पेत्रा : खडकातील कोरीव कामासाठी कामासाठी प्रसिद्ध असलेले जॉर्डनमधील प्राचीन शहर. येथील लाल, पिवळ्या खडकांमुळे ‘रोझ-रेड सिटी’ या नावानेही ते ओळखले जाते. जॉर्डनच्या दक्षिण भागातील वाळवंटी प्रदेशात, मौंट हॉरच्या ईशान्य दरीत वाडी मूसा या गावाजवळच या प्राचीन शहराचे अवशेष आढळतात. बायबलमध्ये उल्लेखिलेल्या सीला या गावाचे ग्रीक नाव ‘पेत्रा’ (खडक) असावे.
हे शहर मूळचे हॉरिटांचे असावे. त्यानंतर ते एडोमाइटांनी जिंकले. इ. स. पू. चौथ्या शतकात ते नाबाता या अरबी जमातीच्या ताब्यात गेले. येथपासूनच या शहराविषयीचा उल्लेख मिळतो. इ. स. पू. ३१२ मध्ये नाबाता या जमातीने येथे राजधानी वसविली. नाबातांच्या काळात हे शहर पूर्व-पश्चिम व्यापारी मार्गांवरील केंद्र बनल्याने त्याचा खूपच विस्तार करण्यात आला. पुढे अरब-रोमन संघर्षकाळात इ. स. ४० नंतर पेत्राचा ऱ्हास होऊ लागला व अखेर १०६ मध्ये ते रोमनांच्या ताब्यात गेले. त्यांनी या शहराचे व्यापारी महत्त्व वाढविण्याचा प्रयत्न केला, पण त्याच सुमारास सिरियातील पॅल्मायराचे व्यापारी शहर म्हणून महत्त्व वाढले. अशा परिस्थितीत सातव्या शतकात पेत्रा मुसलमानांच्या व पुढे बाराव्या शतकातील ख्रिस्ती धर्मयुद्धकाळात ख्रिश्चनांच्या ताब्यात गेले. नंतर १८१२ मध्ये जॉन ल्यूइस बुर्कहार्ट या स्विस प्रवाशाला त्याचा शोध लागेपर्यंतची या नगराची माहिती मिळत नाही. दोन्ही बाजूंना उंच तट असलेल्या वळणावळणांच्या खिंडीतून गेल्यावर या प्राचीन शहराचा पठारी परिसर दिसतो. पेत्रा येथे १९५८ व त्यानंतर झालेल्या उत्खननांमुळे रोमनपूर्वकालीन पेत्राविषयी बरीच माहिती उपलब्ध झाली आहे. तीवरून नाबातांची प्रगत वास्तुकला, अभियांत्रिकी व मृत्तिकाशिल्प यांची कल्पना येते. येथील प्राचीन अवशेष समुद्रसपाटीपासून ८२५ मी. उंचीवर असून, त्यांत खडकात कोरलेली अल् खझ्न (खजिना) ही वास्तू, भव्य थडगी, धार्मिक कोरीव चित्रे, क्वास्र अल् बिंट देऊळ व अर्धवर्तुळाकार थिएटर यांशिवाय रोमन काळातील रस्ता, प्रवेशद्वार व बाजाराच्या जागा इ. उल्लेखनीय आहेत.
चौंडे, मा. ल.