पंचमढी :मध्य प्रदेश राज्यातील हुशंगाबाद जिल्ह्याच्या सोहागपूर तालुक्यातील एक प्रसिद्ध गिरिस्थान व मध्य प्रदेश राज्याची उन्हाळी राजधानी. लोकसंख्या कँटोनमेंटसह ९,२२४ (१९७१). हे जबलपूरच्या नैर्ऋत्येस सु. १७९ किमी. सातपुडा पर्वतरांगेच्या जंगलवेष्टित महादेव टेकड्यांनी वेढलेल्या ५९·५७ चौ. किमी. क्षेत्राच्या पठारावर, समुद्र सपाटीपासून १,०६७ मी. उंचीवर वसले आहे. मुंबई–अलाहाबाद या मध्य लोहमार्गावरील पिपरिया हे याचे जवळचे (५१ किमी.) लोहमार्गस्थानक आहे. पिपरिया व छिंदवाडा येथून पंचमढीशी मोटार वाहतूक चालते. येथे वार्षिक सरासरी कमाल व किमान तपमान अनुक्रमे २६° से. व १५° से. आणि पर्जन्यमान २०६ सेंमी. असते. येथील हवा आल्हाददायक असून हिवाळ्यात तपमान अतिकमी होत नाही वा उन्हाळ्यात ते जास्त वाढतही नाही. याचा बराचसा भाग जंगलवेष्टित असून त्यात साल, हिरडा, साग, जांभूळ, आंबा, महुआ इ. प्रमुख वनस्पतींशिवाय निरनिराळे पक्षीही आढळतात.
पंचमढी हा पंच मठींचा (पाच प्राचीन गुहा) अपभ्रंश असावा. येथे असलेल्या या पाच गुहा पांडवांच्या असून वनवासकाळात पांडव काही काळ येथे राहिले होते, असे मानले जाते. काही अभ्यासक त्या गुहांचा संबंध बौद्ध काळाशी जोडतात. पूर्वीच्या येथील तळ्याच्या ठिकाणीच सध्याचे पंचमढी वसलेले आहे, असाही एक समज आहे. द हायलँड्स आॅफ सेंट्रल इंडियाचा लेखक कॅप्टन जे. फॉरसाइथ याने १८५७ मध्ये एक आरोग्यवर्धक केंद्र म्हणून या ठिकाणाची प्रथम स्थापना केली. १८८६ मध्ये येथे नगरपालिकेची स्थापना झाली असून शहराचा नागरी कारभार कँटोनमेंट बोर्ड व नगरपालिका यांद्वारा चालतो.
पंचमढीपासून आठ किमी.वरील धूपगढ (१,३५८ मी.), नऊ किमी. वरील महादेव (१,३३६ मी.) व चौरागढ (१,३१६ मी.) ही येथील प्रमुख शिखरे होत. यांपैकी धूपगढ हे सातपुडा पर्वतरांगेतील अत्युच्च शिखर असून येथून सूर्यास्ताचे मनोरम दृश्य दिसते. महादेव टेकडीवर महादेवाचे मंदिर आणि जवळच महादेव गुहा असून शिवरात्रीला येथे मेळा भरतो. महादेव गुहेपासून चार किमी.वरील चौरागढ हे गोंड आदिवासींचे धार्मिक ठिकाण आहे. येथून ३२ किमी. वरील झरिया जंगल शिकारीसाठी महत्त्वाचे असून तेथे दिवसासुद्धा सिंह सापडतात. पठाराच्या उतारावर वालुकाश्माच्या खाणी आहेत. येथील पांडव गुहा, गोल्फ मैदान व त्याच्या जवळील ४८५·६ हे. क्षेत्राचे सुंदर शासकीय उद्यान, अनेक जलप्रपात आणि वनश्रीने वेढलेले लहानलहान ओढे, जमना कुंड, एकांतगिरी व राजेंद्रगिरी (पॅनोरमा) ह्या टेकड्या इ. विविध प्रेक्षणीय स्थळांमुळे पर्यटक, वनस्पतिशास्त्रज्ञ, खेळाडू व सिनेकलावंतांची येथे खूप गर्दी होते. निरनिराळ्या खेळांचे (टेनिस, बॅडमिंटन, बिलिअर्ड्झ इ.) क्लब, पोहण्यासाठी सुंदर तलाव, विहारनौका, विद्यालये, महाविद्यालय, ग्रंथालय, शासकीय रुग्णालय, तारगृह इ. विविध सुखसोयींशिवाय भूदल शिक्षणाचे केंद्रही येथे आहे.
चौधरी, वसंत
“