जर्मनी, पूर्व : जर्मन लोकशाही प्रजासत्ताक (जर्मन डेमॉक्रॅटिक रिपब्लिक). पूर्व यूरोपमधील अत्यंत पुढारलेल्या आणि औद्योगिक दृष्ट्या जागतिक महत्त्वाचा देश. बर्लिनचा ४०३ चौ. किमी.चा पूर्व भाग धरून एकूण क्षेत्रफळ १,०८,१७८ चौ. किमी. लोकसंख्या १,६९,५१,२५१ (१९७३). विस्तार ५०° १०′ उ. ते ५४° ४१′ उ. आणि ९° ५४′ पू. ते १५° २′ पू. पश्चिम जर्मनीशी याची सीमा १,३८१ किमी. पूर्वेकडे पोलंडशी ओडर-नीस या नद्यांच्या अनुरोधाने ४५६ किमी. व दक्षिणेकडे चेकोस्लोव्हाकियाशी ४३० किमी. याच्या उत्तरेस बाल्टिक समुद्र आहे.

भूवर्णन : अगदी उत्तरेकडील बाल्टिक समुद्रकिनाऱ्यालगतचा भाग वालुकामय असून तो लहान टेकड्यांनी, वाळूच्या टेकड्यांनी व सरोवरांनी व्यापलेला आहे. अगदी मध्यवर्ती भाग सुपीक व मैदानी असला, तरी याचा काही भाग पर्वतांनी व वाळूने व्यापलेला आहे. दक्षिण भागात मिट्ल्‌जबर्ग पर्वतरांग व उत्तर जर्मन मैदानाचा भाग असून हा सर्व भाग जंगलांनी आच्छादिलेला आहे. फिख्‌टेलबेर्क हे एर्ट्‌सबिर्ग पर्वतरांगेतील १,२१४ मी. उंचीचे सर्वांत मोठे उंच शिखर आहे. बाल्टिक समुद्रकिनाऱ्यालगत थोडीच बेटे आहेत, त्यांतील ऱ्युगन हे सर्वांत मोठे आहे. ओडर, नीस, एल्ब, हाफेल, स्प्री, झाले (साल) या येथील प्रमुख नद्या होत.

हवामान : पूर्व जर्मनीचे हवामान समशीतोष्ण आहे. वायव्य भागाला समुद्रसान्निध्याचा फायदा मिळत असल्याने वर्षभर हवामानात विशेष फरक जाणवत नाही परंतु आग्नेय भागात हवामान थोडे विषम स्वरूपाचे असते. दैनंदिन तपमानात फारसा फरक पडत नाही. बर्लिन शहराचे जानेवारी महिन्यांचे सरासरी तपमान १·१° से. आणि जुलै महिन्यांचे सरासरी तपमान १७·२° से. असते. दक्षिण भागात असलेल्या ड्रेझ्‌डेन या शहराचे जानेवारी महिन्यांचे सरासरी तपमान ०° से. व जुलै महिन्यांचे तपमान १८·३° से. असते. वार्षिक सरासरी तपमान ८·९° से. असते. उन्हाळ्यात पावसाचे प्रमाण जास्त असून वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६०·४ सेंमी. असते.

वनस्पती व प्राणी :उत्तर, मध्य व पश्चिम यूरोपात आढळणाऱ्या वनस्पती व प्राणी पूर्व जर्मनीतही आढळतात. पर्वतीय भागात पाइन, स्प्रूस, ओक आणि बीच वृक्षांची जंगले आहेत. अनेक प्रकारची फुले, नेचे, शैवाल इ. आढळतात. हरिण, जंगली डुकरे, कोल्हे, बॅजर, बीव्हर, इ. प्राणी आढळतात. पक्षी बहुतेक स्थलांतरी असून ते ईशान्य-नैर्ऋत्य दिशेने स्थलांतर करतात. मासे थोडेसेच सापडतात.

दाते, सु. प्र.

राजकीय स्थिती : हा देश पूर्व यूरोपातील समाजवादी देशांत सर्वांत अधिक विकसित आहे. त्याची स्थापना ७ ऑक्टोबर १९४९ रोजी झाली. पूर्व जर्मनीचे सरकार सोशॅलिस्ट यूनिटी नावाच्या पक्षाच्या नियंत्रणाखाली होते. १९४६ साली सोशल डेमॉक्रॅटिक पक्ष आणि कम्युनिस्ट पक्ष यांचे विलीनीकरण करून हा नवीन पक्ष बनविण्यात आला. पूर्व जर्मनीच्या नव्या शासनाचे पहिले अध्यक्ष व्हिल्हेल्म पीक, पंतप्रधान ऑटो ग्रोटव्हाल आणि उपपंतप्रधान व्हाल्टर उलब्रिख्ट हे होते. हे सरकार स्थापन झाल्यानंतर रशियन लष्करी शासन काढून घेण्यात आले व त्याऐवजी रशियन नियंत्रण मंडळ नेमण्यात आले. वॉर्सा करार झाल्यानंतर हे मंडळही बरखास्त करण्यात आले.

ऑक्टोबर १९४९ मध्येच प्रसृत करण्यात आलेले पूर्व जर्मनीचे पहिले संविधान काही बाबतींत वायमार संविधानाच्या धर्तीवर रचलेले होते. या संविधानात मानवी आणि नागरी हक्कांची हमी देण्यात आली आहे. पीपल्स चेंबर आणि स्टेट्स चेंबर अशी द्विगृही पद्धती स्वीकारण्यात आली असून सर्व कार्यकारी अधिकार पीपल्स चेंबरने निवडलेला राष्ट्राध्यक्ष व बहुमतपक्षाने नेमलेला पंतप्रधान यांना देण्यात आले आहेत.

राज्यव्यवस्थेत १९५२ मध्ये बदल करण्यात आला. घटकराज्ये बरखास्त करून त्यांऐवजी बारा जिल्हे बनविण्यात आले व ते केंद्र सरकारच्या प्रत्यक्ष अंमलाखाली ठेवण्यात आले. १९६० मध्ये राष्ट्राध्यक्षाचे पद रद्द करण्यात आले व पुढे १९७५ साली स्टेट्स चेंबर बरखास्त करण्यात आले. राष्ट्राध्यक्षाचे स्थान कौन्सिल ऑफ स्टेटच्या अध्यक्षाला देण्यात आले. पूर्व जर्मनीत एकंदर चार पक्ष आहेत : सोशॅलिस्ट यूनिटी, ख्रिश्चन डेमॉक्रॅटिक, लिबरल डेमॉक्रॅटिक आणि नॅशनल डेमॉक्रॅटिक.

पहिल्या १९५० मध्ये झालेल्या निवडणुकीपासून सर्व पक्षांच्या उमेदवारांची एकत्र यादी मतदारांनी सादर करण्याची पद्धत चालू आहे. त्यामुळे चार पक्ष असले, तरी वस्तुतः एकपक्षीय राज्यपद्धतीच आहे. १९६८ मध्ये नवे संविधान अंमलात आले. ते रशियन संविधानाच्या धर्तीवर आहे. या संविधानानुसार पूर्व जर्मनी हे जर्मन समाजवादी राष्ट्र असल्याचे घोषित करण्यात आले. सर्व सत्ता कामगार आणि शेतकरी वर्गांची आहे. रशिया व अन्य समाजवादी देशांशी मैत्रीचे धोरण व जागतिक शांतता हे विदेशनीतीचे सूत्र संविधानात नमूद करण्यात आले आहे.

ओडर व नीस नद्यांच्या पूर्वेकडील जर्मन प्रदेश दुसऱ्या महायुद्धानंतर पोलंडमध्ये समाविष्ट करण्यात आला होता. पूर्व जर्मनीने १९५१ मध्ये ओडर नदीची ही नवी सीमा मान्य करणारा करार पोलंडशी केला. प. जर्मनीने बराच काळ या कराराला मान्यता दिली नव्हती परंतु विली ब्रांटच्या कारकीर्दीत प. जर्मनीनेही त्यास मान्यता दिली.


या प्रारंभीच्या काळात पूर्व जर्मनीला बिकट आर्थिक परिस्थिती व तीमुळे निर्माण झालेला जनतेचा असंतोष यांना तोंड द्यावे लागले. रशियाने नुकसानभरपाईबद्दल पूर्व जर्मनीतील कारखाने व यंत्रसामग्री रशियात हलविली. महायुद्धात झालेल्या संहारात देशाची तरुण पिढी बळी पडली होती. समाजवादी राष्ट्र निर्माण करण्याच्या निर्धाराने आर्थिक धोरणे आखली गेली आणि त्यांत मोठ्या उद्योगधंद्यांच्या पुनर्रचनेवर भर देण्यात आला. त्यामुळे उपभोग्य वस्तूंचा तुटवडा पडला. त्यातच सरकारने १०% कामाचे तास वाढविले. त्यामुळे असंतोषाचा भडका उडाला. जून १९५३ मध्ये पूर्व बर्लिन, लाइपसिक, मॅग्डेबर्ग, हाल इ. शहरांत कामगारांची उग्र निदर्शने झाली. ती रशियन सैन्याच्या मदतीने दडपून टाकण्यात आली.

बिकट आर्थिक परिस्थितीमुळे पूर्व जर्मनीतील लोक मोठ्या प्रमाणावर प. जर्मनीत जाऊ लागले. त्यांत तंत्रज्ञ व कुशल कामगार यांचा विशेष भरणा होता. तेव्हा १९६१ साली बर्लिनमध्ये प. जर्मनीच्या सीमेवर भिंत बांधून हा लोंढा थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला. भिंतीमुळे काही प्रमाणात हा लोंढा थांबला पण त्याहीपेक्षा आर्थिक परिस्थितीत झालेल्या सुधारणेचा परिणाम अधिक होता. १९५६ ते १९७२ या काळात औद्योगिक उत्पादन तिपटीने वाढले. या आर्थिक चमत्कारामुळे पू. जर्मनीला यूरोपमधील उद्योगप्रधान देशांत स्थान मिळाले. आर्थिक विकासाच्या दृष्टीने पूर्वयुरोपातील समाजवादी देशांत पू. जर्मनी सर्वाधिक संपन्न व प्रगत देश झाला. पूर्व जर्मनीची अर्थव्यवस्था सर्व समाजवादी देशांप्रमाणेच केंद्रीय स्वरूपाची आहे. ९८% औद्योगिक उत्पादनाचे राष्ट्रीयीकरण झालेले आहे. एप्रिल १९६० मध्ये संपूर्ण शेती सामुदायिक बनली.

राजकीय व संरक्षण यांबाबतीतही पूर्व जर्मनी हा रशिया आणि पूर्व यूरोपातील समाजवादी राष्ट्रे यांच्याशी संलग्न आहे. १९५५ मध्ये रशियाशी शांततेचा करार झाला. १९६४ मध्ये रशियाशी पुन्हा मैत्री, परस्परसाहाय्य व सहकार्य यांविषयी वीस वर्षांचा करार करण्यात आला. वॉर्सा करारात पूर्व जर्मनी सामील आहे.

१९६० पर्यंत पूर्व जर्मनीला फक्त साम्यवादी देशांचीच मान्यता होती. १९७१ मध्ये विली ब्रांट प. जर्मनीचे चॅन्सलर झाल्यानंतर त्यांनी पू. जर्मनीशी मर्यादित प्रमाणात राजनैतिक संबंध स्थापन करण्याचा मूलभूत करार केला. त्या वेळीच बर्लिनच्या प्रश्नावर अमेरिका, रशिया, फ्रान्स व ग्रेट ब्रिटन या राष्ट्रांत तडजोड झाली. त्यानंतर बर्लिनचा प्रश्नही जवळजवळ मिटला आहे. हा करार झाल्यानंतर सर्व पश्चिमी देशांची पू. जर्मनीला मान्यता मिळाली आणि सप्टेंबर १९७३ मध्ये पू. जर्मनीला प. जर्मनीबरोबर संयुक्त राष्ट्रांत प्रवेश मिळाला.

पश्चिम जर्मनीशी झालेल्या करारानुसार पूर्व आणि प. जर्मनीतील नागरिकांना उभय देशांत प्रवास करण्याच्या सवलती मिळाल्या. प. जर्मनीप्रमाणेच पू. जर्मनीच्या संविधानातही दोन्ही जर्मनीच्या अंतिम एकीकरणाचे ध्येय ग्रथित करण्यात आले असून हे एकीकरण समाजवादाच्या आधारे व्हावे, असे नमूद केले आहे.

व्हाल्टर उलब्रिख्ट यांच्या मृत्यूनंतर १९७१ पासून एरिख होनकर हे पू. जर्मनीचे राष्ट्रप्रमुख असून तेच सोशॅलिस्ट यूनिटी पक्षाचे पहिले चिटणीस होत.

