जर्मानिक भाषासमूह : स्लाव्हिक समूहाच्या पश्चिमेला आणि लॅटिनोद्भव भाषांच्या पूर्वेला व उत्तरेला असणारा जर्मानिक हा ⇨ इंडो-यूरोपियन भाषाकुटुंबातील एक समूह आहे.
जर्मानिकच्या तीन शाखा आहेत : पूर्व जर्मानिक, स्कॅंडिनेव्हियन किंवा उत्तर जर्मानिक व पश्चिम जर्मानिक.
पूर्व जर्मानिक : जर्मानिक समूहाची सर्वांत प्राचीन शाखा गॉथिक किंवा पूर्व जर्मानिक ही आहे. वुल्फिला (३११–८३) या पश्चिमेकडील गॉथ आर्चबिशपच्या बायबलच्या भाषांतरावरून गॉथिकची माहिती आपणाला मिळते. मुळात चौथ्या शतकात झालेल्या या भाषांतराचे सहाव्या शतकातील हस्तलिखित उपलब्ध आहे. याशिवाय त्या काळचे काही धार्मिक वाङ्मयही उपलब्ध आहे. क्रिमियाच्या आसपास बोलली जाणारी ही भाषा सोळाव्या शतकात नष्ट झाली.
ग्रीक लिपीवर आधारलेल्या लिपीत गॉथिकचे लेखन केलेले आहे. मात्र आवश्यकतेनुसार त्यात काही चिन्हांची भर घालण्यात आलेली आहे. एकंदर लिपिचिन्हे चोवीस असून ती पुढील उच्चार दर्शवितात :
स्वर: |
आ,इ,ए,उ,ओ. |
|
व्यंजने: |
स्फोटक– क(मृदुतालव्य),ग,त,द, प,ब,क(ओष्ठ्य). |
|
अनुनासिके – म,न. |
||
घर्षक– फ,ख,ख्व(अघोषव?), स,झ,थ. |
||
कंपक – र. |
||
पार्श्विक – ल. |
||
अर्धस्वर– य,व. |
ङ या अनुनासिकाला स्वतंत्र चिन्ह नव्हते, पण ते उच्चारात होते.
उत्तर जर्मानिक (नॉर्स) : जर्मानिकची उत्तरेकडील शाखा स्कॅंडिनेव्हियन भाषांची आहे. तिच्यातील सर्वांत जुने लेखन तिसऱ्या शतकातील असून ते रूनिक लिपीतील आहे. तिच्यात पुढील भाषा येतात :
(१) आइसलॅंडिक-या भाषेतील सर्वांत जुना उपलब्ध पुरावा बाराव्या शतकातील आहे. या जुन्या भाषेला प्राचीन आइसलॅंडिक हे नाव असून तुलनात्मक व्याकरणात उत्तर जर्मानिकची प्रतिनिधी म्हणून तिचाच उपयोग करण्यात येतो [→ आइसलँडिक भाषा].
(२) नॉर्वेजियन – ही आइसलॅंडिकला अतिशय जवळची असून तिचा पुरावा जवळजवळ त्याच सुमाराचा आहे.
(३) स्वीडिश.
(४) डॅनिश.
पश्चिम जर्मानिक : ही जर्मानिकची सर्वांत समृद्ध शाखा असून तिच्यात पुढील भाषांचा समावेश होतो :
(१) हाय जर्मन – वस्तुतः हा अतिशय विस्कळित असा गट आहे. प्रत्येक लिखित साधनातून वेगळीच बोली दिसून येते. आठव्या शतकात फक्त कठीण शब्दांवरील टीपाच सापडतात. प्रारंभीचे साहित्य केवळ मठातील भिक्षुणींचेच असून ते नवव्या शतकापासून उपलब्ध आहे. हाय जर्मनमध्ये मुख्यत्वे बव्हेरियन व आलेमानिक यांचा समावेश होतो. या भाषांची लेखनपद्धती अतिशय अनिश्चित असून प्रत्येक मठाची भाषा व लेखन वेगळे आहे. याशिवाय फ्रॅंकोनियन ही एक बोली आहे.
