पेआनो, जूझेप्पे : (२७ ऑगस्ट १८५८-२० एप्रिल १९३२). इटालियन गणितज्ञ व तर्कशास्त्रज्ञ.⇨गणिताचा तात्त्विक पाया  व आकारिक तर्कशास्त्रीय भाषेचा [→ तर्कशास्त्र, आकारिक] विकास या विषयांत त्यांनी महत्त्वाचे कार्य केले. त्यांचा जन्म कुनेओजवळील स्पीनेट्टा येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कूनेओ येथे व उच्च शिक्षण तूरिन विद्यापीठात झाले. १८८० मध्ये विद्यापीठाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर १८९० पर्यंत त्याच विद्यापीठात साहाय्यक म्हणून त्यांनी काम केले. १८९० मध्ये अल्पतमीय कलनशास्त्राचे [→कलन] प्राध्यापक म्हणून त्यांची तूरिन विद्यापीठीत नेमणूक झाली व मृत्यूपावेतो त्यांनी तेथेच काम केले. १८८६ ते १९०१ या काळात त्यांनी तूरिन येथील लष्करी ॲकॅडेमीतही प्राध्यापक म्हणून काम केले.

पेआनो हे त्यांच्या ⇨चिन्हांकित तर्कशास्त्र व स्वंयसिद्धकानुसारी [→ स्वयंसिद्धक ] पद्धतीबद्दल विशेष प्रसिद्ध आहेत. संख्येविषयीच्या संकल्पनेसंबंधी त्यांनी केलेल्या विवरणामुळे गणिताच्या तात्त्विक पायाच्या संशोधनाला नवी दिशा प्राप्त झाली. नैसर्गिक संख्यांसंबंधी त्यांनी मांडलेली गृहीततत्त्वे [→ संख्या] त्यांच्याच नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांचे लेखन काटेकोरपणा व सुस्पष्ट मांडणी यांकरिता विशेष मान्यता पावले होते. त्यावेळी गणितामध्ये प्रचलित असलेल्या कल्पनांना धक्का देणारी कित्येक प्रति-उदाहरणे त्यांनी मांडून दाखविली होती. १८९० मध्ये त्यांनी एका लेखात अवकाश भरून टाकणाऱ्या वक्राचे त्यांचे प्रसिद्ध उदाहरण दिले. या वक्रावरूनच ⇨संस्थितिविज्ञानातील विशिष्ट अवकाशांना ‘पेआनो अवकाश’ असे म्हणतात. त्यांनी १८९१ मध्ये स्थापन केलेले Rivista di Mathematica हे गणितविषयक नियतकालिक १९०६ पर्यंत प्रसिद्ध होत होते. गणितातील सर्व ज्ञात प्रमेये एकत्रितपणे प्रसिद्ध करण्यासाठी त्यांनी या नियतकालिकातून Formalario Mathematica ही योजना १८९२-१९०६ या काळात इतर सहकाऱ्यांच्या साहाय्याने अमलात आणली आणि पेआनो यांच्या खास संकेतन पद्धतीचा तीत उपयोग करण्यात आला. पुढे बर्ट्रंड रसेल व ए. एन्. व्हाइटहेड यांनी या पद्धतीचा आपल्या प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका (१९१३) या सुप्रसिद्ध ग्रंथात अंशतः उपयोग केला. संचाचा घटक असण्याकरिता वापरात असलेले € हे चिन्ह त्यांनीच रूढ केले. एच्. जी. ग्रासमान यांची सदिशांची पद्धत [→ सदिश] पेआनो यांनी बरीच लोकप्रिय केली. १९०१-०६ या काळात त्यांनी विमाविज्ञानाविषयी लेखन केले.विज्ञानाकरिता एक आंतरराष्ट्रीय भाषा असावी असे त्यांचे मत होते. १९०३ मध्ये व्याकरणरहित लॅटिन भाषा ( latino  sine flexione ) ‘इंतेरलिंग्वा’ या नावाने प्रचारात आणण्यासंबंधीचे त्यांचे प्रतिपादन प्रसिद्ध झाले. त्यांनी व्याकरणाचे बीजगणित व भाषाभ्यास यासंबंधी संशोधन केले आणि १९१५ मध्ये इटालियन, फ्रेंच, जर्मन व इंग्लिश भाषिकांना उपयुक्त ठरेल असा इंतेरलिंग्वा भाषेतील शब्दसंग्रह (Vocabulario  de  interlingua) प्रसिद्ध केला. १९०८ मध्ये ते ॲकॅडेमिया प्रो इंतेरलिंग्वा या संस्थेचे अध्यक्ष झाले. [→ कृत्रिम भाषा].पेआनो यांचे लेखन सिलेक्टेड वर्क्स ऑफ जूझेप्पे पेआनो या शीर्षकाखाली एच्. सी. केनेडी यांनी १९७२ मध्ये प्रसिद्ध केले आहे. ते तूरिन येथे मृत्यू पावले.

                                                                                

                                                                                                                                                                         ओक, स. ज.