जर्मन साहित्य: इ. स. ८०० पर्यंतचे जर्मन साहित्य हे मौखिक परंपरेने जपलेले लोकसाहित्य होते. काही जर्मानिक जमातींची वीरगीते, पेगन धर्मसूक्ते इत्यादींचा त्यात समावेश होतो. रोमन इतिहासकार टॅसिटस ह्याने गेरमानिआ  ह्या इ. स. ९८ मध्ये लिहिलेल्या आपल्या ग्रंथात जर्मानिक जमातींचे वर्णन केले आहे. ह्या जमातींपैकी गॉथ हे विशेष प्रगत होते. ते ‘गॉथिक’ ही पूर्व–जर्मानिक भाषा बोलत. त्यांचा बिशप ⇨वुल्फिला  (३११–सु. ३८२) ह्याने गॉथिकमध्ये बायबलचा अनुवाद केला. हा अनुवाद लेखनिविष्ट करण्यासाठी त्याला ग्रीक, लॅटिन व रूनिक मूळाक्षरांच्या आधारे सोयीस्कर अशी मूळाक्षरे तयार करावी लागली. ह्या अनुवादाचा फार थोडा भाग आज उपलब्ध असला, तरी तोही जर्मानिक भाषांच्या अभ्यासकांना मोलाचा वाटेल असा आहे. गॉथिक भाषेचा वाङ्‌मयीन उपयोग करून तिच्या विकासासाठी त्याने एक दिशा उपलब्ध करून दिली होती. तथापि चौथ्या शतकाच्या अखेरीस हुणांच्या हल्ल्यांनी ह्या जर्मानिक जमातींच्या जगाला फार मोठा धक्का दिला. त्यांच्यावर स्थानांतराची वेळ आली व त्या युरोपभर पसरल्या. त्यासाठी त्यांना करावी लागलेली भ्रमंती, धडपड, लढाई ह्यांतूनच जर्मानिकांच्या पुढे झालेल्या लोकमहाकाव्यांच्या व सागांच्या रचनेला योग्य अशी पार्श्वभूमी व सामग्री निर्माण झाली. आईसलँडिकमध्ये तिने एड्डांचे रूप धारण केले, [⟶ आइसलँडिक साहित्य] तर जर्मन भाषेत ⇨ नीबलुङगन्‌लीडसारख्या लोकमहाकाव्याचे. ह्या महाकाव्यासंबंधीचे विवेचन पुढे येईलच.

आपणास उपलब्ध असलेले जुन्यातील जुने जर्मन लेखन म्हणजे आठव्या शतकातील काही टीपा होत. भाषाशास्त्रीय अभ्यासाच्या दृष्टीने त्या उपयुक्त आहेत.

जर्मन साहित्यातील आरंभीची ग्रंथरचना ख्रिस्ती मठवासीयांनी केलेली आहे. नीत्युपदेश हा त्यांचा गाभा आहे. काही ग्रंथ लॅटिनवरून अनुवादिलेले आहेत. अशा अनुवादांत सेंट गॉलच्या मठातील एक संन्यासी नोटकर ह्याने बोईथिअस ह्या रोमन तत्त्वज्ञाच्या द कन्सोलाशिओन फिलोसोफीचा केलेला अनुवाद उल्लेखनीय आहे. बायबलच्या काही भागांचेही त्याने भाषांतर केले आहे. स्वतंत्र ग्रंथरचनेत ओटफ्रीड फोन वायसेनबुर्गच्या एव्हान्गेलीएनबूख (८६५) ह्या काव्याचा उल्लेख आवश्यक आहे. क्रिस्ट  ह्या नावानेही ते ओळखले जाते. ख्रिस्तजीवनावर आधारलेल्या ह्या काव्यात जर्मानिक काव्यपरंपरेत सामान्यतः रुढ असलेल्या अनुप्रासयुक्त रचनेऐवजी अंत्ययमकाचा वापर केलेला आढळतो. ख्रिस्तजीवनाचे विशेष परिणामकारक दर्शन हेलिआंड  (इं. शी. द सेव्हर) ह्या काव्यात आढळते. त्याचा कर्ता मात्र अज्ञात आहे. संपन्न शब्दकळा, वेधक प्रतिमा व छंदहाताळणीतील कौशल्य ही त्याची काही लक्षणीय वैशिष्ट्ये. लोकपरंपरेला हे काव्य अधिक जवळचे आहे. लुडविगस्लिड (८८१, इं. शी. साँग ऑफ लुडविग) हे ख्रिस्ती वीरगीताचे एक उदाहरण. ख्रिस्ती धर्मासाठी लढणाऱ्या राजांची अशा गीतांत प्रशंसा असे. जर्मन भाषेतील ख्रिस्ती मठप्रणीत धर्मसाहित्यातील दस वेसोब्रुनर गेबेट  (८००, इं. शी. प्रेअर ऑफ वेसोब्रुनर) आणि मुसपिलि (सु. ८३०) ही दोन काव्येही उल्लेखनीय होत. पहिल्यात जगन्निर्मितीसंबंधी काही ओळी आलेल्या असून दुसऱ्यात निवाड्याच्या दिवसाचे चित्रण आहे.

ख्रिस्ती मठातील संन्याशांनी लेखनबद्ध करून ठेवलेले काही पेगन साहित्यही आहे. त्यात हिल्डब्रांडस्‌लीड  (सु. ८००, इं. शी. साँग ऑफ हिल्डब्रांड) आणि मेर्सबुर्गर त्साउबर श्प्रुश  ह्यांचा समावेश होतो. जर्मानिकांचे शौर्य, त्यांचे मानबिंदू आणि त्यांचा नियतिवाद ह्यांचा प्रत्यय हिल्डब्रांडस्‌लीडमधून येतो. हिल्डब्रांड हा एक सैनिक. अनेक वर्षे इटलीतील आपल्या घरापासून तो दूर असतो. तो इटलीत परततो, तेव्हा प्रत्यक्ष त्याचा मुलगाही त्याला ओळखू शकत नाही. उलट तो त्याला युद्धाचे आव्हान देतो. ते स्वीकारून हिल्डब्रांड त्याच्याशी लढतो आणि त्याला ठार करतो. मेर्सबुर्गर… मध्ये काही मंत्र आहेत. जखमा भरून काढणे, सर्दीसारखे विकार नाहीसे करणे, तुरुंगातील कैद्यांना मुक्त करणे अशा विविध हेतूंच्या पूर्ततेसाठी हे मंत्र आहेत.

प्राचीन हाय जर्मन कालखंडात जर्मन भाषेला अधिकृत वाङ्‌मयीन भाषा म्हणून स्थान मिळविण्यासाठी लॅटिनशी झगडावे लागले परंतु विद्वज्जनांचे ग्रंथ मुख्यतः लॅटिनमध्येच रचिले जात. परिणामतः लॅटिनमध्ये काही लेखन झाले. सेंट गॉलच्या मठातील एकेहार्ट ह्या भिक्षूने लिहिलेले वाल्टरिउस मानुफोर्टीस  (सु. ९३०, इं. शी. वॉल्टर ऑफ द स्ट्राँग हँड) हे लॅटिन महाकाव्य उल्लेखनीय होय. हे काव्य लॅटिन भाषेत लिहिलेले असले, तरी हुणांचा हल्ल्यांमुळे जर्मानिकांना कराव्या लागलेल्या स्थानांतरांच्या इतिहासाची प्रेरणा त्याच्या मागे आहे. काही बोधवादी नाटकेही लिहिली गेली. ख्रिस्ती धर्म आणि पेगनिझम ह्यांतील संघर्ष त्यांतून मांडलेला आढळतो.

मध्ययुगीनहायजर्मनकालखंड (१०५०—१४५०) : दहाव्या-अकराव्या शतकांत आध्यात्मिक पुनरुत्थानाच्या चळवळीने आकार घेतला. ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केल्यानंतर आरंभीच्या काळात जर्मनांकडून ख्रिस्ती धर्मतत्त्वांचे कठोर पालन होत नसे. उदा., त्यांच्यातील अनेक धर्मगुरू विवाह करून सांसारिक जीवन जगत. तथापि काळाच्या ओघात ख्रिस्ती धर्माच्या आंतरिक शिस्तीचा त्यांच्यावर प्रभाव पडला. मठवासीयांनी त्या शिस्तीचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे, असा विचार बळावला. क्लूनी येथील बर्गंडियन मठाने ह्या विचाराचे नेतृत्व केले. मठवासीयांनी पूर्णपणे विरक्त होऊन ऐहिक सुखांचा त्याग केला पाहिजे, लौकिक साहित्यनिर्मितीपासूनही त्यांनी अलिप्त राहिले पाहिजे इ. नियम प्रचारात आणले गेले. सर्वसामान्यांकडून एवढ्या कडक शिस्तीची अपेक्षा नसली, तरी त्यांनी ख्रिस्तोपदेशाचे गंभीरपणे पालन करून ख्रिस्ताचे सुजाण अनुयायी व्हावे, असे मत व्यक्त केले जाऊ लागले. ह्या वातावरणाचा साहित्यावर प्रतिकूल परिणाम झाला. सु. एक शतकाच्या कालावधीत फारसे लेखन झाले नाही. पुन्हा ग्रंथनिर्मिती होऊ लागली, तेव्हा जर्मन भाषेच्या स्वरूपात महत्त्वाचे फेरबदल घडून आलेले होते. तसेच ख्रिस्ती नीत्युपदेशापेक्षा सरदारी—शिलेदारीचा प्रभाव साहित्यावर पडू लागला होता. ही परिवर्तने प्राचीन जर्मन साहित्य आणि मध्ययुगीन जर्मन साहित्य ह्यांच्यामधील संक्रमणकालाची सूचक होत.