साक्रीकर, दिनकर

संरक्षण व्यवस्था : दुसरे जागतिक महायुद्ध चालू असतानाच पू. जर्मनीला पूर्णपणे निःशस्त्र करणे चुकीचे ठरेल, असे सोव्हिएट रशियाचे मत होते. सोव्हिएट रशियात असलेल्या जर्मन युद्धबंद्यांतून १९४३ मध्ये एक जर्मन अधिकारी संघ स्थापण्यात आला. महायुद्धात बरेच युद्धबंदी नाझी जर्मनीच्या विरुद्ध लढल्याचे आढळते. १९४५ मध्ये अशाच युद्धबंद्यांपैकी जनरल म्यूलर, आर्नो फोन लेन्स्की वगैरेंनी पू. जर्मनीची संरक्षणव्यवस्था करण्यात भाग घेतला होता. महायुद्धाअखेर रशियाने पू. जर्मनीत पोलीस संघटना या नावाखाली संरक्षणबल उभारण्यास प्रारंभ केला. ऑक्टोबर १९४५ मध्ये कामगार-किसानांची संरक्षणसेना स्थापण्यात आली, असे जर्मन लोकशाही प्रजासत्ताकाचे अध्यक्ष ऑटो ओपिट्सने घोषित केले. १९४६ ते १९५० या काळात वेगवेगळ्या क्षेत्रांतील पोलीस संघटना स्थापण्यात आल्या. या संघटनांत जुने नाझी जर्मन अधिकारी नेमण्यात आले. रशियाचे जनरल पेट्राकोव्हस्की व इतर लष्करी अधिकारी या संघटनांचे सल्लागार होते. स्पेनच्या यादवी युद्धात जनरल गोमेझ म्हणून प्रसिद्ध असलेले जनरल व्हिल्हेल्म त्सायसर हे संघटना सेनापती झाले. दुय्यम म्हणून हाइंट्स होफमान होते. होफमान यांनी रशियातील फ्रुत्स अकादमीत लष्करी शिक्षण घेतले होते. मे १९५२ मध्ये ही पोलीस संघटना म्हणजे प्रत्यक्षातील संरक्षणव्यवस्थाच आहे, असे पू. जर्मनीने जाहीर केले. १८ जानेवारी १९५६ रोजी पू. जर्मनीच्या लोकसभेतील एका ठरावान्वये राष्ट्रीय लोकसेवा व राष्ट्रीय संरक्षण मंत्रालय स्थापण्यात आले. वॉर्सा करारातील तरतुदीप्रमाणे राष्ट्रीय लोकसेना ही वॉर्सा लष्करी संघटनेत दाखल झाली.


संरक्षण संरचना :येथील संरक्षण संरचना रशिया व इतर समाजवादी राष्ट्रांतील संरक्षण संरचनेप्रमाणे आहे तिची रूपरेखा अशी :

पुढे १९६० साली होफमान संरक्षणमंत्री झाले व राष्ट्रीय संरक्षण समितीची स्थापना करण्यात आली. या राष्ट्रीय संरक्षण समितीला आपत्कालात हुकूमनाम्याचे अधिकार आहेत. लोकसेनेत दाखल होऊन देशाचे व कामगारवर्गाचे संरक्षण करणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य ठरविणारा कायदा आहे. १९६२ च्या आरंभी सक्तीच्या लष्कर भरतीचा कायदा जारी झाला. १९६३ मध्ये लष्करी न्यायालये चालू झाली.

पूर्व जर्मनीला रशियाकडून लष्करी सामग्री मिळते. हलकी शस्त्रास्त्रे आणि वाहने पू. जर्मनीत तयार होतात. लष्करी संघटना रशियाच्या लष्करी संघटनेप्रमाणेच आहे. लष्करी शिक्षणात आक्रमक वृत्तीवर व रात्रीच्या लढाईवर भर दिला जातो.

संरक्षणबल (१९७५–७६) : भूसेना : सैनिक ९८,०००, रणगाडा डिव्हिजन २ (२,०००–३,००० रणगाडे) मोटरवाहनी पायदळ : डिव्हिजन ४ याशिवाय विमाने व रणगाडाभेदी क्षेपणास्त्रेही भरपूर आहेत. नौसेना : नौसेनिक १७,००० असून पाणबुड्यांचा पाठलाग करणारी प्रक्षेपणास्त्रयुक्त, टॉर्पेडो, गस्ती, सुरंग पेरणारी व काढणारी अशा प्रकारची १०४ जहाजे व बोटी आहेत. भर समुद्रावर लढाई करण्यास नौसेना समर्थ नाही. किनारासंरक्षण हीच एवढी कामगिरी ती करू शकते. वायुसेना : वायुसैनिक २८,००० असून लढाऊ, हल्लेखोर, अंतर्भेदी अशी ३३० लढाऊ विमाने आहेत. विमानविरोधी प्रक्षेपणास्त्रे व तोफखाना असून दोन छत्रीधारी बटालियन वायुसेनेत आहेत. सीमासंरक्षण व इतर बिगर लष्करी आणि राखीव सैनिक वगैरेंची संख्या सु. ८ लाख आहे. २३३ कोटी ३० लाख डॉलर वार्षिक लष्करी खर्च होतो.

दीक्षित, हे. वि.


आर्थिक स्थिती : नाझी राजवटीत पू. जर्मनीचा भाग शेतीप्रधान होता. जे थोडेबहुत कारखाने होते, त्यांतील बरेच युद्धात उध्वस्त झाले होते व उरलेल्यांची बरीचशी यंत्रसामग्री रशियनांनी नुकसानभरपाई म्हणून रशियास नेली होती. शिवाय तेथे कायम ठेवण्यात आलेल्या रशियन सैन्यास पोसण्याची जबाबदारीही पू. जर्मन लोकांवरच टाकण्यातआली होती. असा आर्थिक बोजा शिरावर असताना रशियाने लादलेल्या धोरणानुसार अवजड उद्योग उभारण्याची कारवाई पू. जर्मनीला करावी लागल्यामुळे, तेथील जनतेचेराहणीमान दीर्घकाळपर्यंत खालावलेल्या स्तरावरच राहिले. त्यामुळे धुमसत असलेल्या असंतोषाचा स्फोट होऊन १९५३ मध्ये पू. बर्लिन व इतर शहरांतील जर्मन जनतेनेबरीच बंडाळी माजविली परंतु रशियन सैन्याने ती मोडून काढली. तिचा परिणाम म्हणून आर्थिक धोरणात शासनाने बदल केला व जनतेचे राहणीमान सुधारण्याच्याप्रयत्नांकडे विशेष लक्ष दिले. जनतेमधील असंतोषामुळे तेथील बरेच लोक निर्वासित होऊन आपली सुटका करून घेऊ लागले. सुटकेचा मार्ग म्हणजे पू. बर्लिनमधून प.बर्लिनमध्ये शिरावयाचे व तेथून प. जर्मनीत जावयाचे. बरेचसे कुशल कामगार व डॉक्टर आणि इतर व्यावसायिक अशा रीतीने पू. जर्मनी सोडून गेले. हे निर्वसनथांबविण्यासाठी पू. जर्मनीला १९६१ मध्ये पू. आणि प. बर्लिन यांमध्ये एक मोठी तारेची भिंतच उभारावी लागली. कालांतराने ती काँक्रीटची करण्यात आली. १९४५–६२ च्यादरम्यान उलट बाजूनेही म्हणजे प. जर्मनीतून सु. ७ लक्ष लोक पू. जर्मनीत आले.

सुरुवातीची काही वर्षे पू. जर्मनीला आर्थिक टंचाईची गेली, तरी त्यानंतर व विशेषतः १९६३ मध्ये नवे आर्थिक धोरण अंमलात आल्यानंतर, प. जर्मनीप्रमाणेच पू. जर्मनीनेविस्मयजनक प्रगती केली असून पूर्व यूरोपमध्ये मानाचे स्थान पटकाविले आहे. देशातील दरडोई उत्पन्न चेकोस्लोव्हाकिया सोडल्यास यूरोपमधील अन्य कोणत्याहीसाम्यवादी देशांपेक्षा अधिक आहे. १९५० पासून पू. जर्मनी कोमेकॉन (Comecon) चा सभासद आहे. पू. जर्मनीने या सभासदत्वाचा काही विशिष्ट औद्योगिक वस्तूंच्याउत्पादनात शीघ्र गतीने वाढ करण्यासाठी उपयोग केला आहे. १९६४ मध्ये पू. जर्मनीचा रशियाबरोबर वीस वर्षांच्या कालावधीचा मैत्री, परस्परसाहाय्य व सहकार्य यांबाबतचाकरार झाला आहे.

पूर्व जर्मनीतील सोशॅलिस्ट एकता पक्षाने राष्ट्राचे सामाजिक जीवन व्यवस्थितपणे संघटित केले असून तेथील युवक संघ, स्त्रीसंघटना व कामगार संघटना आपापले कार्यसांभाळीत आहेत. १९७२ साली औद्योगिक उत्पादनापैकी ९९.९ टक्के उत्पादन राष्ट्रीयीकृत व ०.१ टक्के उत्पादन खाजगी मालकीचे होते. शेतीचे सामूहिकीकरणही ८५ टक्केकृषिक्षेत्राला लागू आहे. अशा रीतीने राष्ट्राचे सर्वंकष जीवन शासनाच्या व अधिकारारूढ पक्षाच्या ताब्यात आहे.

शेती : राष्ट्रीय उत्पन्नात १९७० साली शेतीचा १२ टक्के वाटा असून देशातील एकूण श्रमशक्तीच्या १३ टक्के लोक या व्यवसायात गुंतलेले होते. पूर्व जर्मनीच्या एकूण जमिनीपैकी६० टक्के जमीन पिकांच्या लागवडीस योग्य आहे. १३·४ टक्के चराऊ जमीन असून सु. २५ टक्के वनव्याप्त आहे. १९४५ पासून रशियनांनी पू. जर्मनीचा ताबा घेतल्यानंतर जमिनीचेपुनःसंघटन केले. १०० हेक्टरांपेक्षा मोठी शेते व युद्धगुन्हेगारांची शेते यांचा मालकांकडून सक्तीने ताबा घेण्यात आला. या शेतांचे एकूण क्षेत्रफळ ३६३ लक्ष हे. होते. ३१ लक्ष हे.जमीन शेतकऱ्यांत वाटण्यात आली. सामूहिकीकरणाचे धोरण १९५२ पासून अंमलात आले व १९७० पर्यंत एकूण शेतजमिनीच्या ८५·८ टक्के जमीन ९,००० सामूहिकशेततुकड्यांखाली आणली गेली. तीमध्ये राष्ट्रीयीकृत शेतजमीन मिळविल्यास सामूहिक शेतीखाली एकूण कृषिक्षेत्रापैकी ९४·१ टक्के जमीन सामील होती. १९७२ सालीकृषियोग्य जमीन ४६,४८,९०८ हे., चराऊ जमीन १४,४८,४९८ हे. आणि जंगलांसाठी २९,४९,७४१ हे. जमीन होती. त्याच वर्षी सामूहिक शेतांची संख्या ७,५७५ (५४.१ लक्षहे.) आणि सरकारी शेते (४,४६,७२७ हे.) होती. खाजगी मालकीखाली जमिनीचे एकूण क्षेत्रफळ सर्व कृषिक्षेत्राच्या केवळ ५.९ टक्के होते. ३०.७५ हेक्टरांमागे एक ट्रॅक्टर असेयेथील प्रमाण आहे. पूर्व यूरोपीय देशांपैकी फक्त चेकोस्लोव्हाकियानेच हे प्रमाण मागे सारले आहे. त्याचप्रमाणे दरहेक्टरी २२० पौंड रासायनिक खतांचा वापर हे प्रमाणहीसाम्यवादी व अनेक यूरोपीय भांडवलशाही राष्ट्रांच्या मानाने फार मोठे आहे. युद्धपूर्व काळाच्या मानाने हे प्रमाण ४० टक्क्यांनी अधिक आहे. परिणामी पीक भरपूर येत असले,तरी अन्नधान्यासाठी देशाला आयातीवर अवलंबून राहावे लागतेच.

पूर्व जर्मनीमधील प्रमुख पिके बटाटे, बीट, गहू, बार्ली, राय आणि ओट ही आहेत. १९७० मध्ये अन्नधान्यांच्या लागवडीखालील जमीन सु. २·१ लक्ष हे. होती. १९३४–३८ मध्येअन्नधान्य पिकविणाऱ्या जमिनीपेक्षा ती जवळजवळ १० लक्ष हेक्टरांनी कमी होती. गळिताच्या धान्याखाली १९७० साली १·५ लक्ष हे. जमीन नव्यानेच आली होती.बटाट्याखालील जमिनीत घट झाली असली, तरी बीटखाली अधिक जमीन आली आहे. गवताखालील जमिनीच्या क्षेत्रातही अलीकडे वाढ करण्यात आली असून मांसाचेउत्पादन वाढविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. अन्नधान्याची लागवड कमी झाल्याने महायुद्धापूर्वी अन्नधान्याची निर्यात करणाऱ्या पूर्व जर्मनीस आता सु. १० लक्ष टन अन्नधान्यमुख्यत्वे रशियातून दरवर्षी आयात करावी लागत आहे. १९७२ अखेर देशात गुरे ५३·७९ लक्ष (२१·६९ लक्ष दूध देणाऱ्या गाई समाविष्ट), डुकरे १ कोटी ३·६१ लक्ष, मेंढ्या१६·५७ लक्ष, बकरे ९६ हजार, घोडे ९४ हजार, कोंबड्या ४ कोटी ३७·४८ लक्ष व ५·७ लक्ष मधमाश्यांची पोळी होती. दूधपदार्थांचे उत्पादन अपुरे असल्यामुळे त्यांची आयातकरावी लागते. १९७२ अखेर दूध व दूधपदार्थांचे उत्पादन खालीलप्रमाणे झाले (लक्ष मे. टनांत) : दूध–गाईचे ७५·१५, बकऱ्यांचे १.२०, लोणी : २·४८ (कारखान्यांतील), ३१हजार (शेतांवरील), चीज : १·५२, अंडी : सु. २·४७, मध : ५,०८८ मे. टन.

