जावळि : कर्नाटक संगीतातील एक प्रणयगीतप्रकार. ⇨पदम् ही दिव्य, उदात्त व उत्कट प्रेमाची गीते होत तर त्याउलट जावळी ही हलकीफुलकी व शृंगारिक स्वरूपाची असतात. कल्पनेच्या आणि आशयाच्या दृष्टीने त्यांचे स्वरूप लौकिक आणि ऐंद्रिय असते. मुख्यत्वेकरून त्यांच्या तरतरीत, आकर्षक आणि उडत्या स्वरावलींमुळे व चालींमुळे त्यांना लोकप्रियता लाभलेली आहे. जावळी ही प्रायः ‘मध्यमकालात’ (मध्यलयीत) बांधलेली असून ती परज, जंझूटी, काफी, बेहाग आणि हमीरकल्याण अशा प्रचलित रागांत असते. नायक, नायिका व तिची सखी यांनी गायिलेल्या जावळीही उपलब्ध आहेत. उदात्ततेपासून काही प्रमाणात ढळलेले असे नायक-नायिकासंकेताचे स्वरूप जावळी या प्रकारात दिसून येते. जावळी ही प्रायः बोलीभाषेत असून, कधी कधी तिचे स्वरूप उत्तान-अश्लीलही असते. ‘पदम्’शी तुलना केली असता जावळीमध्ये आविष्कृत होणाऱ्या व्यक्ती कनिष्ठ दर्जाच्या असतात.
जावळी ही अभिजात संगीताच्या ललित क्षेत्रात मोडते. संगीताच्या कार्यक्रमामध्ये पल्लवीनंतरच्या भागात जावळी गायिली जाते. त्याचप्रमाणे नृत्याच्या कार्यक्रमातही जावळी गातात. जावळीच्या उडत्या आणि जिवंत स्वरावली तज्ञ व अनभिज्ञ या दोघांनाही सारख्याच आकर्षक वाटतात.
जावळीचा आरंभ एकोणिसाव्या शतकात झाला. जावळी या शब्दाचे मूळ ‘जावडि’ (विशिष्ट प्रकारची ग्राम्य व कामुक कविता) हा कन्नड शब्द असावा. संगीताचा प्रवाहीपणा हे जावळीचे एक खास वैशिष्ट्य आहे. जावळीची प्रेमगीते ही अभिजात संगीताच्या हलक्याफुलक्या आणि लोकप्रिय अवगुंठनामध्ये वेढलेली असतात. पदम्मध्ये जे खास सखोल आणि अंतर्भेदी असे भाव व ‘धातू’ (स्वरावली) असतात, त्यांचा जावळी या प्रकारात सर्वस्वी अभाव असतो. मात्र काही जावळींना ‘संगती’ (स्वरवैचित्र्ये) असतात. काही गायक अधूनमधून या शृंगारिक गायनप्रकारात ‘कल्पनास्वर’ गातात. तेलुगू व कन्नड या भाषांत जावळी आहेत. जावळीचे साम्य उत्तर भारतीय संगीतातील गझल या प्रकाराशी आहे.
जावळीमध्ये जशा जंझूटी रागामधील ‘सखि प्राण …’ यासारख्या विलंबित लयीतील जावळी असतात त्याचप्रमाणे हिंदुस्थानी काफी रागातील ‘वद्दनि ने …’ यासारख्या द्रुतलयीतही जावळी असतात. पट्टाभिरामय्याकृत ‘पारिपोवलेरा …’ (राग बिलहरी, ताल रूपक) यांसारख्या जावळी साहित्यगुणांनी नटलेल्या आहेत. ‘तिल्लाना’प्रमाणेच जावळी हा एक मर्यादित गानप्रकार असून, तो चार ते सहा मिनिटांच्या अवधीत गायिला जातो.
सांबमूर्ती, पी. (इं.) मंगरूळकर, अरविंद (म.)