जर्मन सिल्व्हर : (निकेल सिल्व्हर). चांदीसारखी दिसणारी निकेल, तांबे व जस्त यांची मिश्रधातू. तांबे व निकेल यांची धातुके (कच्च्या स्वरूपातील धातू) वितळवून चिनी लोक पाकटाँग ही मिश्रधातू तयार करीत असत. मानवाने प्रथम वापरलेल्या मिश्रधातूंपैकी ही एक होय. नंतर तीत जस्ताची धातुके मिसळून सुधारणा करण्यात आली व तिची ईस्ट इंडिया कंपनीमार्फत यूरोपात निर्यात होऊ लागली. १८४० नंतर ती यूरोपात तांबे, निकेल व जस्त या तीन धातूंचे मिश्रण करून तयार करण्यात येऊ लागली. १९१४ सालापर्यंत ही मिश्रधातू जर्मन सिल्व्हर नावाने परिचित होती. आता तिला निकेल सिल्व्हर म्हणतात.

हिच्यात १७–३०% निकेल, ५३–६३%  तांबे व सु. २०%  जस्त असते परंतु सामान्यपणे निकेलाचे प्रमाण वाढविले, तर जस्ताचे प्रमाण कमी करतात. चांदीसारखा शुभ्र रंग, चांगली तन्यता, ओतण्याची, लाटण्याची व तारा काढण्याची सुलभता, अम्ल व गंज प्रतिरोधी या गुणधर्मांमुळे हिला उद्योगधंद्यांत महत्त्व प्राप्त झाले. चांदीचा मुलामा देण्यासाठी ही सुयोग्य अशी आधार धातू आहे. विद्युत्, विलेपित (विद्युत् प्रवाहाच्या साहाय्याने मुलामा दिलेले) तक्ते, चांदीसारखी दिसणारी शोभिवंत भांडी, रोल्ड-गोल्ड मुलाम्याचे अलंकार, दागिन्यांचे धातुकाम, रासायनिक उपकरणे, सागरी उपकरणातील जोडभाग इत्यादींसाठी हिचा उपयोग करतात. हिच्या लाटीव कठीण अशा पट्ट्या स्प्रिंगा तयार करण्यासाठी वापरतात. या स्प्रिंगा विषेशतः विद्युत् व दूरध्वनी अभिचलित्रामध्ये (विद्युत् प्रवाह नियंत्रित करणाऱ्या साधनामध्ये) वापरल्या जातात.

ठाकूर, अ. ना.