ह्या संधिकालीन साहित्यात बामबेर्कचा डीकन एझो ह्याने लिहिलेले सूक्त उल्लेखनीय आहे. सुंदर प्रतिमा—रूपकांतून मानवाच्या अंतिम पारलौकिक कल्याणाचे तत्त्वज्ञान त्याने मांडले आहे. कोलोनचा बिशप आनो ह्याच्या स्तुतिपर आनोलीड  (सु. १०९०, इं. शी. साँग ऑफ सेंट आनो) रचिले गेले. त्यात आनोचे जीवन आणि स्तुती ह्यांबरोबरच बरेचसे ऐतिहासिक आणि अन्य तपशीलही आलेले आहेत. जगदुत्पत्ती, ख्रिस्तजन्म, ख्रिस्ती धर्माचा प्रसार, युद्धे, आनोच्या थडग्यापाशी झालेले चमत्कार इत्यादींचा त्यांत समावेश होतो.

मध्ययुगीन हाय जर्मन कालखंडात प्रेमकविता (मिन्निसाँग) आणि महाकाव्य हे दोन साहित्यप्रकार विशेष हाताळले गेले.


प्रेमकविता : मध्ययुगीन जर्मन प्रेमकविता सु. ११७० ते १२३० ह्या कालखंडात मध्य आणि दक्षिण जर्मनीत बहरली. ती रचिणारे कवी ⇨मिनस्येंगर (प्रेमकवी) ह्या नावाने ओळखले जात असत. दक्षिण फ्रान्समधील ⇨ त्रूबदूरांचा आदर्श त्यांच्यासमोर होता. शिलेदार-सरदारांच्या प्रेमभावनेचा उत्कट आविष्कारह्याप्रेमकाव्यांतूनआढळतो. ह्याप्रेमकवींपैकीकाहीविविध सरदारांच्या सेवेत होते, तर काही सरदारवर्गातील होते. त्यांच्या कवितांतून मांडला जाणारा प्रेमसंबंध सरदार आणि विवाहित स्त्री अशा प्रकारचा आहे, हे लक्षणीय. वॉल्टर फोन डर फोगेलवायड (सु. ११७०—सु. १२२८) हा सर्वश्रेष्ठ प्रेमकवी. जर्मन भावकवितेवर त्याचा दीर्घकाल प्रभाव होता. उत्कट प्रेमकविता तर त्याने लिहिल्याच परंतु देशभक्तिपर सुंदर गीतेही लिहिली. सूक्ष्म सौदर्यदृष्टी आणि निसर्गप्रेम ही त्याच्या कवितेची अन्य वैशिष्ट्ये.

महाकाव्य : जर्मन महाकाव्यांची परंपरा ठिकठिकाणच्या दरबारांतून वीरगीते गाणाऱ्या चारणांनी (स्पीललॉयट) निर्माण केली, असे दिसते. विविध वीरगीतांतील कथादुवे एकत्र जुळवून त्यांतून महाकाव्ये उभी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. क्योनिग रोथर  (सु. ११६०, इं. शी. किंग रोथर) हे अशा महाकाव्याचेएकउदाहरणहोय. वाग्‌निश्चितवधूचेअपहरणहाह्या महाकाव्याचा विषय. कॉन्स्टँटिनोपलच्या राजाची मुलगी राजा रोथर पळवून आणतो. ह्या महाकाव्याच्या नायकाने पौर्वात्य वधू प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करावा, हे लक्षणीय आहे. यूरोपीय धर्मयुद्धांचा प्रभाव असावा. असा प्रभाव अन्य काही काव्यांवरही पडलेला आढळतो. हेर्त्सोग एर्न्स्ट  (सु. ११८०) मध्ये ड्यूक एर्न्स्ट हा धर्मयुद्धासाठीपूर्वेकडेजातो. असेदाखविलेआहे. युरोपिय धर्मयुद्धांनी धर्मवीर सरदाराची एक सर्व-यूरोपीय प्रतिमा निर्माण केली होती. प्रेमाचे, साहसाचे विविध रंग तीत मिसळले गेले आणि ती प्रतिबिंबित करणारे वैशिष्ट्यपूर्ण साहित्यही निर्माण होऊ लागले. फ्रान्समधील प्रॉव्हान्स हे त्याचे मूलकेंद्र ठरले आणि तेथून विविध यूरोपीय साहित्यांत हा नवा प्रवाह येऊन मिसळला. ह्या संदर्भात फ्रेंच महाकाव्यांच्या आधारे रचिलेली दस अलेक्झांडर लीड  व दस रोलांडस्लीड  ही दोन जर्मन महाकाव्ये उल्लेखनीय ठरतात. पहिले लाम्‌प्रेख्टनामक धर्मगुरूने लिहिलेले असून त्यात अलेक्झांडरच्या पूर्वेकडील स्वाऱ्यांचे वर्णन आहे. रोलंड हा शार्लमेनचा पुतण्या. बास्क लोकांच्या फौजांशी लढत असताना त्याला मृत्यू आला. उपर्युक्त दुसऱ्या महाकाव्याचा तो नामक. कोनराट नावाच्या एका धर्मगुरूने ते लिहिलेले आहे.

नीबलुङगन्‌लीड  हे जर्मनांचे राष्ट्रीय महाकाव्य ह्याच कालखंडात लिहिले गेले. ह्या महाकाव्याचा आपणास उपलब्ध असलेला सर्वांत जुना पाठ सु. १२०० चा आहे. जर्मन चारणांच्या कलेचा प्रकर्ष त्यात आढळतो. ह्या महाकाव्यास फार मोठी लोकप्रियता लाभली. बर्गंडियन राजा ग्यूंटर ह्याची बहीण क्रीमहिल्ड ही ह्या महाकाव्यातील मध्यवर्ती व्यक्तिरेखा होय. ग्यूंटरच्या सांगण्यावरून त्याचा नोकर हागेन क्रीमहिल्डच्या पतीचा–सीगफ्रीडचा–वध करतो. पतिनिधनांतर हूणांचा राजा एत्सेल (ॲटिला) ह्याच्याशी क्रीमहिल्ड विवाह करते व यथावकाश सीगफ्रीडच्या वधाचा सूड घेते. ह्या महाकाव्याचा कर्ता अज्ञात आहे तथापि त्यातून त्याने निर्मिलेले सूडनाट्य विलक्षण प्रत्ययकारी आहे.

जर्मनांच्या राष्ट्रीय महाकाव्यांत ⇨ गुड्रूनलीड  किंवा कुड्रूनलीड  ह्या तेराव्या शतकात रचिल्या गेलेल्या महाकाव्याचा उल्लेखही आवश्यक आहे. अनेक आपत्तींना धैर्याने तोंड देऊन स्वतःच्या प्रियकराशी एकनिष्ठ राहणाऱ्या गुड्रून नावाच्या स्त्रीभोवती हे काव्य मुख्यतः गुंफले गेले आहे. ह्या महाकाव्याचा कर्ताही अज्ञात आहे. गुड्रूनलीडला नीबलुङगन्‌लीड एवढी लोकप्रियता लाभल्याचे दिसत नाही. ऑस्ट्रोगॉथांचा राजा डीट्रिख अथवा थीओडोरिक द ग्रेट ह्याच्या जीवनाभोवती गुंफलेले काही रोमान्सही चारणांनी लिहिले. डीट्रिख हा जर्मनांच्या दृष्टीने राष्ट्रीय वीरांचे प्रतीक होय.

राष्ट्रीय महाकाव्यांबरोबरच फ्रेंच साहित्याच्या प्रभावातून दरबारी महाकाव्ये लिहिली गेली काहींची जर्मन रूपांतरे झाली. आइलहार्ट फोन ओबेर्ग (बारावे-तेरावे शतक) ह्याचे ट्रिस्टान उंड इसोल्ट  हे काव्य अशा रूपांतरांपैकी पहिले होय. तथापि हाइन्रिख फोन फेल्डेके (बारावे शतक) हा खऱ्याखुऱ्या अर्थाने दरबारी महाकाव्याचा जनक मानला जातो. व्हर्जिलच्या ईनिड  ह्या महाकाव्यातील इनीअस आणि डायडो ह्यांची प्रेमकथा मध्ययुगीन शिलेदारी मूल्यांच्या चौकटीत बसविण्याचा प्रयत्न त्याने एनायट  (सु. ११८६) हे महाकाव्य रचून केला. तथापि हे करीत असताना ईनिडवर आधारलेला एक फ्रेंच रोमान्स त्याच्यासमोर होता. ह्या रोमान्सची वैशिष्ट्ये एनायटमध्ये उतरलेली असली, तरी फेल्डेकेने आपली स्वतंत्र वृत्तीही अनेक ठिकाणी दाखविलेली आहे. तथापि दरबारी महाकाव्यांची परंपरा समृद्ध करण्याचे श्रेय मुख्यतः ⇨ हार्टमान फोन औए (सु. ११७०-१२२०), ⇨ व्होल्फ्राम फोन एशेनबाख  (११७०–१२२०) व ⇨ गोट्‌फ्रीट फोन श्ट्रासबुर्ग  (तेरावे शतक) ह्यांच्याकडे जाते. जातिवंत सरदाराला आवश्यक अशा संयम, निष्ठा, श्रद्धा, नम्रता, निर्भयपणा आणि ईश्वरभक्ती ह्या गुणांचा गौरव त्यांनी आपल्या महाकाव्यांतून केला. एरेक, इवाइन  व डर आर्म हाइन्रिख  ही हार्टमानची उल्लेखनीय महाकाव्ये. डर आर्म हाइन्रिखमध्ये ईश्वर व माणूस ह्यांच्यातील नातेसंबंध त्याने परिणामकारकपणे दाखविला आहे. सुबोध शैली आणि प्रभावी निवेदन ही त्याच्या महाकाव्यांची महत्त्वाची वैशिष्ट्ये. व्होल्फ्रामचे पार्झिवाल  हे दरबारी महाकाव्यांत सर्वश्रेष्ठ गणले जाते. एक सामान्य तरुण स्वप्रयत्नांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा घडवून आणतो, हे दाखविणारी ही कथा प्रतीकात्मक पातळीवर ईश्वराचा शोध घेण्यासाठी धडपडणाऱ्या मानवाची कथा ठरते. ट्रिस्टान आणि इसोल्ट ह्या प्रेमी युगुलाची कहाणी गोट्फ्रीटने आपल्या ⇨ ट्रिस्टान  उंड  इसोल्टमध्ये मांडली आहे. ह्या विषयावर लिहिल्या गेलेल्या मध्ययुगीन महाकाव्यांत गोट्फ्रीटचे हे महाकाव्य सर्वश्रेष्ठ गणले जाते. गोट्फ्रीटचा दृष्टीकोण ऐहिकतेकडे विशेष झुकलेला दिसतो.

