धातु व अधातूंचे जोडकाम : कोणत्याही प्रकारचे अभियांत्रिकीय संरचनात्मक काम तयार करताना किंवा उभारताना धातू अथवा अधातूंचे अनेक भाग एकत्र जोडावे लागतात. दोन किंवा जास्त पृष्ठभागांचा ज्या ठिकाणी एकत्र संबंध जोडला जातो, त्या ठिकाणास जोड असे म्हणतात. असे जोड प्रामुख्याने (१) कायम स्वरूपाचे व (२) तात्पुरत्या स्वरूपाचे अशा दोन प्रकारचे असतात. कायम स्वरूपाच्या जोडांनी तयार झालेल्या संरचनात्मक कामातील जोडलेले भाग सहजासहजी सुटे होत नाहीत. ते सुटे करताना त्यांत विकृती निर्माण होते. तात्पुरत्या स्वरूपाच्या जोडांनी जोडलेले भाग हवे तेव्हा सहज सुटे करता येतात व पुन्हा पहिल्याप्रमाणे जोडता येतात. असे करताना त्यांच्यात कसलीही विकृती निर्माण होत नाही.

कायम स्वरूपाची जोडकामे : ही जोडकामे पुढील पद्धतींनी करतात: (१) डाखकाम, (२) झाळकाम, (३) वितळजोडकाम (वेल्डिंग), (४) रिव्हेटिंग, (५) तारटाके, (६) आसंजक जोड (चिकट पदार्थाने चिकटविणे), (७) दाब जोड, (८) आकुंचन जोड.

डाखकाम : या पद्धतीत एकाच धातूचे किंवा निरनिराळ्या धातूंचे भाग प्रथमतः एकमेकांस कच्चे जोडतात, नंतर जोडाच्या ठिकाणी डाखधातू (कथिल व शिसे यांची मिश्रधातू) डाखणीने वितळवून जोड पुरा करतात. डाख धातूने जोडलेले भाग, उदा., ट्रँझिस्टरमधील विद्युत् संवाहक तारा, मोटारगाडीतील प्रारकाच्या (एंजिनात निर्माण होणारी व त्याच्या भोवतालच्या पाण्यात शोषिली जाणारी उष्णता बाहेर टाकणाऱ्या प्रयुक्तीच्या) पितळी नळ्या, डाख धातू तप्त सळईने वितळवून सुटे करतात [ ⟶ झाळकाम व डाखकाम].

झाळकाम : या पद्धतीने एकाच धातूचे किंवा निरनिराळ्या धातूंचे भाग एकमेकांस पक्के जोडतात. जोडाच्या ठिकाणी जोडधातू (तांबे व जस्त यांची मिश्रधातू) भट्टीमध्ये किंवा फुंकनळीने ज्योतीची उष्णता पुरवून किंवा झोत दिव्याने अथवा विद्युत् प्रवाहाने किंवा इंधनवायू ज्योतीने वितळवितात. पोलादी पट्ट्यांची तोंडे झाळकामाने जोडून सायकलीची चाके तयार करतात. सोनार दागिने तयार करताना झाळकामाने जोड देतात. लाकूड कापण्याच्या पोलादी पट्टा करवतीची टोके झाळकामाने जोडतात [ ⟶ झाळकाम व डाखकाम].

वितळजोडकाम : या पद्धतीने सम धातूंचे भाग एकत्र पक्के जोडतात. ज्या एका धातूचे भाग एकमेकांस जोडावयाचे असतात त्यांच्या जोडच्या ठिकाणी त्याच धातूची कांडी व जोडाची टोके एकाच वेळी वितळवून त्यांच्या रसांचा मिलाफ करतात. त्यामुळे जोड मूळ धातूशी एकरूप होतो [ ⟶ वितळजोडकाम].

रिव्हेटिंग : या पद्धतीत बव्हंशी एकाच धातूचे उदा., पोलाद, तांबे व ॲल्युमिनियम यांचे भाग त्यांच्या मूळ अवस्थेत (थंड असताना) त्या त्या धातूंच्या रिव्हेटांनी एकत्र जोडतात. त्यासाठी धातूंच्या भागात जोडाच्या ठिकाणी रिव्हेटाच्या जाडीच्या आकारमानाची  भोके प्रथम पाडून घेतात. नंतर त्यांत रिव्हेट धालून रिव्हेटाच्या भोकाबाहेर आलेल्या टोकास रिव्हेटाच्या डोक्याचा आकार हाताने वा यंत्राच्या साहाय्याने देतात [⟶ रिव्हेट].

तारटाके : या पद्धतीने एकाच धातूचे, निरनिराळ्या धातूंचे, एकाच किंवा निरनिराळ्या अधातूंचे किंवा धातू व अधातूंचे पत्रे किंवा तक्ते एकमेकांस उच्च कार्बन-पोलादाच्या इंग्रजी U अक्षराच्या आकाराच्या तारटाक्यानी यंत्राच्या साहाय्याने एकत्र जोडतात. रबर, चामडे, ॲस्बेस्टस, मऊ प्लॅस्टिक, मॅसोनाइट, प्लायवुड, तंतुयुक्त व कागदी पुठ्ठे हे अधातू एकमेकांस किंवा निरनिराळ्या धातूंस जोडतात. जोडाच्या ठिकाणी रिव्हेटाप्रमाणे प्रथम भोके पाडावी लागत नाहीत. छिद्रे तारेच्या टोकांनीच दाब दिल्यावर पडतात व टोके नंतर पृष्ठभागावर वळून चेपून बसतात. मूळ धातूच्या किंवा अधातूच्या पृष्ठभागावर दुसऱ्या धातूचे विलेपन, रंग वा पदार्थांचे पूट किंवा रासायनिक क्रिया केलेली असल्यास या पद्धतीच्या जोडकामात त्याची खराबी अथवा नासाडी होत नाही.

आ. १. तारटाक्यांचे जोडाकाम : (१) धातुपट्टी, (२) राठ तंतू, (३) तारटाके घालणारे यंत्र, (४) तारटाके.

