आ. १. सेरॅटॉप्टेरिस थॅलिक्ट्रॉइडिस : (१) वनस्पती, (२) जननक्षम पानाचा भाग, (३) बीजुककोश.जल नेचे : (इं. वॉटर-फर्न्‌स लॅ. हायड्रॉप्टेरिडेलिझ). ही संज्ञा नेचे नावांनी ओळखल्या जाणाऱ्या पाच वंशांतील (मार्सिलिया, पिल्युलॅरिया, रेग्निलिडियम, सॅल्व्हिनिया  ॲझोला) अबीजी व वाहिनीवंत (द्रव पदार्थांचे परिवहन करणाऱ्या वाहिन्या असलेल्या) वनस्पतींच्या जातींना उद्देशून वापरली जाते कारण त्यांतील सर्व जाती (सु. ८७) उथळ पाण्यात वा दलदलीत वाढतात. जल-जीवनाला योग्य अशा अनुयोजना [मुख्यतः बीजुककोशांना म्हणजे प्रजोत्पादक घटक (कोशिका) निर्माण करणाऱ्या पिशवीसारख्या अवयवांना एका संरक्षित व जटिल संरचनेत काही काळ बंद करून ठेवणे] आणि लहान व मोठी अशी दोन प्रकारची बीजुके (विषमबीजुकत्व लघुबीजुके व गुरुबीजुके) असणे ही लक्षणे देखील त्यांचे वैशिष्ट्य आहे [→ नेचे]. या दोन्ही लक्षणांना वर्गीकरणात विशेष महत्त्व देऊन ह्या पाच वंशांचा अंतर्भाव हायड्रॉप्टेरिडेलीझ ह्या स्वतंत्र गणात बहुधा करतात परंतु अलीकडे विषमबीजुकत्व हे प्रगतिदर्शक लक्षण अनेक लहानमोठ्या गटांत आढळले असल्याने आणि तसेच परिस्थितिजन्य लक्षणेही एका वंशातील काही जातींत किंवा एका कुलातील फक्त काही वंशांत किंवा जातींतच दिसून येत असल्याने वर्गीकरणात त्यांचे महत्त्व मर्यादित मानण्यात आले आहे. ह्याशिवाय वर दिलेल्या पाच वंशांतील जातींत आणि इतर नेचांच्या जातींत कित्येक लक्षणांत साम्य आढळते. ह्या गोष्टी लक्षात घेऊन सर्व जल नेचांचा अंतर्भाव फक्त दोन कुलांत (मार्सिलिएसी व सॅल्व्हिनिएसी) करून खऱ्या नेचांमध्ये (फिलिकेलीझ गणात) ती कुले समाविष्ट करणे योग्य ठरते तथापि जल नेचांचा अंतर्भाव बीजुककोशाभोवतीच्या संरक्षक आवरणाच्या आणि विषमबीजुकत्वाच्या आधारावर वत्यांचेआपसातीलकाहीभेदलक्षातघेऊनदोनस्वतंत्रगणांत (मार्सिलिएलीझवसॅल्व्हिनिएलीझ) केल्याचेहीआढळते खरेनेचे समबीजुक (लहान व मोठे असा फरक बीजुकांत नसणारे) आहेत. पुढे दिलेल्या वर्णनात ह्या दोन गणांच्या आणि त्यांतील कुलांच्या लक्षणांचा प्रमुख वंशांच्या वर्णनाद्वारे ऊहापोह केला आहे. सेरॅटॉप्टेरिस (आ. १) ह्या समबीजुक वंशांतील जलीय जातीही जल नेचे या संज्ञेत समाविष्ट व्हावयास पाहिजे, परंतु त्यांची इतर सर्व लक्षणे भिन्न असल्याने त्यांचा अंतर्भाव पार्केरिएसी ह्या स्वतंत्र कुलात करण्यात आला आहे व ते कुल इतर खऱ्या नेचांत अंतर्भूत केले आहे. जपानात या नेचाची पाने कच्ची किंवा शिजवून खातात भात खाचरात त्याची लागवड करतात. से. थॅलिक्ट्रॉइडिस  ही जाती भारतातही आढळते.

