त्यांचा जिल्ह्यात येणारा भाग हे महत्त्वाचे मार्ग आहेत. त्यांत १४९·१० किमी. राष्ट्रीय महामार्ग ५८२·६० किमी. राज्यमार्ग १,६२१·६३ किमी. जिल्हामार्ग १,९२६·५९ किमी. ग्रामीण मार्ग मिळून ४,२७९·९२ किमी. रस्ते आहेत. त्यांतील ६८६·१० किमी. डांबरी १,३०८·३८ किमी. खडीचे व २,२८५·४४ किमी. निकृष्ट आहेत. हे रस्ते व लोहमार्ग तापीला अगर तिच्या उपनद्यांना समांतर धावतात व मंद उताराचा फायदा घेतात. रस्ते व लोहमार्ग यांच्या लगतचे भाग प्रगतिशील आहेत. डोंगराळ भागात वाहतुकीच्या सोयी फारशा नाहीत व त्यामुळे हे भाग मागासलेले आहेत.
जिल्ह्यात ३१ मार्च १९७४ रोजी मोटरसायकली, स्कूटर वगैरे १२,१०४ मोटारी ५,६५३ टॅक्सी ३७२ ऑटोरिक्षा २०४ शासकीय वाहने ८४१ मालवाहू गाड्या खाजगी ८३८, सार्वजनिक ३,४०० रुग्णवाहिका २४ शाळांच्या बसगाड्या २९ अनुवाहने १,६३१, ट्रॅक्टर २,१०६ व इतर ५४८ मिळून एकूण २८,७५० खनिज तेलचलित वाहने होती. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सु. २०० बसगाड्या दररोज ३०९ मार्गावरून व सु. ४४,३५१ किमी. प्रवास करून सरासरी ६६·२८९ प्रवाशांची वाहतूक करीत होत्या.
जिल्ह्यात १९७३-७४ मध्ये ३०१ डाकघरे ३३ तारघरे २,१५९ दूरध्वनियंत्रे व ३५,१५५ रेडिओ होते. त्यापैकी ९१७ ग्रामीण प्रक्षेपणखात्याने ग्रामीण भागात बसविलेले होते.
जिल्ह्यातील उत्पादित वस्तूंपैकी कापूस, सुती कापड, लुगडी, भूईमूग, गोडेतेल, इमारती लाकूड व जंगली उत्पन्ने, मिरची, डाळी, कागद, दूध इ. माल जिल्ह्याबाहेर जातो. जिल्ह्यात उत्पादन न होणाऱ्या चहा, कॉफी, साखर यांसारख्या जीवनावश्यक वस्तू आणि यंत्रसामग्री यांची आयात करावी लागते.
लोक व समाजजीवन : जिल्ह्याची १९७१ ची लोकसंख्या १६,६२,१८१ असून गेल्या दहा वर्षातील तिच्या वाढीचे प्रमाण २३% इतके पडते. जिल्ह्यातील लोकसंख्येची घनता चौ. किमी.ला १२७ असून ती तापीच्या खोऱ्यात सार्वाधिक व डोंगराळ भागात कमी होत जाते. खोऱ्यातील सुपीक भागातील शेतकरी काहीसे पुढारलेले असून तेथील घरबांधणीमध्ये चुना, विटा, दगड इत्यादींचा उपयोग केल्याचे आढळते. सुखवस्तू शेतकऱ्यांची घरे दुमजली असतात. घरे सर्वसाधारणपणे धाब्याची असून पश्चिम भागात पाऊस जास्त असल्यामुळे तेथे ती उतरत्या छपराची आढळतात. भाकरी अगर पोळी, डाळीचे वरण, भाज्या, दूध व तूप हे जेवणातील मुख्य पदार्थ होत. जिल्ह्यात सु. ९१·२५% लोक हिंदू, ५·९३% मुस्लिम, ०·२६% ख्रिस्ती, ०·०४% शीख, १·७४% बौध्द व ०·७८%जैन आहेत. डोंगराळ भागात आदिवासी लोक राहत असून मावची, पावरे, भिल्ल, धनका, कातकरी या प्रमुख आदिवासी जमाती होत. जिल्ह्यात अनुसूचीत जातीचे ३·७% व अनुसूचित जमातींचे ३७% लोक आहेत. आदिवासी खेडी ५-६ वाडे मिळून तयार होतात. घरे झोपडीवजा असतात. बांबू , पाने व जंगली लाकूड या स्थानिक उपलब्ध वस्तूंचा उपयोग घरबांधणीत विशेषकरून आढळतो. भाकरी, मिरचीची चटणी, डाळीचे कालवण हे आदिवासींच्या जेवणातील मुख्य पदार्थ, शिकार मिळाल्यास कधीकधी मटणही असते. आदिवासींचा पोशाख म्हणजे गुडघ्यापर्यंत धोतर, अंगात कुडते व फेटा जंगलातील आदिवासींजवळ धोतरही नसते. त्यांना लंगोटीवरच भागवावे लागते. स्त्रिया लुगडे व चोळी वापरतात. गळ्यात मणी, कवड्या यांचे दागिने व हातात सामान्यतः कथलाची कडी घालतात. याशिवाय जिल्ह्यात बैलांचा व्यापार करणारे भटके वंजारी, मेंढपाळी करणारे ठेलारी आणि शिकार करणारे फासेपारधी लोकही आढळतात.
जिल्ह्यातील सु . ८३% लोक १,३७९ खेड्यातून राहतात व उरलेले धुळे, नंदुरबार, शिरपूर, दोंडाईचा, शहादे, नवापूर, तळोदा या सात शहरात राहतात. शहरांतील लोक खेड्यातील लोकांपेक्षा सधन असल्यामुळे त्यांचे जीवनमान उच्च आहे. याचा प्रत्यय त्यांचे कपडे, घरे, खाणे-पिणे व त्यांच्याकडील सुखसोयीच्या वस्तू यांवरून येतो.
साक्षरतेचे प्रमाण १९७१ मध्ये ३१·८८% असून पुरुषांमध्ये ते ४२·९६% व स्त्रियांमध्ये २०·३०% आहे. जिल्ह्याची भाषा मुख्यतः मराठी हीच आहे. तथापि अल्प प्रमाणात गुजराती, हिंदी, उर्दू, भिल्ली इ. भाषाही आहेत. ग्रामीण भागातील मुख्य बोली अहिराणी ही आहे. ती मराठीची बोली असली, तरी तिच्यावर गुजराती, हिंदी, प्राकृत यांचा थोडा परिणाम झाला आहे. आभीर राजसत्तेमुळे ही भाषा आली असावी असे मानतात. या भाषेविषयी बरीच उलटसुलट मते आहेत. १९७२-७३ मध्ये धुळे जिल्ह्यात पूर्व-प्राथमिक शाळा ४२ होत्या व त्यांत १,३३६ मुलगे, १,०८१ मुली, प्रशिक्षित शिक्षक ४४ व साधे शिक्षक १४ होते. प्राथमिक शिक्षणाच्या शाळा १,६९४ असून त्यांत मुलगे १,३४,९३५, मुली ८५,४१६, प्रशिक्षित शिक्षण ५,७७९ व साधे शिक्षक ६४१ होते. माध्यमिक शिक्षणाच्या शाळा १७३ होत्या. व त्यांत मुलगे ३७,९२३ ,मुली १२,८०९, प्रशिक्षित शिक्षक १,६५० व साधे शिक्षक ३८३ होते. १४ उच्च शिक्षणसंस्थामध्ये मुलगे ५,८७४, मुली ७८६ व शिक्षक ३८० होते. अनुसूचित जातींच्या एकूण १८,४४८ विद्यार्थ्यांना व अनुसूचित जमातींच्या एकूण ४३,९८८ विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे शैक्षणिक साहाय्य देण्यात आले. आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या ३९,८३४ विद्यार्थांना १३,९२,३०७ रू.चे साहाय्य देण्यात आले. जिल्ह्यात मागासवर्गीय विद्यार्थ्यासाठी नंदुरबार, तळोदा, प्रकाशे, चिंचपाडा, खापर, सांगवी येथे वसतिगृह असून होळगी, सुरवाणी, सोनखांब, कोचरे, भडभुंजा-सोनगड, तळवडी, वरसुस व सांगवी येथे आश्रमशाळा आहेत.