आ. १ मध्ये कारखान्यात वापरण्यात येणाऱ्या झाडूतील राठ तंतू व धातुपट्टी यांचे जोडकाम यंत्राच्या साहाय्याने तारटाके घालून केले जात असल्याचे दाखविले आहे. तारटाक्यांतही वेढा प्रकार, चपटी चिमटी पकड इ. प्रकार असतात. तारटाके यंत्र मिनिटाला २८५ ते ३२५ टाके मारू शकते.

आसंजक जोड : या पद्धतीने एकाच अगर निरनिराळ्या धातुंचे किंवा निरनिराळ्या अधातूंचे किंवा धातू व अधातूंचे भाग एकमेकांस आसंजकांनी (चिकट पदार्थांनी) दाब देऊन जोडतात. असे निरनिराळे आसंजक दर चौ. सेंमी.वर ३·५ ते ३५० किग्रॅ. भार पेलू शकतात. अधातूंमध्ये लाकूड, काच, रबर, चामडे, ॲस्बेस्टस, प्लॅस्टिक, दगड, कॅनव्हास, मेणकापड इत्यादींचा समावेश होतो.

विविध प्रकारची एपॉक्सी व पॉलिएस्टर रेझिने आणि नैसर्गिक व कृत्रिम रबरांचे मिश्रण आसंजक म्हणून मोठ्या प्रमाणवर वापरतात. तसेच फिनॉलिक एलॅस्टोमर, व्हिनिल फिनॉलिक, बालाटा व गटापर्चा (काही विशिष्ट झाडांचा चीक), प्लॅस्टर ऑफ पॅरिस, सरस, केसीन, फिनॉल फॉर्माल्डिहाइड, थ्रेसील इ. आसंजकांचा उपयोग आगगाडीचे डबे, जहाजे, विमाने, शीतकपाटे, रॉकेट, कृत्रिम उपग्रह, रडार परावर्तक, विद्युत् चलित्र (मोटर) वगैरेंच्या संरचनांतील जोडकाम करण्यासाठी करतात. लाकडी फर्निचर कामात लाकडांचे भाग आणि सनमायका, फॉर्मायका इ. व्यापारी नावांनी ओळखण्यात येणारे स्तरयुक्त तक्ते ग्लुकॉल, नेव्हीकॉल, फेवीकॉल वगैरे नावांनी बाजारात तयार मिळणाऱ्या आसंजकांनी जोडतात [ ⟶ आसंजके].

आ. २. आसंजक जोडकाम : (१) ॲल्युमिनियम, काच अथवा प्लायवूडचे भाग, (२) आसंजकाचे थर.

आसंजकांनी जोडकाम करण्यापूर्वी जोडाच्या ठिकाणचे पृष्ठभाग काळजीपूर्वक स्वच्छ करून घ्यावे लागतात. आसंजकाचा थर पातळ असल्याने वजनही कमी होते. या पद्धतीने जोडकाम सोपे, सुलभ व सुटसुटीत होते. कुशल कारागिराची जरूरी लागत नाही. या पद्धतीत पुढील मूलतत्त्वे मात्र विचारात घ्यावी लागतात : (१) जोडावयाच्या भागांतील रासायनिक आकर्षण, (२) जोडवयाच्या पृष्ठभागांचे व आसंजकाचे संसंग (एकत्रित राहण्याचे) सामर्थ्य, (३) परिणामी आसंजन क्षेत्र, (४) आसंजन क्रियेसाठी लागणारी दाबाची आवश्यकता, (५) जोडावरील भार जास्त क्षेत्रावर विभागला जाईल असे प्राथमिक सांधे तयार करून घेणे,(६) काही आसंजके पाणी, वाफ, तेल, अम्ले, वायू, लवणे व उष्णता यांच्या क्रियेने कमकुवत होतात. ही मूलतत्त्वे विचारात घेऊन योग्य कामाला योग्य असाच आसंजक निवडावा लागतो. आसंजक हातकुंचल्याने, यांत्रिक लाटांनी (सेलर्सनी) किंवा सुऱ्यांनी लावतात. आसंजक सर्व भागावर समप्रमाणात बसावा म्हणून फवारणी यंत्राने जोडाच्या पृष्ठभागांवर आसंजक फवारतात किंवा त्यात बुचकळून काढतात. काही विशिष्ट कामासाठी आसंजकापासून तयार केलेली घन पातळ पत्री जोडाच्या भागांमध्ये दाबात पकडून विद्युत् किरण, दिवे, तप्त तवे किंवा तप्त हवा यांच्या साहाय्याने जोड तापवितात. त्यासाठी साधारण ८०° ते २०५° से. तापमान पुरते. आसंजक सुकेपर्यंत जोडाचा भाग दाबात ठेवावा लागतो. आ. २ मध्ये ॲल्युमिनियम, काच व प्लायवुडचे भाग आसंजकाने एकत्र जोडल्याचे दाखविले आहे. बाजारात मिळणाऱ्या एपॉक्सी भुकटीपासून तयार केलेल्या निरनिराळ्या आकारांच्या व मापांच्या घन चकत्या जोडाच्या ठिकाणी वापरून काही विशिष्ट जोडकामे सुलभ व जलद पूर्ण करता येतात. ऊष्मामृदू (तापविल्यावर मऊ होणाऱ्या) प्लॅस्टिकाचे भाग तीन पद्धतींनी जोडतात. अशा प्लॅस्टिकाचे भाग अशाच प्रकारच्या प्लॅस्टिकाच्या पट्ट्या वापरून विद्युत् प्रवाहाने तप्त केलेली पिस्तुलासारख्या एका साधनाची नळी साधारण ३ ते १२ मिमी. अंतरावर धरून तीतून दाबाची हवा सोडून एकत्र जोडतात. त्यासाठी साधारण २०५° से. तापमान लागते. दुसऱ्या पद्धतीत प्लॅस्टिकच्या पादत्राणांचे भाग तप्त केलेली तांब्याची सळई त्यांवर दाबून धरून जोडकाम करतात. तिसऱ्या पद्धतीत जे दोन भाग एकत्र जोडावयाचे असतात त्यांतील एक भाग यंत्राने फिरता ठेवतात व दुसरा भाग त्याला टेकवून काही सेकंद दाब देतात. घर्षणाने उष्णता निर्माण होते व त्यामुळे मऊ झालेल्या प्लॅस्टिकाने जोडकाम साध्य होते.

