धान्य : हा शब्द मूळचा संस्कृत भाषेतील असून मूळ धातू धा= पोषण करणे यापासून उत्पन्न झाला असावा.बृहदारण्यकोपनिषदात दहा प्रकारची धान्ये आहेत. त्यांत भात (तांदूळ), गहू, यव, तीळ, उडीद, मसूर यांचा समावेश आहे. भावप्रकाशात शाली, व्रीही, शूक, शिंबी व क्षुद्र असे धान्याचे पाच प्रकार नमूद केले आहेत. मराठी भाषेत धान्य हा शब्द मुख्यत्वेकरून तृणधान्यांना (उदा., भात, ज्वारी, बाजरी, गहू, मका आणि नागली, वरी, कोद्रा यांसारखी डोंगरी धान्ये) उद्देशून वापरला जातो [→तृणधान्ये]. डाळीच्या पिकांनाही (उदा., तूर, हरभरा, मटकी, उडीद वगैरे) कडधान्ये या नावाने ओळखण्याचा प्रघात आहे [→कडधान्ये].

गोखले, वा. पु.