जहालमतवाद : (रॅडिकॅलिझम). जहालमतवाद म्हणजे मौलिक विचारप्रणालीवर आधारलेली नैतिक वा सामाजिक जीवनाची आधुनिक उपपत्ती. प्रस्थापित समाजव्यवस्था, माणसामाणसांचे संबंध, एकंदर जगाचे भवितव्य यांचे सर्वांगीण पृथक्करण व विवेचन करून नीतितत्त्वांची बौद्धिक उपपत्ती व संपूर्ण जीवनाला स्पर्श करणारी नव्या व्यवस्थेची, नव्या जगाची संकल्पना जहालमतवादात मांडलेली असते.
फ्रेंच व अमेरिकन राज्यक्रांत्यांतही आधुनिक जहालमतवादाचा प्रभावी आविष्कार झाला. अर्थात त्या क्रांत्यांत सर्व प्रचलित जहालमतवादी प्रवृत्तींचा आविष्कार झालेला नव्हता तरी पण जॅकोबिनमध्ये प्रबोधनकाळातील आदर्शांना मूर्त स्वरूप देण्याचा प्रत्यक्ष प्रयत्न झाला. त्यांच्या संघटनातंत्राचा जहालमतवादाच्या प्रसारासाठी परिणामकारक उपयोग झाला. लोकानुवर्तित्व (पॉप्युलिझम) हा आणखी एक जहालमतवादाचा प्रकार होय. त्याची विविध स्वरूपे निरनिराळ्या देशांत प्रगट झाली. अमेरिकेत जेफर्सनच्या लोकशाही आदर्शात या प्रवृत्तीचा उगम शोधता येईल. लोकानुवर्तित्वाच्या भिन्नभिन्न आविष्कारांत काही सर्वसामान्य सूत्रे होती : निसर्गाच्या सन्निध राहणाऱ्या माणसांचे हक्क तसेच माणसाच्या निर्माणशक्तीवर दृढ विश्वास आणि त्याची स्वाभाविक प्रतिक्रिया म्हणून मोठ्या केंद्रसत्तेला तसेच धंदेवाईक राजकीय प्रशासकांना विरोध, ही या जहालमतवादाची वैशिष्ट्ये होत.
उजवा जहालमतवाद हा प्रस्थापित राजकीय सत्तेशी एकरूप झालेला आणि त्याचा समर्थक बनल्यामुळे यापुढे जहालमतवाद, म्हणजे डावा जहालमतवाद, असे समीकरण रूढ झाले. डावा जहालमतवाद हाही एकसूत्री अथवा एकजिनसी राहिलेला नसून त्याच्यात अनेक प्रवृत्ती निर्माण झाल्या आहेत. त्यांचे साधारणपणे तीन गट करता येतील : (१) अराज्यवादी, (२) मार्क्सवादी-लेनिनवादी (माओवादी, ट्रॉट्स्कीवादी यांचा समावेश या गटात होईल), (३) मार्क्सवाद न मानणारे जहालसमाजवादी, अतिजहाल अराज्यवादी. हे सर्वसामान्य राजकीय प्रक्रियेपासून अलिप्तच राहिले आहेत. स्पेनच्या यादवीत अराज्यवाद्यांनी जहाल आघाडीत सामील होऊन फ्रँकोच्या आक्रमणाला तोंड दिले. फ्रान्समध्ये झालेल्या १९६८ च्या विद्यार्थिक्रांतीतही अराज्यवादी गटाने कामगिरी केली. यूरोपीय देशांत ठिकठिकाणी अराज्यवादी गटांचा प्रभाव आढळून येतो.
मार्क्सवादी साम्यवाद्यांनी एक प्रबळ अशी आंतरराष्ट्रीय संघटना उभारली होती. त्यांना पहिल्या महायुद्धानंतर रशियन क्रांतीत मोठे यश मिळाले व रशियात मार्क्सवादी सत्ता स्थापन झाली. ⇨मार्क्सवादाला अभिप्रेत असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रांतीला प्रथम एका राष्ट्रसत्तेचा आधार मिळाला परंतु साम्यवादी आंतरराष्ट्रीय संघटनेची एकता फार टिकली नाही. स्टालिन व ट्रॉट्स्की यांच्या मतभेदामुळे ट्रॉट्स्कीला रशियातून हद्दपार करण्यात आल्यानंतर त्याने वेगळी आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन केली. ती अद्याप कार्य करीत आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर एकीकडे पूर्व यूरोपमध्ये सर्वत्र साम्यवादी सत्ता अस्तित्वात आली. चीन, व्हिएटनाम, उ. कोरिया येथेही यशस्वी क्रांत्या होऊन ⇨साम्यवाद प्रस्थापित झाला परंतु त्याचबरोबर साम्यवादी आंदोलनात नवीन फूट पडली. यूगोस्लाव्हिया, चीन यांनी रशियन नेतृत्व झुगारून दिले. पश्चिम यूरोपमध्ये इटली, फ्रान्स, पोर्तुगाल व स्पेन या देशांतील साम्यवाद्यांनी कामगारांच्या हुकूमशाहीच्या मार्क्सवादी सिद्धांताचा व रशियाच्या आंतरराष्ट्रीय नेतृत्वाचा धिक्कार केला. फ्रान्समधील नवीन जहाजमतवाद्यांनी एकूण मार्क्सवाद व रशिया-चीनचे प्रतिमान झुगारून दिले आहे. हे नवीन डावे गट व्यक्तिस्वातंत्र्याचे मूल्य महत्त्वाचे मानतात. आर्थिक विकेंद्रीकरण व प्रत्यक्ष लोकशाही यांचा ते पुरस्कार करतात. त्यांना राजकीय, आर्थिक व शैक्षणिक अशी सर्वांगीण पुनर्घटना अभिप्रेत आहे.
दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात जहालमतवादाचा प्रसार आशिया, आफ्रिका व लॅटिन अमेरिका यांतही झाला. विशेषतः, यूरोपीय वसाहतवादाच्या गुलामगिरीतून मुक्त झालेल्या देशांत जहालमतवादाचा विशेष प्रभाव आढळून येतो. त्यात राष्ट्रवाद आणि लोकशाही समाजवाद किंवा हुकूमशाही मानणारा साम्यवाद अशा दोन्ही प्रवृत्ती आढळून येतात. आशियातील साम्यवाद्यांतही (चीन, उ. कोरिया, व्हिएटनाम) स्वतंत्रपणे साम्यवादी समाजाची उभारणी करणे व रशिया-चीन संघर्षात तटस्थ राहणे, असा या धोरणाचा प्रभाव आढळतो. लॅटिन अमेरिकेत, क्यूबात कास्ट्रोने यशस्वी क्रांती केल्यानंतर त्याच्या गनिमी युद्धतंत्राचा व त्या तंत्राचा श्रेष्ठ प्रतिनिधी म्हणून चे गेव्हारा याचा जगभर लौकिक झाला. विशेषतः यूरोपीय तरुणांत तो अतिशय लोकप्रिय झाला व त्याच्या नावाने युवक-गट अस्तित्वात आले. या गनिमी युद्धतंत्राच्या प्रभावातून आता शहरी गनिमांचाही पंथ पश्चिम यूरोपमधील काही देशांत उदयास आला आहे. अति-जहालमतवादाचा हा अत्यंत नवीन आविष्कार होय.
अशा रीतीने जगाच्या सर्व भागांत निरनिराळ्या स्वरूपाचा, निरनिराळ्या वैचारिक प्रणाली व क्रांतितंत्रे मानणारा जहालमतवाद अस्तित्वात आहे. मानवी समाजाचे नियमन बुद्धीच्या–तर्काच्या–आधाराने व्हावे, बळाने होऊ नये, मनुष्य संघटनेचा गुलाम बनू नये, त्याचे स्वातंत्र्य जास्तीत जास्त विकसित व्हावे, त्याला विकासाची जास्तीत जास्त संधी मिळावी, राज्य बुद्धीचे असावे, शक्तीचे असू नये, असा जहालमतवादाचा मूळचा ध्येयवाद होता. या ध्येवादासाठी जहालमतवाद्यांनी निष्ठापूर्वक परिश्रम केले परंतु ठिकठिकाणी त्यांनीच ज्या सत्ता अस्तित्वात आणल्या, त्या सत्ताच या ध्येयवादाशी विसंगत व विरोधी स्वरूप दाखवू लागल्या व त्यामुळे जहालमतवाद्यांतच असंतोष निर्माण झाला. स्वातंत्र्य, समता, सर्व जनतेचे कल्याण या उद्देशांसाठी स्थापन केलेल्या संस्था अमानुष अन्यायाचे साधन बनल्या व त्यांच्यावर कठोर टीका करण्याचे काम जहालमतवाद्यांना करावे लागले. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात जहालमतवाद प्रस्थापित व्यवस्थेला अनेक प्रकाराची आव्हाने देत आला आहे, त्याचप्रमाणे जहालमतवादालाही अनेक प्रकारच्या आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. माणसाचे दूरीभवन म्हणजे स्वतःच्या नैसर्गिक वृत्ती व व्यवस्था यांपासून दुरावणे, ही संज्ञा आता पुनःपुन्हा उच्चारली जात आहे. विशेषतः औद्योगिक व विकसित समाजात ही एक गंभीर समस्या जाते. जहालमतवादापुढे हे नवे आव्हान खडे आहे.
संदर्भ : 1. Gombin, Richard, The Origins of Modern Leftism, 1975.
2. Halevy, Elie Trans. Morris, Mary, The Growth of Philosophic Radicalism, London, 1972.
3. Horowitz, I. L. Radicalism and the Revolt Against Reason, London, 1961.
साक्रीकर, दिनकर
“