दाबजोड : या पद्धतीत तप्त अवस्थेत किंवा थंड अवस्थेत दाबाच्या साहाय्याने धातूच्या दोन भागांचे जोडकाम करतात. थंड अवस्थेत निरनिराळ्या धातू व मिश्रधातूंचे भाग एकमेकांत बसविण्यासाठी एका भागावर दाबयंत्राने हवा तेवढा दाब देतात. मात्र असे भाग जोडाच्या ठिकाणी जवळजवळ एकाच मापाचे असतात. एक भाग दुसऱ्याहून अल्पांशाने मोठा असतो. त्यामुळे दाब दिल्यावर ते एकमेकांत घट्ट पक्के बसतात. लहान दंतचक्रे त्यांच्या दंडगोल दंडावर किंवा एका भागातील भोकांत खीळ किंवा मळसूत्रदंडिका (स्टड) बसविताना किंवा विद्युत् चलित्रातील आर्मेचराच्या आसदंडिकेवर स्टँपिंग्ज (सिलिकॉन पोलादाचे खाचा असलेले पातळ पत्रे) घट्ट बसविताना ही पद्धत वापरतात.

तप्त अवस्थेत एका पद्धतीत धातूचे भाग जोडाच्या ठिकाणी स्वतंत्रपणे प्रथम त्या धातूच्या वितळबिंदूच्या खालील जवळच्या तापमानाला तापवितात व जोडाच्या ठिकाणी यंत्राने दाब देऊन किंवा हातोडीने ठोकून जोडकाम पुरे करतात, अशा जोडांना लोहारी किंवा घडीव जोड म्हणतात. मात्र प्रथम जोडाच्या ठिकाणच्या धातूच्या भागावर तेथील धातू तप्त करून त्याची जाडी थोडी वाढवून घ्यावी लागते. सांडशीला लांब दांडे जोडताना किंवा इंग्रजी T अक्षराच्या आकाराचा चावी पाना तयार करताना लोहार ही पद्धत वापरतो. दुसऱ्या पद्धतीस विद्युत् रोध तप्त जोड असे म्हणतात. या पद्धतीत जे भाग एकत्र जोडावयाचे त्या ठिकाणचा भाग विद्युत् रोध क्रियेने तप्त केल्यावर यंत्राच्या साहाय्याने दाब देतात व जोडकाम पुरे करतात. वितळजोड पद्धतीप्रमाणे हीत धातू वितळत नाहीत. साखळ्यांचे दुवे या पद्धतीने जोडतात.

मोटारगाड्या व विमाने यांचे साटे धातुपत्र्यांचे केलेले असतात. त्यासाठी पोलादी किंवा ॲल्युमिनियम पत्रे किंवा भाग एकत्र जोडण्यासाठी बिंदुजोड यंत्र वापरतात. या यंत्रात दोन निमुळती कठीण मिश्रतांब्याची विद्युत् अग्रे समोरासमोर बसविलेली असतात आणि त्यांच्यामधील मोकळ्या जागेत जोडावयाचे भाग सारले जातात.

धातूच्या नळ्यांच्या विस्फारित तोंडांचे किंवा तबकडी तोंडांचे जोडकाम, तसेच धातुपत्र्यापासून वळवून तयार केलेल्या नळ्या व नळ आणि धातुपत्र्यांच्यी एकावर एक चढविलेल्या कडा यांचे जोडकाम विद्युत् रोध तप्त पद्धतीने केले जाते परंतु अशा यंत्रात दोन विद्युत् अग्रे लहान चक्राच्या स्वरूपात असून काही विशिष्ट आकारांच्या उपांगांची मदत घ्यावी लागते. जोडाच्या ठिकाणचा सर्व भाग संपूर्ण लांबीवर जोडला जातो.

धातुपत्र्यांच्या कडा एकमेकींवर जोडताना जोडाच्या पृष्ठभागांमध्ये त्याच धातूच्या वर्खाची फीत ठेवून संपूर्ण जोड चक्री विद्युत् अग्रांतून किंवा लाटांच्या स्वरूपाच्या विद्युत् अग्रांतून सरकवितात. यामुळे विद्युत् प्रवाह समप्रमाणात वाहून उष्णतेचे उत्सर्जन जलद होते व जोडलेल्या पातळ पत्र्यांत विकृती निर्माण होत नाही. या पद्धतीस धातुवर्ख कडा जोड म्हणतात.

व्हिनिल रेझिनाचे पूट चढविलेल्या पोलादी नळ्या पोलादी पत्र्यांना जोडताना त्यांच्या पृष्ठभागाची खराबी होऊ नये म्हणून चुंबकीय दाबजोड पद्धती वापरतात. हीत विद्युत् अग्रांवर योग्य वेळी दाब देण्यासाठी समकालीकरण योजना विद्युत् मंडलात विद्युत् चुंबक जोडून केलेली असते. निरनिराळ्या धातूंचे पत्रे अल्प दाबाने (सु.१·७५ किग्रॅ./चौ.सेंमी) जलद जोडण्यासाठी श्राव्यातीत (श्राव्य नसणाऱ्या कंपनांचा उपयोग करणारी) दाबजोड पद्धती वापरतात. या पद्धतीत एक भरीव शंक्वाकार भाग यांत्रिक आरोहित्र (कंपनांचे विवर्धन करणारे साधन) म्हणून वापरतात. हा भाग लघू कंपनाचे विवर्धन करून गोलक किंवा चातीच्या आकाराच्या कंपक घटकाला पुरवितात. हा कंपक जोडावयाच्या भागाला स्पर्श करतो. कंपक दाबाचा जोर निर्माण करून जोडाच्या भागातील अणूंचा संसंग घडवून आणतो व त्यामुळे जोड घट्ट बसतो. अत्यंत पातळ पत्र्यांतही विकृती निर्माण न होता जोड पुरा होतो. तसेच अत्यंत पातळ पत्रा जाड भागाला या पद्धतीने एकत्र जोडता येतो.

