धर्मराज : (युधिष्ठिर). पंडू राजाची पत्नी कुंती हिला यमधर्माच्या मंत्रामुळे झालेला पुत्र. कौरव व पांडव यांचा ज्येष्ठ भाऊ. धीरोदात्त, धर्मनिष्ठ व ज्ञानी राजा. त्याच्या जन्माच्या वेळी आकाशवाणी झाली, की ‘हा सत्यवचनी व धर्मनिष्ठ राजा होईल व युधिष्ठीर या नावाने प्रसिद्ध होईल’ (महाभारत, आदिपर्व, १२३). धर्मपुत्र, अजातशत्रू, धर्म इ. नावांनीही तो प्रसिद्ध आहे. एक श्रेष्ठ तत्त्वचिंतक, सत्यनिष्ठ राजा आणि शत्रु-मित्रांना समान मानणारा, क्षमा, नीती, सत्य, धर्माचरण इ. गुणांनी संपन्न असणारा म्हणून महाभारतात त्याचा अनेक ठिकाणी गौरव केलेला आहे. अश्वत्थाम्याच्या मृत्यूच्या वेळी एकदाच धर्मराज संदिग्ध व म्हणून खोटे बोलला (महाभारत, द्रोणपर्व, १६४–१०७).

सर्व कौरव-पांडवांच्या बरोबरच त्याचे शिक्षण झाले. धृतराष्ट्राने त्याला यौवराज्याभिषेक केल्यामुळे कौरव-पांडवांत वैर निर्माण झाले. नारदाच्या सूचनेवरून त्याने राजसूय यज्ञ केला. त्यावेळी युधिष्ठिराचा व पांडवांचा झालेला गौरव पाहून दुर्योधनाच्या मनातील द्वेष अधिकच तीव्र झाला. दुर्योधनाने द्यूतात पराभूत केल्यानंतर धर्मराजाने शांतपणे वनवास पतकरला. अर्जुन, भीमादी भावांचा आणि द्रौपदीचा राग अनावर होत असतानाही धर्मराजाने त्यांचे सांत्वन केले. पांडव द्वैतवनात असताना चित्ररथ गंधर्वाने दुर्योधनाचा पराभव केला. त्यावेळी त्याला सोडविण्याची विनंती करण्यासाठी एक दूत धर्मराजाकडे आला. दुर्योधनाला मदत करणे योग्य नाही, असे भीम म्हणत असतानाही धर्मराजा म्हणाला, की ‘कौरवांबरोबर आपला संघर्ष असताना दुर्योधन आपला शत्रू, पण त्याच्यावर संकट आले असता आपण एकशे पाचजणांनी एकत्र असले पाहिजे’. काम्यकवनात स्वतः यमाने यक्षाचे रूप घेऊन धर्मराजांची परीक्षा घेतली. अज्ञातवासात हा कंक म्हणून विराटाच्या दरबारात राहिला.

वनवास संपल्यानंतर कौरवांनी आपल्याशी योग्यप्रकारे वागावे, अशी धर्मराजाची इच्छा होती परंतु सुईच्या अग्रावर मावेल एवढीही भूमी देण्याचे दुर्योधनाने नाकारल्यामुळे युद्धाचा प्रसंग निर्माण झाला. युद्ध टाळण्याचा धर्मराजाने खूप प्रयत्न केला. शेवटी युद्ध झाले आणि त्यात पांडवांचा विजय झाला. नंतर धर्मराजाने धृतराष्ट्राच्या आज्ञेने सर्व मृत बांधवांचे और्ध्वदेहिक केले. महाप्रस्थानाच्या वेळी धर्मराज स्वर्गात पोहोचला पण सर्व बांधव नरकात असताना मी एकटा येथे स्वर्गसुखाचा उपभोग घेणार नाही, असे त्याने यमधर्मास सांगितले (महाभारत, स्वर्गारोहणपर्व, २.१४).

शत्रूबद्दलही आदरभाव असणारा, श्रेष्ठ सत्यवचनी राजा म्हणून युधिष्ठिर प्रसिद्ध आहे. दुर्योधनासही तो सुयोधन म्हणत असे. त्याने राग, लोभ, मोह, मत्सर इ. दुर्गुणांना जिंकले होते. भीष्माचार्यांनी अंतकाळी धर्मराजाला राजधर्म, आपद्धर्म व मोक्षधर्म यांचा उपदेश केला. युधिष्ठिराच्या नावाने ‘युधिष्ठिर शक’ सुरू झाला. याचा प्रारंभकाल इ. स. पू. ३१०२ असा सांगितला जातो पण या गोष्टीस आधार मिळत नाही.

भिडे, वि. वि.