पेरुंगळूर वैद्यलिंगम् अखिलांडम् – ‘अकिलन’ : (२७ जून १९२२ – ३१ जानेवारी १९८८). भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रख्यात तमिळ लेखक. जन्म पुदुकोट्टई जिल्ह्यातील पेरुंगळूर गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात. अखिलन वा अकिलन ह्या नावानेच ते प्रसिद्ध आहेत; कारण ह्या नावानेच ते लिहितात. पुदुकोट्टई येथे शालेय शिक्षण घेत असतानाच अकिलनचे वडील वैद्यलिंगम् कौटुंबिक विपत्तीने खचून वारले. ते वनखात्यात वनक्षेत्रपाल (रेंजर) होते. नंतर आईने त्यांचे पालनपोषण मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण केले. पण घरची परिस्थिती यथातथाच असल्याने, अकिलन ह्यांचे सुरुवातीचे आयुष्य हाल-अपेष्टांत व्यतीत झाले. पुदुकोट्टई येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांनी शक्ति युवक संघनावाची संस्था तेथे स्थापून (१९४०) विद्यार्थी चळवळीचे बीज पेरले. १९४२ मध्येछोडो अकिलनभारत आंदोलना त्यांनी भाग घेतला. याप्रमाणे विद्यार्थिदशेतच स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी होऊन त्यांनी १९४४ पर्यंत देशसेवा केली. नंतर त्यांनी रेल्वे डाकसेवा विभागात (मेल सर्व्हिस) पृथक्कार (सॉर्टर) म्हणून १९४५ ते १९५७ पर्यंत काम केले. १९५८ ते १९६५ पर्यंतचा काळ मद्रास येथे स्वतंत्र लेखन करण्यात त्यांनी व्यतीत केला. १९६५ च्या अखेरीस त्यांनी आकाशवाणी’ वर नोकरी पतकरली. हल्ली ते आकाशवाणीच्या मद्रास केंद्रावर निर्माते म्हणून काम करत आहेत.

‘अकिलन’

अकिलनह्या टोपणनावाने त्यांनी शालेय जीवनापासूनच लघुकथा लिहिण्यास सुरुवात केली. कल्कि या साप्ताहिकात कलैमहळ या मासिकात त्यांच्या सुरुवातीच्या कथा प्रसिद्ध झाल्या. आतापर्यंत त्यांनी सु. दोनशे लघुकथा लिहिल्या आहेत. श्रीमंत वर्गाच्या आचारांवर त्यांनी आपल्या कथा-कादंबऱ्यांतून ठिकठिकाणी कोरडे ओढले आहेत. रेल्वे डाकसेवेत असतानाच त्यांनी आठ कादंबऱ्या लिहिल्या. नेंजिन् अलैगळ् (१९५३, म. शी. हृदय-लहरी) आणि वाळुव् एंगे ? (१९५७, म. शी. जीवन कोठे आहे ?) ह्या त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. कथा-कादंबऱ्या लिहिण्याची प्रेरणा त्यांना कलैमहळ मासिकाचे संपादन कि. वा. जगन्नाथन् यांच्याकडून मिळाली. १९५८ मध्ये त्यांनी लिहिलेली पावै विळक्कु (म. शी. दीपकन्या) ही कादंबरी बरीच गाजली. या कादंबरीतील उमा ही व्यक्तिरेखा तर तमिळनाडूत फारच लोकप्रिय झाली. अकिलन यांनी काही ऐतिहासिक कादंबऱ्याही लिहिल्या आहेत. वेंगैयिन् मैन्दन् (१९६१, म. शी पुरुषव्याघ्र राजराज चोल) ह्या राजराज चोलाच्या कारकीर्दीवर लिहिलेल्या कादंबरीस १९६३ चा साहित्य अकादेमी- पुरस्कार लाभला. कयल् विळि (१९६५, म. शी. मीनाक्षी) आणि पेट्रि-तिरूनगर (१९६६, म. शी. विजयश्रीनगर) या त्यांच्या आणखी दोन उल्लेखनीय ऐतिहासिक कादंबऱ्या होत.

चित्तिरप्पावै (१९६८, म. शी. चित्रकन्या) या १९७५ चा भारतीय ज्ञानपीठपुरस्कार प्राप्त झालेल्या त्यांच्या प्रख्यात कादंबरीत त्यांनी कला व संपत्ती यांच्यातील संघर्ष कलात्मक ताकदीने दाखवून आपल्या हक्क, कर्तव्य व जीवननिष्ठेवर अढळपणे उभ्या राहणाऱ्या एका नवयुगीन स्त्रीचा साक्षात्कार घडवला आहे. माणसाचे घर हे स्नेह व प्रेमाचे अधिष्ठान असावे; नुसत्या अवडंबराचे ते प्रदर्शन असू नये, असे ते सूचित करतात. लब्धप्रतिष्ठितांच्या ढोंगी वर्तनावरही त्यांनी ह्या कादंबरीत विदारक प्रकाश टाकला आहे. समाजाच्या सद्यःस्थितीविषयी अंतर्मुख होऊन, अकिलन हे आपले जीवनदर्शन येथे प्रकट करतात. समाजातील अपप्रवृत्तींचे त्यांनी तीत सुंदर विश्लेषण करून एका नव्या आदर्श समाजाचे चित्रही उभे केले आहे. अण्णामलै हा चित्रकार व त्याच्या गुरुची मुलगी आनंदी या दोन पात्रांद्वारे ही कादंबरी विकसित होते.

