कोलंबाइट – टँटॅलाइट : खनिज स्फटिक समचतुर्भुजी द्विप्रसूच्याकार. जुळे स्फटिक हृदयाकार असतात. [→ स्फटिकविज्ञान]. सामान्यपणे स्फटिकांच्या तर कधीकधी संपुंजित रूपात आढळते. पाटन : (010) स्पष्ट [→पाटन]. भंजन उपशंखाभ. ठिसूळ. कठिनता ६ (कोलंबाइट) ते ६–६·५ (टँटॅलाइट). वि.गु. ५·२ (कोलंबाइट) ते ७·९५ (टँटॅलाइट). दुधी काचेप्रमाणे काहीसे पारभासी. चमक काहीशी धातूसारखी. रंग लोखंडासारखा काळा, कधीकधी रंगदीप्त (एकाच नमुन्यात विविध रंग दिसतात).

कोलंबाइट - टँटॅलाइट स्फटिक

कस गडद तांबडा ते काळा. रा.सं. कोलंबाइट (Fe, Mn) Nb2O6 टँटँलाइट (Fe,Mn) Ta2O6. या दोन खनिजांच्या घन विद्रावांची अखंडित माला असल्याने दोन्हींच्या मधले प्रकारही असतात व रासायनिक संघटनानुसार खनिजाच्या भौतिक गुणधर्मांत बदल होत जातात. टँटॅलाइटातील लोहाच्या जागी मँगॅनीज आल्यास मँगॅनोटँटॅलाइट तयार होते. कोलंबाइटासारख्या दिसणाऱ्या वुल्फ्रॅमाइटापेक्षा ते हलके व तोरमल्लीपेक्षा (टूर्मलिनापेक्षा) जड असते. ग्रॅनाइटी खडक, क्वॉर्टझ शिरा, पेग्मटाइट भित्ती, डबर इत्यादींमध्ये हे फेल्स्पार, वैदूर्य (बेरिल), तोरमल्ली, वुल्फ्रॅमाइट इत्यादींच्या बरोबर आढळते. हे मुख्यतःझाईरे (बेल्जियन काँगो), मॅलॅगॅसी, नायजेरिया, ब्राझील, रशिया इ. देशांत सापडते. बिहार, राजस्थान, आंध्र प्रदेश, तमिळनाडू या राज्यांमधील पेग्मटाइटात व गुजरात, केरळ, ओरिसा, महाराष्ट्र या राज्यांतील इल्मेनाइटयुक्त वाळूत हेआढळते. या मौल्यवान विरळ खनिजाचा निओबियम व टँटॅलम ही मूलद्रव्ये मिळविण्यासाठी उपयोग होतो. प्रथम अमेरिकेत आढळल्याने व अमेरिकेचे एक नाव कोलंबिया असल्याने कोलंबाइट हे आणि टँटॅलमवरून टँटॅलाइट हे नाव पडले आहे.

ठाकूर, अ. ना.