संयोगी जोड पद्धतीत जोडावयाच्या भागांवर दर चौ. सेंमी. वर २८० ते ५६० किग्रॅ. दाब दिल्याने जी पृष्ठभागात उष्णता निर्माण होते त्यामुळे तेथील धातू पसरून त्यांचे संयोगीकरण होते. या पद्धतीत तापमान सु. ५४०° से.च्या खाली असून दाब २० मिनिटांपासून ३ तासांपर्यंत ठेवतात. या पद्धतीने निरनिराळ्या धातू एकत्र जोडणे शक्य होते.

निष्कलंक (स्टेनलेस) पोलादाच्या दोन पट्टिकांमध्ये ॲल्युमिनियम पट्टिका एकत्र जोडण्याचे काम स्फोटक आघात पद्धतीने करतात. निष्कलंक पोलादाच्या बाह्य पट्टिकांवर ज्वालाग्राही स्फोटक पदार्थांचे तक्ते बसवून एकाच वेळी ज्वालाकांडीने स्फोट घडवून आणतात. स्फोटामुळे जोडावयाच्या धातुपट्टिका एकमेकींवर प्रचंड दाबाने आदळतात व उष्णता निर्माण होऊन जोडकाम पुरे होते.

खाद्यपदार्थ, मद्य, दूध, रसायने, रंग, पेट्रोल, खते, साबण, प्लॅस्टिक पदार्थ तयार करणाऱ्या कारखान्यांत मिश्रण पात्रे, टाक्या, नळ, पंप वगैरे धातूंचे भाग किंवा वस्तू वापराव्या लागतात. जेव्हा त्यांचे बाह्यांग उष्णता, गंजणे, झिजणे यांना रोधक असे असावे लागते तेव्हा असे भाग किंवा अशा वस्तू स्वस्त अशा मृदू पोलादापासून बनवितात व त्यांच्या बाह्यांगावर दाबाच्या साहाय्याने दुसऱ्या संरक्षक धातूंच्या पट्ट्या किंवा पत्रे यांचे आवरण चढवितात. त्यांना चिलखती धातू असे म्हणतात. इंकोनेल, मोनेल, निष्कलंक पोलाद या मिश्रधातू व निकेल, क्रोमियम, ॲल्युमिनियम या धातू यासाठी वापरतात. मूळ धातुभाग जर मृदू पोलादाचा असेल, तर तो साधारण १,२००° से. तापमानाला प्रथम तापवून त्यावर हव्या त्या धातूचा किंवा मिश्रधातूचा पत्रा ठेवून ते एकत्र लाटण यंत्रात घालून दाबाने घट्ट बसवितात. सोन्याचे अलंकार स्वस्त होण्यासाठी तांब्याच्या पट्टीवर सोन्याचा पत्रा ठेवून ते एकत्र उच्च द्रवीय दाब यंत्रातून लाटून काढतात.

घर्षण दाबजोड पद्धतीत जोडावयाचे भाग यंत्रात पकडून एकमेकांवर घासतात. हे भाग मिनिटाला १२,००० फेरे या गतीने फिरल्याने घर्षणाने त्यांच्या पृष्ठभागांत उष्णता निर्माण होऊन दाब दिल्याने जोडकाम ५ ते २५ सेकंदांत पुरे होते.

धातूचे यंत्रण (कातकाम) करण्यासाठी स्वस्त किंमतीची धारेची यंत्रण हत्यारे बनविण्यासाठी कार्बाइड, टंगस्टन किंवा कठीण मृत्तिका यांचे धारतुकडे मृदू पोलादाच्या दांडीवर कोबाल्ट धातूच्या वर्खाने उष्णता व दाब देऊन एकत्र जोडतात.

आकुंचन जोड : या पद्धतीने एकाच धातूचे किंवा निरनिराळ्या धातूंचे भाग एकमेकांस घट्ट जोडतात. जोडावयाच्या भागांपैकी एक भाग थंड ठेवतात व दुसरा तापवून प्रसरण पावल्यावर थंड भागावर चढवितात किंवा थंड भाग तप्त भागात खुपसतात. नंतर तेलात किंवा पाण्यात ताबडतोब असे भाग एकत्र बुडवितात. त्यामुळे तप्त भाग थंड होऊन आकुंचित होतो व थंड भागावर घट्ट पकड धरतो. धातूच्या सळईवर किंवा खिळीवर दुसरी नळी वा पुंगळी तसेच लहान चक्राच्या मध्यभागात पुंगळी किंवा दंडिका अशा प्रकारे घट्ट बसविता येते. बैलगाडीच्या लाकडी चाकावर लोखंडी धाव याच पद्धतीने बसवितात.

तात्पुरत्या स्वरूपाची जोडकामे : ही जोडकामे पुढील बंधन पद्धतींनी करतात : (१) बोल्ट, (२) स्क्रू (मळसूत्र), (३) चावी, (४) चावर, (५) खिळा, (६) तारफास, (७) खीळ, (८) युग्मन, (९) चाप, (१०) पेच, (११) शिसे, (१२) वादी, (१३) बिजागरी, (१४) शृंखला, (१५) संयोगदांडी, (१६) सांधा, (१७) पकडपट्टी वलय, (१८) सर्वगामी जोड, (१९) झिप किंवा सरक बंधक.

बोल्ट बंधन : यात जोडावयाच्या भागांवर जोडाच्या ठिकाणी प्रथम आरपार किंवा ठराविक जोडीपर्यंत भोके पाडावी लागतात. आरपार भोक असल्यास त्यात बोल्ट घालून बोल्टाच्या बाहेर आलेल्या टोकाकडील बाह्यांगावर जे आटे पाडलेले असतात त्या आट्यांशी जुळते आटे आतील अंगावर पाडलेला नट पान्याने आवळून घट्ट बसवितात [ ⟶ बोल्ट व नट].

