कावाबाटा, यासुनारी : (११ जून १८९९—१६ एप्रिल १९७२). प्रख्यात जपानी कादंबरीकार. ओसाका येथे जन्म. वयाच्या दुसऱ्या वर्षीच पोरकेपण आले. पुढे आजोबांनी त्यांचा प्रतिपाळ केला. `टोकिओ इंपरियल’ विद्यापीठात इंग्रजी व जपानी वाङ्मयाचा अभ्यास केला व पदवी घेतली (१९२४). त्याच वेळी `नीओ-सेन्सुॲलिस्ट्‌स’ ह्या तरुण लेखकपंथाचे नेतृत्व केले. त्यांच्या इझू-नो-ओदोरीको (१९२५, इं.शी. द इझू डान्सर) ह्या कादंबरीने त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या अन्य कादंबऱ्यांत युकीगुनी (१९४७, इं.भा.स्नो कंट्री, १९५७), सेम्बा झुरू (१९४९, इं.भा.थाउजंड क्रेन्स, १९५९), यामा नो ओतो (१९५४, इ.शी.द साउंड ऑफ द माउंटन) आदींचा अंतर्भाव होतो. स्नो कंट्री  ह्या कादंबरीत एक निराधार, ग्रामीण गैशा व टोकिओमधील एक स्वच्छंद व उथळ मनोवृत्तीचा तरुण ह्यांच्या विफल प्रेमाची कहाणी आहे, तर थाउजंड क्रेन्समध्ये चहापानाच्या पारंपरिक विधीभोवती गुंफलेल्या घटनांची मालिका वर्णिली आहे. आपल्या कादंबऱ्यांतील नायिकांची चित्रणे त्यांनी अधिक तन्मयतेने रेखाटलेली आहेत. त्यांच्या साहित्यातून मृत्यू, विनाश, एकाकीपणा ह्यांचे प्रभावी चित्रण आढळते. कावाबाटांची शैली काव्यात्म व चित्रदर्शी आहे. नाजूक रंगात रंगविलेल्या जपानी वा चिनी चित्रांसारखे त्यांचे चित्रण गूढरम्य वाटते.१९६८ साली त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले. हा सन्मान मिळविणारे ते पहिलेच जपानी साहित्यिक होत. जपानमधील सर्व महत्त्वाची वाङ्मयीन पारितोषिके त्यांना लाभली. त्यांच्या कादंबऱ्यांची अनेक भाषांतून भाषांतरे झाली आहेत. कानागावा जिल्ह्यातील झुशी ह्या गावी त्यांनी आत्महत्या केली.

इनामदार, श्री.दे.