खनिज संपत्ती : देशातील खनिज संपत्ती तुटपुंजी आहे. पू. जर्मनीत लिग्नाइटचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. जगात लिग्नाइटच्या उत्पादनात पू. जर्मनीचा पहिलाक्रमांक आहे. १९७२ मध्ये लिग्नाइटचे उत्पादन सु. २४·८५ कोटी मे. टन होते. लिग्नाइटपासून कोक बनविणारा जगातील एकमेव काखाना पू. जर्मनीत आहे. त्याचा उपयोगमुख्यतः वीजउत्पादनासाठी करण्यात येतो. सध्या पू. जर्मनी दुसरे अणुशक्तिकेंद्र उभारत आहे. पूर्व जर्मनीत पेट्रोलियम मुळीच उपलब्ध नाही. सर्व पेट्रोल रशियातून आयातकरावी लागते. पोटॅश व मीठ यांचे साठे व उत्पादन भरपूर असल्याने रासायनिक उद्योगांत पू. जर्मनी एक प्रमुख राष्ट्र मानले जाते. तांबे आणि जस्त यांचे उत्पादन बेताचेचअसून चांगल्या प्रतीच्या कच्च्या लोखंडाचीदेखील उणीव भासते. तरीसुद्धा रशियाच्या मदतीने पू. जर्मनीमध्ये पोलादाचे आणि यंत्रांचे उत्पादन सुरू आहे. कमी प्रतीचे कच्चेलोखंड पुरेसे आहे. पू. जर्मनीत युरेनियमच्याही खाणी आहेत परंतु त्यांचे उत्पादन रशियाच्या नियंत्रणाखाली असून सर्व युरेनियम रशियाला पाठविले जाते. पू. जर्मनीतीलसर्व खाणी राष्ट्राच्या मालकीच्या आहेत. श्वेट (Schwedt) शहरापासून ओडर नदीवरील ल्यूनापर्यंत ३४० किमी. लांबीचा तेलनळ १९६७ मध्ये बांधून पुरा झाला. देशाचाऔद्योगिक केंद्रांना या नळाद्वारा सोव्हिएट रशियातील तेलपुरवठा करण्यात येतो. १९७२ साली देशातील एकूण तेलनळ लांबी ७१० किमी. होती.


जंगल संपत्ती : १९७२ साली जंगलांखाली २९,४९,७४१ हे. जमीन होती पाइन हा महत्त्वाचा वृक्षप्रकार (५८%), त्यानंतर स्प्रूस (२०%), ओक (७·५%) व बीच (६%) हेवृक्षप्रकार येतात. १९३३ नंतर जंगलांची मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेली तोड, सोव्हिएट गटातील देशांना सक्तीने करण्यात आलेली जंगलपदार्थांची निर्यात व वृक्षांचीनव्याने लागवड करण्याकडे झालेले दुर्लक्ष या तिन्ही कारणांमुळे अरण्यांची विशेष समाधानकारक स्थिती नाही. १९४७ नंतर लाकूडतोडीचे प्रमाण कमी करण्यात येऊनवृक्षसंवर्धनधोरण अनुसरण्यात आले. १९७२ साली ओद्योगिक लाकडाचे उत्पादन ७१.५७ लक्ष घ. मी., तर जळाऊ लाकडाचे उत्पादन सु. ७.३७ लक्ष घ.मी. झाले.

मत्स्योद्योग : व्यापारी दृष्ट्या महत्त्वाचे मत्स्यप्रकार म्हणजे हेरिंग, स्प्रॅट, कॉडफिश, कोलफिश, कार्प, रेड पर्च, सामन व हॅडॉक हे होते. १९५५ मधील ६८,६०० टनांपासून१९६८ साली ३ लक्ष टनांपर्यंत प्रतिवर्षी मत्स्योत्पादनात वाढ होत गेलेली असली, तरीही अंतर्गत मागणीच्या मानाने हा पुरवठा अल्पच ठरतो. १९६३ च्या सुमारास मच्छीमारीसमूह देशातील सर्व किनारीय प्रदेश आणि नदीकाठच्या भागांमध्ये उभारण्यात आले. १९६८ च्या सुमारास देशात ४२ उत्पादक मच्छीमारी सहकारी संघ कार्यशील होते. १९७२साली एकूण मासेउत्पादन ३,२३,२८१ मे. टन झाले.

विद्युत्‌शक्ती : लिग्नाइट इंधन वापरून ९०% वीजउत्पादन करण्यात येते. जलविद्युत्‌‌केंद्रे व देशातील पहिले अणुशक्तिकेंद्र (१९६६ साली कार्यान्वित) यांपासून सु. ५% वीजनिर्माण केली जाते. देशातील वीजउत्पादनामध्ये वेगाने वाढ होत आहे १९७२ साली ७,२८२·८ कोटी कि. वॉ. ता. वीजउत्पादन झाले.

उद्योग : पू. जर्मनी औद्योगिक दृष्ट्या भरभराटीस आलेला देश आहे. राष्ट्रीय उत्पन्नात उद्योगधंद्यांचा वाटा ६० टक्के असून देशातील ४०% श्रमशक्ती त्यांत गुंतलेली आहे.दुसरे महायुद्ध संपल्यानंतर रशियाव्याप्त पू. जर्मनीत कारखान्यांची मोडतोड प. जर्मनीपेक्षा अधिक प्रमाणावर करण्यात आली व ती केवळ शस्त्रास्त्रांच्या कारखान्यांची नव्हे, तरइतर कारखान्यांचीसुद्धा. जे कारखाने चालू ठेवण्यात आले, त्यांतील बऱ्याच कारखान्यांचे उत्पादन १९५३ पर्यंत रशियाला खंडणी म्हणून पाठविले जाई. ही खंडणी १९५४मध्ये बंद करण्यात आली. त्यानंतरदेखील रशियाला पाठविलेल्या पू. जर्मनीच्या मालाला कमी किंमती देऊन व रशियातून पू. जर्मनीला निर्यात केलेल्या मालाचे जास्त भावघेऊन रशिया पू. जर्मनीकडून अप्रत्यक्षपणे खंडणी घेतच राहिला. पू. जर्मनीची अर्थव्यवस्था पूर्णपणे रशियाच्या वर्चस्वाखाली आली. तिच्यावर नियोजनही लादण्यात आले.सुरुवातीस विशिष्ट कारखान्यांसाठी योजना केल्या जात, नंतर विभागीय योजना आखण्यात येत व अखेरीस राष्ट्रीय नियोजनाचा आराखडा तयार केला जाई. अल्पकालीनयोजनांची जागा हळूहळू दीर्घकालीन योजना घेऊ लागल्या. तिमाही योजनांच्या जागी सहामाही योजना केल्या जाऊ लागल्या. १९४८ मध्ये पू. जर्मनीला एक द्विवर्ष योजनाबनवावी लागली. तिचे उद्देश अर्थव्यवस्थेची पुनर्रचना व पुढील पंचवार्षिक योजनेची पूर्वतयारी हे होते. पहिली पंचवार्षिक योजना १९५१–५५ साली व दुसरी १९५६–६० यावर्षांसाठी करण्यात आली. तिसरी योजना १९६१–६५ साली तयार होत असतानाच दुसरी व तिसरी योजना बाजूस सारून १९५९–६५ अशी एक सप्तवार्षिक योजनाबनविण्यात आली आणि तिचा सोव्हिएट गटातील राष्ट्रीय योजनांशी समन्वय साधण्यात आला.

पूर्व जर्मनीतील उद्योगांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. मोठमोठ्या उद्योगसंस्था युद्धगुन्हेगारांच्या म्हणून रशियन सैन्याने ताब्यात घेतल्या व त्या सरकारी बनल्या. त्यांमधूनएकूण औद्योगिक कामगारांपैकी ७५ टक्के कामगार काम करीत होते. १९५८ पर्यंत एकूण औद्योगिक उत्पादनापैकी ९० टक्के उत्पादन करणाऱ्या संस्था राष्ट्रीयीकृत झाल्याहोत्या. काही संस्था संयुक्त क्षेत्रात काम करू लागल्या कारण कालांतराने त्यांचेही संपूर्ण राष्ट्रीयीकरण साधावयाचे होते. १९५५ पर्यंत खाणी, धातूंचे उत्पादन व वीजनिर्मितीया सर्वांचे राष्ट्रीयीकरण झाले होते. १९५८ मध्ये खासगी क्षेत्राचा व्याप फक्त कापड-उत्पादन, पादत्राणे व लाकडी सामान अशा किरकोळ उद्योगांपुरताच मर्यादित होता.

पूर्व जर्मनीच्या अर्थव्यवस्थेचे नियोजन सुरुवातीस सर्वस्वी रशियास अनुकूल व त्याच्या मार्गदर्शनाबरहुकूम आखण्यात आले. ज्या उद्योगांच्या बाबतीत पू. जर्मनीत पुरेशीसाधनसामग्री उपलब्ध नव्हती, अशांचीही स्थापना व विकास करण्याचा आग्रह धरण्यात आला. उदा., पोलादाचे वार्षिक उत्पादन पू. जर्मनीला युद्धपूर्व काळातील १२ लक्ष मे.टनांवरून १९५८ मध्ये ३० लक्ष मे. टनांपर्यंत वाढवावे लागले व त्यासाठी कच्चे लोखंड रशियातून व कोळसा पोलंडमधून आयात करणे भाग पडले. यंत्रोत्पादन व इतर अवजडउद्योग यांच्या विकासावर विशेष भर दिला गेल्याने जनतेला आपल्या उपभोग्य वस्तूंच्या व घरांबाबतच्या गरजा भागविणे अशक्य झाले. ज्या उद्योगांत पू. जर्मनी पूर्वीपासूनकार्यक्षम होता, त्यांच्या उत्पादनातही बरीच वाढ करण्यात आली. उदा., कृत्रिम पेट्रोल, कृत्रिम रबर, वीजयंत्रे व कार्यालयास लागणारी यंत्रसामग्री. जहाजबांधणीउद्योगाचाही विकास करण्यात आला. त्या मानाने रेल्वेचे डबे व कृत्रिम धाग्यांपासून होणारे कापड यांच्या उत्पादनात वाढ झाली नाही. उद्योगांमध्ये धातु-प्रक्रिया उद्योग हेसर्वांत महत्त्वाचे असून त्याखालोखाल मूलोद्योग (रसायन उद्योग त्यांपैकी एक) येतात. वेल्लित पोलाद (रोल्ड स्टील) उत्पादनात हळूहळू पण निश्चित वाढ होत आहे. १९६७साली त्याचे उत्पादन ३०·७५ लक्ष मे. टन होते तेच १९७२ मध्ये ३७ लक्ष मे. टन झाले अशुद्ध पोलाद उत्पादन १९६७ मधील ४५·९ लक्ष मे. टनांवरून १९७२ मधील ५६·७ लक्षमे. टनांवर गेले. कापड उद्योग, चर्मोद्योग, पादत्राणे, छपाई, काच आणि अन्नप्रक्रिया हे उद्योग महत्त्वाचे आहेत. कृत्रिम तंतुउद्योग व प्लॅस्टिक उद्योग यांच्याकडे अधिकाधिकलक्ष देण्यात येत आहे. घड्याळे, गणन यंत्रे, कॅमेरे इ. अचूक व सूक्ष्मभागांचे निर्यातयोग्य वस्तुनिर्मिती उद्योगही महत्त्वाचे मानले जातात. राष्ट्रीयीकृत उद्योगांच्याव्यवस्थापनाची जबाबदारी त्या त्या मंत्रालयाकडे असते. १९७२ साली खालीलप्रमाणे उत्पादन झाले (लक्ष मे. टन) : नत्रखते : ४·२८ कृत्रिम : रबर १·३३ गंधकाम्ल :१०·४५ कॅल्सिन्ड सोडा : ७·२१ कॉस्टिक सोडा : ४·२० अमोनिया : ५·५४ सिमेंट : ८८·५७ कापड : २,४२० लक्ष चौ. मी. पादत्राणे (जोड) : ३६४ लक्ष.


दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत व १९५८—६५ च्या सप्तवार्षिक योजनेत शासकीय औद्योगिक धोरण बदलले. अवजड उद्योगांची वाढ करण्यामागे न लागता परंपरागत उद्योगांच्याविकासाकडे विशेष लक्ष पुरविले जाऊ लागले. याचा परिणाम वीजयंत्रे, सूक्ष्मयंत्रे व काचेचे पदार्थ आणि रासायनिके यांचे उत्पादन वाढवून आवश्यक तो अवजड माल रशियाव चेकोस्लोव्हाकिया ह्या देशांमधून आयात करण्याचे धोरण अंमलात आले. रशियाहून आयात झालेल्या तेलावर आधारलेल्या खनिज तेल रसायन उद्योगाचीही वाढ करण्यातआली. १९५०–७० या दोन दशकांत औद्योगिक उत्पादन जवळजवळ तिपटीने वाढले. उद्योगधंद्यांतील गुंतवणूक सतत वाढत राहिली. आधुनिक तंत्रज्ञानाचा सारखा वापरहोत राहिला व परिणामी मजुरांची उत्पादकता चढत्या श्रेणीने वर गेली. सारांश, सोव्हिएट गटातील राष्ट्रांमध्ये पूर्व जर्मनी हा रशियाच्या खालोखाल यंत्रे व विकाससामग्रीयांचा पुरवठा करणारा औद्योगिक देश बनला आहे.

पूर्व जर्मनीमधील ११,५६४ औद्योगिक उत्पादनसंस्थांपैकी १९७० मध्ये २,४३७ राष्ट्रीय मालकीच्या, ३११ सहकारी क्षेत्रात, ३,१८४ खासगी क्षेत्रात व ५,६२२ संयुक्त क्षेत्रात कामकरीत होत्या. खासगी क्षेत्रातील संस्थांचे उत्पादन एकूण औद्योगिक उत्पादनाच्या जवळजवळ २ टक्केच आहे. रशियाने नेलेली यंत्रसामग्री, कच्च्या मालाचा अभाव, कुशलकामगारांचे निर्वसन इ. अडचणींतूनही पूर्व जर्मनीने आपली औद्योगिक प्रगती साधली आहे. पक्क्या मालाचा दर्जा सुधारणे, प्रगत तंत्रविद्येचा अधिक वापर करणे वउत्पादकता वाढविणे यांवर अलीकडे पू. जर्मनीचा कल आहे. औद्योगिक धोरणाचा मुख्य भर इंधन व वीज, अभियांत्रिकी, रसायने, विजेची उपकरणे आणि इलेक्ट्रॉनीयउद्योग यांच्या उत्पादनावर आहे. पू. जर्मनीचे राहणीमान सोव्हिएट वर्चस्वाखालील राष्ट्रांच्या सरासरी राहणीमानाहून वरचढ आहे परंतु प. जर्मनीच्या मानाने कमी पातळीवरआहे. कच्चा माल व अन्नपुरवठा अपुरा असल्याने त्यासाठी बरेच उत्पादन निर्यात करावे लागते. १९७२ साली उद्योगाचा राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा ६१ टक्के होता. राष्ट्रीय वसहकारी उद्योगधंदे यांचा स्थूल राष्ट्रीय उत्पादनात ९६.१ टक्के वाटा होता, तर खाजगी उद्योगधंद्यांचा ३·९ टक्के (१९५० साली ३१·२ टक्के) वाटा होता. १९७२ मध्ये देशात१०,६४१ उद्योगसंस्था व ३२.५१ लक्ष कामगार होते. त्याच साली कृषी व जंगलउद्योग यांमध्ये ९.३६ लक्ष, बांधकाम ५.६ लक्ष, वाणिज्य ८.४८ लक्ष, वाहतूक व संदेशवहन५.८९ लक्ष आणि इतर उद्योगांत १६·२७ लक्ष कामगार गुंतलेले होते. एकूण श्रमशक्तीपैकी ४७ टक्के स्त्रीकामगार आहेत. देशात बेकारी नसली, तरी कामगार अनुपस्थितीचेप्रमाण फार मोठे आहे. १९६१ पूर्वी हजारो कुशल कामगार देश सोडून गेल्यामुळे कुशल कामगारांचा नेहमीच तुटवडा जाणवतो. देशातील सर्व कामगार संघटना ‘कॉन्फेडरेशनऑफ फ्री जर्मन ट्रेड युनियन्स’ या मध्यवर्ती संस्थेशी (स्थापना १९४५) संलग्न असून तिचे ७३ लक्ष सभासद आहेत. आर्थिक धोरणांची चर्चा करणे, राष्ट्रीय योजनेच्याअंमलबजावणीस साहाय्य करणे एवढ्यापुरतेच कामगार संघटनांचे कार्यक्षेत्र मर्यादित आहे. या संघटना सरकारी यंत्रणेचाच एक भाग म्हणून काम करतात. पाच दिवसांचाकामाचा आठवडा असून वर्षाकाठी कामगारांस मिळणारी १३ दिवसांची पगारी सुट्टी देशातील १,२४५ विश्रामधामांपैकी कोणत्याही एका धामात कामगाराला उपभोगता येते.कॉन्फेडरेशन ऑफ फ्री जर्मन ट्रेड युनियन्सतर्फे या विश्रामधामांची व्यवस्था पाहिली जाते.

व्यापार : पू. जर्मनीत बहुतेक घाऊक व्यापाराचे राष्ट्रीयीकरण झाले असून बाकीच्यांवर शासकीय नियंत्रण आहे. किरकोळ व्यापारात अल्प प्रमाणावर खासगी दुकानदारआहेत परंतु त्यांचेही राष्ट्रीयीकरण करण्याचा शासनाचा हेतू आहे. १९६८ मध्ये एकूण किरकोळ व्यापाराची वाटणी अशी होती : ६६.८ टक्के सरकारी क्षेत्रात, १९.७ टक्केसहकारी क्षेत्रात, ७.१ टक्के संयुक्त क्षेत्रात व ६.४ टक्के खासगी क्षेत्रात. १९५३ प्रमाणेच १९६१–६२ मध्ये अन्नपदार्थांची तीव्र टंचाई अनुभवास आली. याची कारणे उत्पादनातघट, अपुरी आयात, अकार्यक्षम वाटप व लोकांची अन्नसवयींत फेरफार न करण्याची प्रवृत्ती, ही होती. याचा परिणाम म्हणून १९६२ मध्ये शासनाला जवळजवळरेशनिंगसारखीच वाटपपद्धती वापरावी लागली. उपभोक्त्यांना आपली नावे जवळच्या वाटपकेंद्रावर नोंदवावी लागून तेथूनच खरेदी करण्याची त्यांच्यावर सक्ती करण्यातआली. ज्या पदार्थांचा तुटवडा होता, त्यांच्या विक्री-किंमतींत सरकारने वाढ केली. काही वस्तूंच्या खरेदी-किंमती वाढवून किंवा उत्पादकास उपदाने देऊन त्यांच्याउत्पादनास उत्तेजन देण्यात आले. काही वस्तूंच्या बाबतीत दोन किंमती ठरविण्यात आल्या. लेव्ही पद्धतीने सरकारला विकावयाच्या कोट्यासाठी एक किंमत व ठरलेल्याकोट्यापेक्षा अधिक माल सरकारला विकल्यास तीहून जास्त किंमत. किरकोळ विक्री रोखीनेच होत असते आणि हप्तेबंदीने खरेदी पद्धती अद्याप तरी मोठ्या प्रमाणावरपसरलेली नाही. ६% व्याजदराने कर्जे दिली जातात अथवा प्रत्यक्ष दुकानदाराकडेच याबाबत व्यवस्था केली जाते. किरकोळ विक्रीची स्वयं-सेवा दुकाने हळूहळू वाढतआहेत. १९६८ साली त्यांचे प्रमाण एकूण किरकोळ व्यापाराच्या १३% होते.

जाहिरातदारी पू. जर्मनीत शासनाच्या ताब्यात आहे. उपलब्ध वस्तूंची जनतेला माहिती देण्यासाठी किंवा ज्या वस्तूंचा खप वाढणे नियोजनाच्या उद्दिष्टांसाठी आवश्यक आहे,त्यांची जनतेला माहिती करून देण्यासाठी शासन जाहिराती प्रसृत करते. मासिके व वर्तमानपत्रे यांचा जाहिरातींसाठी संपर्कमाध्यमे म्हणून मोठ्या प्रमाणावर उपयोगकरण्यात येतो. लाइपसिक येथे भरणारी वार्षिक व्यापारी जत्रा हे आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांतील सर्वांत महत्त्वाचे प्रदर्शन मानले जाते. ही जत्रा म्हणजे पू. जर्मनीच्या औद्योगिकप्रगतीचा मानबिंदू म्हणता येईल.

परराष्ट्रीय व्यापाराची मक्तेदारी शासनाकडे आहे. शासकीय निर्यातसंस्थेला मध्यवर्ती बँकेकडून कर्जपुरवठा होतो आणि त्यातून ती संस्था निर्यातदारांना निर्यात मालाचीकिंमत देते. निर्यातीप्रमाणेच आयातीवरही मध्यवर्ती बँकेचे नियंत्रण असते. पाश्चिमात्य राष्ट्रांशी द्विराष्ट्रीय पद्धतीने व्यापार चालतो. आयात मालापैकी अशुद्ध तेल, कोळसाआणि कोक, अन्नधान्ये व कच्चे लोखंड हे प्रमुख पदार्थ होत. निर्यात मालामध्ये मुख्यत्वे लिग्नाइट, घड्याळे, पोटॅश, आगगाड्यांचे डबे, यंत्रे, छायाचित्रणाचे कागद व कापडयांचा समावेश होतो. १९५०–६८ या काळात परराष्ट्रीय व्यापारात बराच फरक झाला आहे. कच्चा माल व इंधन यांची निर्यात १९५० मध्ये एकूण निर्यातीच्या ५३ टक्के होतीपरंतु १९७० मध्ये ती फक्त २० टक्केच होती. याउलट यंत्रांच्या निर्यातीचा हिस्सा त्याच काळात एकूण निर्यातीच्या २८ टक्क्यांवरून ६० टक्क्यांपर्यंत वाढला.कच्चा माल आणितेल यांची आयात नेहमीच एकूण आयातीच्या ५० टक्क्यांहून अधिक होती. यंत्रांची आयात या काळात एकूण आयातीच्या ५ टक्क्यांवरून ३० टक्क्यांपर्यंत वाढली. याउलटअन्नपदार्थांच्या आयातीचे प्रमाण एकूण आयातीच्या ३४ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत घसरले.


पूर्व जर्मनीचा परराष्ट्रीय व्यापार सर्वांत जास्त रशियाशी चालतो. त्याखालोखाल चेकोस्लोव्हाकिया, प. जर्मनी, पोलंड आणि हंगेरी या देशांशी पू. जर्मनीचा व्यापार चालतो.१९७० मध्ये पू. जर्मनीच्या एकूण व्यापारापैकी ७० टक्के व्यापार सोव्हिएट गटातील राष्ट्रांशी होता त्यातील केवळ रशियाशी झालेला आयात-निर्यात व्यापार एकूण व्यापाराच्या४० टक्के होता. एकूण आयातीपैकी १० टक्के आयात व तेवढीच निर्यात प. जर्मनीकडे करण्यात येते. १९६०–७० या काळात पू. जर्मनीने आपल्या व्यापाराचे प्रमाण जवळजवळ९० टक्क्यांनी वाढविले. १९७२ साली पू. जर्मनीचा आयात-निर्यात व्यापार साम्यवादी, विकसनशील व इतर राष्ट्रांशी पुढीलप्रमाणे होता (कोटी डीडीआर मार्क किंवाऑस्टमार्कमध्ये) : आयात : १,५१९ ६२·७ आणि ७०३·५. निर्यात : १,८०५ ८६.७ व ५०१·४. त्याच वर्षी एकट्या रशियाशी आयात-निर्यात व्यापार अनुक्रमे ८००·८५ कोटी व९६१·५२ कोटी ऑस्टमार्क झाला.

पूर्व जर्मनीची परकीय चलनविषयक आकडेवारी उपलब्ध नाही परंतु औद्योगिक विकासासाठी आवश्यक तो माल बाहेरून आयात करण्यात पुरेसे परकीय चलन पू. जर्मनीसमिळू शकत नाही, असे दिसते. परकीय चलनाची परिस्थिती सुधारावी म्हणून काटकसरीचे बरेच मार्ग अवलंबिले जात आहेत. आयात कमी करून व निर्यातीचे प्रमाण वाढवूनअधिक परकीय चलन मिळविण्याचे प्रयत्न सतत चालूच असतात. अन्य मार्गांमध्ये उलाढाल-कर व इतर कर यांचे वाढते प्रमाण, रेशनिंग, बँकांचे अधिक कडक पतपुरवठा-धोरण, वित्तविषयक सुधारणा, मर्यादित हप्तेबंदी खरेदीपद्धत इत्यादींचा समावेश होतो.

