धर्मांतर : धर्मांतर म्हणजे एका धर्मातून बाहेर पडून विधिपूर्वक दुसरा धर्म स्वीकारणे. धर्म ह्याचा येथे ‘प्रस्थापित धर्म’ असा अर्थ समजावयाचा आहे. जगातील असे प्रमुख धर्म म्हणजे ख्रिस्ती, इस्लाम, ज्यू, पारशी, बौद्ध, जैन, हिंदू  इत्यादी. ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतराविषयी तात्त्विक विचार फारच सूक्ष्म रीतीने केला आहे. पापी लोकांना पश्चात्ताप होऊन ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करण्यास सांगितले आहे तसेच तसे केल्याने ते पापापासून मुक्त होतील, अशी ग्वाहीही दिली आहे  (बायबल ‘द ॲक्ट्स’ ३·१९). ख्रिस्ती धर्मात प्रवेश करणे म्हणजे अंधारातून प्रकाशात जाणे, असेही बायबलमध्ये म्हटले आहे (‘१ पीटर’ २·९). धर्मांतर हा जणू मृत्यू व पुनर्जन्म आहे (‘रोमन्स’ ६·२—८), सैतानाच्या शक्तीकडून देवाच्या शक्तीकडे वळणे आहे (‘द ॲक्ट्स’ २६·१८) ह्यांसारख्या कल्पनाही बायबलमध्ये आल्या आहेत. धर्मांतराचे नैतिक, आध्यात्मिक, बौद्धिक ह्यांसारखे प्रकारही पाडले जातात. धर्मांतरामध्ये बाह्य धर्मांतराइतकेच आंतरिक धर्मांतरही महत्त्वाचे असते. बौद्धांची प्राचीन काळी आंतरिक धर्मांतराची चळवळ अर्ध्या जगावर पसरली. त्यात जबरदस्तीचा उपयोग केव्हाही केल्याचे उदाहरण नाही.

काहीजण बुद्धिपूर्वक धर्मांतर करतात. मात्र बहुसंख्य धर्मांतरे धनादिकांच्या लोभाने किंवा बळजबरीने घडवून आणलेली असतात. ख्रिस्ती व इस्लाम धर्मांच्या इतिहासात जबरदस्ती, सत्तेचे दडपण, प्रलोभन व अनेक वेळा युद्ध या प्रकारच्या साधनांनी धर्मांतर घडवून आणल्याचे पुष्कळ पुरावे सापडतात. ख्रिस्ती व इस्लाम धर्मांमध्ये प्रविष्ट झालेले अनेक हिंदू लोभाने किंवा बळजबरीने धर्मांतरित झालेले आढळतात. पोर्तुगीजांनी शस्त्राच्या धाकाने भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर शेकडो हिंदूंना ख्रिस्ती बनवले. आठव्या शतकापासून भारतात मुसलमानांनी अनेक हिंदूंना बळजबरीने  मुसलमान बनवले. मुसलमान लोक सत्ताधारी असल्याने त्यांनी अनेकदा गुन्हेगारांनी मुसलमान धर्म स्वीकारल्यास शिक्षा मिळणार नाही, अशी प्रलोभने दाखवूनही धर्मांतरे घडवली. बुद्धिपूर्वक धर्मांतराचे अलीकडील उदाहरण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी केलेला बौद्ध धर्मातील प्रवेश. त्यांच्यासमवेत तसेच नंतरही त्यांच्या हजारो अनुयायांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला.

धर्मातरितांना पुन्हा मूळ धर्मात घेणे ह्या अर्थी ‘शुद्धीकरण’ हा शब्द वापरला जातो. मध्ययुगीन इतिहासात नेताजी पालकर (शिवकालीन पत्रव्यवहार, खंड १५, पृ. २८९) आणि गंगाधर रंगनाथ कुळकर्णी (भारत इतिहास संशोधक मंडळ, द्वितीय संमेलनवृत्त, पृ. १३०-१३१) ह्यांची शुद्धीकरणे प्रसिद्ध आहेत. ह्या दोघांनाही जबरदस्तीने मुसलमान करण्यात आले होते व नंतर त्यांचे शुद्धीकरण झाले.

धर्मांतर ही केवळ वैयक्तिक बाब नसून ती समाजिकही असल्याने कायद्याच्या दृष्टीने धर्मांतराची दखल अनेकदा घ्यावी लागते. हिंदुविवाह कायद्यात धर्मांतरासाठी घटस्फोट मागण्याची सोय आहे. धर्मांतराचा प्रश्न द्विभार्याप्रतिबंधक कायद्याच्या संदर्भातही वारंवार पुढे येतो. भारतीय दंड संहितेच्या ४९४ कलमानुसार एक पती अगर पत्नी जिवंत असता दुसरा विवाह करणे हा गुन्हा मानला आहे. ख्रिस्ती विवाह कल्पनेनुसारही एकपत्नी व एकपती हाच विवाह शास्त्रशुद्ध मानला आहे.

धर्मांतर केल्यानंतर एक धर्म सोडून दुसरा धर्म का स्वीकारला यासंबंधी स्वतःचे विचार सांगणारी काही पुस्तके उपलब्ध आहेत. बाबा पदमनजी यांनी १८५४ मध्ये ख्रिस्ती धर्म स्वीकारला. यासंबंधी त्यांनी अरुणोदय (१८८४) या नावाने आत्मचरित्र लिहून त्यात धर्मांतरासंबंधीची पुष्कळ माहिती दिली आहे. रे. ना. वा. टिळक यांनी केलेल्या धर्मांतरासंबंधीचे त्यांचे मनोगत स्मृतिचित्रे (१९३४—३६) या लक्ष्मीबाई टिळकांच्या पुस्तकात आढळून येते. त्याचप्रमाणे पं. रमाबाईंनी ख्रिस्ती धर्म का स्वीकारला याची माहिती अपराजिता रमा (१९७५) या सौ. ताराबाई साठे यांनी लिहिलेल्या चरित्रविषयक पुस्तकात मिळते.

संदर्भ : 1. Thomas, W. B. Psychology of Conversion, 1935.

            2. Underwood, A. C. Conversion, Christian and Nonchristian, 1925.

थिटे, ग. उ. गाडगीळ, श्री. वि.