स्क्रू बंधन : या पद्धतीत एकाच धातूचे वा निरनिराळ्या धातूंचे भाग एकत्र जोडतात. यंत्र मळसूत्र (यंत्रातील भाग जोडण्यासाठी वापरण्यात येणारे मळसूत्र) टोकापर्यंत भरीव दंडगोलाकृती असून बहुधा त्याच्या सर्व लांबीभर निरनिराळ्या प्रकारचे आटे पाडलेले असतात. लाकडाचे भाग जोडण्यासाठी जे मळसूत्र वापरतात त्याचे टोक निमुळते असून त्यावरच फक्त एकाच प्रकारचे आटे पाडलेले असतात. त्याच्या माथ्यावर खाच असून ते डिसमीसने (स्क्रू ड्रायव्हरने) पिळून लाकडात बसवितात. ज्या मळसूत्रांना चौरस माथा असतो ती पान्याने पिळतात व त्यांचा उपयोग धातूचा भाग लाकडाशी जोडण्यासाठी करतात. यंत्र मळसूत्र त्याच्या माथ्याच्या आकारावरून ओळखले जाते व निरनिराळ्या कामांसाठी निरनिराळ्या आकारांचे माथे असलेली मळसूत्रे वापरतात. मात्र अशा मळसूत्राने धातूचे भाग जोडताना त्यात प्रथम भोके पाडावी लागतात आणि भोकात अंतःसूत्रकाने मळसूत्राच्या आट्यांशी जुळते आटे पाडून घ्यावे लागतात [⟶ स्क्रू].

चावी बंधन : धातूंच्या विशेषतः पोलादाच्या दंडावर, भुजादंडावर, दंडिकेवर धातूच्या विशेषतः पोलादाच्या व बिडाच्या कप्प्या, चाके, युग्मन (सम अक्षीय दोन दंडांपैकी एकाची गती दुसऱ्याला देण्याकरिता वापरण्यात येणारी जोडणी) व मोठाली दंतचक्रे घट्ट बसविण्यासाठी पोलादाच्या निरनिराळ्या आकारांच्या चाव्या बसवितात. त्यासाठी कप्पीवरील किंवा चाकावरील तुंब्यात तसेच दंडावर किंवा भुजादंडावर चावीच्या आकाराशी जुळते अर्धगाळे पाडून घ्यावे लागतात. नंतर दोन अर्धगाळ्यांपासून पूर्ण झालेल्या गाळ्यात पोलादी चावी ठोकून बसवितात. चौरस, चपमाथा, डूब, खोगीर, चपटी, पंखी, डोल, गोल निमुळती असे चाव्यांचे विविध प्रकार आहेत [ ⟶ चावी (चक्राची)].

आ. ३. चावर बंधनाचे दोन प्रकार : (१) चावर.

चावर बंधन : या पद्धतीत ताण किंवा दाब येणारे धातूचे दोन भाग एकत्र जोडण्यासाठी पोलादी चावर (कॉटर) वापरतात. याचा उपयोग चावी प्रमाणेच होतो. यात दोन प्रकार असतात. एक आयताकार चपटा असून दोन्ही अंगांवर निमुळता असतो, तर दुसरा एकाच अंगावर निमुळता असतो. त्यांच्या कडा कोरबंद असतात किंवा त्यांना किंचित गोलाई दिलेली असते. जोडावयाच्या दोन भागांत चावराच्या दोन भागांत चावराच्या आकाराचा निमुळता आरपार गाळा पाडतात आणि त्यात चावर ठोकून बसवितात. आ. ३ मध्ये झडपेची दंडिका संयोगी झडप दांड्याला चावराने जोडलेले दोन प्रकार दाखविले आहेत. सायकलीची पायटाभुजा दंतचक्राला चावराने जोडतात.

खिळा बंधन : या पद्धतीत लाकूड, चामडे, लाकडी तक्ते, मेणकापड, कॅनव्हास अशांसारखे अधातू पदार्थ घर्षण पकड निर्माण करून एकत्र जोडतात. धातुपत्रे लाकडाला जोडता येतात. या जोडकामासाठी विशेषेकरून पोलादी चपटे (कुऱ्हाडी) किंवा तारखिळे वापरतात. अशा खिळ्यांना माथे असून दुसरी टोके निमुळती धारदार असतात. नौकांच्या जोडकामासाठी पाण्याने गंजू नयेत म्हणून तांब्याचे खिळे वापरतात. काही प्रकारच्या खिळ्यांच्या अंगावर खाचा किंवा खवले पाडतात त्यामुळे त्यांची पकड जास्त घट्ट बसते [ ⟶ खिळे].

तारफास बंधन : या पद्धतीत एकाच धातूचे, निरनिराळ्या धातूंचे, निरनिराळ्या अधातूंचे आणि धातू व अधातूंचे भाग धातूच्या तारांचे फास किंवा वेढे आवळून व पकडीने तारेची टोके पिळवटून एकत्र जोडतात. छत्र्यांच्या काड्यांचा जोड, विद्युत् संवाहक तारांचे जोड, तारदोरांचे जोड इ. या पद्धतीने करतात. मात्र यासाठी तार मऊ लागते. जस्तविलेपित पोलादी तारा या कामासाठी मोठ्या प्रमाणवर वापरतात.