आ. २. मार्सिलिया : (१) वनस्पती, (२) पाने, (३) बीजुकफल, (४) रुजलेले बीजुकफल, (५) बीजुककोश पुंज, (६) लघुबीजुककोश, (७) गुरुबीजुककोश, (८) लघुबीजुकात पुं-गंतुकधारीचा विकास (अक्षरांनी भित्ती व त्यांचा क्रम दाखविले आहेत), (९) रेतुक, (१०) गुरुबीजुकात स्त्री-गंतुकधारी, (११) अंदुककलशात रंदुक, (१२) गंतुकधारीने वेढलेला विकासी गर्भ (गंतुकधारी, अंदुककलश, रंदुक इ. संज्ञांच्या स्पष्टीकरणार्थ प्रजोत्पादन उप-उपशीर्षक पहावे.)

जीवाश्म : जल नेचांपैकी फक्त दोन (सॅल्व्हिनिया  ॲझोला) वंशांच्या जीवाश्मांनी (शिळारूप अवशेषांची) निश्चित माहिती मिळते.रोडाइटस दक्षिणी  ही तृतीय कल्पातील (सु. ६·५ ते १·२ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) जाती भारताच्या अंतरा-ट्रॅपी थरांत (ज्वालामुखी खडकांच्या दोन जवळजवळ सपाट आडव्या थरांच्या म्हणजे ‘ट्रॅपांच्या’मध्ये असणाऱ्या गाळाच्या खडकांच्या थरांत) आढळली असून रेग्निलिडियम (मार्सिलिएसी) वंशाशी तिचे बरेच साम्य दिसते, असे सहानी व राव (१९४३) यांनी सिद्ध केले आहे. त्याच खडकांच्या थरांत (मध्य प्रदेश) सॅल्व्हिनियाचे व ॲझोलाचे जीवाश्म सापडले आहेत.सॅ. इंटरट्रॅपिया  हे नाव त्या जातीच्या लघु-व गुरु-बीजुकांच्या जीवाश्मांवरून दिले आहे (महाबळे, १९५०) ॲ. इंटरट्रॅपिया  हे नाव त्या नेचाच्या सर्व विखुरलेल्या अवयवांच्या जीवाश्मांच्या अभ्यासावर आधारले आहे (सहानी व राव, १९४३). सॅल्व्हिनियाची तरंगणारी पाने संपीडित (दबलेल्या) अवस्थेत (जीवाश्मांचा एक प्रकार) ऑस्ट्रेलियाखेरीज इतर खंडात सापडली आहेत व ती  सर्व तृतीय कल्पातील आहेत. नवजीव महाकल्पापूर्वीच्या (सु. ६·५ कोटी वर्षांपूर्वीच्या) कोणत्याही जल नेचाच्या वंशाचे जीवाश्म आढळलेले नाहीत.


आ. ३. रेग्निलिडियम : (१) पान, (२) बीजुकफल. आ. ४. पिल्युलॅरिया : (१) पान, (२) बीजुकफल.मार्सिलिएलीझ : ह्या गणात मार्सिलिएसी हे एकच कुल असून त्यामध्ये मार्सिलिया (आ. २), रेग्निलिडियम (आ. ३) व पिल्युलॅरिया (आ. ४) हे तीन वंश येतात. मार्सिलियात ६५ जाती, पिल्युलॅरियात सहा व रेग्निलिडियमात फक्त एकच जाती आढळते यांपैकी पहिल्या दोन वंशांतील जाती बहुधा सर्वत्र आढळतात, परंतु तिसऱ्यातील जातीचे ब्राझील हे मूलस्थान आहे. पिल्युलॅरिया, रेग्निलिडियम  मार्सिलिया  असा चढता क्रम त्यांच्या शारीरिक लक्षणांच्या  जटिलपणाच्या आधारावर लावता येतो. स्थलवासी (जमिनीवरील) वनस्पतींशी तुलना केल्यास सर्व जलवासींत काहीसा शारीरिक ऱ्हास आढळतो. शाखायुक्त, बारीक, सरपटणारे खोड [मूलक्षोड → खोड], त्यापासून खाली फुटलेली आगंतुक मुळे आणि सरळ उंच वाढणारी पाने सर्वांत आढळतात.मार्सिलियात चतुर्दली (चार दले असलेली), रेग्निलिडियामामध्ये द्विदली (दोन दले असलेली) व पिल्युलॅरियात दलहीन, एकांतरित (एकाआड एक) पाने असून त्यांचे देठ लांब असतात. मार्सिलियात चारांपैकी खालची दोन दले एकांतरित व वरची दोन दुभंगल्याप्रमाणे रेग्निलिडियमातील (आ. ३) दोनच दले दुभंगल्याप्रमाणे (म्हणजे खालची दले ऱ्हास पावलेली) पिल्युलॅरियात (आ. ४) दलांचा अभाव (म्हणजे सर्वच दले ऱ्हसित) सर्वांत कलिकावस्थेत पान इतर नेचांप्रमाणे स्वतःभोवती टोकापासून तळाकडे गुंडाळलेले (अवसंवलित) असते. काही जाती कोवळेपणी केसाळ असतात. पानांच्या पात्यात शिरांची मांडणी इतर नेचांतल्याप्रमाणे द्विशाखाक्रमी (पुनःपुन्हा दोनदा विभागलेल्यांची) असते तथापि जाळीदारपणाकडे तिची कमीअधिक प्रवृत्ती दिसते. रात्रीच्या वेळी दलांची पाती परस्परांस चिकटून राहतात, त्यावेळी त्यांच्या वरच्या बाजू आत असतात व हाच प्रकार विकासावस्थेत (कळीमध्ये) दिसते.