ह्या तीन महाकवींच्या नंतर दरबारी महाकाव्य ऱ्हासाला लागल्याचे दिसते. ह्या तिघांचे अनुकरण करण्याचे प्रयत्न मात्र झाले. हाइन्रिख फोन डेम ट्यूर्लीन आणि कोनराट फ्लेक (तेरावे शतक) ह्यांनी अनुक्रमे हार्टमान आणि गोट्फ्रीट ह्यांच्या अनुकरणाने महाकाव्ये लिहिली परंतु ती यशस्वी ठरली नाहीत. रूडोल्फ फोन एम्स (तेरावे शतक) ह्या बोधवादी प्रवृत्तीच्या कवीने एका बौद्ध कथेवर बारलाम उंड जोसाफट  (इं. शी. बारलम अँड जोसाफट) हे महाकाव्य लिहिले.

कोनराट फोन व्युर्झबुर्ग (तेरावे शतक) ह्याचे डेर ट्रोयानीश क्रीग  हे मध्ययुगीन जर्मन साहित्यातील सर्वांत दीर्घ महाकाव्य असले, तरी रचनेच्या दृष्टीने ढिसाळ आहे. तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात दरबारी महाकाव्यांचा काळ संपुष्टात आला. व्हेर्नर डर गेर्ट्‌नरचे मायर हेल्मब्रेश्ट  (सु. १२५०) हे त्या दृष्टीने विशेष लक्षणीय. सरंजामी समाजव्यवस्थेच्या अवनतीचे वास्तववादी चित्रण त्यात केले आहे.

अन्यसाहित्य : मध्ययुगीन जर्मन साहित्यात गद्यनिर्मिती फारशी झाल्याचे दिसत नाही. तत्कालीन गद्याच्या स्वरूपाचा शोध घेण्यासाठी ख्रिस्ती संन्याशांची प्रवचने, काही विधिविषयक ग्रंथ ह्यांकडे वळावे लागते. तथापि ह्या अल्पशा गद्यातही सुंदर परिपक्व शैलीचे नमुने आढळतात. बेर्टोल्ट फोन रेगन्सबुर्ख ह्या ख्रिस्ती संन्याशाची प्रवचने त्या दृष्टीने उल्लेखनीय आहेत. ती साधी, सुबोध पण नाट्यात्म असून त्यांतून वेधक प्रतिमांचा परिणामकारक उपयोग केलेला आहे. त्यानंतर ⇨ माइस्टर एक्‌हार्ट (१२६० ?–१३२७ ?) आणि त्याच्या प्रभावाखालील टाऊलर आणि झूझो ह्या गूढवाद्यांच्या लेखनाने जर्मन गद्यात आणखी मोलाची भर घातली.


तेराव्या शतकापासून जर्मन भाषेत धार्मिक स्वरूपाची नाटके लिहिली जाऊ लागली. अशा नाट्यलेखनाचे नमुने त्रुटित स्वरूपात आढळतात. ह्या धार्मिक नाटकांखेरीज फार्सवजा लौकिक नाटकेही केली जात. त्यांना ‘फास्टनाख्टस्पील’ असे म्हणतात. पंधराव्या शतकाच्या मध्यास हान्स रोझेन्‌प्लूट आणि हान्स फोल्झ ह्या दोघांनी अशा प्रकारची नाटके रचिली.

१४५०१६०० : १४५० नंतरच्या जर्मन साहित्यात मुख्यतः मानवतावादाचा प्रभाव दिसून येतो. १४५३ मध्ये तुर्कांनी काँन्स्टँटिनोपल जिंकून घेतल्यानंतर प्रबोधनाचे वारे यूरोपात वाहू लागले. ह्या प्रबोधनाकडून जर्मन मानवतावादाने स्फूर्ती घेतली. यूरोपीय प्रबोधनाचा प्रवाह जर्मनीत मुख्यतः इटलीतून आला. पीत्रार्क, बोकाचीओ इ. श्रेष्ठ इटालियन साहित्यिकांच्या साहित्याचे तसेच ग्रीक-लॅटिन अभिजात साहित्यकृतींचे जर्मनमध्ये अनुवाद केले गेले. ते करणाऱ्या अनुवादकांमध्ये आल्ब्रेख्त फोन आइप (१४२०–७५), हाइन्रिख स्टाइनहॉवेल (१४१२–७८), नीक्लास फोन व्हील (सु. १४१०– सु. १४९८) इत्यादींचा समावेश होतो. त्यांच्या अनुवादांनी जर्मन गद्याच्या विकासाला महत्त्वाचा हातभार लावला. तथापि पंधराव्या शतकाच्या अखेरच्या पादात आणि त्यानंतर सोळाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत केवळ लॅटिन ग्रंथनिर्मितीवर भर राहिला. लॅटिन ग्रंथांचा प्रभाव सर्वसामान्यांपर्यंत फारसा पोचू शकला नाही. नाटकाच्या क्षेत्रात मात्र मानवतावाद्यांनी एक महत्त्वाची कामगिरी केली. विद्यापीठीय अभ्यासक्रमाचा भाग म्हणून रोमन नाटकांचे प्रयोग करण्याची  पद्धत त्यांनी पाडली. त्या नाट्यकृतींचा घाट, त्यांची अंकवार विभागणी, मर्यादित पात्रे इ. वैशिष्ट्यांच्या प्रभावातून जर्मन नाटकाच्या विकासाला चालना मिळाली.

बाराव्या-तेराव्या शतकांत बहरलेले शिलेदारी साहित्य सरदारवर्गाचे होते. ज्या यूरोपीय धर्मयुद्धांनी सरदाराची एक अद्‌भुतरम्य प्रतिमा निर्माण केली होती, ती प्रमुख धर्मयुद्धेच तेराव्या शतकाच्या अखेरीस संपुष्टात आल्यामुळे त्या शिलेदारी साहित्याचा मूलाधारच नाहीसा झाला. बंदुकीच्या दारूचा शोध लागला आणि युद्धांमध्ये व्यक्तिगत पराक्रमापेक्षा सामूहिक कृतीला विशेष महत्त्व आले. जुनी उमरावशाही यथावकाश नाहीशी होऊन मध्यम वर्गाचा उदय झाला व त्या वर्गाच्या जाणिवा साहित्यातून अवतरू लागल्या. शिलेदारी साहित्याच्या पार्श्वभूमीवर हे मध्यम वर्गीय साहित्य कलात्मकतेच्या संदर्भात फार उणे वाटते. बोधवादी आणि व्यावहारिक प्रवृत्ती मात्र त्यात प्राधान्याने आढळतात. शिलेदारी साहित्याची परंपरा टिकविण्याचे काही प्रयत्न झाले परंतु बदललेल्या सामाजिक परिस्थितीत ते तग धरू शकले नाहीत. ह्या संदर्भात ‘अखेरचा सरदार’ म्हणून ओळखला जाणारा जर्मनीचा राजा व पवित्र रोमन साम्राज्याचा सम्राट पहिला माक्सिमीलिआन (१४५९–१५१९) ह्याचा उल्लेख आवश्यक आहे. मध्ययुगीन शिलेदारी साहित्याचा हा अखेरचा आश्रयदाता. टॉयरडांक  (१५१७) हे दरबारी महाकाव्य त्याच्या नावावर मोडते. दरबारी महाकाव्याच्या अवनतावस्थेची सर्व लक्षणे त्यात दिसून येतात.

दरबारी प्रेमकवितेचा जोरही हळूहळू ओसरला. तेराव्या शतकाच्या आरंभापासून तिच्या ऱ्हासाची लक्षणे दिसू लागली. त्यानंतर माइस्टरसिंगर संप्रदायाचा उदय झाला. ⇨ माइस्टरसिंगर  (मास्टरसिंगर) हे संगीत जाणणारे कवी मुख्यतः कारागिरांच्या आणि व्यापाऱ्यांच्या वर्गांतून आलेले होते. जर्मनीतील शहरी मध्यम वर्गीयांना वाटू लागलेल्या काव्यविषयक आस्थेचे हा संप्रदाय म्हणजे एक प्रतीक होते. पूर्वकालीन बारा श्रेष्ठ कवींचा (मास्टर्स) वारसा ते सांगत. उत्स्फूर्त काव्यस्रोतापेक्षा कवितेच्या काटेकोर तंत्रनियमांवर त्यांचा विशेष भर होता. ते शिकविण्यासाठी त्यांनी स्वतंत्र गीतशाळा स्थापन केलेल्या होत्या. हान्स रोझेन्‌प्लूट आणि हान्स फोल्झ हे उल्लेखनीय मास्टरसिंगर. ⇨ हान्स झाक्स  हा सर्वश्रेष्ठ मास्टरसिंगर. त्याने माइस्टरसिंगर संप्रदायातील गीते तर लिहिलीच परंतु सु. २०८ नाटकेही लिहिली. आकृतिबंधाच्या दृष्टीने ती काहीशी विस्कळितच असली, तरी खरीखुरी, जिवंत पात्रे निर्माण करण्याचे व उत्तम संवाद लिहिण्याचे सामर्थ्य त्याच्या नाटकांत होते.

