पेडॅलिएसी : (तिल कुल). फुलझाडांपैकी [→ वनस्पति, आवृतबीज उपविभाग ] द्विदलिकित वनस्पतींचे एक लहान कुल. या कुलातील तीळ (सं. तिल) या महत्त्वाच्या वनस्पतीच्या नावावरून या कुलाला तिल कुल हे नाव दिले आहे. याचा अंतर्भाव पर्सोनेलीझ गणात करतात. बिग्नोनिएसी (टेटू कुल), ॲकँथेसी (वासक कुल), मार्टिनिएसी (वृश्चन कुल), स्क्रोफ्यूलॅरिएसी (ब्राह्मी कुल), लॅबिएटी (तुलसी कुल), व्हर्बिनेसी (साग कुल) इ. कुलांशी या कुलाचे आप्तभाव आहेत. ए. एंग्लर व के. प्रांट्ल यांच्या पद्धतीत पेडॅलिएसीचा समावेश ट्युबिफ्लोरि गणात केला असून जी. बेंथॅम व जे. डी. हूकर यांनी पर्सोनेलीझमध्येच केला आहे मात्र व्हर्बिनेसी व लॅबिएटी ही कुले त्यात अंतर्भूत नाहीत. जे. हचिन्सन यांनीही व्हर्बिनेसी व लॅबिएटी ही कुले लॅमिएलीझ या स्वतंत्र गणात घातली आहेत.मार्टिनिएसी कुलाला स्वतंत्र दर्जा बेंथॅम व हूकर यांच्या पद्धतीत नाही ते पेडॅलिनीत अंतर्भूत आहे.
तिल कुलात सु. १२ वंश व ५० जाती (जी. एच्. एम्. लॉरेन्स यांच्या मते १६ वंश व ५० जाती) अंतर्भूत केल्या असून या वनस्पती बहुतेक ⇨ ओषधी व झुडपे आहेत त्या एक किंवा अनेक वर्षे जगतात व बहुतेक समुद्रकिनारी व मरुस्थलात (रुक्ष जागी) आढळतात त्यांचा प्रसार उष्ण कटिबंधात, द. आफ्रिकेत, मॅलॅगॅसीत व इंडोमलायात आहे. यांची पाने साधी, अनुपपर्णी (उपपर्णे नसलेली) अखंड किंवा काहीशी विभागलेली, समोरासमोर (कधीकधी सर्वांत वरची एकाआड एक) असतात. प्रपिंडीय (द्रव पदार्थ स्रवणाऱ्या ग्रंथी असलेले) केस सर्वांगावर असतात. फुले एक एकटी किंवा तीन फुलांच्या वल्लरीत असतात ती द्विलिंगी, अनियमित, अवकिंज असतात संदले पाच, कधी चार व तळाशी थोडी जुळलेली प्रदले (पाकळ्या) पाच, खाली जुळून नळीसारख्या, काहीशा द्वयोष्ठाकृती (दोन ओठांसारख्या) व वर पसरट केसरदले चार, द्वयोन्नत (दोन लहान व दोन मोठी) पाकळ्यांस चिकटलेली एक वंध्य केसरदल असते. दोन जुळलेल्या किंजदलांच्या ऊर्ध्वस्थ किंजपुटात बहुधा चार कप्पे किंवा छद्मपटांनी विभागलेला एक कप्पा असतो. बीजक विन्यास (बीजकांची मांडणी) अक्षलग्न व बीजके प्रत्येक कप्प्यात एक ते अनेक [→ फूल ] फळ बोंड किंवा कपाली (कवचयुक्त), कधीकधी अंकुशयुक्त. बियांत पातळ पुष्क (गर्भाबाहेरील अन्नांश) असतो या कुलातील तीळ, मोठे गोखरू [→ गोखरू, मोठे ] इ. वनस्पती उपयुक्त आहेत.
परांडेकर, शं. आ.