धरमतर : साबाज (शाहाबाज). कुलाबा जिल्ह्याच्या पेण तालुक्यातील अंबा नदीच्या तीरावरील एक छोटेसे बंदर आणि वावे गावचा पाडा. हे नदीमुखापासून आत सु. १६ किमी. आणि अलिबागच्या पूर्वेस सु. २० किमी. अलिबाग—पेण रस्त्यावर आहे. १८६८ मध्ये अलिबागच्या बाजूला एक धक्का बांधला आणि १९२६ मध्ये पेणच्या बाजूला दुसरा नवीन धक्का बांधण्यात आला. सुमारे ६० टन वजनाच्या बोटी वर्षभर या धक्यापर्यंत ये–जा करू शकतात. परंतु धरमतरपासून नदीउगमाकडील प्रवाह वाहतुकीस तितकासा उपयुक्त नाही. मुंबई—धरमतर दररोज फेरी बोटीची वाहतूक चालते. येथून भात, मीठ, विटा, सुकी व ओली मासळी हा माल मुख्यतः मुंबईला पाठविला जातो. परंतु मुंबई—कोकण—गोवा या जलद एस्. टी. वाहतुकीच्या सोयीमुळे दिवसेंदिवस याचे महत्त्व कमी होऊ लागले आहे.
चौधरी, वसंत