जिल्ह्यात १९७३-७४ मध्ये ३ रूग्णालये, १५ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ६४ दवाखाने व ४४१ रूग्णशय्या होत्या. कुटुंबनियोजनाचा प्रसार होत असून १९७३-७४ मध्ये २,८२४ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ६२,७४२ मुलांना देवी ६६,५०९ लोकांस पुन्हा देवी व २,५५,४१२ लोकांस कॉलरा लस टोचण्यात आली.
जिल्ह्यात सहकारी संस्थांची वाढ होत असून १९७३-७४ मध्ये ७६८ शेती पत संस्था, ८३० इतर शेती सहकारी संस्था व ५१६ बिगर-शेती सहकारी संस्था होत्या. मार्च १९७४ अखेर जिल्ह्यात ८८ छापखाने असून २ दैनिके, २० साप्ताहिके, ५ पाक्षिके निघतात.
मुलांचे व मुलींचे रप्पारप्पी, विटीदांडू, शिवाशिवी, खोखो, हुतुतू, आट्यापाट्या, सूरपारंब्या, फुगड्या, झिम्मा, पिंगा इ. खेळ ग्रामीण भागात व काही शहरी भागातही खेळतात. तथापि अलीकडे खोखो, आट्यापाट्या, हुतुतू, लंगडी वगैरे देशी व क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, टेबल टेनिस, टेनिस इ. विदेशी खेळ शाळा-महाविद्यालयातून खेळले जातात. पत्ते, कॅरम इ. बैठे खेळही चालतात. दशावतारी गंजिफा, सोंगट्या, सागरगोटे इ. खेळ लोपत चालले आहेत. कुस्ती, पोहणे, मल्लखांब, डबलबार, सिंगलबार, पळणे, उंच उडी, लांब उडी इत्यादींच्या स्पर्धा विशेषतः शाळा-महाविद्यालयांतून अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत. तमाशा, नाटक, सिनेमा इ. सार्वजनिक मनोरंजनाचे प्रकार ग्रामीण व शहरी भागांत सारखेच लोकप्रिय आहेत. जिल्ह्यात १६ बोलपटगृहे व नाट्यगृहे असून त्यांत एका वेळेस ९,४२४ प्रेक्षक बसू शकतात. फिरती बोलपटगृहे आणि नाट्यगृहे २४ असून त्यांत एका वेळेस १२,५२४ लोकांची करमणूक होऊ शकते. जिल्हा प्रसिद्धी खात्यातर्फेही चित्रपट दाखविले जातात व करमणुकीबरोबर लोकशिक्षणाचेही कार्य केले जाते. धुळे येथील राजवाडे संशोधन मंदिर व श्रीसमर्थ वागदेवता मंदिर या संस्थातून संशोधनाचे कार्य चालते. धुळे येथील रूग्णसेवा मंडळ, मातृसेवासंघ, नवापूर महिलामंडळ, नवापूरचे महात्मा गांधी पुस्तकालय इ. संस्था सामाजिक कार्य करतात.
महत्त्वाची स्थळे : ऐतिहासिक दृष्ट्या प्रसिद्ध असलेली काही ठिकाणे जिल्ह्यात आहेत. १९४२ च्या लढ्यात बलिदान करणाऱ्या शिरीषकुमारमुळे नंदुरबार हे शहर पावन झाले आहे. याशिवाय सोनगीरजवळील डोंगरी किल्ला. बळसाणे येथील हेमांडपंती देवालये, थाळनेर येथील भुईकोटा किल्ला, लळींगचा किल्ला इ. ऐतिहासिक स्थळे प्रसिद्ध असून प्रकाशे, सारंगखेडे, मुडावद, बोरीस इ. यात्रास्थळे प्रसिद्ध आहेत. प्रवाशांसाठी विश्रामगृहे आणि इतर सोयी जिल्ह्यात अनेक ठिकाणी केलेल्या आहेत.
फडके, वि. शं. कुमठेकर, ज. ब.
“