जलालाबाद : अफगाणिस्तानच्या नानगरहर प्रांताची राजधानी. लोकसंख्या ४८,९१९ (१९६९). हे काबूलच्या पूर्वेस १२० किमी. व पेशावरच्या वायव्येस खैबर खिंडीमार्गे १२२ किमी. काबूल नदीच्या उजव्या काठावर, समुद्रसपाटीपासून ५९४ मी. उंचीवर आहे. हे ठिकाण बाबराने पसंत केले व तेथे काही बगीचेही लावले परंतु अकबराने शहर १५६० मध्ये वसविले. काबूलच्या धर्तीवर वसविलेले हे छोटेखानी शहर मजबूत तटबंदीयुक्त आहे. जलालाबाद हे अफगाणिस्तानातील एक अतिशय महत्त्वाचे ठाणे आहे कारण येथून लाघमन व कुनार खोऱ्यांच्या प्रवेशद्वारावर नजर आणि काबूल–पेशावर रस्त्यावर नियंत्रण ठेवता येते. दोन्ही अफगाण युद्धांच्या वेळी इंग्रजांनी हे व्यापले होते. ख्रि. पू. दुसऱ्या शतकापासून जलालाबाद निरनिराळ्या सत्तांखाली होते. अफगाण सत्तेखाली ते १८३४ पासून आहे. हे अफगाणिस्तानातील व्यापारकेंद्र असून येथे मोठा बाजार भरतो. काबूल नदीच्या बागायती मैदानी प्रदेशांत वसल्यामुळे याच्या आसमंतात संत्री, बदाम, ऊस, तांदूळ, धान्य इत्यादींचे मुख्य उत्पादन होते. येथे साखरशुद्धीकरणाचे कारखाने आहेत. हस्तव्यवसायही चालतो. येथे नानगरहर विद्यापीठाची स्थापना १९६३ साली झाली आहे. येथील कोरीव लेणी हुबेहूब गया येथील कोरीव लेण्यांसारखी दिसतात. येथे विमानतळ व सैनिकी केंद्र आहे.
कांबळे, य. रा.