स्वेबीया येथे काही रूपक कथाकाव्ये लिहिली जात होती. शिलेदारी साहित्यनिर्मितीची उणीव मात्र या काव्यांनी भरून निघाली नाही. अशा काव्यांत हेर्मान फोन झाक्सेनहाइम ह्याने लिहिलेली स्पीगेल्स आबेनटॉयर (इं. शी. द मिरर्स अडव्हेंचर) आणि म्योरिन  ह्यांचा समावेश होतो. बॅलड आणि लोकगीते ह्यांचीही रचना झाली. तथापि मध्यम वर्गीयांना विनोदी, साहसप्रधान कथा विशेष आवडत. एकाच नायकावर आधारित अशा अनेक कथांची एक मालाच तयार होई. टिल ऑयलेनश्पीगेल हा असाच एक नायक. हा एक हुषार, हजरजबाबी तरुण. एका शेतकऱ्याचा तो मुलगा. शहरातील अनेक भोळसटांना तो ठकवतो. ऑयलेनश्पीगेलच्या कथांचा स्ट्रॅस्‌बर्ग येथे १५१५ मध्ये प्रसिद्ध झालेला एक संग्रह उपलब्ध आहे. ह्या कथांना सर्व-यूरोपीय कीर्ती प्राप्त झाली. पशुकथांनाही बरीच लोकप्रियता लाभली. इसापच्या नीतिकथा जर्मन भाषेत आणण्यात आल्या. धार्मिक वादांमध्येही त्यांचा उपयोग केला जाई. रायनेकफुक्स (१४९८, इं. शी. रेनार्ड द फॉक्स) ह्या लो जर्मनमध्ये लिहिलेल्या एका रोमान्समध्ये एका कोल्ह्याच्या कथेआडून मानवी स्वभावावरच उपरोधप्रचुर भाष्य केले आहे. झेबास्टिआन ब्रांट (१४५७–१५२१) ह्याने नारेनशिफ (१४९४, इं. शी. शिप ऑफ फूल्स) हे उपरोधपर काव्य लिहिले. त्याचा उपरोध अधिक उघड आणि स्पष्ट असा होता. त्याने विविध प्रकारच्या मूर्खांची वर्गवारी करून तत्कालीन जीवनातील विसंगतींवर आणि अपप्रवृत्तींवर टीका केली. तत्कालीन धार्मिक जीवनातील दोषही त्याला दिसत होते पण धर्मविषयक नवा दृष्टिकोण देण्याची क्षमता त्याच्या अंगी नव्हती. रोमन साम्राज्याचे ख्रिस्ती वैभव टिकवून धरण्याच्या जर्मन सम्राटाच्या प्रयत्नांना त्याचा पाठिंबा होता. तथापि ह्या कृतीला सर्व-यूरोपीय कीर्ती मिळाली तिचे अनुवाद-अनुकरणही झाले.

सोळाव्या शतकात मार्टिन ल्यूथरने आरंभिलेल्या धर्मसुधारणेच्या चळवळीने जर्मनीतील सामाजिक-राजकीय जीवन ढवळून निघाले. चर्चमधील अपप्रवृत्ती नाहीशा व्हाव्यात, असे मानवतावाद्यांनाही वाटत होते. तथापि सैद्धांतिक बदलांना त्यांचा विरोध होता त्यामुळे काही अपवाद वगळता ह्या चळवळीपासून ते सामान्यतः अलिप्तच राहिले. अशा अपवादांत उल्‍रिख फोन हुटेन (१४८८–१५२३) ह्याचा समावेश होतो. अनेक पुस्तपत्रे लिहून त्याने ल्यूथरला आपला पाठिंबा व्यक्त केला. हुल्ड्राइख त्स्व्हिंग्‌ली ह्या स्विस धर्मसुधारकाने धर्मसुधारणेची आपली चळवळ स्वतंत्रपणे चालू ठेवली होती. काही सैद्धांतिक मुद्यांवर ल्यूथरचे आणि त्याचे मतभेद होते. धर्मसुधारणेच्या चळवळीमागे प्रखर उपरोधपर लेखन करणाऱ्या व्यक्ती फारशा आढळत नाहीत. नीक्लास मानूएल (१४८४-१५३०) ह्या स्विस लेखकाने धर्मसुधारणेच्या बाजूने काही उपरोधप्रचुर नाटके लिहिली तथापि कॅथलिक पंथीय टोमास मुर्नर (१४७५–१५३७) ह्याचा उपरोध फारच तीव्र होता. फोम ग्रोसेन ल्यूथरिशेन नारेन  (इं. शी. अबाउट द ग्रेट ल्यूथरन फूल) हे पुस्तक लिहून कॅथलिक पंथाचे त्याने जोरदार समर्थन केले. धर्मसुधारक व त्यांचे विरोधक ह्यांच्या झगड्यातून वादप्रवण असे काही लेखन झाले तरीही धर्मसुधारणेच्या चळवळीचा जर्मन साहित्यावर प्रत्यक्षपणे काही परिणाम झाला, असे दिसत नाही. ह्याला अपवाद सामान्यतः ल्यूथरच्या लेखनाचाच. जर्मन भाषेत बायबलचा सुंदर अनुवाद करून जोमदार जर्मन शैलीचा त्याने एक आदर्शच निर्माण केला. त्याने प्रॉटेस्टंट पंथीयांसाठी सामूहिक स्तोत्रगायनाची पद्धत घालून दिली आणि त्यासाठी स्वतः काही उत्कृष्ट स्तोत्रे रचिली. त्याच्या स्तोत्रांनी धर्मस्तोत्ररचनेची एक परंपराच निर्माण केली. बायबलमधील अनेक विषयांवर नाट्यरचना करण्याची प्रेरणा दिल्यामुळे अनेक नाटककारांनी लक्षणीय स्वरूपाचे नाट्यलेखन करून ल्यूथरची शिकवण सर्वसामान्यांपर्यंत पोचवली. अशा नाटककारांत बुर्क्‌हार्ट व्हाल्डिस आणि पाउल रेबहून ह्यांचा समावेश होतो.


धर्मसुधारणेच्या चळवळीची लाट ओसरल्यानंतर निर्भेळ रंजनासाठी निर्मिलेल्या साहित्यास महत्त्व आले. त्याचा वाचकवर्ग मुख्यतः शहरवासीयांचा होता. जुन्या रोमान्समधून घेतलेल्या कथा, संतचरित्रे, आख्यायिका ह्यांच्या आधारे मनोरंजक पुस्तके लिहिली जाऊ लागली. त्यांना ‘फोल्क्सब्युशर’ (इं. शी. चॅपबुक्स) म्हणत. सोळाव्या शतकानंतरही ती आवडीने वाचली जात होती. विनोदी गद्यकथाही लोकप्रिय होत्या. योहानेस पाउली ह्याचा शिम्फ उंड एर्न्स्ट  (१५२२), आणि यर्ख विक्राम ह्याचा दस रोलवागेन ब्युशलाईन  (१५५५, इं. शी. कोच ट्रॅव्हलर्स कंपॅनिअन) हे कथासंग्रह उल्लेखनीय आहेत. पाउलीचा दृष्टिकोण बोधवादी, तर विक्रामचा इहवादी रंजनवादी. विक्रामने काही कादंबऱ्याही लिहिल्या आहेत. फ्रेंच साहित्याच्या प्रभावातून त्याने आरंभी अद्‌भुतरम्य साहसांवर भर दिला परंतु डेअर गोल्डफाडेन  (१५५७) ह्या कादंबरीपासून तो वास्तववादाकडे झुकला. क्नाबेन स्पीगेल  (१५५४, इं. शी. मिरर ऑफ बॉइज) मध्ये त्याने सामान्य माणसालाही स्वप्रयत्नाने मोठ्या पदावर कसे जाता येते, हे दाखविले आहे. आधुनिक कादंबरीची आरंभचिन्हे विक्रामच्या ह्या कादंबऱ्यांत दिसून येतात.

योहान फिशार्ट हा सोळाव्या शतकाच्या अखेरच्या पादातील सर्वश्रेष्ठ लेखक. प्रॉटेस्टंट पंथाचा पुरस्कार करून कॅथलिकांना आणि जेझुइटांना त्याने आपल्या उपरोधिकांतून प्रखर विरोध केला. त्या दृष्टीने दस येसूइट्‌टेन ह्युटलाइन  (१५८०, इं. शी. द जेझुइट्स कॅप) हे उपरोधपर काव्य लक्षणीय आहे. ह्याशिवाय दस ग्लयूकहाफ्ट शिफ फोन त्सुरिच  (१५७६ इं. शी. द लकी शिप फ्रॉम झुरिक) हे महाकाव्य त्याने लिहिले राब्लॅ ह्या विख्यात फ्रेंच लेखकाच्या गारगान्टुआ  ह्या विनोदी रोमान्सचा गेशीश्टसक्लिटरुंग  हा विस्तृत अनुवाद केला. बोधवादी प्रवृत्ती फिशार्टच्या लेखनातही दिसून येतातच.

गेओर्ग रोलेनहागेन हा आणखी एक उल्लेखनीय कवी. डेअर फ्रोशमॉयझेलर  (१५९५, इं. शी. द फ्रॉग्ज वॉर अगेन्स्ट द माइस) ही त्याची महाकाव्य-विडंबिका प्रसिद्ध आहे. बेडूक-उंदीर युद्धाच्या रूपकातून रोलेनहागेनने प्रॉटेस्टंट आणि कॅथलिक ह्यांच्यातील वादावर उपरोधपूर्ण भाष्य केले असून उपरोधाचा रोख कॅथलिकांविरुद्ध विशेष आहे.

