जलमुखी : (हिं. जंगली मेहंदी, दादमरी गु. तलवगियो सं. अग्निगर्वा, विकटा, सुक्रांदा इं. ब्लिस्टरिंग ॲमानिया लॅ. ॲम्मानिया बॅक्सिफेरा कुल-लिथ्रेसी). सु. १५–६० सेंमी. उंच व सरळ वाढणारी किंवा थोडीफार जमिनीवर पसरणारी ही वर्षायू (एक वर्षभर जगणारी) ⇨ओषधी भारतात बहुधा सर्वत्र ओलसर जागी (भात खाचरात किंवा पाणथळ जागी) आढळते. शिवाय श्रीलंका, अफगाणिस्तान, चीन, मलाया, ऑस्ट्रेलिया व आफ्रिका येथेही सापडते. फांद्या समोरासमोर व पानेही तशीच पण ती लहान, साधी, बिनदेठाची, लंबवर्तुळाकृती असतात. फुले पानांच्या बगलेत झुबक्यांनी नोव्हेंबरात येतात. पाकळ्या फार लहान किंवा नसतात. बोंडे (फळे) गोलसर, बसकट व तांबडी आणि बिया अनेक व अर्धगोलाकृती असतात. इतर सर्वसामान्य लक्षणे मेंदी (मेदिका) कुलात [→ लिथ्रेसी] वर्णिल्याप्रमाणे. बोंडे संवर्ताने (सर्वांत बाहेरच्या पुष्पदलांनी) पूर्णपणे वेढलेली नसून त्यांचे स्फुटन (तडकणे) वृत्तीय प्रकारचे (करंडकाप्रमाणे) असते. पाने कडू, तिखट, क्षुधावर्धक व सौम्य रेचक संधिवातात कातडीवर फोड आणण्यास वापरतात. ती दीपक (भूक वाढविणारी) व वाजीकर (कामोत्तेजक) आहेत ही वनस्पती विषारी आहे.
पहा : वनस्पति, विषारी.
कुलकर्णी, उ. के.