जाई : (म.चमेली, चंबेली हिं.चमेली, मोतिया, जाति गु. चंबेली क. जाति मल्लिगे, अज्जिगे सं. मालती, जातिपुष्प इं. स्पॅनिश जॅस्मिन, कॉमन जॅस्मिन लॅ. जॅस्मिनम ऑफिसिनेल फार्मा ग्रँडिफ्लोरम, जॅस्मिनम ग्रॅंडिफ्लोरम कुल-ओलिएसी). झुडपाप्रमाणे वाढणारी ही मोठी वेल मूळची वायव्य हिमालयातील असून भारतात सर्वत्र बागेत लावलेली आढळते. प्राचीन काळापासून या वेलीची माहिती अरब व आर्य लोकांस होती, असे संस्कृत वाङ्मयावरून दिसून येते. ही वेल लांब फांद्यांनी जवळच्या आधारावर चढत जाते बागेत मांडवावर किंवा कमानीवर चढवून शोभेत भर टाकता येते. कोवळ्या फांद्या रेषायुक्त असून पाने समोरासमोर, संयुक्त व विषमदली पिच्छाकृती असतात. दले सात ते अकरा व त्यांपैकी अंतिम दल इतरांपेक्षा मोठे व टोकदार फांद्यांच्या टोकांस किंवा पानांच्या बगलेतून पानांपेक्षा लांब व मर्यादित फुलोरे [वल्लरी ⟶ पुष्पबंध] जुलै ते सप्टेंबरमध्ये येतात. फुले पांढरी, नाजूक व सुवासिक असून पाकळ्यांची खालची बाजू जांभळट असते. छदे अंडाकृती-चमसाकृती (चमच्याच्या आकाराची) व पानांसारखी हिरवी संवर्त गुळगुळीत संदले आरीसारखी पाच, वर सुटी परंतु खाली जुळलेली पुष्पमुकुट अपछत्राकृती पाकळ्या पाच, खाली जुळून नलिकाकृती, वर सपाट, सुट्या, दीर्घवर्तुळाकृती अथवा व्यस्त अंडाकृती केसरदले दोन किंजदले दोन ऊर्ध्वस्थ किंजपुटात दोन कप्पे व चार बीजके [⟶ फूल]. इतर लक्षणे पारिजातक कुलात [⟶ ओलिएसी] वर्णिल्याप्रमाणे असतात.
सपाट प्रदेशात, तसेच सु. ३,००० मी. उंचीच्या डोंगराळ भागात ही वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळते. यूरोप आणि भूमध्यसमुद्राच्या आसपासच्या देशांत या वनस्पतीच्या फुलांपासून व्यापारी दृष्ट्या मोठ्या प्रमाणावर सुगंधी द्रव्याचे उत्पादन होते. भारतात जाईची लागवड विशेषतः शहरांच्या आसपास केली जाते, कारण शहरात ही फुले ताबडतोब विकली जातात कुमाऊँ, राजस्थान, मध्य प्रदेश आणि उ. प्रदेशातील काही ठिकाणी (उदा., गाझीपूर, फरूखाबाद, बालिया, जौनपूर) सुगंधी द्रव्यांच्या उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर जाईची लागवड केली जाते. गजरे, हार, तुरे आणि पूजा यांसाठी फुलांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो एकूण उत्पादनाचा काही थोडा भाग केसांना लावण्याची तेले व अत्तरे (जॅस्मिन तेल) बनविण्यास वापरला जातो. फुलातील बाष्पनशील (उडून जाणाऱ्या) तेलाचे उत्पादन भारतात होत नाही त्याचे व्यापारी महत्त्वाचे उत्पादन मुख्यतः फ्रान्स व इटली येथे होते. सुवासिक द्रव्यांत वापरण्यास गुलाबाखालोखाल जाईच्या फुलांचा वापर करतात तसेच बहुसंख्य उंची सुवासिक द्रव्ये, साबण, सौंदर्यप्रसाधने, दंतमंजने, धूप आणि तंबाखू यांमध्ये जाईचे तेल वापरले जाते. कोणतेही संश्लेषित (कृत्रिम रीतीने तयार केलेले) सुगंधी रसायन ह्या तेलाची बरोबरी करू शकत नाही. फुलांतून सु. ०·०२५ ते ०·०३०% अत्तर निघते.
जाईची मुळे उगाळून नायट्यावर लावतात तोंड आले असता हिची पाने चघळल्यास विकार कमी होतो. ताज्या पानांचा रस भोवरीवर (कुरुपावर) लावतात. तेल व अत्तरे त्वचारोग, नेत्रविकार, डोकेदुखी, कानदुखी इत्यादींवर वापरतात. जाई कृमिनाशक, मूत्रल (लघवी साफ करणारी) आणि मासिक पाळीच्या दोषांवर गुणकारी आहे. जाईत ‘जॅस्मिनीन’ हे अल्कलॉइड असते.
पांढरी जाई : (लॅ. जॅस्मिनन ऑफिसिनेल). ही झुडूपवजा व वेढे देत जाणारी वेल काटक असून उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधांतील हवामानात लागवडीत आहे ही मूळची इराण व काश्मीर येथील असून त्या प्रदेशांत ती ९३०–२,७९० मी. उंचीपर्यंतच्या भागात वाढते. हिची काही लक्षणे ‘जाई’त वर्णिल्याप्रमाणे आहेत जाई (चमेली) हा ह्या मूळ वनस्पतीचा प्रकार असून ह्याचे अनेक प्रकार व उपप्रकार लागवडीत असलेले आढळतात. हिची पाने संयुक्त (जाईप्रमाणे) पण दले तीन ते सात वल्लरी पानापेक्षा आखूड फुले जाईपेक्षा संख्येने कमी (क्वचित एकच), पांढरी, सुवासिक पाकळ्या चार किंवा पाच. फळ लंबगोल व पक्केपणी काळे असते.
पहा : ओलिएसी हेमपुष्पिका.
जमदाडे, ज. वि. चौधरी, रा. मो.
रुईकर, स. के.
वनजाई : (लॅ. क्लेरोडेंड्रॉन इनर्मी कुल-व्हर्बिनेसी). हे पुष्कळ फांद्या असलेले, इतस्ततः पसरणारे व एक ते सव्वा मी. उंचीचे झुडूप भारतात समुद्रकिनाऱ्याजवळील प्रदेशांत आढळते. पाने लंबवर्तुळाकार, ४ x २ सेंमी., गर्द काळसर हिरवी, समोरासमोर असतात. फुले लांब नळीच्या आकाराची आणि पांढरी असतात. पाने कडू जहर असतात. त्यामुळे शेळ्या व इतर जनावरे ती खात नाहीत. यासाठी हे झुडूप कुंपणासाठी उपयुक्त आहे. फांद्या छाटून कुंपणाला निरनिराळ्या प्राण्यांचे अथवा इतर प्रकारचे आकार देऊन कुंपण आकर्षक करतात. मुळे तेलात उकळून संधिवातावर चोळण्यासाठी तेल बनवितात. याची लागवड बी किंवा फाटे (छाट कलमे) लावून करतात.
पहा : क्लेरोडेंड्रॉन.
चौधरी, रा. मो.
“