सतरावेशतक : ह्या शतकाच्या पूर्वार्धात तीस वर्षांच्या युद्धाची छाया जर्मनीवर पडलेली होती. कॅथलिक आणि प्रॉटेस्टंट सत्तांमधील हे युद्ध मुख्यतः जर्मनीच्या भूमीवर लढले गेले. त्यात मनुष्यहानी फार मोठ्या प्रमाणावर झाली जीविताची आणि मालमत्तेची शाश्वती राहिली नाही दारिद्र्य वाढले लोकांचे मनोधैर्य खचले.  ल्यूथरप्रणीत धर्मसुधारणेच्या चळवळीला उत्तर देण्यासाठी सोळाव्या शतकात कॅथलिकांनीही मर्यादित धर्मसुधारणेची चळवळ सुरू केली होती. प्रतिधर्मसुधारणा (काउंटर रेफॉर्मेशन) ह्या नावाने ती ओळखली जाते. ल्यूथरपंथीय आणि हे प्रतिधर्मसुधारक ह्यांच्यामधील झगडाही ह्या शतकात चालू होता. सोळाव्या शतकात ल्यूथरच्या चळवळीमुळे निर्माण झालेल्या धार्मिक संघर्षाच्या प्रभावाने जर्मनीचे वातावरण भारलेले असल्यामुळे यूरोपीय प्रबोधनाच्या प्रवृत्तींना तेथे फारसा वाव मिळाला नव्हता परंतु ह्या शतकात त्या दिसू लागल्या. बरोक कलेचा उदय हे ह्या शतकाचे आणखी एक लक्षणीय वैशिष्ट्य. चित्रकला, वास्तुकला, संगीत, साहित्य इ. विविध कलाक्षेत्रांवर तिचा प्रभाव पडला. वाङ्‌मयाच्या संदर्भात साहित्यकृतीच्या घाटाची काटेकोर जाणीव, भव्यता आणि अत्यलंकृतता हे तिचे विशेष होत. धर्मसुधारणेला विरोध करण्यासाठी बरोक साहित्याचा उपयोग करण्यात आला. भाषाशुद्धीचे प्रयत्न झाले. त्यासाठी संस्था उभारण्यात आल्या. त्यांपैकी फ्रुख्टब्रिंगेंड गेसेलशाफ्ट (इं. शी. द फ्रूटबेअरिंग सोसायटी) ही सर्वांत महत्त्वाची संस्था १६१७ मध्ये स्थापन झाली. जर्मन कवितेचा विकास हे ह्या संस्थेचे उद्दिष्ट असले, तरी काव्य आणि भाषा ह्यांचे निकटचे नाते लक्षात घेऊन भाषेच्या विचाराला तीत प्राथम्य देण्यात आले होते. भाषाशुद्धीकरणाच्या संदर्भात ⇨ ओपिट्स फोन बोबरफेल्ट  (१५९७–१६३९) ह्या जर्मन कवी-समीक्षकाचे कार्य उल्लेखनीय आहे. प्रगल्भ अभिव्यक्तीची क्षमता विशुद्ध जर्मन भाषेच्या ठायी कशी आहे, हे सप्रमाण दाखविण्याचा त्याने प्रयत्न केला. ‘द फ्रूटबेअरिंग सोसायटी’चा तो सदस्य होता. बूख डेर डॉयशेन पोएटेराय  (१६२४, इं. शी. बुक ऑन जर्मन पोएट्री) ह्या त्याच्या ग्रंथातून त्याने जर्मन कवितेच्या विकासास मार्गदर्शक असे विचार व्यक्त केले तिला तिचे नियम आणि भूमिका दिली. कवी म्हणून ओपिट्स श्रेष्ठ नव्हता परंतु काव्यविचाराच्या संदर्भांतील त्याचे कार्य मोलाचे आहे. जर्मन प्रबोधनाचा तो नेता होता, असे म्हटले तरी चालेल.

ह्या शतकातील जर्मन साहित्यात मुख्यतः भावकविता, नाटक व कादंबरी हे साहित्यप्रकार हाताळले गेले. मानवी जीवनाची दैवाधीनता व क्षणजीवित्व, इहलोकीच्या सुखांचे भ्रामक स्वरूप, मरणापलीकडील चिरंतनत्व असे विषय ह्या साहित्यातून पुन्हापुन्हा येत राहतात.

कविता : ओपिट्स फोन बोबरफेल्ट याने पुरस्कारिलेल्या काव्यरचनातंत्राच्या अनुरोधाने सतराव्या शतकातील बरोक कविता मुख्यतः लिहिली गेली. ती व्यक्तिनिष्ठ असण्यापेक्षा प्रातिनिधिक आहे. कविता समाजासाठी लिहिली जात होती बोधवादाला तीत प्राधान्य होते. साहजिकच ह्या शतकात कलात्मक सुभाषितवजा कवितांची (एपिग्रॅम्स) लक्षणीय निर्मिती झाली. अशा सुभाषितकारांत फ्रीड्रिख फोन लोगाऊ (१६०४–५५) ह्याची रचना विशेष उल्लेखनीय आहे. जर्मनांकडून होणाऱ्या परकीयांच्या–विशेषतः फ्रेंचांच्या–पोषाखादी अनुकरणावर त्याने आपल्या उपरोधप्रचुर सुभाषितांतून टीका केली. योहानेस शेफलर (१६२४–७७, अँजेलस सिलीशिअस ह्या टोपण नावाने त्याने काव्यरचना केली) ह्याच्या कवितेवर याकोप ब्योम ह्या तत्त्वज्ञाच्या आरोरा ओडर मोर्गेन रोट इन अन्‌फांग  (१६१२, इं. शी. अरोरा ऑर मॉर्निंग रेडनेस इन बिगिनिंग) ह्या ग्रंथातील विचारांचा प्रभाव होता. शेफलर हा पुढे कॅथलिक झाला, तरी त्याने रचिलेली अनेक सुंदर धार्मिक स्तोत्रे प्रॉटेस्टंटांच्या स्तोत्रपाठातही अठराव्या शतकात अंतर्भूत केली गेली. जेझुइट कवी फ्रीड्रिख फोन श्पे ह्याच्या ट्रुटझनाख्टिगाल  (१६४९, इं. शी. इन स्पाइट ऑफ द नाइटिंगेल) ह्या संग्रहातील काव्यरचना लोकगीतांच्या परंपरेतील आहेत. याकोप बाल्ड (१६०४–६८) याच्या काव्यात जर्मन भावकवितेचे परिणत रूप आढळते. देशभक्तीने भारलेल्या सुंदर उद्देशिका त्याने लिहिल्या. पाउल फ्लेमिंग याने आपल्या काव्यातून स्टोइक विचारांचा प्रभावी आविष्कार घडवून आणला आहे. उत्कट धर्मश्रद्धा आणि जीवनाच्या क्षणभंगुरत्वाच्या जाणिवेतून आलेली विरक्ती ⇨आंड्रेआस ग्ऱ्युफिउस  (१६१६–६४) याच्या काव्यातून लक्षणीयपणे प्रत्ययास येते. होफमान फोन होफमान्सवाल्डाऊ याच्या कवितेवर समकालीन इटालियन कवितेचा प्रभाव प्राधान्याने जाणवतो. विविध इंद्रियसंवेदनांची प्रभावी अभिव्यक्ती त्याने आपल्या कवितेतून घडवून आणली.


नाटक : आरंभीची जर्मन नाटके इंग्रजी नाट्यकृतींच्या अनुकरणाने लिहिली गेली. डानिएल कास्पार फोन लोहेन्‌श्टाइन (१६३५–८३) हा प्रॉटेस्टंट नाटककार. कॅथलिक पंथाचा विजय हा अशिवाचा (इव्हिल) विजय होय, असा विचार आपल्या नाटकांतून रूपकात्मक पद्धतीने त्याने मांडला. त्याच्यावर सेनीका ह्या रोमन नाटककाराचा प्रभाव दिसून येतो. क्रौर्य, रक्तपात ह्यांच्या वर्णनात त्यास विशेष रस असल्याचे क्लेओपात्रा, सोफेनिस्ब, अग्रीप्पिना  ह्यांसारख्या त्याच्या नाटकांतून दिसून येते. या शतकातील सर्वश्रेष्ठ नाटककारांमध्ये आंड्रेआस ग्ऱ्यूफिउस आणि याकोप बिडरमान (मृ. १६३९) यांचा उल्लेख आवश्यक आहे. शब्दांची कौशल्यपूर्ण आणि परिणामकारक मांडणी ही बरोक साहित्यशैलीची वैशिष्ट्ये ग्ऱ्युफिउसच्या नाट्यकृतींत दिसून येतात. अनिश्चिततेची दुःखद जाणीव आणि स्टोइक जीवनदृष्टी हे त्याच्या नाटकांचे लक्षणीय विषय. तथापि ही नाटके मुख्यतः वाङ्‌मयीन स्वरूपाची आहेत. त्यांच्या सर्वसामान्यांवर आणि पुढील पिढ्यांवरही फारसा प्रभाव पडू शकला नाही.

