क्लाइन, फेलिक्स : (२५ नोव्हेंबर १८४९–२२ जून १९२५). जर्मन गणितज्ञ. भूमितीसंबंधीच्या त्यांच्या व्यापक विचारांचा गणिताच्या विकासावर मोठा परिणाम झाला. त्यांचा जन्म ड्युसेलडॉर्फ येथे झाला. बॉन, गॉटिंगेन व बर्लिन येथे शिक्षण घेतल्यानंतर एर्लांगेन विद्यापीठात त्यांची प्राध्यापकपदावर नेमणूक झाली (१८७२–७५). तेथेच त्यांनी ‘एर्लांगेन प्रोग्रॅम’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या गणितीय संशोधनाची योजना अंमलात आणली व या योजनेत त्यांनी विवृत्त फलने [→ फलन], ⇨गट सिद्धांत आणि अ-यूक्लिडीय भूमिती [→ भूमिती] या विषयांत महत्त्वाचे कार्य केले. त्यानंतर त्यांनी म्यूनिक, लाइपसिक (१८८०–८६) व गॉटिंगेन (१८८६–१९१३) येथील विद्यापीठात अध्यापन केले.

गॉटिंगेन येथून प्रसिद्ध होणाऱ्याMathematische Annulen या नियतकालिकाचे क्लाइन १८७२ पासून संपादक होते. त्यांनी १८९५ मध्ये एक गणितीय विश्वकोश तयार करण्याची योजना सुरू केली. त्यांनी प्राथमिक गणितासंबंधी केलेल्या लेखनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. त्यांनी अमेरिकेपर्यंत दूरवर प्रवास करून गणितविषयक व्याख्याने दिली. Vorlesungen über die Theorie der automorphen Functionen (दोन खंड, १८९७ व १९०२) हा त्यांचा ग्रंथ महत्त्वाचा मानला जातो. १८८५ मध्ये इंग्लंडच्या रॉयल सोयायटीच्या सदस्यत्वावर त्यांची निवड झाली व १९१२ मध्ये सोसायटीच्या कॉप्ली पदकाचा त्यांना बहुमान मिळाला. ते गॉटिंगेन येथे मृत्यू पावले.

वाड, श. स.