अर्थकारण : १०० फेनिज = १ डॉइश-मार्क (डीडीआर मार्क) किंवा ऑस्टमार्क हे अधिकृत चलन असून १, ५, १०, २० व ५० फेनिजची नाणी आणि ५, १०, २०, ५० व १०० ऑस्टमार्कच्या नोटा वापरात आहेत. मार्च १९७४ मधील विदेश विनिमय दर १०० ऑस्टमार्क=२३.१४ स्टर्लिंग पौड=५३.७४ अमेरिकन डॉलर असा होता.

 जर्मन चलन बँक ही मध्यवर्ती बँक म्हणून १९४८ साली पूर्व बर्लिनमध्ये स्थापण्यात आली. नोव्हेंबर १९६५ पासून तीच सरकारी बँक म्हणूनही कार्य चालविते. इतर सर्व पतपुरवठा संस्थांना मार्गदर्शन करणे, अल्पमुदतीचे आवश्यक तेवढे भांडवल पुरविणे, सरकारी रोखे विकणे व बांधकामासाठी पतपुरवठा करणे ही जबाबदारी बँकेकडे आहे. १९६१ पासून परराष्ट्रीय व्यापाराची एकमेव बँक म्हणून तीच कार्य पाहत आहे. देशातील इतर सर्व बँका हिच्या नियंत्रणांखाली काम करतात. १९५७ मध्ये पू. जर्मनीने जुन्या नोटा रद्द करून त्याबदली नवीन नोटा प्रसृत केल्या व अशा रीतीने चलनात महत्त्वाची सुधारणा घडवून आणली. इतर बँका पुढीलप्रमाणे : आयात-निर्यात व्यापार विषयक वित्तकार्य सांभाळणारी बँक उद्योग बांधकाम, अंतर्गत व्यापार व वाहतूक यांना वित्तप्रबंध करणारी बँक कृषी व सहकारी संस्था यांना पतपुरवठा करणारी बँक.

 दुसऱ्या महायुद्धानंतर पू. जर्मनीमधील सर्व खाजगी विमा कंपन्यांचे विलीनीकरण करण्यात आले. समाजकल्याण विमा योजना अस्तित्वात असून तिचे सर्व काम कामगार संघटनांकडे आहे. व्यापारी विम्याचे काम ‘जर्मन विमा संस्था’ या शासकीय मक्तेदारी असणाऱ्या संस्थेकडे सोपविण्यात आले आहे. ही संस्था आग, गारा, मोटरगाड्या, राष्ट्रीयीकत उद्योगधंद्यांची मालमता, तसेच जीवन, अपघात, आरोग्य, मालमत्ता यांबद्दलचे विमे आणि स्वयंव्यावसायिकांसाठी सामाजिक विमा यांसंबंधीचे कार्य पाहते. ‘स्टेट फॉरिन अँड रीइन्शुरन्स कंपनी’ ही संस्था जहाज उद्योग, पतविमा व पुरर्विमा यांसंबंधीचे विमाव्यवहार पाहते. देशात शेअरबाजार नाहीत.

 दर वर्षाअखेर लोकसभेला पुढील वर्षाचे अंदाजपत्रक सादर करण्यात येते. आर्थिक वर्ष १ जानेवारीपासून सुरू होते परंतु १ जानेवारीनंतरही अंदाजपत्रकात दुरुस्ती करता येते. अर्थप्रबंधाची व्यवस्था केंद्रीभूत असल्याने अंदाजपत्रकामध्ये सरकारी आयव्ययाच्या तरतुर्दीबरोबरच सरकारी क्षेत्रातील कारखान्यांच्या खर्चाचीही तरतूद करावी लागते. अंदाजपत्रकाद्वारेच शासकिय योजना अंमलात आणली जाते. १९७२ च्या अर्थसंकल्पात राजस्व व खर्च अनुक्रमे ८,६९५.१ कोटी ऑस्टमार्क आणि ८,५७६.४ कोटी ऑस्टमार्क होता. खर्चाच्या बाबी पुढीलप्रमाणे (कोटी ऑस्टमार्क) : आरोग्य व सामाजिक सेवा, शिक्षण व सांस्कृतिक बाबी : ३,२३६.२ संरक्षण : ७६२.५. १९७३ च्या अर्थसंकल्पात संरक्षणावर ८३२.८ कोटी ऑस्टमार्कची तरतूद होती.

 पूर्व जर्मनीमध्ये उलाढाल-कर हे शासकीय उत्पन्नाचे सर्वांत मुख्य साधन असून त्याखालोखाल राष्ट्रीय कारखान्यांच्या नफ्यावरील कराचा क्रमांक लागतो. या दोन्ही करांचे मिळून सरकारी उत्पन्न एकूण शासकीय उत्पन्नाच्या जवळजवळ ५०% आहे. किरकोळ व्यापार आणि सेवापुरवठा करणाऱ्या खासगी उद्योगसंस्थांवरील करांचे ओझे भरपूर आहे. त्याचप्रमाणे स्थावर मालमत्ता, मोटरगाड्या, करमणूक यांवरील करांपासूनही सरकारला बरेच उत्पन्न मिळते. वेतन व पगार यांवरील जास्तीत जास्त कर २० टक्केच असल्यामुळे श्रीमंतांना विशेष फायदा होतो. कलावंत, शास्त्रज्ञ आणि इतर बुद्धिजीवी वर्गांतील लोकांच्या प्राप्तीवर १४% कर आकारण्यात येतो.

 परकीय भांडवल गुंतवणूक : पू. जर्मनी परराष्ट्रांना भांडवल पुरवत नाही परंतु विकसनशील राष्ट्रांना पतपुरवठा करून, तांत्रिक मदत देऊन त्यांच्या औद्योगिक विकासास हातभार लावते. परराष्ट्रेही पू. जर्मनीत भांडवल गुंतवणूक करीत नाहीत.


आर्थिक नियोजन : पू. जर्मनीतील अर्थव्यवस्थेचे नियोजन राष्ट्रीय योजना आयोगाकडे व औद्योगिक मंत्रालयांकडे सोपविण्यात आले आहे. योजना आयोग स्थूलमानाने योजनेचा आराखडा बनवितो व औद्योगिक मंत्रालयांनी त्याचा तपशील तयार केल्यावर योजना तयार होते. सुरुवातीस १९४९-५० ची द्विवर्षिक योजना करण्यात आली त्यानंतर १९५१-५५ आणि १९५६-६० ह्या दोन पंचवार्षिक योजना अंमलात आल्या. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्टे १९५७ मध्ये प्रथम काही प्रमाणात कमी करण्यात येऊन नंतर ती योजना गुंडाळण्यात आली व तिच्या जागी १९५९-६५ ही सप्तवार्षिक योजना रशियाच्या धर्तीवर तयार करण्यात येऊन अंमलात आणली गेली. सर्वच योजनांमध्ये अवजड उद्योगांवर विशेष भर देण्यात आला. त्यामानाने उपभोग्य वस्तूंच्या उत्पादनाकडे काहीसे दुर्लक्ष झाले असल्याचे आढळते. कच्च्या मालाचा आणि मनुष्यशक्तीचा तुटवडा ह्या दोन समस्यांना पू. जर्मनीला नजीकच्या भविष्यकाळात तोंड द्यावे लागणार आहे. स्वयंचलित यंत्रांचा अधिकाधिक वापर आणि कच्च्या मालाचा किमान उपयोग करणाऱ्या नवीन स्वरूपाच्या उद्योगधंद्यांवर भर, या धोरणाचा पाठपुरावा करणे पू. जर्मनीस आवश्यक होऊन बसणार आहे.

 वाहतूक व संदेशवहन : देशातील रेल्वे शासकीय मालकीची आहे. औद्योगिक केंद्रे असलेल्या दक्षिण भागात लोहमार्गांचे दाट जाळे पसरले आहे. शिवाय प्रमुख प्रादेशिक केंद्रे एकमेकांना व बर्लिनलाही जोडली आहेत. पर्यटकांच्या सोयीसाठी व कृषिविकासासाठी काही थोडेसे लोहमार्ग अरुंद मापी आहेत. १९७२ मध्ये लोहमार्गांची एकूण लांबी १४,३८४ किमी. होती. त्यांपैकी १,३८४ किमी. मार्गांवर (९ मार्गांवर) विजेची एंजिने वापरात होती. १९७२ मध्ये ६४.१ कोटी प्रवाशांनी एकूण १,९९३.२ कोटी प्रवासी-किमी. प्रवास लोहमार्गांनी केला व त्याच साली एकूण मालवाहतूक ४,४६३ कोटी टन किमी. इतकी झाली.

 पूर्व जर्मनीत १९७२ मध्ये एकूण ४५,५७२ किमी. लांबीचे रस्ते होते. त्यांपैकी १,४६४ किमी. लांबीचे मोटररस्ते होते. रस्त्यांचे जाळे उत्तरेकडील भागात विरळ असून दक्षिणेकडे मात्र अतिशय दाट आहे. लाइपसिक-ड्रेझ्‌डेन, बर्लिन-रॉस्टॉक व हॉल-मॅग्डेबर्ग हे द्रुतमार्ग व बर्लिन वलय १९७५ पर्यंत पूर्ण करण्याची योजना आहे. पू. जर्मनीत १९७२ मध्ये सु. १४ लक्ष मोटरी, २.०६ लक्ष ट्रक, १७,७७४ बसगाड्या व ३०.७ लक्ष मोटरसायकली व मोपेड होत्या.

 पूर्व जर्मनीतील नद्या व त्यांना जोडणारे कालवे यांच्यामुळे विशेषतः उत्तर भागात बरीच जलवाहतूक चालते. एकूण अंतर्गत जलमार्ग २,५४६ किमी. आहे. औद्योगिक भरभराट झालेल्या दक्षिण भागात जलमार्गांची सोय नसल्यामुळे जलमार्गांचा उपयोग मालवाहतुकीस बेताचाच होतो. १९७२ मध्ये २३०.४ कोटी टन किमी. मालवाहतूक जलमार्गांनी झाली. सु. ८० लक्ष प्रवाशांनी २१.७ कोटी प्रवासी-किमी. प्रवास जलमार्गांवरून केला.

 बाल्टिक किनाऱ्यावर व्यापारी जहाजांना बंदराची सोय असल्यामुळे पू. जर्मनीचा परराष्ट्राशी व्हिझ्‌मार, रॉस्टॉक व स्ट्रालझुंट या बंदरांमधून बराच व्यापार चालतो. १९७२ मध्ये पू. जर्मनीची १९४ व्यापारी जहाजे मालवाहतुकीसाठी उपलब्ध होती आणि त्यांचा एकूण टनभार सु. १० लक्ष टन होता.

 देशात बर्लिनखेरीज इतर पाचसहा विमानतळ असून त्यांना जोडणारी हवाईवाहतूक १९५६ मध्ये सुरू झाली. यूरोप, आशिया व आफ्रिका येथील ३६ शहरांना अनुसूचीप्रमाणे पू. जर्मनीच्या विमानांची वाहतूक चालू असते. १९७२ मध्ये ९,२५,९०० प्रवाशांनी एकूण १०,९८,५०० प्रवासी-किमी. प्रवास हवाईमार्गे केला.

 सोव्हिएट पेट्रोल श्वेट येथे आल्यावर त्याचे शुद्धीकरण होते व ते नळमार्गाने रॉस्टॉक बंदराला व ल्यूना येथील रसायन कारखान्यांना पुरविले जाते. आणखी नळमार्गही बांधण्यात येत आहेत.

 दळवळणाच्या बाबतीत सर्व दूरध्वनी, तारायंत्र, रेडिओ व दूरचित्रवाणी यंत्रणा सरकारी मालकीची असून सरकारकडूनच चालविली जाते. १९७२ मध्ये रेडिओ परवानाधारकांची संख्या ६०.५ लक्ष व दूरचित्रवाणी परवानाधारकांची संख्या ४८.१९ लक्ष इतकी होती. डाक कार्यालयांची संख्या ११,९६७ व दूरध्वनींची संख्या २२,३२,०६९ होती.

धोंगडे, ए. रा.

 लोक व समाजजीवन : १९४७ अखेर बर्लिनचा पूर्व भाग समाविष्ट करून एकूण लोकसंख्या १,९१,०२,००० इतकी होती. हळूहळू कमी होत जाऊन ती १९६४ मध्ये १,७०,०३,६५५ इतकी झाली व त्यानंतर वाढत जाऊन १९७३ अखेर १,६९,५१,२५१ इतकी होती. त्यापैकी ७८,५१,३३६ पुरुष व ९०,९९,९७५ स्त्रिया होत्या. यातील ७२% लोकसंख्या २,००० पेक्षा अधिक लोकवस्तीच्या शहरांत केंद्रित झाली आहे. लोकसंख्येची सरासरी घनता १९७३ अखेर दर चौ. किमी. ला १५७ होती. पू. बर्लिन या राजधानीची लोकसंख्या १९७३ अखेर १०,८८,८२८ होती. शिवाय एक लाखाहून अधिक वस्तीची १२ शहरे पू. जर्मनीत आहेत. एकूण लोकसंख्येपैकी स्लाव्ह लोकांचे प्रमाण जास्त आहे. जर्मन ही सरकारमान्य भाषा असली, तरी स्थलपरत्वे तीत फरक जाणवतो.