कादंबरी : जर्मन बरोक साहित्य मुख्यतः अन्य यूरोपीय साहित्यांच्या प्रभावातून उभे राहिले. जर्मन कादंबरीनेही परभाषांतील कादंबऱ्यांच्या जर्मन अनुवादांतून स्फूर्ती घेतली. स्वतः ओपिट्सने कादंबरीचा आदर्श निर्माण करण्यासाठी जॉन बार्क्ले या स्कॉटिश लेखकाच्या आर्गेनिस  ह्या लॅटिन कादंबरीचा अनुवाद केला. इजीडिअस आल्बेर्तेनुस याने जर्मन भाषेला ‘पिकरेस्क’ कादंबरीचा परिचय करून दिला. या शतकात दोन श्रेष्ठ कादंबरीकार निर्माण झाले. योहान बीअर आणि हान्स याकोप क्रिस्टोफेल फोन ग्रिमेल्सहाउझेन हे ते होत. बीअरच्या कादंबऱ्यांतून आढळणारी वास्तववादी दृष्टी लक्षणीय आहे. ग्रिमेल्सहाउझेन याने लिहिलेली … सिंप्लीसिसिमुस (१६६८–६९) ही जर्मन साहित्यातील एक श्रेष्ठ कादंबरी होय. तीस वर्षांच्या युद्धाच्या काळातील जर्मनीचे वास्तववादी, परिणामकारक चित्र त्याने या कादंबरीत रंगविलेले आहे. फिलिप फोन त्सेझेन (१६१९–८९) आणि डानिएल कास्पार फोन लोहेन्श्टाइन हेही ह्या शतकातील उल्लेखनीय कादंबरीकार. त्सेझेनसमोर फ्रेंच रोमान्सलेखनाचा आदर्श होता. आड्रिआटिश रोझमुंड  (१६४५, इं. शी. रोझमुंड फ्रॉम व्हेनिस ऑन द ॲड्रिॲटिक सी) ही प्रेम आणि मृत्यू ह्या विषयावर त्यानेलिहिलेली कादंबरी. ह्या कादंबरीत काही आत्मचरित्रात्मक संदर्भही आहेत. आर्मिनिउस  (१६८९) ही त्याची कादंबरी अपूर्णच आहे. गुंतागुंतीचे कथानक असलेल्या ह्या कादंबरीत जर्मानिक जमातींचा इतिहास, शौर्य, सद्‌गुण ह्यांचे चित्रण आहे.

अठरावेशतक : धर्मविचार ही सतराव्या शतकातील घडामोडीमागील महत्त्वाची प्रेरणा होती, तर अठराव्या शतकात बुद्धिवाद प्रभावी ठरला. लायप्‌निट्ससारख्या बुद्धिवादी तत्त्वज्ञांनी आपले विचार रुजवले. ईश्वर आणि मानव ह्यांच्या नातेसंबंधाचा विचार ख्रिस्ती धर्मश्रद्धेच्या काटेकोर चौकटीत करण्याची प्रवृत्ती मंदावली. विश्व सुसूत्र, सुसंवादी आणि आकलनीय आहे तथापि माणसाने आपली प्रज्ञा अधिकाधिक समर्थ आणि कार्यक्षम करीत राहिले पाहिले, अशी भूमिका दृढावली. पारलौकिकापेक्षा इहलोकाचा विचार निकटचा ठरला. कोणत्याही जगापेक्षा आपण राहतो ते जग-ही पृथ्वी-अधिक श्रेष्ठ आहे, असा विचार लायप्‌निट्सने मांडला. तीस वर्षांच्या युद्धाने ढासळलेले जर्मनीतील बौद्धिक जीवन पुन्हा स्थिरस्थावर होऊ लागले. नव्या वातावरणात व्यावहारिक दृष्टी व उद्दिष्टे ह्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. बोधवादी प्रवृत्ती वाढल्या जोपासल्या गेल्या.

अठराव्या शतकातील पहिल्या सु. चाळीस वर्षांतील जर्मन साहित्य मुख्यतः अनुकरणात्मक आहे. सतराव्या शतकातील फ्रेंच साहित्य हा त्याचा आदर्श. सतराव्या शतकाच्या अखेरीसच बरोक साहित्यशैलीचा प्रभाव ओसरू लागला. फ्रीड्रिख रूडोल्फ फोन कानिटझ (१६५४–९९), बेंजामिन नॉयकिर्श (१६६५–१७२९) ह्यांसारख्या कवींच्या संयत व सुबोध अभिव्यक्तीतून ह्याचा प्रत्यय येतो. त्यांचे कवित्व मात्र सामान्यच होते. योहान क्रिस्टिआन ग्यूंटर (१६९५–१७२३) हा ह्या काळातील एक विशेष उल्लेखनीय कवी. अकाली मृत्यूमुळे त्याचे काव्यकर्तृत्व परिणतावस्थेत पोचण्यापूर्वीच संपुष्टात आले. तथापि त्याच्या मरणोत्तर प्रसिद्ध झालेल्या गेडिश्ट (१७२४) ह्या त्याच्या काव्यसंग्रहातून त्याच्या श्रेष्ठ प्रतिभेची बीजे जाणवतात.

सुसूत्र आणि सुसंवादी विश्वाच्या संकल्पनेशी सुसंगत असा साहित्यविचार पुढे आला. साहित्यकृतीचा सुनिश्चित घाट व तिला नियंत्रित करणारे सुसूत्र नियम अभिजाततावाद देऊ शकत होता. सतराव्या शतकातील अभिजाततावादी फ्रेंच साहित्याच्या प्रभावातून ⇨ योहान ख्रिस्टॉफ गोट्शेट  (१७००–६६) ह्याने जर्मन साहित्यासाठी अभिजाततावादी मानदंडांचा प्रखर पुरस्कार केला. फरसुख आयनर क्रिटिशेन डिस्टकुन्स्ट  (१७३०, इं. शी. अटेंप्ट ॲट अ क्रिटिकल आर्ट ऑफ पोएट्री) हा त्याचा ग्रंथ त्या दृष्टीने उल्लेखनीय आहे. गोट्शेटच्या प्रभावामुळे जर्मन नाटकांत काही इष्ट परिवर्तने घडून आली त्या नाटकांना वाङ्‌मयीन अंग लाभले. तथापि फ्रेंच आदर्शांच्या आग्रहामुळे जर्मन नाटकांतील विकासोन्मुख अशा अनेक बाबींची उपेक्षा झाली. गोट्शेटने फ्रेंच साहित्याच्या केवळ बाह्य रूपाकडे व नियमांकडे पाहिले. त्याचे अंतःसामर्थ्य त्याने जाणले नाही. ही त्याच्या अभिजाततावादाची मर्यादा होती. छद्म अभिजाततावाद (स्यूडोक्लासिसिझम) म्हणून तो ओळखला जातो.

गोट्शेटच्या वाङ्‌मयीन भूमिकेस योहान बोड्मर व योहान ब्रायटिंगर ह्या दोन स्विस समीक्षकांकडून लवकरच विरोध सुरू झाला (१७४०). साहित्यकृतीत प्रतिभेच्या उत्स्फूर्त आविष्काराला वाव असला पाहिजे सर्जनशील कल्पनाशक्तीवर बुद्धीने सत्ता गाजवणे अनिष्ट आहे, अशी ह्या समीक्षकांची भूमिका होती. स्वतःला गोटशेट्चे अनुयायी म्हणवणाऱ्या अनेक साहित्यिकांनी बोड्मर आणि ब्रायटिंगर ह्यांना बऱ्याच प्रमाणात आपला पाठिंबा दिला. गोट्लीप व्हिल्हेल्म राबेनर हा उपरोधकार, क्रिस्टिआन फ्यूर्‌ख्टेगोट गेलर्ट हा कवी आणि बोधकथाकार (फॅब्यूलिस्ट), योहान श्लेगेल हा नाटककार ह्यांचा त्यांत समावेश होतो. हाल येथे १६९४ मध्ये स्थापन झालेल्या विद्यापीठातील बाउमगार्टेनसारख्या गुरूंनी आणि अनेक छात्रांनी बोड्मर व ब्रायटिंगर ह्यांच्या विचारांचे स्वागत केले.

हाल येथे इमान्युएल प्यूरा आणि साम्युएल गोट्होल्ड लांग हे दोन कवी उदयाला आले. प्यूराच्या कवितेवर मिल्टनचा प्रभाव होता, तर लांगच्या कवितेवर बायबलच्या भाषेचे संस्कार होते. ह्या दोघांनी निर्यमक पद्यरचनाही केली. त्यांच्यानंतर प्रसिद्धी पावलेल्या ⇨ फ्रीड्रिख गोट्लीप क्लोपश्टोक  (१७२४–१८०३) ह्यानेही निर्यमक छंदाचा पुरस्कार केला. डर मेसिआस  (१७४८–७३, इं. शी. द मेसिआ) ह्या ख्रिस्तजीवनावर लिहिलेल्या त्याच्या महाकाव्याने क्लोपश्टोकला फार मोठी कीर्ती मिळवून दिली. ह्या महाकाव्याचा काही भाग क्लोपश्टोकने विद्यार्थिदशेतच लिहिला होता. त्याच्या उद्देशिकादी भावकविताही ख्याती पावल्या. यमकांच्या बंधनातून त्याने जर्मन भावकवितेची मुक्तता केली तीतून विशुद्ध आत्मनिष्ठेची जोपासना केली. त्याच्या महाकाव्यापेक्षाही त्याचे हे कर्तृत्व अनेक अभ्यासकांना अधिक मोलाचे वाटते. बायबलमधील विषयांवर त्याने काही नाटकेही लिहिली.


जेम्स मॅक्फर्सन (१७३६–९६) ह्या स्कॉटिश कवीने १७६३ मध्ये ओसियनच्या गेलिक काव्यांचा इंग्रजी अनुवाद म्हणून काही काव्यखंड प्रसिद्ध केले. गेलिक साहित्यात ओसियन ही एक आख्यायिकीय व्यक्तिरेखा आहे. गेलिकमधील काही काव्ये त्याची, असे परंपरा मानते. ह्या अनुवादांत मॅक्फर्सनचे स्वतःचेच कवित्व जास्त होते आणि मूळ गेलिक कवितांचा फार थोडा भाग होता [→ मॅक्फर्सन, जेम्स]. तथापि ह्या कविता लोकप्रिय झाल्या. त्यांचा जर्मन अनुवाद १७६४ मध्ये प्रसिद्ध होताच जर्मन साहित्यविश्वावरही त्याची मोहिनी पडली आणि तथाकथित ‘ओशियॅनिक’ कवितांचे अनुकरण होऊ लागले. स्वतःला चारण (बार्ड) म्हणवून घेण्यात अनुकारकांना धन्यता वाटू लागली. अशा अनुकारकांत हाइन्रिख व्हिल्हेल्म फोन गेर्स्टेनबेर्ख हा विशेष उल्लेखनीय. त्याचे गेडिश्ट आयनेस श्काल्डेन  (१७६६, इं. शी. पोएम ऑफ अ स्काल्ड) हे काव्य ह्या दृष्टीने वाचनीय आहे.

