पॉलिबिअस : (इ. स. पू. सु. १९८-११७). एका प्रसिद्ध ग्रीक इतिहासकार. पॉलिबिअसचा जन्म आर्केदीआ प्रांतातील मेगलॉपलिस येथे झाला. लायकोर्टस या तत्कालीन ग्राक मुत्सद्याचा तो मुलगा.तेथे त्याने अनेक जबाबदारीची पदे भूषविली. तो ग्रीकांच्या घोडदळाचा सेनापती होता. तो रोमनांचा उघडउघड पक्षपाती होता. रोमाच्या मॅसिडोनिया प्रांतावरील स्वारीत पिडनाच्या लढाईत इ. स. पू. १६८ त्याला कैदी म्हणून रोमला पाठविण्यात आले. तो इमिलिअस पॉलस या रोमन सेनापतीच्या घरी राहिला. त्याच्या प्रयत्नाने रोमनांशी झालेल्या तहांत ग्रीकांना महत्त्वाच्या सवलती मिळाल्या.
रोममधील सिपिओ इमिलिअस या कुटुंबाचा आश्रय सु. १६ वर्षे मिळाल्यामुळे त्याला रोममधील घडामोडींची, तसेच राजकीय परिस्थितीची अद्ययावत माहिती गोळा करता आली. त्याने स्पेन व आफ्रिका खंडात प्रवास केला आणि इ. स. पू. २६६-१४६ या कालखंडातील रोमन प्रजासत्ताकाच्या विकासावरिल प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. या ग्रंथाच्या चाळीस भागांपैकी केवळ पाच भाग व उर्वरित भागातील काही उत्तरे उपलब्ध आहेत.
त्याला मुख्यत: दुसर्या प्यूनिक युद्धपासून (इ. स. पू. २२०) अँटोयओकस व टॉलेमी फिलॉपॉटर यातील युद्धांपर्यंतचा इतिहास लिहावयाचा होता तथापि तो पहिल्या प्यूनिक युद्धापर्यंत मागे गेलेला दिसतो. पॉलिबिअस हा थ्यूसिडिडिझ इतकाच प्रभावी इतिहासकार आहे. त्याने उपलब्ध ऐतिहासिक साधने आणि भौगोलिक स्थिती यांचा चिकित्सक अभ्यास करून रोमचा इतिहास लिहिला.
संदर्भ : 1. Bury, J. B. Ancient Greek Historians, New York, 1958.
2. Walbank, F. W. Polybius, New York, 1973.
ओक, द. ह.