पेहलवी साहित्य : इसवी सनाच्या सहाव्या शतकापासूनच पेहलवी भाषेत खऱ्या अर्थाने साहित्यनिर्मिती सुरू झाली असावी, असे अभ्यासकांचे मत आहे. अरबांनी इराण जिंकून तेथे आपली सत्ता प्रस्थापित केल्यानंतरही (सातव्या शतकाचा मध्य) दस्तूर किंवा आदरणीय विद्वान पारशी धर्मगुरू त्या भाषेत ग्रंथरचना करीत होते. तथापि भारतात येताना त्यांनी ह्या ग्रंथांची हस्तलिखिते आपल्याबरोबर आणली नाहीत. सतराव्या-अठराव्या शतकांत ती भारतात आणण्यात आली.
उपलब्ध पेहलवी ग्रंथांचे स्थूलमानाने तीन वर्ग पाडता येतील: (१) प्राचीन अवेस्ता ग्रंथांची आणि त्यांवरील भाष्यांची पेहलवीत केलेली भाषांतरे, (२) पेहलवी भाषेतील धार्मिक ग्रंथ आणि (३) ज्यांना काटेकोरपणे ‘धार्मिक’ हे विशेषण लावता येणार नाही, असे – ऐतिहासिक आणि संकीर्ण विषयांवरील – ग्रंथ.
अवेस्ता भाषेतील ग्रंथांच्या अभ्यासकांच्या दृष्टीने पहिल्या वर्गातील ग्रंथ अत्यंत महत्त्वाचे आहेत. अवेस्ता भाषेतील यस्न, वेंदिदाद, महत्त्वाचे काही यश्त, अओगेमदएचा अशा धर्मसाहित्याच्या अनुवादांवरून, प्राचीन अनुवादकांनी हे साहित्य कसे आणि कोणत्या दृष्टीकोणातून समजून घेतले होते, ह्याची कल्पना येऊ शकते. मूळ ग्रंथाचे भाषांतर अनेकदा शब्दश: केलेले आहे. जेथे अनुवादकांना मूळ अवेस्ता शब्दांच्या अर्थाचे आकलन झाले नाही, तेथे त्या शब्दांचा अनुवाद न करता त्यांचे केवळ पेहलवी लिप्यंतर दिलेले आहे काही ठिकाणी चुकीचा अनुवादही आढळतो. अनुवादकांच्या ह्या मर्यादा लक्षात घेऊनही अनुवादांचे मोल मोठे आहे, हे मान्य झालेले आहे.
पारशी धर्म समजून घेण्याच्या दृष्टीने दुसऱ्या वर्गातील धार्मिक ग्रंथ महत्त्वाचे आहेत. ह्या संदर्भात दिनकर्द ह्या ग्रंथाचे खंड ३ ते ९ हे उल्लेखनीय आहेत. पारशी धर्मीय सासानींच्या, तसेच सासानींचे साम्राज्य नष्ट झाल्यानंतरच्या काही शतकांतील पारशी अनुयायांच्या धार्मिक श्रद्धा त्यांत साररूपाने व्यक्त झालेल्या आहेत. ‘नस्क’ ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या २१ अवेस्ता धर्मग्रंथांपैकी १९ ग्रंथांचा आशय दिनकर्दच्या आठव्या आणि नवव्या खंडांत संक्षेपाने दिलेला असल्यामुळे ह्या खंडांचे महत्त्व विशेष आहे. बुंदाहिश्न ह्या ग्रंथात विश्वोत्पत्तीची जरथुश्त्रप्रणीत कथा आलेली आहे. दातस्तान- इ-देनिक हा ग्रंथ प्रश्नोत्तरपद्धतीने रचिलेला असून पारशी धर्मतत्त्वांचा तो मार्गदर्शक ग्रंथ मानला जातो. विविध धार्मिक विषयांवर दस्तूरांनी केलेला उपदेश अनेक पंदनाम्यांतून संगृहीत आहे. तिसरा वर्ग ऐतिहासिक आणि संकीर्ण विषयांवरील ग्रंथांचा. आर्तख्शिराने सासानी साम्राज्याची स्थापना कशी केली, हे कार्नामक-इ आर्तख्शिर-इ पापकान ह्या इतिवृत्तात ( क्रॉनिकल ) सांगितले आहे. यात्कार-इ झरिरान ही ख्योनिअनांचा राजा अर्जास्प ह्याच्याविरूद्ध पुकारलेल्या पवित्र युद्धाची कथा आहे. विश्तास्प राजाचा भाऊ झरिर ह्याने ह्या युद्धात प्रमुख आणि महत्त्वाची कामगिरी बजावलेली होती. मादीगान-ई-हझार दातेस्तान हा कायद्याचे विस्तृत विवेचन करणारा ग्रंथ. इराणमधील महत्त्वाच्या शहरांची माहिती देणारा एक भौगोलिक स्वरूपाचा ग्रंथही मिळतो. ही शहरे कुणी उभविली, ह्यासंबंधीची माहितीही ह्या ग्रंथात दिलेली आहे. बुद्धिबळे किंवा शतरंज ह्या खेळावर एक ग्रंथ पेहलवीत लिहिला गेला आहे. इराणमधील बुद्धिमान माणसांची परीक्षा घेण्यासाठी भारतातून हा खेळ इराणमध्ये पाठविण्यात आला, अशी माहिती त्यात मिळते. सिगिस्तान ( सिस्तान ) मधील विस्मयकारक गोष्टींच्या वर्णनार्थ एक ग्रंथ लिहिला गेला आहे.
पहा : अवेस्ता.
तारापोर, जे. सी. (इं.) कुलकर्णी, अ. र. (म).
“