योहान व्हिल्हेल्म लूटव्हिख ग्लाइम, योहान पेटर ऊट्स, योहान निकोलाउस ग्योटझ, व्हिल्हेल्म रामलर, एवाल्ड फोन क्लाइस्ट ह्यांसारख्या कवींनी प्राचीन ग्रीक भावकवी ⇨आनाक्रेऑन  ह्याच्या काव्यानुकरणाने कविता लिहिल्या. मद्य, प्रेम, राजकारण, उत्सवप्रसंग असे विषय आनाक्रेऑनने आपल्या काव्यांतून हाताळलेले आहेत. ह्या ‘आनाक्रेआँटिक’ कवींनी इंद्रियानुभवांचे मोल मान्य केले, तरी बुद्धीला डावलले नाहीच, हे लक्षात घेण्याजोगे आहे. दुसऱ्या फ्रीड्रिखच्या मोहीमांनी प्रभावित होऊन ग्लाइमने देशभक्तिपर कविताही लिहिल्या.

लेसिंग : अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात ⇨गोट्होल्ट एफ्राइम लेसिंग  (१७२९–८१) हा श्रेष्ठ जर्मन समीक्षक उदयाला आला. ह्याने सर्व-यूरोपीय कीर्ती संपादन केली. लेसिंग हाही अभिजाततावादी होता तथापि त्याचे अभिजाततावादी आदर्श त्याने थेट ग्रीक साहित्यातून स्वीकारले होते गोट्शेट्प्रमाणे फ्रेंचमधून घेतलेले नव्हते. लेसिंगने नाट्यलेखनही केले. नाट्यलेखनाच्या संदर्भात इंग्रज नाटककारांचा त्याच्यावर विशेष प्रभाव होता. कोणत्याही नाटककाराने शेक्सपिअरचा आदर्श समोर ठेवला पाहिजे, असे त्याचे मत होते. ॲरिस्टॉटलचे नाट्यनियम शेक्सपिअरला ज्ञात नसतानाही त्यांचे पालन फ्रेंच नाटककारांपेक्षा त्याच्याकडूनच अधिक कसोशीने झालेले आहे, अशी लेसिंगची धारणा होती. मिस सारा सँप्‌सन  (१७५५), मिना फोन बार्नहेल्म  (१७६७), एमिलिआ गालोटी  (१७७२) आणि नाथान डेर वायज  (१७७९, इं. शी. नाथान द वाइज) ही लेसिंगची काही नाटके. मिस सारा सँप्‌सन  ही सर्वसामान्यांच्या जीवनावर आधारलेली पहिली जर्मन कौटुंबिक शोकात्मिका. हांबुर्गिश ड्रामाटुर्गी (१७६७–६८ इं. शी. ड्रॅमॅटिक नोट्स फ्रॉम हँबर्ग) हा त्याचा नाट्यसमीक्षात्मक ग्रंथही प्रसिद्ध आहे. लाओकून … (१७६६, इं. शी. लाओकून ऑर द लिमिटेशन्स ऑफ पोएट्री अँड पेंटिंग) हा त्याचा आणखी एक उल्लेखनीय समीक्षात्मक ग्रंथ. लाओकून … मध्ये काव्य आणि चित्रकला ह्यांच्या सीमारेषा स्पष्ट केल्या आहेत … ब्रीफ, डी नॉयेस्ट लिटराटूर बेट्रेफेंड  (इं. शी. लेटर्स ऑन द मोस्ट रिसेंट लिटरेचर) ह्या साप्ताहिकातही त्याने मोझेस मेंडेल्स्झोन हा जर्मन ज्यू तत्त्वज्ञ आणि क्रिस्टोफ फ्रीड्रिख नीकोलाई हा जर्मन समीक्षक ह्यांच्याबरोबर दर्जेदार समीक्षात्मक लेख लिहिले. पुढील जर्मन समीक्षेला हे लेखन मार्गदर्शक ठरलेले आहे.

फ्रेंच साहित्याच्या वर्चस्वातून आणि अनुकरणातून बाहेर पडून स्वत्व शोधण्याची प्रेरणा लेसिंगने जर्मन साहित्यिकांना दिली तसेच हे स्वत्व अधिक सामर्थ्यशील करण्याच्या दृष्टीने इंग्रजी साहित्यही प्रेरक ठरू शकेल, ह्याची जाणीव त्यांना करून दिली. लेसिंगमुळे जर्मन साहित्याने प्रगतीचा एक मोठा टप्पा गाठला. अठराव्या शतकाच्या प्रथमार्धातील आणि उत्तरार्धातील जर्मन साहित्याचा तौलनिक विचार केल्यास हे सहज ध्यानात येते.

कादंबरी : कादंबरीच्या क्षेत्रात ⇨क्रिस्टोफ मार्टीन व्हीलांट  (१७३३–१८१३) ह्याने महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. व्हीलांटवर फ्रेंच साहित्यिकांचा प्रभाव होता. आगाथोन  (१७६६–६७) व डी आबडेरिटेन  (१७७४, इं. शी. द पीपल ऑफ ॲब्डिरा) ह्या त्याच्या प्रसिद्ध कादंबऱ्या. आगाथोन  ही जर्मन भाषेतील पहिली यशस्वी मनोविश्लेषणात्मक कादंबरी म्हणता येईल. बुद्धी आणि इंद्रिये ह्यांतील संघर्ष हा ह्या कादंबरीचा विषय. ग्रीसमधील ॲब्डिरा शहरातील रहिवाशांवर विनोदपूर्ण टीका करण्याची भूमिका घेऊन व्हीलांटने समकालीन सामाजिक-राजकीय वास्तवातील दोष आणि विसंगती उघड केल्या आहेत. ओबेरोन (१७८०) हे एक महाकाव्यही त्याने लिहिले. सुंदर परीकथेचे वातावरण त्यात आहे. अरेबियन नाइट्स  व शेक्सपिअरच्या अ मिडसमर्स नाइट्स ड्रीम  ह्या नाटकांचा त्यावर प्रभाव पडलेला आहे.

जर्मन कादंबरीच्या विकासात आगाथोनला एक निश्चित स्थान असले, तरी जर्मन कादंबरीवर इंग्रजी कादंबरीकारांचे झालेले संस्कारही लक्षणीय आहेत. स्वतः व्हीलांटवर आगाथोन  लिहिताना सॅम्युएल रिचर्ड्‌सनच्या तंत्राचा प्रभाव होता, हे जाणवते. व्हीलांटने शेक्सपिअरच्या २२ नाटकांचे जर्मन अनुवाद केले, ही त्याची आणखी एक उल्लेखनीय कामगिरी. व्हीलांटला काही अनुयायी लाभले. त्यांत मोरिट्झ आउगुस्ट फोन थ्युमेल, योहान बाप्टिस्ट फोन आलक्सिंगर, योहान आलॉयस ब्लुमावर, कार्ल आर्नोल्ट कोर्टुम ह्यांचा समावेश होतो.

क्रिस्टिआन फ्यूर्‌ख्टेगोट गेलर्ट (१७१५–६९) ह्याने लिहिलेली लेबेन डेअर श्वेडिशेन ग्रेयफिन फोन गे  (१७४६, इं. शी. लाइफ ऑफ द स्वीडिश काउंटेस जी …) ही कादंबरीही प्रसिद्ध आहे. गेलर्टसमोरही सॅम्युएल रिचर्ड्‌सनचा आदर्श होता.

उद्‌बोधनात्मकलेखन : योहान त्सिमरमान, मोझेस मेंडेल्स्‌झोन, योहान पेस्टालोत्सी आदींनी असे लेखन केले. त्सिमरमानच्या बेट्राख्टुंगेन युबर डी आइनसामकाइट  (१७५६, इं. भा. सॉलिट्यूड : ऑन माइंड अँड द हार्ट, सर्वोत्कृष्ट आवृ. १८२५) ह्या ग्रंथातील विचार मौलिक आणि आधुनिक आहेत. मेंडेल्स्‌झोनने आत्म्याच्या अमरत्वावर लिहिलेला फाडोन (१७६७) हा प्लेटॉनिक संवाद त्याच्या उल्लेखनीय लेखनापैकी होय. पेस्टालोत्सीने शिक्षणविषयक विचार मांडले. वी गेर्ट्रूट ईर किंडर लेअर्ट  (१८०१, इं. भा. हाउ गर्ट्रूड एज्युकेट्स हर चिल्ड्रन, १८९४) हा त्याचा महत्त्वाचा ग्रंथ. त्यात त्याने आपली शिक्षणपद्धती स्पष्ट केली आहे. डी आबेंडस्टुंड आयनेस आइनसीडलर्स  (१७८०, इं. शी. ईव्हनिंग अवर्स ऑफ अ हर्मिट) ही बोधवादी कादंबरीही त्याने लिहिली.

स्टुर्मउंडड्रांग : अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात बुद्धिवादाला विरोध होऊ लागला. बुद्धीला तिच्या मर्यादा असल्यामुळे केवळ बुद्धी हीच संस्कृतीचे अधिष्ठान असणे अयोग्य ठरेल संस्कृतिसंवर्धनाच्या प्रक्रियेत मानवी भावनेचेही मोल ओळखणे आवश्यक आहे भावना आणि बुद्धी ह्यांच्या सुसंवादातूनच व्यक्तित्वाचा पूर्ण विकास साधता येईल, असे विचार व्यक्त होऊ लागले. बुद्धिवादविरोधी भूमिकेचा पहिला संघटित आविष्कार ‘स्टुर्म उंड ड्रांग’ (इं. अर्थ स्टॉर्म अँड स्ट्रेस) ह्या चळवळीने घडविला. ह्या चळवळीतील एक नाटककार फ्रीड्रिख माक्सिमीलिआन क्लिंगर ह्याच्या स्टुर्म उंड ड्रांग  ह्या नाट्यकृतीचेच नाव ह्या चळवळीला देण्यात आले होते.


