जलमत्कुण : विशिष्ट जलवासी कीटकांना हे नाव देतात. त्यांना नावाडी या नावानेही संबोधितात. त्यांचा समावेश हेमिप्टेरा गणातील नोटोनेक्टिडी व कॉरिक्सिडी कुलांत करतात. कॉरिक्सिडी कुलातील कीटक शंखासारखे, ३·०–९·५ मिमी. लांब असून उत्तम पोहतात. ते आपले मागचे पाय वल्ह्यासारखे मारून पाण्यात उभे पोहतात. पाय पसरट असून त्यांवर दाट केस असतात. ते जमिनीवर चालण्याच्या कामी निरुपयोगी असतात. पाण्यात बुडी मारून पोहताना श्वसनासाठी लागणारी हवा ते आपल्या पंखाखाली असलेल्या उदरावरील (पोटावरील) खोलगट भागात एका बुडबुड्याच्या रूपाने नेतात. बरेचसे अंगरुपेरी पटलाने आच्छादिलेले असते. शरीर खालून व वरून चापट असते. त्यांचा रंग श्यामल (निळसर काळा) असतो. डोके खूप मोठे असते व पुढे गोल झालेले असते. अधरोष्ठ फार आखूड व पसरट असतो. तीन किंवा चार खंडी (भागांच्या) शृंगिका (सांधे असलेले लांब स्पर्शेंद्रिय) डोक्याच्या कडेपासून निघते. पुढचे पंख संपूर्ण चर्मिल (चामड्यासारखे) असून त्यांवर अनियमित तपकिरी व पिवळे पट्टे असतात. पुढच्या पायांचे गुल्फ (घोटे) दातेरी अवजारासारखे असतात आणि त्यांचा उपयोग भक्ष्य पकडण्यासाठी होतो, तर पाण्यात अन्न खाताना मधल्या पायांच्या जोडीचा कसल्या तरी आधाराला धरून ठेवण्यासाठी उपयोग होतो.
शैवले, कुजक्या वनस्पती, चिखलातील लहान जीव हे त्यांचे मुख्य अन्न होय पण काही जाती डासांच्या अळ्याही खातात. प्रौढ कीटक एका डबक्यातून दुसऱ्या डबक्यात उडून जातात. ते बहुधा बऱ्याच मोठ्या संख्येने आढळतात. ते रात्री उडतात व काही प्रकाशाकडे आकर्षिले जातात. त्यांच्या अंड्यांचे विविध आकारमानांचे गट जलवनस्पतींना अडकलेले आढळतात.
नोटोनेक्टिडी कुलातील कीटक वरकरणी जलमत्कुणासारखा दिसतो पण तो पाण्यावर उताणा (पाठीवर) पोहतो. तो विशेषतः कीटकांचे रक्त शोषतो आणि हाताळताना माणसाला चावण्यास कचरत नाही. मेक्सिकोमध्ये आर्क्टोकॉरिक्सा वंशातील दोन जाती विपुल आढळतात. स्थानिक लोक त्यांची अंडी खातात. प्रौढ कीटक गोळा करून वाळवतात आणि कोंबड्या, पक्षी व माशांचे खाद्य म्हणून निर्यात करतात.
जमदाडे, ज. वि.
“