या देशाचा दक्षिण भाग उद्योगप्रधान आहे. १९४५ सालापर्यत व्हिल्हेल्म पीक स्टाट गूबन ते मॅग्डेबर्ग रेषेच्या उत्तरेकडे बर्लिन हे एकमेव उद्योगप्रधान स्थळ होते. नव्या जगातील रुप्याच्या खाणींचा शोध लागेपर्यंत येथील दक्षिणेकडील डोंगराळ भागातील रुप्याच्या खाणींवर पुष्कळ लोकांची उपजीविका अवलंबून होती. नंतरच्या काळात हे लोक वेगवेगळी कलाकौशल्ये, व्यापार, कापड आणि धातुकामाचे उद्योग या व्यवसायांकडे वळले. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात लिग्नाइट आणि मीठ या खनिजांचे उद्योग वाढले, परिवहनाचे विस्तीर्ण जाळे विणले गेले व त्यायोगे पुढच्या काळात रासायनिक पदार्थ, अवजड यंत्रसामग्री, ऊर्जानिर्मिती केंद्रे अशा विविध उद्योगांचा प्रसार होऊन प्रादेशिक अर्थव्यवस्था विस्तार पावली. याच कालावधीत उत्तरेकडे मात्र खनिज संपत्तीचा अभाव, वाहतूक आणि बाजार व्यवस्थांची कमतरता आणि मेक्लनबुर्क व ब्रांडनबुर्क यांसारख्या प्रांतांतील जमीनधारकांचा प्रभावी वर्ग यांच्या दाबामुळे औद्योगिक प्रगती फारशी झाली नाही. समाजवादी नियोजनाने संपूर्ण राष्ट्राच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित केले. दक्षिणेतील ड्रेझ्‌डेन, कार्लमार्क्सस्टाड, हाल, लाइपसिक इ. उद्योगकेंद्रांची नव्याने पुनर्रचना करून व तोपर्यंत औद्योगिक क्षेत्रात मागे राहिलेल्या उत्तरेकडील विभागात रॉस्टॉक, व्हिस्मार, स्ट्रालसुंड येथे जहाजबांधणीच्या कारखान्यांसारखे नवे उद्योग सुरु करण्यात आले. वाहतुकीची विस्तृत पुनर्रचना करुन नवीन शेती विकसित करण्याकरिता खास प्रयत्न केले गेले. देशातील सामान्यपणे एक तृतीयांश लोक अद्यापिही बर्लिन, हाल, लाइपसिक, कार्लमार्क्सस्टाड, त्स्विकाऊ, ड्रेझ्‌डेन अशा महानहरांतून राहतात परंतु शहराबाहेरील नव्या निवासयोजनांची गती वाढत आहे.

 सध्या ग्रामीण वस्त्यांतही कालोचित बदल घडवून आणले जात आहेत. नव्या धर्तींचे खेड्यांचे पुनर्रचनाकार्य राष्ट्रीय नियोजनाबरहुकूम अंमलात येत आहे. बड्या समाजवादी समूह संस्था व सहकारी घटक यांच्या निर्मितीला प्रोत्साहन देऊन ग्रामीण भागाचे परिवर्तन चालू आहे. अशा ग्रामीण क्षेत्रात निवासासाठी बहुमजली इमारतींची बांधणी, शैक्षणिक संस्था, बाजार, दुकाने, व्यवसाय ठिकाणे, सांस्कृतिक व सेवा कार्यासाठी इमारती, कोठारे, गोठे, छोट्या उद्योगधंद्यांसाठी राखीव जागा इ. विविध सामाजिक गरजा लक्षात घेऊन गावांची आखणी केली जात आहे. व्यक्तिगत मालकीची घरे, खाजगी मालकीची शेते इ. गोष्टींची या नव्या बदलाप्रमाणे उचलबांगडी करण्यात येत आहे. सर्वांत जास्त नागरीकरण कार्लमार्क्सस्टाइड व लाइपसिक भागांत झालेले असून उत्तरेकडील नॉइब्रांडनबुर्क भागात ते सर्वांत कमी प्रमाणात आढळते.

 वांशिक दृष्ट्या स्लाव्हिक वंशाच्या खुणा पुष्कळ प्रमाणात आढळतात. स्वेबियन आणि थुरिंजियन, सॅक्सन आणि प्रशियन, उत्तरेकडील जर्मन व दक्षिणेकडील जर्मन यांची काही खास वैशिष्ट्ये टिकून असली, तरी सामान्यपणे समाज एकजिनसी आहे.

 लोकसंख्येपैकी ९९ टक्के लोक जर्मन भाषा बोलणारे आहेत. जर्मन भाषा ही राजभाषा असून हाय जर्मन भाषा प्रमाणभाषा मानतात. बाल्टिक किनाऱ्याकडील व तेथील बेटांवर लो जर्मन बोलली जाते. प्रादेशिक बोली भाषांचा प्रभाव वेगवेगळ्या प्रदेशांत दैनंदिन जीवनात जाणवतो. उदा., दक्षिणेत सॅक्सनी भागात सॅक्सन, मेक्लनबुर्क विभागात प्लॅटड्यूश किंवा हाय जर्मन.

 जुन्या स्लाव्हिक स्थायिकांचे वंशज असलेले सु. अडीच लाख सोर्बस लोक कॉट्बुस आणि ड्रेझ्‌डेन जिल्ह्यांत राहतात. एल्ब आणि झाले (साल) नद्यांच्या पूर्व तीरांवर वस्ती करून स्थिरावलेल्या स्लाव्ह रहिवाशांना इतिहासकाळात जर्मनीच्या पूर्वेकडील विस्तारांसाठी मागे रेटले गेले, नष्ट करण्यात आले किंवा त्यांचे जर्मनीकरण केले गेले. आग्नेयीकडील स्लाव्हिक नागरिकांनी मात्र आपले वेगळे व्यक्तित्व शाबूत राखले असून आपली सांस्कृतिक स्वायत्तता अबाधित राखली आहे. त्यांच्या भाषेला तेथे अधिकृत द्वैभाषिक स्थान आहे. त्यांच्या स्वतंत्र शाळा, रंगभूमी आणि ‘डोमोविना’ ही (अधिकृत सोर्ब मायभूमी संघटना) आहे.

 १९५० च्या जनगणनेप्रमाणे ८०.५% लोक प्रॉटेस्टंट व ११% लोक रोमन कॅथलिक होते परंतु १९६४ च्या जनगणनेनुसार त्यांचे प्रमाण अनुक्रमे ५९.४% व ८.१% होते. राज्यघटनेनुसार धार्मिक स्वातंत्र्य मान्य करण्यात आलेले असले, तरी सत्ताधारी जर्मनी समाजवादी एकता पक्षाचा उद्देश मात्र निधर्मी समाज प्रस्थापित करणे हा आहे. नव्या पिढीतील युवकांत धार्मिक भावना लोप पावत आहेत.

 तिसऱ्या राइखच्या पतनानंतर निर्माण झालेल्या गोंधळाच्या परिस्थितीत १९४७ साली पू. जर्मनीची लोकसंख्या जेवढी होती त्याहीपेक्षा १९६७ साली ती खाली उतरलेली होती. १९६१ पर्यंत लोकसंख्या कमी होत जाऊन त्यानंतर ती तुलनात्मक रीत्या स्थिरावली गेली. दुसरे जागतिक महायुद्ध, त्यानंतर उद्‌भवलेली भीषण परिस्थिती, स्थलांतरे इ. गोष्टींचा परिणाम होऊन पू. जर्मनीच्या लोकसंख्येचे चित्रे बरेचसे विस्कळीत झाले. नवयुवकांची कमतरता, मध्यम वयाच्या आणि वयस्कर स्त्रियांचे संख्याधिक्य आणि एकंदरीत वृद्धांच्या संख्येतील वाढ यांचा लोकसंख्येवर विपरीत परिणाम घडला. जन्म आणि मृत्युसंख्येची आकडेवारी याची साक्ष देते. उत्कृष्ट वैद्यकीय साहाय्य आणि बालमृत्यूंचे अल्पप्रमाण असूनही १९७० मध्ये जननसंख्या हजारी १४ होती. वृद्ध लोकांतील मृत्यूचे प्रमाणही वाढलेले होते. तेही १,००० मध्ये १४ असेच होते. वस्तुतः युवकांतील मृत्युमान घटत होते. आयुर्मर्यादा पुरुषांच्या बाबतीत सरासरी ६९ वर्षे व स्त्रियांच्यात ७४ वर्षे इतकी वाढलेली होती. जननसंख्येचे प्रमाण उत्तरेकडे अधिक, तर नागरीकरण वाढत असणाऱ्या दक्षिण विभागात ते घटत होते. इतर कोणत्याही यूरोपीय देशांपेक्षा पू. जर्मनीत सेवानिवृत्त लोकांची टक्केवारी अधिक होती. १९४६ साली १३५ स्त्रियांना १०० पुरुष हे प्रमाण होते, ते १९७० साली ११७ स्त्रियांना १०० पुरुष इतके घटले. १९७० साली सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या ८० लाख होती १९५० नंतर कामकऱ्यांत स्त्रियांचा भरणा सुरू झाला पुरुष कामगारांचे प्रमाण घसरले आणि स्त्रियांनी कामगारसंख्येचा जवळजवळ निम्मा भाग व्यापल्यामुळे बालकांसाठी पाळणाघरे, बालकमंदिरे, क्रीडाकेंद्रे, शाळा इ. सोयींची तरतूद करणे भाग पडले. व्यवसायक्षेत्रातही महिलांना वरचा दर्जा मिळू लागला. एक तृतीयांशापेक्षा अधिक लोक उद्योगधंद्यात गुंतलेले आहेत. व्यापार-उदीम, सेवाक्षेत्रे यांतही संथपणे वाढ दिसते, तर शेतामधील कामगारसंख्या घटत जाऊन आठव्या स्थानावर येऊन पोहोचली आहे. उद्योगधंद्यात कामगारांना वाढती मागणी आहे. त्यामुळे नियोजकांना अधिक स्वयंचलित यांत्रिकीकरण, वाजवीकरण किंवा सुयोजन वगैरे उपायांचा अवलंब करणे भाग पडत आहे. पू. जर्मनीत अंतर्गत स्थलांतर चालूच आहे. छोट्या ग्रामीण वस्तीतून नव्या, नियोजित विस्तारणाऱ्या औद्योगिक केंद्राकडे हे स्थलांतर होत आहे. १८ ते ३० वर्षे वयांतील तरुणांनी स्थलांतरामुळे सोडलेली वसतिस्थाने व नव्याने गजबजू लागलेली केंद्रे या दोन्ही ठिकाणी सामाजिक व आर्थिक परिवर्तन घडत आहे. बर्लिन, फ्रॅंकफुर्ट, कॉट्बुस ही स्थलांतरितांची आकर्षणकेंद्रे आहेत. नॉइब्रांडनबुर्क येथील लोकवस्ती घटत आहे.१९६१ साली देशाच्या सीमा निश्चित होईपर्यंत बर्लिनच्या दुसऱ्या भागात फार मोठ्या प्रमाणावर कुशल व शिक्षित लोकांनी स्थलांतर केले, त्याचा देशाच्या आर्थिक परिस्थितीवर विपरीत परिणाम झाला.


जर्मनीत १८८१ सालापासूनच सामाजिक सेवांच्या बाबतीत प्रागतिक भूमिका स्वीकारलेली होती. आजारपण, अपघात, वार्धक्य, पंगुत्व यांसाठी विमायोजना कार्यान्वित होत्या. केंद्रानुवर्ती सक्तीची सामूहिक विमायोजना १९४७ साली सोव्हिएटव्याप्त प्रदेशात सुरू करण्यात आली. तीत सर्व सरकारी व खाजगी कर्मचारी, कामगार, खाजगी व्यावसायिक, सामूहिक शेती करणरे, विद्यार्थी, विमाधारकांचे कुटुंबीय यांचाही समावेश करण्यात आला. याचे शासन कामगार संघटनांकडे सोपविले गेले. पगाराच्या वीस टक्के रक्कम या योजनेसाठी द्यावी लागते. त्यातील अर्धी रक्कम कर्मचारी स्वतः व अर्धी मालक भरत असतो. खाणकामगारांना थोडी अधिक वर्गणी द्यावी लागते. खाजगी शेतकरी मात्र या योजनेतून वगळलेले आहेत. ही वर्गणी अपुरी पडत असल्यामुळे शासनाला आपल्या अर्थसंकल्पातून दरवर्षी अधिक साहाय्यक भर टाकावी लागते.