आ. ५. मार्सिलियाची सूक्ष्म रचना : मूलक्षोडाच्या आडव्या छेदाचा काही भाग : (१) अपित्वचा, (२) हवामार्ग, (३) दृढोतक, (४) मध्यत्वचा, (५) प्रकाष्ठ, (६) अंतस्त्वचा, (७) परिकाष्ठ, (८) परिरंभ, (९) भेंड.शारीरिकअंतर्रचना : मार्सिलियाच्या खोडात (आ. ५) द्विपरिकाष्ठी नलिकारंभ (दोन परिकाष्ठाची वर्तुळे असलेला नळीसारखा वाहक भाग), आत व बाहेर अंतस्त्वचा, साधे पर्णलेश व पर्णविवरे असतात प्रकाष्ठ, परिकाष्ठ [→ ऊतके, वनस्पतींतील] व इतर सामान्य ऊतके ही खऱ्या नेचांतल्याप्रमाणे असतात. मध्यत्वचेत आतील बाजूस दृढोतक (कठीण आवरणाच्या शरीर घटकांचे समूह) व बाहेर हवेच्या हालचालीस हवामार्ग असतात [→ वायूतक] मुळांमध्ये बहिर्वर्धी व एक सूत्र किंवा द्विसूत्र (एक किंवा दोन आदि प्रकाष्ठयुक्त) प्रकाष्ठ, आद्यरंभ व खोडातल्याप्रमाणे वायूतक इ, असतात. इतर वंशांतील अंतर्रचना काहीशी याचप्रमाणे परंतु अधिक ऱ्हास पावलेली असते. ह्या सामान्य संरचनेत परिस्थितीनुरूप किरकोळ फरक पडतात [→ शारीर, वनस्पतींचे].