एंगे पोगिरोम् ? (१९७३, म. शी. आम्ही कोठे जात आहोत?) या सामाजिक कादंबरीत त्यांनी स्वातंत्र्योत्तर काळातील ढोंगी व अनाचारी धनिक आणि गांधीयुगाचे सच्चे देशभक्त यांच्यातील संघर्ष मोठ्या कलात्मकतेने चित्रित केला आहे. त्यांच्या या कादंबरीस १९७५ मध्ये दहा हजार रुपयांचा डॉ. राजा सर अण्णामलै चेट्टियार पुरस्कार लाभला. त्यांनी कथा, कादंबरी, नाटक, निबंध, समीक्षा, प्रवासवर्णन, बालवाङ्‍मय इ. प्रकारांतील सु. ४५ साहित्यकृती निर्माण केल्या. त्यांच्या इतर उल्लेखनीय साहित्यकृती पुढीलप्रमाणे होत : कथासंग्रह : शक्तिवेल् (१९४६, शक्तिभाला), निलविनिल (१९४८, चांदण्यात), मुळु निलवु (१९५४, पूर्णिमा, मोपासांच्या कथांचा तमिळ अनुवाद); कादंबऱ्या : पेण् (१९४७, स्त्री), दाहम् (१९५३, तहान, ऑस्कर वाईल्डच्या सलोमी ह्या नाटकाचे तमिळ रूपांतर), पुदु वेळ्ळम् (१९६४, नवा पूर); नाटके : वाळ्‍ळिल इन्बम् (१९५५, जीवनात सुख); समीक्षा : कलैयुम् वयिरूम् (१९५६, कला आणि पोट); निबंध : कदैक्कले (१९७२, कथेची कला); प्रवासवर्णन : शोवियत् नाट्टिल् (१९७७, सोवियत देशात) इत्यादी.

अकिलन हे कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाहीत; तथापि त्यांच्या लेखनावर गांधीजींच्या तत्त्वज्ञानाचा मात्र खोलवर प्रभाव पडलेला आहे. गांधीयुगीन तत्त्वांना आपल्या कथा-कादंबऱ्यांच्या योगाने तमिळनाडूत परिपुष्ट व प्रभावी बनवणारे अकिलन हे सामर्थ्यसंपन्न लेखक होत. जीवनासाठी कला हे त्यांच्या लेखनाचे सूत्र होय. त्यांची वृत्तीही राष्ट्रवादी आहे. त्यांची शैली सरळ पण प्रभावी आहे. समाजातील अन्यायांवर प्रहार करताना त्यांच्या लेखणीस विशेष धार चढते. वाचकांना अंतर्मुख व चिंतनशील बनविण्याचे सामर्थ्य त्यांच्या कथा-कादंबऱ्यांत पुरेपूर प्रत्ययास येते.

त्यांनी श्रीलंका, मलेशिया, सिंगापूर, रशिया इ. देशांचा प्रवास केला. त्यांच्या अनेक कथा-कादंबऱ्यांचे विविध भारतीय भाषांत व काही कथांचे इंग्रजी, रशियन, जर्मन, पोलिश इ. यूरोपीय भाषांतही अनुवाद झाले आहेत. त्यांच्या पावै विळक्कु, कयल् विळि व वाळवु एंगे? ह्या तीन कादंबऱ्यांवर आधारित तमिळ चित्रपटही निघालेत. त्यांच्या काही कादंबऱ्या दक्षिण भारतातील अनेक विद्यापीठांतून तसेच सिंगापूर, मलेशियातील विद्यापीठांतूनही पाठ्यपुस्तके म्हणून लागल्या आहेत. त्यांच्या कादंबऱ्या तमिळनाडूच्या जीवनावर आधारित असल्या, तरी त्यांतील व्यापक दृष्टीमुळे त्यांना वैश्विक परिमाण प्राप्त झाले आहे. सामाजिक, राजकीय, आर्थिक व भावनिक समस्या त्यांनी आपल्या कादंबऱ्यांतून मोठ्या कलात्मकतेने हाताळल्या आहेत.

अकिलन १९६४ पासून साहित्य अकादेमीच्या तमिळ-सल्लागार मंडळाचे सदस्य होते आणि १९७९ पासून सा. अकादेमीच्या जनरल कौन्सिलचे सदस्य आहेत. अखिल भारतीय तमिळ लोखकसंघटनेचे सरचिटणीस (१९६१–६४), तमिळ लेखक सहकारी प्रकाशन संस्थेचे संचालक इ. पदांवरही त्यांनी काम केले. आजवर त्यांना विविध सन्मान तसेच पुरस्कार-पारितोषिकेही मिळाली; कलैमहळचा प्रथम कादंबरीपुरस्कार (पेण् – १९४६), अकादेवी अवॉर्ड फॉर तमिळ नॉव्हेल (नेंजिन् अलैगळ् – १९५३), तमिळनाडू स्टेट एज्युकेशन बोर्डाचे बालसाहित्याचे पहिले पारितोषिक (१९६३), तमिळनाडू राज्याचे साहित्य पुरस्कार (कयल् विळि – १९६८, ऍरिमलै – लघुकथासंग्रह, १९७०) इत्यादी.

तमिळ कथा-कादंबरीच्या विकासात अकिलनचा वाटा व स्थान विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते.

लाळे, प्र. ग.; सुर्वे, भा. ग.