 स्त्रिया आणि खाणकामगार वयाच्या ६० व्या वर्षी आणि पुरुष वयाच्या ६५ व्या वर्षी सेवानिवृत्तीला पात्र ठरतात. सर्वस्वी निवृत्तिवेतनावर गुजराण करणाऱ्यांना इतर कल्याणकारी संस्थांकडून मदत दिली जाते. विमाधारकाच्या अंत्यविधीसाठी १०० ते ४०० मार्क आणि त्याच्यावर अवलंबून असणाऱ्यांसाठी निम्मी रक्कम देण्यात येते. बेकारी विमा, कामगारास नुकसान भरपाई, आजारपणाची रजा वगैरे सोयी आहेतच. आजारपणात ५० टक्के पगार मिळू शकतो. महिलांना गरोदरपणाची रजा, बालकांसाठी निरनिराळी शैक्षणिक करमणुकीची साधने वगैरे खरेदी करण्याकरिता रक्कम दिली जाते. मुलांसाठी मिळणाऱ्या भत्त्याचे प्रमाण पहिल्या बालकासाठी ५०० डॉ. मार्कपासून पाचव्या व पुढील बालकासाठी १,००० डॉ. मार्कपर्यंत असते. खाणकामगार, डाकखाते व लोहमार्ग कर्मचारी व इतर काही व्यावसायिकांना थोडे अधिक सेवानिवृत्तिवेतन मिळते. राष्ट्राच्या उत्पन्नापैकी २१ टक्के रक्कम सामाजिक-विमायोजनवेर खर्च केली जाते.

 कुटुंबात स्त्रियांना पूर्णपणे समान दर्जा असतो. अविवाहित माता, अधिक मुले असणारी कुटुंबे, विधवा आणि विधुर यांच्याकडे अधिक लक्ष पुरविले जाते.

 दुसऱ्या महायुद्धातील विध्वंसामुळे पू. जर्मनीत निवासव्यवस्था ही एक गंभीर समस्या आहे. यूद्धोत्तर काळात अवजड उद्योगघंद्यांतील गुंतवणूक, कामगार व मालपुरवठ्यातील टंचाई यांमुळे गृहरचनाकार्य काहीसे रेंगाळले पण १९५४ सालानंतर या पुनर्रचनाकार्याने वेग घेतला. सहकारी गृहरचनासंस्था पुढे आल्या. १९६८ च्या अखेरीस निवासांपैकी १०.६% एका खोलीची, ३६.२% दोन खोल्यांची, ४३.५% तीन खोल्यांची आणि ९.७% चार किंवा त्यांपेक्षा अधिक खोल्या असलेली घरे होती. प्रत्येक कुटुंबाच्या आर्थिक आणि राजकीय दर्जाला साजेशी, स्थानिक वस्तुस्थितीशी सुसंगत, पुरेशी जागा निवासास मिळण्याचा प्रत्येक नागरिकाचा आणि कुटुंबाचा हक्क आहे व तशी संधी शक्य तो सर्वांना दिली जाते. सरकारी व सहकारी गृहबांधणीवर भर देण्यात येत असून खाजगी मालकीच्या घरांचे प्रमाण कमी होत आहे. घरभाड्यांचे दर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे आहेत. एक लाखाहून कमी वस्ती असलेल्या शहरांपेक्षा बर्लिनमधील घरभाडे ५० टक्क्यांनी अधिक आहे.

 आरोग्यव्यवस्थेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आलेले आहे. आजार आणि अपघात अशा आपत्कालात आर्थिक सुरक्षितता, मोफत वैद्यकीय साहाय्य, औषधयोजना, शुश्रूषा यांची तरतूद केलेली आहे. या योजनेत सर्व नागरिक समाविष्ट करण्यात आलेले आहेत. राष्ट्रीय विमा योजना व केंद्रीय अर्थसंकल्पातून त्याच्या खर्चाची तरतूद केलेली आहे. प्रत्येक परगण्यात आरोग्य खाते व सार्वजनिक आरोग्याधिकारी आहे. आरोग्य हा समाजकल्याण कार्यक्रमाचा एक भाग आहे.

 १९५४ ते १९६१ या कालावधीत पू. जर्मनीतून प. जर्मनीत ५,००० डॉक्टर (दंतवैद्य व पशुवैद्यसुद्धा) पळून गेले. त्यामुळे प. जर्मनीत, विशेषतः ग्रामीण क्षेत्रात, डॉक्टरांची चणचण भासू लागली. १९६८ च्या अखेरीस पू. जर्मनीत २४,६२० डॉक्टर ६,७२३ दंतवैद्य व २,८२८ औषधितज्ञ होते. एकूण ६५७ सार्वजनिक रुग्णालयांतून १,९४,९७० खाटांची म्हणजेच दर १०,००० लोकांसाठी ११४ खाटांची व्यवस्था होती. देशात सु. २५० आरोग्यभुवने आहेत. बालमृत्यूचे प्रमाण १९६८ साली अवघे दोन टक्के होते. ते १९७२ मध्ये १.८ टक्के झाले. सर्व विद्यार्थ्यांचा विमा उतरविण्यात आलेला असून तो बहुतांश मोफत आहे. आरोग्याधिकाऱ्यांना प्रामुख्याने क्षय, गुप्तरोग, विषमज्वर, कर्करोग आणि हृद रोहिणीसंबंधित रोगांना तोंड द्यावे लागते. १९७३ अखेर देशात एकूण २९,२७५ डॉक्टर व ७,५५८ दंतवैद्य होते.

 शिक्षण : पू. जर्मनीत निरक्षरतेचे प्रमाण नगण्य आहे. शिक्षण मोफत असून मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना छात्रनिधि-साहाय्य सरकारकडून मिळते. राष्ट्रीय उत्पन्नापैकी ७% रक्कम राष्ट्रीय शिक्षणावर खर्चिली जाते. १९५९ च्या व १९६५ च्या सुधारलेल्या कायद्यांनुसार राज्यातील शाळांची व्यवस्था सर्वत्र समान असून ती अत्यंत काळजीपूर्वक व सुसंघटित केलेली आहे. शालेय व्यवस्था बहुतांत्रिक सार्वजनिक शाळांच्या (ओबर श्यूल) केंद्राभोवती गुंफलेली असून त्यांत दहा इयत्तांचा सर्वसामान्य शिक्षणक्रम आहे. १९७३ मध्ये देशात अशा ५,०४२ शाळांमधून २६,०८,०७४ विद्यार्थी शिक्षण घेत होते. सरासरीने प्रत्येक वर्गांत २७ विद्यार्थी होते. शिशुशाळा व अन्य शालापूर्व शिक्षणाच्या अनेक सोयी विस्तृत प्रमाणावर उपलब्ध आहेत. आर्थिक गरजा ध्यानात घेऊन आखलेल्या शिक्षणपद्धतीत सहाव्या इयत्तेपर्यंत प्रत्यक्ष शारीरिक शिक्षणाची व श्रमशिक्षणाची तरतूद आहे. सातवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दर आठवड्यात किमान एक दिवस कारखान्यात किंवा सामुदायिक शेतावर काम करण्यासाठी जावे लागते. दहावीपर्यंतच्या शाळांतील विद्यार्थ्यांना आठवीनंतर १२ वर्षे शालेय शिक्षण असणाऱ्या शाळांत जाता येते. नववीतील विद्यार्थ्यांना वर्षातील सहा आठवडे प्रत्यक्ष काम करावे लागते. ते इयत्तेनुसार हळूहळू वाढत जात बारावीतील विद्यार्थ्यांसाठी ११ आठवडे मुदतीचे होते. विद्यापीठातील विद्यार्थ्यांना सामुदायिक शेती व अन्य खास प्रकल्पांवर काम करणे अनिवार्य आहे. १९७३ अखेर ५३८ खास शाळांत (सोंडरश्लेन) साडेपाच हजारांवर शिक्षक सु. पाऊण लाख विद्यार्थ्यांना शिकवीत होते. २८८ विस्तारित बहुतांत्रिक माध्यमिक शाळांत  ५१,६०९ विद्यार्थी होते. १,०३५ तांत्रिक शाळांतून १४,६९२ अध्यापक, ४,३१,९६३ विद्यार्थी होते. १९३ खास शाळांत (फाशश्यूलेन-यांत पत्रद्वारे शिक्षण देणाऱ्या व सायंशाळांची गणना होते) दीड लाख विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय होती. सात विद्यापीठे व इतर ३७ उच्चतर खास विद्यालयांत १,४५,७१७ विद्यार्थी अध्ययन करीत होते.


देशात १९७२ मध्ये पुढील सात विद्यापीठे होती : कार्ल मार्क्स विद्यापीठ, लाइपसिक (१४०९), रॉस्टॉक विद्यापीठ, रॉस्टॉक (१४१९), एर्न्स्ट मोरिट्स आर्ण्ट विद्यापीठ, ग्राइफ्सव्हाल्ट (१४५६), मार्टिन ल्यूथर हाल-व्हिटन्बेर्क (१६९४), हंबोल्ट विद्यापीठ, बर्लिन (१८०९), टेक्निश विद्यापीठ, ड्रेझ्‌डेन (१८२८) आणि फ्रीड्रिख शिलर विद्यापीठ, येना. या विद्यापीठांतून एकूण ७०,३६२ विद्यार्थी शिकत होते (१९७२). शाळेतील दहा वर्षांच्या शिक्षणानंतर प्रथम व्यावसायिक शाळांत शिकून कुशल कारागिरीचे शिफारसपत्र संपादन करून पुढील अभ्यासासाठी तांत्रिक अथवा स्थापत्य विद्यालयात प्रवेश घेता येतो. व्यावसायिक शाळा किंवा सायंप्रशाळा किंवा कारखान्यांच्या शाळा येथे अभ्यासक्रम पूर्ण करून उमेदवार त्यांची उच्च शालेय शिक्षण पदविका मिळवू शकतात. अबितुर (शिफारसपत्र) च्या साहाय्याने विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षणाला पात्र ठरतो. खास विद्यासंस्थांत कारखान्यांच्या शाळा, ग्राम प्रबोधिका, नभोवाणी आणि दूरदर्शन प्रबोधिका, कृषी व आरोग्यविषयक शिक्षण देणाऱ्या संस्था इत्यादींचा समावेश होतो. शासनसंस्था, अर्थसंस्था यांनी चालविलेल्या खास शिक्षणसंस्था, महाविद्यालये आणि कारखान्यांच्या शाळा यांच्या द्वारे सर्व तऱ्हेच्या उच्च, बहुविध शिक्षणाची पूर्तता होते. उच्च शिक्षणाने अधिक कौशल्य आणि गुणवत्ता प्राप्त होते असे मानले जाते आणि म्हणून कुवतीवर, कार्यक्षमतेवर उच्च शिक्षणातील प्रगती अवलंबून ठेविली आहे. शैक्षणिक शुल्क नाही. तरीही विद्यापीठ शिक्षणासाठी प्रवेश देताना विद्यार्थ्यांची सामाजिक पार्श्वभूमी ध्यानात घेऊन सत्तारूढ पक्षाच्या सदस्यांची, कामगारांची, शेतकऱ्यांची मुले यांना प्राधान्य दिले जाते.

 पूर्व जर्मनीतील शिक्षणाच्या माध्यमात सुसंघटित सार्वजनिक ग्रंथालय योजनेचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. विश्वविद्यालयीन, प्रांतिक, तांत्रिक, सर्वसाधारण ग्रंथशाळा यांच्या मदतीला आहेतच. १९७० साली ११,५०० सार्वजनिक ग्रंथालये व ७,४२७ कामगार संघटनांच्या ग्रंथशाळा होत्या. बर्लिन येथे १६६१ साली स्थापन झालेली ड्यूश स्टाट्स्वीब्लिएथिक (शास्त्रीय ज्ञानाचा महत्त्वपूर्ण संग्रह) या केंद्रीय ग्रंथालयात सतरा लाखांवर ग्रंथसंपत्ती आहे. १९१२ मध्ये कार्यान्वित झालेल्या लाइपसिक येथील ड्यूश बुरवेरेई या राष्ट्रीय ग्रंथशाळेत २२ लाखांवर ग्रंथसंख्या आहे. लाइपसिक विद्यापीठाची ग्रंथसंपत्तीही १८ लाखांवर आहे.

पूर्व जर्मनीत पाचशेंहून अधिक संग्रहालये आहेत. बर्लिंनमधील जर्मन ऐतिहासिक संग्रहालय व ड्रेझ्‌डेन येथील राष्ट्रीय चित्रसंग्रहालय (यांत अप्रतिम फ्रेंच, इटालियन व डच कलाकृती मांडलेल्या आहेत) ही दोन विशेष प्रसिद्ध आहेत.