प्रजोत्पादन : सर्व वंशांतील जातींत, पानांच्या देठांवर, तळाशी किंवा बगलेत, क्वचित तळाजवळ खोडावर ‘बीजुकफल’ या नावाने ओळखले जाणारे कठीण, लहान, गोलसर किंवा घेवड्याच्या बियांसारखे विशिष्ट प्रकारचे अवयव आढळतात. आकारविज्ञानाच्या (सजीवांच्या आकाराचा अभ्यास करणाऱ्या विज्ञानाच्या) भाषेत त्यांचे स्वरूप वादग्रस्त आहे. तथापि त्यांचा उगम, विकास, संरचना इत्यादींचा अभ्यास केल्यास असे दिसून येते की, ते पार्श्विक (बाजूचे) अवयव असून जननक्षम पानांच्या विकासावस्थेत घडून आलेल्या दुमडण्यामुळे बनले असावेत ह्या प्रक्रियेमुळे ते इतर नेचांच्या जननक्षम पानांहून भिन्न वाटतात. वर्षांतील काही काळात ज्या पाणथळ जमिनींत ह्या वनस्पती वाढतात, त्या जमिनी कोरड्या होतात अशा वेळी त्या वनस्पतींच्या प्रजोत्पादक अवयवांना दीर्घकाळ संरक्षण मिळण्यास ही संरचना अनुयोजनात्मक होते हे निर्विवाद. बीजुकनिर्मिती संपल्यावर देखील ही बीजुकफले लागलीच न रुजता काही काळ प्रसुप्तावस्थेत (निष्क्रिय अवस्थेत) काढून मग रुजतात. कित्येक बीजुकफले पन्नास वर्षांनंतरही रुजल्याचे आढळले आहे. त्यांची संरचना जटिल असून त्यांत लघुबीजुककोश व गुरुबीजुककोश ह्यांचे पुंजत्राणाने (बीजुककोशाच्या आवरणाने) वेढलेले पुंज असतात. बीजुकफल पाणी शोषून घेऊन रुजल्यावर (आ. २) त्यातून प्रथम बीजुककोशांचे पुंज व त्यानंतर त्यांतून बीजुके बाहेर पडतात बीजुके पाण्यातच रुजतात बीजुककोशांच्या निर्मितीत ती सर्व एकाच वेळी न बनता क्रमवार (तलवर्धी म्हणजे टोकाकडून तळाकडे) पक्व होत जातात ही निर्मितीची पद्धत खऱ्या नेचांतल्याप्रमाणे (मुलतः एका कोशिकेपासून) असते. गुरुबीजुककोशात एकच गुरुबीजुक बनते व लघुबीजुककोशात ३२ किंवा ६४ लघुबीजुके असतात. बीजुककोशपुंजांची व बीजुककोशांची संख्या व मांडणी या बाबतींत तीन वंशांत किरकोळ भेद असून मार्सिलिया  सर्वांत जटिल व पिल्युलॅरिया  सर्वांत साधा आहे. ⇨सिलाजिनेला  व ⇨आयसॉएटिस ह्या वाहिनीवंत अबीजी वनस्पतींपैकी विषमबीजुक वंशातील गंतुकधारीप्रमाणे (लैंगिक पिढीप्रमाणे) येथेही गंतुकधारी पिढी इतर (समबीजुक) नेचांच्या गंतुकधारीशी तुलना करता, सापेक्षतः ऱ्हास पावलेली असून अंदुककलशांची (स्त्री-जननेंद्रियांची) व रेतुकाशयांची (पुं-जननेंद्रियांची) संख्या फार घटली आहे. ती एकेकच असतात. बहुकेसली चररेतुकाचा (अनेक केसासारखे भाग असलेल्या व चलनवलन करू शकणाऱ्या पुं-जनन कोशिकेचा) अंदुकाशी (स्त्री-जनन कोशिकेशी) संयोग होऊन रंदुक बनते (आ. २) व त्यापासून पुढे गर्भ बनतो. ह्या भावी बीजुकधारीचा (अलैंगिक पिढीचा) विकास स्वतंत्रपणे होऊन पद, आदिमूल, पान (दलिका) व खोड असलेली लहान वनस्पती बनते [→ नेफ्रोलेपिस]. पहिले पान मार्सिलियात व पिल्युलॅरियात आराकृती (दल नसलेले) व नंतरची पाने फक्त मार्सिलियात अनुक्रमे दोन आणि चार दलांची असतात. गर्भविकास इतर समबीजुक नेचांतल्याप्रमाणे (कुल-पॉलिपोडिएसी) असतो. पानाचे स्वरूप व संरचना, शारीर, बीजुककोशपुंज व बीजुककोश यांचे स्थान व स्वरूप इ. लक्षणांवरून मार्सिलिएसी व शिझिएसी [→ नेचे] यांचे आप्तभाव निकट आहेत असे मानतात. भारतात मार्सिलियाच्या नऊ जाती असून त्यांपैकी तीन किंवा चार सामान्यपणे आढळतात गरीब लोक त्यांची भाजी खातात पाळीव जनावरांना ही वनस्पती चारतात.


सॅल्व्हिनिएलीझ : ह्या गणात सॅल्व्हिनिएसी हे एकच कुल असून त्यात सॅल्व्हिनिया  आणि ॲझोला  हे फक्त दोनच विद्यमान वंश आहेत. सॅल्व्हिनियाच्या तेरा व ॲझोलाच्या पाच जाती असून त्या विशेषेकरून उष्ण कटिबंधातील संथ पाण्यात तरंगताना आढळतात. हे दोन्ही वंश आरंभी म्हटल्याप्रमाणे विषमबीजुक आहेत परंतु सॅल्व्हिनिएसीच्या बीजुकफलांत, पक्वावस्थेत दोन्हीपैकी एकाच प्रकारची बीजुके आढळतात तसेच बीजुकफलाचे आवरण हेच पुंजत्राण असते. मार्सिलिएसी व सॅल्व्हिनिएसी ह्या कुलांतील हा फरक फार महत्त्वाचा असल्याने ही दोन्ही कुले (किंवा गण) एकत्र ठेवणे समर्थनीय ठरत नाही.