खीळ बंधन : या पद्धतीने एकाच किंवा निरनिराळ्या धातूंचे आणि धातू व अधातूंचे भाग एकत्र जोडतात. यासाठी पितळ, कासे, कार्बन व मिश्रपोलाद आणि मोनेल धातू यांच्या निरनिराळ्या आकारमानांच्या भरीव अथवा पोकळ चीर खिळी वापरतात. सरळ दंडगोल बिनमाथ्याच्या खिळीने स्तररचित भाग वा बिजागऱ्या एकत्र जोडतात. द्विदल खीळ नटाने किंवा क्लेव्हिस खिळीने किंवा चावराने जोडलेले भाग हादऱ्याने ढिले होऊन सुटू नयेत याकरिता जखडून ठेवण्यासाठी अटक म्हणून वापरतात. क्लेव्हिस खीळ ज्या वेळेस घडीचे भाग जोडावे लागतात त्या वेळी वापरतात. या खिळीच्या टोकाकडील अंगावर भोक असून त्यात द्विदल खीळ फाकून बसवितात. क्लेव्हिस खिळीला माथा असतो, तर द्विदल खिळीला डोळा असतो. निमुळत्या खिळीस माथा नसतो व ती बसविण्यासाठी जोडावयाच्या भागात प्रथम भोक पाडून ते निमुळत्या छिद्रतासणीने निमुळते करून घ्यावे लागते. भरीव खाचा पाडलेल्या व ज्यांचा काही भाग पोकळ किंवा चिरलेला असतो, अशा खिळी ठोकून किंवा दाबाने बसविल्यास त्यांची पकड प्रसारणाने जास्त मजबूत होते.

युग्मन बंधन : या पद्धतीत फिरत्या पोलादी दंडाची किंवा दंडिकेची लांबी वाढविण्यासाठी पोलादी किंवा बिडाच्या युग्मनाने ती एकमेकांस जोडतात. तसेच विद्युत् चलित्राच्या आर्मेचर दंडाला पंपाच्या फिरत्या चक्राचा दंड जोडण्यासाठी किंवा इतर यंत्रांचे दंड जोडण्यासाठी युग्मन वापरतात. युग्मनांचे निरनिराळे प्रकार आहेत. कारण अशा युग्मन जोडांवर पीडन परिबल (पिळवटण्याची प्रेरणा) येते. विस्फार तोंडी किंवा तबकडी तोंडी युग्मनात दोन तबकडी तोंडे असून त्यांच्या तोंडावर बोल्ट घालण्यासाठी भोके पाडलेली असतात. काही तोंडावर याखेरीज यांत्रिक सांधा तयार करून घेतात. एका तोंडावर उंचवटा काढलेला असून दुसऱ्या तोंडावर तो उंचवट्याचा भाग बसेल अशा आकाराचा गाळा पाडलेला असतो.

आ. ४. तबकडी तोंडी युग्मन : (१) फिरत्या दंडाची टोके, (२) तबकडी तोंडे, (३) बोल्ट, (४) चाव्या.

आ. ४ मध्ये तबकडी तोंडे तोंडावर बोल्टाने जोडलेली असून मागील भाग चावीने दंडावर घट्ट बसविलेले दाखविले आहेत. तबकडी तोंडात दंडाच्या जाडीची गोल प्रछिद्रे पाडलेली असतात. असे युग्मन नळ जोडण्यासाठी वापरतात. तेव्हा अशा प्रछिद्रांच्या आतील बाजूस आटे पाडलेले असून त्यांच्याशी जुळते आटे नळाच्या तोंडावर पाडतात. पुंगळी युग्मनात दंडांच्या अंगांवर चावी गाळे पाडतात व पोलादी पोकळ पुंगळीच्या आतील अंगावर जुळता गाळा पाडतात. पुंगळी दंडटोकावर सरकवून गाळ्यात चपमाथ्याच्या चाव्या दोन्ही बाजूंनी ठोकतात. पुंगळी लांब असल्याने जोडाच्या भागांचे क्षेत्र वाढून पकड जास्त घट्ट बसते. साखळी युग्मनात भरीव दंडांची तोंडे विस्फारून दातेरी ठेवतात. अशी तोंडे समोरासमोर टेकून दातेऱ्यांतून सायकलीत वापरतात तशी पोलादी दुहेरी साखळी बसवितात व जोडकाम करतात. यामुळे दंड फिरत असताना त्यांची तोंडे आपोआप सरळ रेषेत येतात. लवचिक युग्मनात दोन तबकडी तोंडे प्रथम दंडांवर चाव्यांनी घट्ट बसवितात. मात्र या तोंडावर सारख्या अंतरावर तीन दंडगोल सरळ पोलादी खिळी पक्क्या बसविलेल्या असतात. या खिळींवर एका पोलादी चकतीत भोके पाडलेले रबराचे तीन तुकडे बसविलेले असतात. ही चकती खिळीवर सरकवून दोन तबकडी तोंडे तीन बोल्टांनी एकत्र जोडतात. त्यासाठी तबकडी तोंडांवर तीन वक्र आरपार गाळे ठेवलेले असतात. यामुळे दंडाची तोंडे सतत फिरताना समोरासमोर एका रेषेत राहतात. आगगाडीचे डबे जोडताना मळसूत्री युग्मन वापरतात.

चाप बंधन : यंत्रांना गती देण्यासाठी चामड्याचे किंवा कॅनव्हासचे प्रेषण पट्टे वापरतात. त्यांची टोके जोडण्यासाठी बिजागरीने एकत्र जोडलेल्या दुतोंडी पोलादी काटेरी चाप वापरतात. बाजारात हे निरनिराळ्या रुंदीचे आयते मिळतात. काटेरी चापाची धारदार टोके चामड्याच्या पट्ट्यात चाप ठोकून घुसवितात त्यामुळे चापाची पकड राहते. याशिवाय निरनिराळ्या आकारांचे चाप छिद्रपाट व धारकपकडी जोडणीत वापरतात.

पेच बंधन : द्रव पदार्थ, बाष्प, वायू, हवा व निरोधकवेष्टित विद्युत् तारा यांच्या वहनासाठी पोलादी नळ्या वापरतात. या नळ्या सरळ किंवा कोनात एकत्र जोडण्यासाठी नळ्यांच्या तोंडावर पेच (आटे) पाडतात. त्यासाठी नळजोडक वापरावे लागतात. असे नळजोडक पुंगळीनट, जोडनट, संजोडक, लघू व दीर्घ कोपरे तीन किंवा चार तोंडी जोडक या प्रकारचे असतात. या प्रकारांच्या तोंडात नळीवरील बाह्य आट्यांशी जुळते आटे पाडलेले असतात. हे जोडक नळ-सांडशीने घट्ट बसवितात. नळ्यांतील पदार्थ बाहेर गळू नयेत किंवा हवेतील ओल आत जाऊ नये म्हणून वाखाचे धागे वापरतात. तोटीही अशाच तऱ्हेने बसवितात. आग विझविण्याचे कॅनव्हासचे नळ पितळी संजोडकाने जोडतात [ ⟶ नळ व नळी].