अर्वाचीन साहित्यिक जर्मन भाषा सॅक्सनीवर तयार झाली असून ती फ्रॅंकोनियनशी साम्य असणाऱ्या बोलीवर आधारलेली आहे.
(२) लो जर्मन – हिचा सर्वांत जुना पुरावा म्हणजे ८३० च्या सुमाराला लिहिले गेलेले एक काव्य आहे. त्याची हस्तलिखिते नवव्या-दहाव्या शतकांतली आहेत. लो जर्मनपासून आजची ‘फ्लेमिश’ किंवा डच भाषा आलेली आहे. त्याचप्रमाणे ऱ्हाईन नदीच्या पूर्वेला असलेल्या सर्व स्थानिक बोली लो जर्मनच आहेत. डच भाषा द. आफ्रिकेत वसाहत करायला गेलेल्या बोअर लोकांकडून अजूनही बोलली जाते. स्थलकालमानानुसार तिचे स्वरूप मात्र बदललेले आहे.
(३) फ्रीझियन व प्राचीन इंग्लिश – फ्रीझियन भाषा नेदर्लंड्सच्या उत्तर समुद्रातील किनाऱ्यालगतच्या प्रदेशात व बेटांत बोलली जाते. जुना फ्रीझियन पुरावा तेराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून उपलब्ध आहे.
अँगल व सॅक्सन या जर्मानिक समूहांची भाषा आज बहुतांश ग्रेट ब्रिटनची भाषा आहे. स्पष्टपणे वेगवेगळ्या स्वरूपांत ही भाषा नवव्या शतकापासून उपलब्ध असून तिला ‘अँग्लो-सॅक्सन’ किंवा ‘प्राचीन इंग्लिश’ हे नाव आहे आणि ती ॲल्फ्रेड राजाची भाषा आहे. आता ती जगाच्या फार मोठ्या प्रदेशाची महत्त्वपूर्ण भाषा बनली आहे.
जर्मानिकची वैशिष्ट्ये : जर्मानिक हा इंडो-यूरोपियन भाषाकुटुंबातील एक वैशिष्ट्यपूर्ण समूह आहे. इंडो-यूरोपियन ध्वनींचे त्यात होणारे परिवर्तन ग्रिम व व्हेर्नर यांनी नियमबद्ध स्वरूपात मांडले आहे. इंडो-यूरोपियन अघोष स्फोटकांचे त्यात अघोष घर्षक होतात सघोष स्फोटकांचे अघोष स्फोटक होतात आणि सघोष महाप्राण स्फोटकांचे सघोष स्फोटक होतात, हा ग्रिमचा नियम पण या नियमात न बसणारी काही उदाहरणे आढळली. त्यांचा अभ्यास करताना व्हेर्नर या शास्त्रज्ञाला असे दिसून आले की, इंडो-यूरोपियन अघोष स्फोटकापासून येणारे अघोष घर्षक जर दोन्ही बाजूंनी सघोष ध्वनींच्या सान्निध्यात असतील आणि जर शब्दातील स्वराघात त्यांच्या पूर्वीच्या अवयवावर नसले, तर ते सघोष घर्षक बनतात. या नियमामुळे इंडो-यूरोपियनमधील आघाताचे अस्तित्व सिद्ध झाले आणि संस्कृत व ग्रीक यांत आढळणारा आघात मूळ भाषेतून आला आहे, या विधानाला तो पोषक ठरला.
संदर्भ :
1. Brugmann, K. Abrege’ de grammaire compare’e des langues indo-europe’ ennes, Paris, 1906.
2. Meillet, Antoine, Introduction a ‘le’ tude comparative des langues indo-europe’ennes, Paris, 1937.
कालेलकर, ना. गो.
“