आ. ६. सॅल्व्हिनिया : (१) वनस्पती, (२) बीजुकफले, (३) निमग्न पर्णे, (४) लघु-व गुरु-बीजुकफलांचा छेद, (५) लघुबीजुके, (६) पुंजक.सॅल्व्हिनिया  वंश मूळचा आफ्रिकेतील असून काही जाती भारतात सामान्यपणे आढळतात (उदा., सॅ. कुक्युलॅटा, सॅ. नटान्स). ह्या वंशातील जातींत (आ. ६) खोड बारीक व शाखायुक्त (मूलक्षोड) असून त्यावर तीन्हींच्या मंडलात लहान व बिनदेठाची पाने असतात प्रत्येक मंडलातील एक पान निमग्न (बुडालेले), बरेच विभागलेले व केसाळ असून मुळांच्या अभावी ते शोषणाचे कार्य करते. शाकीय प्रजोत्पादनाने (पान, खोड यांसारख्या एरवी फक्त पोषणांचे कार्य करणाऱ्या इंद्रियापासून होणाऱ्या प्रजोत्पादनाने) ह्या वनस्पतींची इतकी वाढ होते की, थोड्या काळात पाण्याचा सर्वच पृष्ठभाग त्या व्यापून टाकतात. पानांवर भरपूर केस व उंचवटे असून ती तरंगत राहतात आकाराने ती सपाट, आयत, लंबगोल, १·५ सेंमी. लांब व त्यांच्या चार रांगा असतात. मूलक्षोडात बाह्यपरिकाष्ठी नलिकारंभ (परिकाष्ठ बाहेर असलेला नळीसारखा वाहक भाग) असून एकूण वाहक ऊतकात ऱ्हास आढळतो प्रकाष्ठस्तंभ खंडित असतो. पाण्यात बुडालेल्या पानांवर अनेक (४–२०) बीजुकफलांच्या माळा किंवा झुबके असतात. बीजुकफले गोलसर असून त्यांचे दोन कोशिकाथरांचे आवरण हेच पुंजत्राण असून पक्वावस्थेत त्यामध्ये बहुधा एकच कार्यक्षम गुरुबीजुककोश असतो किंवा अनेक लघुबीजुककोशांचा पुंज असतो. प्रत्येक लघुबीजुकाभोवती परिकलापासून (बीजुककोशातील बीजुके निर्माण झाल्यावर उरलेल्या जीवद्रव्यापासून म्हणजे सजीव कोशिकेतील जिवंत द्रव्यापासून) बनलेला कठीण व विवरयुक्त पुंजक (लहान पुंजका) असतो. तरंगत असलेल्या लघुबीजुककोशातच लघुबीजुके रुजतात व त्यांत प्रत्येकी दोन रेतुकाशये बनतात यांतून बहुकेसली रेतुके बाहेर येऊन मार्सिलियाच्या रेतुकाप्रमाणेच त्यांपैकी एक अंदुकाशी एकरूप होते व रंदुक बनते. रंदुकापासून गर्भविकास जवळजवळ तसाच घडून येतो. सॅल्व्हिनियाचे दोन्ही प्रकारचे गंतुकधारी, गंतुकाशये (जननेंद्रिये) व गुंतके इ. बाबतींतील ऱ्हास मार्सिलियात आढळतो त्याप्रमाणे असतो.