शिसे बंधन : पाणीपुरवठ्याचे जमिनीखालून घातलेले बिडाचे नळ या पद्धतीने एकत्र जोडतात. अशा नळांच्या विरुद्ध टोकांना अंगची नर व मादी तोंडे ठेवलेली असतात. नर तोंड मादी तोंडात सरकवून फटीमध्ये शिशाची लोकर किंवा शिसे चिळण छिन्नीने ठोकून व ठासून जोडकाम पुरे करतात. शिशाच्या नळ्या एकमेकींस किंवा शिशाची नळी पोलादी नळीस जोडताना लाकडी निमुळत्या खुंटीने शिशाच्या एका नळीचे तोंड विस्फारतात व त्यात दुसरी शिशाची नळी किंवा पोलादी नळी घुसवितात. नंतर जोडाच्या ठिकाणी शिसे व कथिलमिश्रित रस ओतून त्याचा लेप देतात.

वादी बंधन : यंत्रांना गती देण्यासाठी चामड्याचे प्रेषण पट्टे वापरतात. त्यांची टोके एकत्र जोडतांना जोडाच्या ठिकाणी टोके एकावर एक चढवून किंवा समोरासमोर टेकवून त्यांवर चामड्याच्या पट्ट्याचा तुकडा ठेवून चामड्याच्या वादीने एकत्र शिवतात. त्यासाठी प्रथम पट्ट्याच्या जोडाच्या भागात पोकळतोंडी पोगराने भोके पाडतात. यानंतर गाढवाच्या चामड्याची वादी भोकातून उलटसुलट घालून जोडकाम करतात.

बिजागरी बंधन : लाकडी व पोलादी दरवाजे, खिडक्या, कपाटे, पेट्या, ट्रंका यांच्या झडपा उघडझापीसाठी पोलादी, पितळी किंवा ॲल्युमिनियमाच्या बिजागऱ्यांनी एकत्र जोडतात. निरनिराळ्या मापाच्या व प्रकारांच्या अशा बिजागऱ्या बाजारात तयार मिळतात. लाकडामध्ये अशा बिजागऱ्या निमुळत्या मळसूत्रांनी घट्ट बसवितात, तर धातूंसाठी रिव्हेट वापरतात.

शृंखला बंधन : जहाज नांगरताना पाण्यात जो लंगर सोडतात तो शृंखलेने (साखळीने) जोडतात. सायकलीचे मागचे चाक फिरवण्यासाठी पायटाचक्र मागील चाकावरील चक्राशी साखळीने जोडतात. या साखळ्या पोलादी असून निरनिराळ्या यंत्रसामग्रीत निरनिराळ्या प्रकारच्या असतात. मालवाहक साधने साखळ्यांनी एकत्र जोडतात. काही यंत्रांत ज्या उपांगांचा वापर तात्पुरता करावयाचा असतो, अशी उपांगे यंत्रावर योग्य जागी रहावी म्हणून साखळीने जोडतात [ ⟶ शृंखला, यांत्रिक].

संयोगदांडी बंधन : धातूंचे निरनिराळे भाग विशेषतः यंत्ररचनेत एकमेकांशी शक्तिप्रेषणासाठी फिरते, हलते, डुलते किंवा सरकते असे जोडावे लागतात तेव्हा निरनिराळ्या आकारांच्या पोलादी संयोग दांड्या, दांडे, भुज किंवा पट्ट्या वापराव्या लागतात. असे जोडकाम बोल्टांनी, खिळींनी व ढिल्या रिव्हेटांनी करतात. बोल्ट, रिव्हेट आणि खिळी यांचा उपयोग केंद्रबिंदूप्रमाणे होऊन जोडलेले भाग त्याभोवती हालतात किंवा फिरतात. दाबयंत्रे, विविध प्रकारची वाहने, एंजिने, टंकलेखन यंत्रे, शिवण यंत्रे, आरेखन यंत्रे, यांत्रिक हत्यारे इत्यादींच्या रचनेत काही ठकाणी निरनिराळे भाग संयोगदांडीने एकत्र जोडतात.

आ. ५. काही लाकडी सांधे : (१) अर्धखाच खुल्या तोंडाचा सांधा, (२) अर्धखाच तिरकस बंद तोंडाचा सांधा, (३) कुसूविंघी सांधा, (४) खुल्या तोंडाचा तिरकस जीभ-खोबण सांधा, (५) बंद तोंडाचा तिरकस आंगठा सांधा, (६) खोबण-चावी सांधा.

सांधा बंधन : इमारती कामाच्या, फर्निचर कामाच्या व ओतकामाचे फर्मे बनविण्याच्या रचनेत लाकडांचे भाग सरळ, कोनात किंवा वक्राकार एकत्र जोडावे लागतात. त्यासाठी निरनिराळ्या प्रकारचे सांधे वापरावे लागतात. हमचौरस (चारी बाजू सारख्या असलेली) लाकडे सरळ रेषेत लांबी वाढविण्यासाठी जोडताना तिरकस कापसांधा वापरतात कारण तो ताणाच्या व दाबाच्या जोरांना टिकतो. लाकडाच्या वरच्या व खालच्या भागांवर जीभखाचेचा सांधा उलटसुलट करून मधल्या चौरस आरपार गाळ्यात एक निमुळती चौरस चावी (खुंटी) ठोकतात. हमचौरस किंवा चपटी लाकडे कोनात जोडण्यासाठी खुल्या व बंद तोंडाचे सरळ किंवा तिरकस अर्धखाच सांधे, कुसूविंधी सांधे, बंद तोंडी खोबण-जीभ एकेरी किंवा दुहेरी सांधे वापरतात. फळ्या कोनात जोडण्यासाठी खुल्या तोंडाचे किंवा बंद तोंडाचे सरळ किंवा तिरकस आंगठा सांधे वापरतात. फळ्यांची रुंदी वाढविण्यासाठी टप्पा, खोबण-जीभ किंवा खोबण-चावी सांधे वापरतात. लाकडे वक्ररेषेत जोडण्यासाठी खाच-जीभ-चावी सांधे वापरतात. सांध्याच्या मजबुतीसाठी जोडाच्या ठिकाणी तारचुका किंवा भोके पाडून बांबूच्या खिळी ठोकतात अथवा मळसूत्र पिळतात. इमारतीच्या छपरासाठी ज्या लाकडी कैच्या तयार करतात त्यांच्या सांध्यांना भोके पाडून दोन्ही अंगांवर पोलादी पट्ट्या बोल्टाने घट्ट बसवितात.

