जॅक्सनव्हिल : अमेरिकेच्या फ्लॉरिडा संस्थानातील टॅलाहॅसीच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे शहर व अटलांटिकवरील एक प्रमुख व्यापारी बंदर. लोकसंख्या ५,२८,८६५ (१९७०) हे सेंट जॉन्स नदीमुखावर असून सर्व प्रकारच्या वाहतूकमार्गांचे मोठे केंद्र आहे. येथे नाविक व हवाईदलाचे प्रशिक्षण केंद्र आहे. येथे यंत्रे, नळ, लाकूडकाम, कागद, लोखंडी व पोलादी सामान, सिगार, खते, रसायने, काँक्रीटच्या वस्तू, काचसामान, पशुखाद्ये, मांसपदार्थ, डबाबंद फळे, जहाजबांधणी इत्यादींचे कारखाने असून मासेमारीचा व्यवसायही मोठा आहे. स्पॅनिशांनी येथे १७४० मध्ये किल्ला बांधला. १८२२ मध्ये अँड्रू जॅक्सनवरून याला जॅक्सनव्हिल हे नाव ठेवले. यादवी युद्धात येथे बऱ्याच चकमकी झाल्या. १९०१ मध्ये आगीने याचे फार मोठे नुकसान झाले. १८६६, १९१२ व १९६३ मध्ये येथे महाविद्यालये व १९३४ मध्ये विद्यापीठ स्थापन झाले. येथील ग्रंथालय, उद्याने, गोद्या, युद्धस्मृतिकारंजे, पौर्वात्य बाग इ. प्रेक्षणीय असून हे एक मोठे पर्यटन केंद्र आहे.
लिमये, दि. ह.