 पूर्व जर्मनीतील विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या संघटना व त्यांची १९६८ मधील सभासदसंख्या पुढीलप्रमाणे होती : (१) कृषी उत्पादक सहकारी संस्था -९,६४,५२८. (२) जर्मन ग्राहक सहकारी संस्था -४०,७५,८२२ (या संस्थेची देशभर ३५,९३० किरकोळ विक्रीची दुकाने होती). (३) राज्यव्यापार संघटना -४०,१४१ दुकाने (४) ४,३५१ कारागीर सहकारी संघटना-सभासदसंख्या २,२७,०५८. (५) कामगार संघटना -६८ लाख सभादस. (६) स्वतंत्र जर्मन युवकसंघ -१७ लाख.

वृत्तपत्रे ही राजकीय पक्षांची व संघटनांची प्रचारमाध्यमे आहेत. १९६८ अखेर असणाऱ्या एकूण ३४ दैनिकांपैकी ९ पू. बर्लिनमधून प्रसिद्ध होत असत. न्यूज ड्यूशलॅंड हे सत्ताधीश पक्षाचे वृत्तपत्र सर्वाधिक खपाचे (८ लाख) व सर्वांत महत्त्वाचे वृत्तपत्र असून ‘ॲलगेमेईनर ड्यूशर नाक्रिशेंडिन्स्ट’ ही एकमेव अधिकृत वृत्तसंस्था आहे. बहुतेक वृत्तपत्रांचा खप ४० हजारांपेक्षा अधिक आहे. तिघांचा खप ४० ते ६० हजार, एकाचा पावणे दोन लाख व बाकी सात प्रमुख पत्रांचा खप दोन लाखांपेक्षा अधिक आहे. सध्या एकूण दैनिक पत्रांची संख्या ४० असून त्यांचा एकूण खप सु. ६३ लक्ष आहे.

 जर्मनीचा संपन्न सांस्कृतिक वारसा, जर्मनीचे विभाजन आणि शीतयुद्ध या तीन गोष्टींचा जर्मनीच्या सांस्कृतिक जीवनावर प्रभाव पडलेला दिसतो. समाजवादी समाजात नवे सांस्कृतिक पर्यावरण निर्माण करण्यावर मूलतः भर दिला जाणे स्वाभाविक आहे. समाजवादी संस्कृतीत शारीरिक शिक्षण, क्रिडा, प्रवास इ. अनेकविध सांस्कृतिक उपक्रमांचा समावेश होतो व म्हणून शासनसंस्था या क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका वठवीत असते.

 कला-साहित्य : सामान्य जनतेशी दृढ नाते प्रस्थापित करून वास्तववादी कलानिर्मितीचा नवा उद्देश डोळ्यासमोर ठेवून १९५० साली ‘व्हरबांड फर बिल्डेंडर कुन्स्टेलर’ ही कलाकार संघटना स्थापन करण्यात आली. कलावंतांच्या ऐहिक कल्याणाकडे लक्ष पुरविण्यासाठी प्रयत्नशील राहणारा हुकूमनामा (कुल्टुरव्हेरोर्डनुंग्न) काढण्यात आला. संस्मरणीय कलाकृतींच्या उभारणीसाठी मंडळे नेमली गेली. बृखन्व्हाल्ट, राव्हन्सबुर्क, झाक्सनहाउझन वगरे ठिकाणी पूर्वी बंदी छावण्या होत्या. तेथे प्लॅस्टिक आर्टची भव्य स्मारके निर्मिली गेली. येथे येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना ती चांगली परिचित आहेत. नवप्रजासत्ताकाच्या समाजवादी जाणिवांचे दर्शन येथील वास्तुशिल्पांत प्रतिबिंबित होते. उदा., इमारतींच्या रचनेत एकच रचनाशिल्प मानले जाणे. कधी-कधी अतिरेकामुळे यात तोचतोपणा, बेचवपणाही निर्माण झाला. ही उणीव भरून काढण्यासाठी उच्चस्तरावर नागरी बांधकामासंबंधीची तत्त्वे ठरविण्यात आली. अगदी नव्याने उभारण्यात आलेल्या आयझनहूटनस्टाट किंवा हॉइअरस्व्हेर्डा अशा नवजात नगरांमध्ये किंवा बर्लिन, ड्रेझ्‌डेन, लाइपसिक यांसारख्या ऐतिहासिक महानगरांच्या पुनर्रचित भागांत या नवतत्त्वांचे परिपालन केलेले दिसते.

 पू. जर्मनीतील प्रकाशन व्यवसाय बर्लिन व लाइपसिकमध्ये केंद्रित झालेला आहे. अभिजात जर्मन साहित्य आणि नव्या जर्मन लेखकांचे अभिनव साहित्य यांची भरपूर प्रसिद्धी या दोन ठिकाणांहून होते. समाजवादी समाजाच्या घडणीत साहित्यिकांची भूमिका निश्चित करण्याच्या दृष्टीने १९५९ साली झालेल्या बिटरफील्ड परिषदेने महत्त्वपूर्ण कामगिरी केली. समाजाच्या विविध विभागांशी सांस्कृतिक जीवनाचे नाते जोडणारी लेखक-श्रमिकांची संघटना स्थापन करण्यात आली. आंतरराष्ट्रीय ख्याती संपादन करणारे पू. जर्मनीतील समाजवादी साहित्यिक म्हणजे बेर्टोल्ट ब्रेक्ट (१८९८—१९५७), आना झेगर्स (१९००— ), आर्नोल्ट त्स्वाइख, एर्न्स्ट व्हिखर्ट (१८८७—१९५०), गेओर्ग काइझर (१८७८—१९४५), एर्न्स्ट टोलर (१८९३—१९३९), हे जन्माने अथवा ध्येयवादाने पू. जर्मनीचे ठरतात.


पूर्व जर्मनीतील सर्व नाट्यगृहे सरकारच्या मालकीची आहेत. यांत १०० वर सार्वकालिक कायम नाट्यगृहे, १,००० सांस्कृतिक केंद्रे आणि सु. २०० खुली (हंगामी) नाट्यगृहे यांचा समावेश होतो. बेर्कथिएटर टाले आणि फेल्टसेनबुहन या राटनमधील नाट्यगृहांचा खास नामोल्लेख आवश्यक आहे. नाझीच्या पतनानंतर बर्लिन येथील ड्यूशेस थिएटर हे सप्टेंबर १९४५ मध्ये सर्वांत आधी सुरू झालेले रंगमंदिर होय. इतर ऐतिहासिक महत्त्वाच्या नाट्यगृहांत बर्लिनमधील स्टाटसोपर, कोमिश ऑपेर बर्लिन, व्होल्कस्‌बुहन आणि लाइपसिक येथील शाऊस्पेल हॉस आणि ऑपेर यांचा अंतर्भाव होतो. वायमार येथील जुन्या राष्ट्रीय

नाट्यगृहाचीही पुनर्बांधणी करण्यात आलेली आहे. सतत होणाऱ्या रसग्रहणात्मक चर्चा, रंगभूमीवर सदर केले जाणारे नवनवे प्रयोग यांच्यामुळे नाट्य सादर करणारे कलावंत, श्रोते, विविध सांस्कृतिक कार्यांशी संबंधित असणाऱ्या विविधा सामाजिक संघटना यांचे दृढ संबंध निर्माण झाले आहेत. प्रयोगांना हजर राहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या ध्यानात घेतली, तर रंगभूमी पू. जर्मनीत अफाट लोकप्रिय आहे, असे म्हणता येईल. रंगभूमीच्या श्रेत्रात बर्लिनचे प्रभुत्व वादातीत आहे. बाल रंगभूमी आणि युवक रंगभूमी यांचा बर्लिन, हाल, लाइपसिक व ड्रेझ्‌डेन येथे झालेला विकास ही एक अपूर्वा‌ई आहे. त्यांच्या नाट्यप्रयोगांत परंपरागत लोकप्रिय परीकथांपासून नवयुवकांच्या समस्यांच्या दर्शनापर्यंत सर्व विषयांना स्थान आहे.

 संगीत जलसे आणि मैफली खूपच लोकप्रिय आहेत. सबंध देशात नव्वदांवर वाद्यवृंद आहेत. त्यांत लाइपसिकर गेवांदहाउसॉर्चेस्टर, स्टाट्स्कापेली ही नावे आघाडीवर आहेत. गिरिजाघर संगीतात लाइपसिकचे थामनेर क्वॉयर आणि ड्रेझ्‌डेनचे क्रेऊझकॉर अनेक वर्षे नाव कमावून आहेत. हौशी गट तर पुष्कळच आहेत.

 सरकारी मालकीची डेफा ही चित्रनिर्मिती संस्था पॉट्सडॅम बाबल्सबेर्क येथून अनेक प्रकारच्या व्यंग चित्रपटांची, अनुबोधचित्रांची व चित्रपटांची निर्मिती करीत असते. करमणूक म्हणून चित्रपटांकडे वळणाऱ्यांची संख्या भरपूर असून ग्रामीण भागात हा मनोरंजनप्रकार अधिक लोकप्रिय आहे. डेफाचे चित्रपट विदेशी निर्यात होतात. डेफाला नव्या पिढीतील प्रशिक्षित कुशल कलावंत, कारागीर व व्यावसायिक अनेक मिळतात. ड्यूशर डेमोक्राटिशर रूंडफुंक ही सरकारी मालकीची नभोवाणी संस्था देशभर विणलेल्या जाळ्याद्वारे राष्ट्रीय जीवनात फार महत्त्वपूर्ण कामगिरी बजावते. बर्लिनमधील नभोवाणी केंद्रावरून जगातील अनेक राष्ट्रांसाठी इंग्रजी, फ्रेंच, अरबी आदी विविध भाषांतून कार्यक्रम प्रसारित होतात. विशेषतः विकसनशील देशांसाठी खास लक्ष पुरवितात. पू. जर्मनीत ५ लघुलहरी, २२ मध्यमलहरी आणि २ दीर्घलहरी नभोवाणी केंद्रे आहेत. साठ लाखांपेक्षा अधिक रेडिओ परवानाधारक असून अत्यल्प मासिक शुल्क घेऊन त्यांची सोय बघितली जाते. बर्लिनमधून ड्यूशर फेर्नसेहफुंक दूरदर्शन संस्था आपल्या प्रक्षेपण केंद्रांच्या जाळ्यातर्फे १० चॅनलवर आपले कार्यक्रम प्रक्षेपित करते. ही संस्था पूर्व यूरोपियन राष्ट्रांना एकत्र आणणाऱ्या इंटरव्हिजन व त्यामुळे पश्चिमी राष्ट्रांशी संबंध ठेवणाऱ्या युरोव्हिजन या संस्थांचीही सभासद आहे. देशात २० एफ्. एम्. केंद्रे, १५ दूरदर्शन केंद्रे आणि ६३ दूरचित्रवाणी परिवर्तके आहेत. दूरदर्शन परवानाधारकांची संख्या ४१ लाखांपेक्षा अधिक आहे.

 पर्यटन : पू. जर्मनीस भेट देणाऱ्यांना पारपत्र व प्रवेशपत्र ही दोन्ही मिळवावी लागतात. पर्यटनाचा विकास व्हावा म्हणून १९५६ अखेर एक राष्ट्रीय समिती नेमण्यात आली. राष्ट्रीय पर्यटन कार्यालय हे पर्यटनास प्रोत्साहन देते. बाल्टिक किनाऱ्यावरील ऱ्यूगन बेट पर्यटकांचे महत्त्वाचे आकर्षणकेंद्र बनले आहे. चेक सरहद्दीवरील थुरिंजिया व एर्ट्‌स्‌गबिर्ग या पर्वतांमधील अनेक आकर्षणकेंद्रांना पर्यटक फार मोठ्या संख्येने उन्हाळ्यात व हिवाळ्यात भेट देतात. १९७३ साली बिगरसाम्यवादी देशांतील ८० लाखांहून अधिक पर्यटकांनी पू. जर्मनीस भेट दिली. (चित्रपत्रे ५, २१).

देसाई, दा. सी.; धोंगडे, ए. रा.

 संदर्भ :

1. Childs, D. East Germany, London, 1969.

2. Dickinson, R. E. Germany : A General and Regional Geography, London, 1961.

3. Stopler, W. F. The structure of the East German Economy, Cambridge, Mass., 1960

पूर्व जर्मनीची राजधानी बर्लिन
कामगार उत्सवातील कळसूत्री बाहुल्यांचा खेळ
लोहशुद्धीकरण कारखाना, फ्रँकफ्रुर्ट
पूर्व जर्मनीतील आधुनिक शेती
आधुनिक पाळणाघर
वराहपालन, लाइपसिक
कुक्कुटपालन केंद्रातील स्वयंचलित अन्नभरण
कोरनझालीस मृत्पात्री केंद्र (लाइपसिक) : एक दृश्य
माँट्रिऑल ऑलिंपिक (१९७६) : २०० मी. धावण्यातील विजेत्या, उजवीकडील सुवर्णपदक-विजेती, डावीकडील ब्राँझपदक-विजेती व मधील चौथ्या क्रमांकाची.
पारंपरिक लोकनृत्य