आ. ६. पकडपट्टीवलय बंधन : (१, २) दोन प्रकारचे पकडपट्टीवलय बंधक, (३) तारफास बंधक, (४) रबराची किंवा कॅनव्हॉसची नळी.पकडपट्टीवलय बंधन : रबराच्या किंवा कॅनव्हासच्या नळ्या धातूच्या भागांना जोडण्यासाठी निरनिराळ्या प्रकारची पकडपट्टीवलये  वापरतात. मोटारगाडीतील प्रारक (एंजिनाची उष्णता शोषून घेतलेले पाणी थंड करण्यासाठी वापरण्यात येणारे साधन) आणि एंजिनातील पाण्याची टाकी जोडण्यासाठी अशा नळ्यांचा वापर करतात. पोलादी पातळ पट्टीच्या वलयावर काही भोके ठेवलेला असून टोके काटकोनात वळविलेली असतात. या टोकांवर भोके पाडून त्यांत एक यंत्र मळसूत्र व नट बसवून पकड घट्ट करतात.   दुसऱ्या प्रकारात पट्टी पूर्ण वळवून तोंडे उचलून पक्की जोडतात. या जोडाच्या ठिकाणी भोक पाडून त्यात अंतःसूत्रकाने आटे पाडतात. असा वलयबंधक नळीवर सरकवून पंखी माथ्याच्या मळसूत्राने वलयबंधकाच्या गळ्यावर बसविलेल्या अटक आकड्यावर दाब देऊन जोड घट्ट करतात. तिसऱ्या प्रकारात पोलादी तारेचा साधा फास बसवितात [ ⟶ दाबपकड].

सर्वगामी जोड : सर्वगामी जोड निरनिराळ्या प्रकारचे असतात. हूक किंवा कार्डन जोडामध्ये दोन इंग्रजी Y अक्षराच्या आकाराची जू-तोंडे असून त्यांचे मागील भाग जोडावयाच्या दोन फिरत्या दंडांवर पक्के बसवितात. दोन्ही जू-तोंडे एका चार टोके चार दिशांना असलेल्या चौफुली भागाला जोडतात. या रचनेने जोडलेल्या दंडांचे अक्ष जरी समतल असले, तरी एकस्थित (एकमेकांना जुळलेले) नसतात. शक्ती व गती यांच्या प्रेषणासाठी असे सर्वगामी जोड यांत्रिक हत्यारे, मोटारगाड्या, यांत्रिक उपकरणे व नियंत्रण साधनांत वापरतात. बेंडिक्सवाइस जोडात जू-तोंडांच्या बाजू बंद असून त्यात पाच पोलादी गोळ्या बसविलेल्या असून चार गोळ्या मधल्या गोळीभोवती भ्रमण करतात. या चार गोळ्या प्रेषणाचे कार्य करतात व मधली गोळी त्यांना ठराविक त्रिज्येत ठेवते. चार गोळ्या जू-तोंडात पाडलेल्या वर्तुळाकार खोबणीत फिरतात. पहिल्या प्रकारचा सर्वगामी जोड मोटारगाडीच्या मागील चाकांना शक्ती व गतीचे प्रेषण करण्यासाठी, तर दुसऱ्या प्रकारचा जोड पुढील चाकांना तेच कार्य करण्यासाठी वापरतात. चालक व चलित दंडांमध्ये बदलत्या कोनांना योग्य असा कोनीय वेग कायम ठेवणे हे या जोडाचे वैशिष्ट्य आहे.

अशा अनेक प्रकारच्या तात्पुरत्या स्वरूपाच्या जोडांखेरीज इतर विविध आकारांचे तात्पुरते यांत्रिक जोड, छिद्रपाट व धारक पकडी जोडणीत वापरतात परंतु असे जोड वर आलेल्या अनेक तात्पुरत्या स्वरूपाच्या जोडांवरच आधारित असतात.

झिप (किंवा सरक) बंधक : विजार, बुशकोट, जर्सी वगैरे कपड्यांचे दोन भाग हवे तेव्हा सुटे करण्यासाठी अथवा जोडण्यासाठी गुंड्या व काजांच्या ऐवजी तारेची झिप वापरतात. पैसे ठेवण्याची किंवा कागदपत्रे ठेवण्याची पिशवी, प्रवासी पिशव्या यांची तोंडे तात्पुरती बंद करण्यासाठीही झिपचा वापर करतात. दोन्ही कडांवर झिपची नर व मादीची स्वतंत्र पट्टी शिवून बसविलेली असते. सरकपट्टीने या कडा एकत्र जोडल्या जातात.

संदर्भ : 1. Lindberg, R. A. Processes and Materials of Manufacture, Boston, 1964.

2. Schwartz, M. M. Modern Metal Joining Techniques, New York, 1969.

3. Wilson, F. W. Harvey, P. D. Tool Engineering Handbook, New York, 1959.

जोशी, त्रिं. ना. माढेकर, मु. के. दीक्षित, चं. ग. पेंडसे, द. वि. ओक, वा. रा.