आ. ७. ॲझोला : (१) वनस्पती, (२) पानाच्या वरच्या खंडाचा छेद, (३) ॲनाबीना, (४) बीजुकफले, (५) लघुबीजुकांचा पुंजक, (६) लघुबीजुके, (७) प्रवर्ध.ॲझोला (आ. ७) ह्या वंशातील एकूण सहा जातींपैकी फक्त एक, ॲ. पिनाटा (ॲ. इंब्रिकॅटा) भारतात गोड्या व संथ पाण्यात सापडते आणि तिने पाण्याचा सर्व पृष्ठभाग व्यापलेला आढळतो. ॲ. फिलिक्युलॉइड्स ही जाती सर्वत्र आढळते. या वंशातील जातीत बारीक, शाखायुक्त खोड, त्यावर पाण्यात खाली वाढणाऱ्या आगंतुक मुळांचा झुबका व एकांतरित, लहान, साध्या, तरंगणाऱ्या पानांच्या दोन रांगा असतात. प्रत्येक पानास एक वरचा व एक खालचा असे दोन खंड असून वरचा जाड, हिरवा व हवेत वाढणारा आणि खालचा पातळ, बुडालेला व शोषक असतो. वरच्या खंडात एक पोकळी व तीत ॲनाबीना  नावाचे नील-हरित शैवल [→ अंतर्वनस्पती → अपिवनस्पती] आढळते हे शैवल हवेतून आपल्या आश्रय वनस्पतीकरिता नायट्रोजन वायू शोषून घेते. शरीरांतर्गत पोकळ्या येथे नसतात वाहक ऊतके ऱ्हसित व मूलक्षोडाची सर्वसामान्य संरचना वर दिल्याप्रमाणे (सॅल्व्हिनिया ) असते. २–४ बीजुकफले फांदीवरील खालच्या पानाच्या वरच्या पर्ण-खंडाच्या बगलेत येतात. बीजुकफले फक्त पुंजत्राणांनी वेढलेली असतात सॅल्व्हिनिया प्रमाणे लघुबीजुके व गुरुबीजुके यांपैकी एकाच प्रकारची बीजुके एका बीजुकफलात बनतात, म्हणून बीजुकफले दोन प्रकारची असतात. गुरुबीजुकफल लहान व लघुबीजुकफल त्यापेक्षा मोठे असते. गुरुबीजुकफलात बहुधा एकच गुरुबीजुककोश, पक्वावस्थेत त्यामध्ये एकच गुरुबीजुक व त्याभोवती उर्वरित जीवद्रव्यापासून बनलेला विवरयुक्त पुंजक असतो. लघुबीजुकफलात अनेक लघुबीजुककोश व प्रत्येकात ६४ लघुबीजुके बनतात उर्वरित जीवद्रव्यापासून चार पुंजके व प्रत्येक पुंजकात अनेक लघुबीजुके विखुरलेली असतात. काही जातींत पुंजकावर अनेक बाणासारखी टोके असलेले अनेक प्रवर्ध (केसासारखी उपांगे) असून त्यांचे कार्य तो पुंजक गुरुबीजुक-पुंजकास अडकविण्याचे असते. सॅल्व्हिनिया प्रमाणेच बीजुकफले आरंभी सारखी असून त्यांत दोन्ही प्रकारचे बीजुककोश तयार होऊ लागतात परंतु विकासावस्थेत त्यांपैकी गुरुबीजुककोश लघुबीजुकफलात व लघुबीजुककोश गुरुबीजुकफलात वंध्य ठरून दुसरे पूर्णत्वास जातात तसेच बीजुककोशनिर्मितीची पद्धत खऱ्या नेचांतल्याप्रमाणे असते. दोन्ही प्रकारची बीजुके (पुंजकात रुतलेली) स्वतंत्रपणे पाण्यात तरंगतात. बीजुके रुजून त्यांतून काहीसे ऱ्हास पावलेले गंतुकधारी बाहेर डोकावतात. पुं-गंतुकधारीवर एकच रेतुकाशय असून त्यापासून आठ चररेतुके बनतात. स्त्री-गंतुकधारीवरही एकच अंदुककलश असून त्यातील अंदुकाशी रेतुकाचा संयोग होतो. रंदुकापासून गर्भविकासाची आणि पुढे नवीन (बीजुकधारी) वनस्पतीची निर्मिती इतर खऱ्या नेचांतल्याप्रमाणे होते  [→ नेचे]. खऱ्या नेचांपैकी हायमेनोफायलेसी कुलाशी या कुलाचे काही लक्षणांत साम्य असल्याने ही दोन्ही कुले समान पूर्वजांपासून अवतरली असावीत.

जर्मनीत व पनामात डासांची वीण (उत्पत्ती) कमी करण्यास तेथील संथ जलाशयांत ही वनस्पती वाढवितात. ॲझोला पिनाटाचा उपयोग आशियातील उष्ण भागांत खताकरिता व इंडोचायनात डुकरे व बदके ह्यांच्या खाद्याकरिता करतात. तसेच न्यूझीलंडमध्ये काही भागांत तोंड आल्यास ॲ. रुब्रा  चघळण्यास वापरतात. शोभेकरिता घरगुती जलजीवालयात (जिवंत जलवनस्पती व प्राणी प्रदर्शनासाठी ठेवण्याच्या काचेच्या भांड्यात किंवा पेटीत) सॅल्व्हिनिया  आणि ॲझोला  ह्यांच्या जाती वाढवितात.

पहा : नेचे.

संदर्भ : 1. Eames, A. J. Vascular Plants : Lower Groups, New York, 1936.

  2. Smith G. M. Cryptogamic Botany, Vol. II, Tokyo, 1955.

  3. Surange, K. R. Indian Fossil Pteridophytes, New Delhi, 1966.

परांडेकर, शं. आ.