ह्या चळवळीतील साहित्यिकांनी आत्मनिष्ठा जोपासली व्यक्तिगत सदसद्‌विवेकबुद्धी हाच अंतिम कायदा मानला प्रतिभा व मौलिकता ह्यांचे महत्त्व प्रतिपादिले निसर्गाचा गौरव केला त्याच्या ठायी देवत्व पाहिले. मध्ययुगाबद्दल त्यांना आकर्षण होते, तर समकालीन संस्कृतीबद्दल असमाधान वाटत होते. फ्रेंच विचारवंत रूसो ह्याच्या विचारांचा प्रभाव ह्या चळवळीवर होता. मध्ययुगाबद्दल आकर्षण असलेला जेम्स मॅक्फर्सनसारखा कवी ह्या चळवळीला जवळचा वाटत होता. योहान गेओर्ग हामान ह्या बुद्धिवादविरोधी तत्त्वज्ञाचे विचारही ह्या चळवळीस फार प्रेरक ठरले. अस्तित्वविषयक मूलभूत सत्यांचे आकलन श्रद्धा आणि इंद्रियानुभव ह्यांच्या द्वारा करून घेतले पाहिजे अशी हामानची शिकवण होती. ⇨योहान गोट्फ्रीट हेर्डर  (१७४४–१८०३) हा हामानचा शिष्य. स्टॉर्म अँड स्ट्रेस ह्या चळवळीला त्याने मोलाचे विचार दिले. हेर्डरने भावनेला विचाराचे माध्यम मानले. आदिमतेचे त्याला आकर्षण होते. फ्रेंच वाङ्‌मयीन आदर्शांचा तो विरोधक होता. शेक्सपिअरबद्दल त्याला आदर होता. शेक्सपिअर हा पेरिक्लीझच्या काळानंतर झालेला सर्वश्रेष्ठ नाटककार होय, असे त्याचे मत होते. लोकसाहित्याबद्दल त्याला जिव्हाळा वाटे. राष्ट्राची अंतःप्रतिभा त्यातून व्यक्त होते, अशी त्याची धारणा होती. विविध देशांची लोकगीते त्याने जमविली होती.

फ्राग्मेंट युबर डी नॉयर डायच लिटराटूर  १७६६–६७ (१७६७, इं. शी. फ्रॅगमेंट्स ऑन मॉडर्न जर्मन लिटरेचर १७६६–६७), क्रिटिश वेल्डर  (१७६९, इं. शी. फॉरेस्ट्स ऑफ क्रिटिसिझम), उरस्प्रुंग डेर स्प्राख  (१७७२, इं. शी. एसे ऑन द ऑरिजिन ऑफ लँग्वेज), शेक्सपिअर  (१७७३), श्टिमेन डेअर फ्योय्‌लकर इन लीडर्न  (१७७८, इं. शी. व्हॉइसीस ऑफ द पीपल इन साँग्ज), इडेएन त्सूर फिलोसोफी डेअर गेशिश्ट डेअर मेन्शहाइट  (४ खंड, १७८४–९१, इं. भा. आयडियाज ऑन द फिलॉसॉफी ऑफ हिस्टरी ऑफ मनकाइंड, १८००) हे त्याचे उल्लेखनीय ग्रंथ होत. भाषा, साहित्यसमीक्षा, इतिहासाचे तत्त्वज्ञान इ. विविध क्षेत्रात हेर्डरने आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला.

अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात उदय पावलेला विश्वविख्यात जर्मन साहित्यिक ⇨ गटे  (१७४९–१८३२) ह्याच्यावरही हेर्डरचा प्रभाव पडला आणि आपल्या वाङ्‌मयीन कारकीर्दीच्या आरंभीच्या काळात गटे स्टॉर्म अँड स्ट्रेसकडे ओढला गेला. ग्योय्‌त्स फोन बेर्लिशिंगेन  (१७७३, इं. शी. गट्स ऑफ बेर्लिशिंगेन) ही त्याने लिहिलेली शोकात्मिका आणि डी लायडेन डेस युंगेन वेर्थरस  (१७७४, इं. शी. द सॉरोज ऑफ यंग वेर्थर) ही त्याची कादंबरी ह्या स्टॉर्म अँड स्ट्रेसच्या प्रभावातून निर्माण झालेल्या श्रेष्ठ साहित्यकृती होत. गटेच्या फाउस्ट  ह्या जगद्‌विख्यात साहित्यकृतीचा आरंभीचा काही भाग तो ह्या चळवळीच्या प्रभावाखाली असतानाच लिहिला गेला.

विख्यात जर्मन नाटककार ⇨ योहान क्रिस्टोफ फ्रीड्रिख फोन शिलर  (१७५९–१८०५) हाही काही काळ ह्या चळवळीत होता. डी रॉयबर (१७८१, इं. शी. द रॉबर्स), डी फरश्वोयरुंग डेस फिएस्को इन गेनुआ  (१७८२, इं. शी. द कॉन्स्पिरेसी ऑफ फिएस्को इन जीनोआ) आणि काबाल उंड लीब  (१७८३, इं. शी. इंट्रिग अँड लव्ह) ह्या त्याच्या तीन गद्यनाटकांवर स्टॉर्म अँड स्ट्रेसचा प्रभाव आहे. नंतरच्या डॉन कार्लोस  (१७८७) ह्या निर्यमक छंदात रचिलेल्या पद्यनाटकात मात्र तो कमी झालेला दिसतो.

स्टॉर्म अँड स्ट्रेसमधील अन्य नाटककारांत याकोप मिखाइल राइनहोल्ट लेंट्स, फ्रीड्रिख माक्सिमीलिआन क्लिंगर, फ्रीड्रिख म्यूलर (मालर म्यूलर) ह्यांचा अंतर्भाव होतो. गटेच्या ग्योय्‌त्स फोन बेर्लिशिंगेन  ह्या नाट्यकृतीचा प्रभाव त्यांच्या नाट्यलेखनावर जाणवतो.

स्टॉर्म अँड स्ट्रेसमधील नाटककारांपुढे शेक्सपिअरने निर्मिलेल्या व्यक्तिरेखांचा आदर्श होता व नाट्यलेखनाच्या इतर अंगांना व्यक्तिरेखनाच्या मानाने त्यांनी दुय्यम स्थान दिले होते, असे सामान्यतः दिसून येते. जर्मनीच्या राष्ट्रीय रंगभूमीच्या उभारणीत ह्या चळवळीतील नाटककारांनी उचललेला वाटा मोठा आहे.

ओ. एच्. फोन गेमिंगेन, एफ्. एल्. श्रडर आणि ए. डब्ल्यू. इफ्लांट हे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धातील आणखी काही नाटककार. गेमिंगेन हा दीद्रोचा अनुकारक. श्रडर आणि इफ्लांट हे दोघे श्रेष्ठ नट. श्रडरने काही इंग्रजी नाटकांचे जर्मन अनुवाद केले, तर इफ्लांटने दैनंदिन जीवनावर आधारलेली बोधवादी नाटके लिहिली.

‘द सॉरोज ऑफ यंग वेर्थर’ ह्या गटेच्या कादंबरीने स्टॉर्म अँड स्ट्रेसमधील काही कादंबरीकार प्रभावित झाले होते. योहान मार्टीन मिलर याची सीगवार्ट : आयन क्लोस्टरगेशिश्ट  (१७७६) ही कादंबरी त्या दृष्टीने लक्षणीय आहे. काहींनी आत्मचरित्रपर कादंबऱ्या लिहिल्या. कार्ल फिलिप मोरिट्स ह्याच्या आंटोन रायझरचा  (१७८५–९०) त्यांत अंतर्भाव होतो.

आपल्या भावकवितांतून क्लोपश्टोकने निर्माण केलेला आत्मनिष्ठेचा आदर्श ही स्टॉर्म अँड स्ट्रेसच्या आगमनाची एक पूर्वखूण होती. क्लोपश्टोकचा प्रभाव असलेले परंतु स्टॉर्म अँड स्ट्रेसच्या मुख्य प्रवाहापासून अलिप्त असलेले काही साहित्यिक होते. १७७२ मध्ये गटिंगेन येथे स्थापन झालेल्या ‘ग्योयटिंगर हायनबुंड’ ह्या कविमंडळातील कवी त्यांपैकीच होत. ग्योय्‌टिंगर मुझेनअलमनाक  ह्या पत्रिकेत त्यांच्या कविता त्यांनी प्रसिद्ध केल्या. मैत्री, देशभक्ती व स्वातंत्र्य ही त्यांची तत्त्वत्रयी होती. योहान हाइन्रिख फोस, लूटव्हिख हल्टी, क्रिस्टिआन त्सू श्टोलबेर्ख आणि फ्रीड्रिख लेओपोल्ट श्टोलबेर्ख हे बंधू, माटीआस क्लाउडिउस, जे. एम्. मिलर, ब्यूर्गर हे ह्या मंडळातील काही कवी होत. धार्मिक, देशभक्तिपर इ. विविध प्रकारची भावकविता त्यांनी लिहिली. फोसचे लुईझ  (१७८३) हे जानपद महाकाव्य प्रसिद्ध आहे. हल्टी हा स्वप्नाळू वृत्ती़चा कवी होता. हळुवार भावकाव्ये त्याने लिहिली. स्वातंत्र्य आणि देशभक्ती हे श्टोलबेर्ख बंधूंच्या कवितांचे प्रमुख विषय. उत्कट धर्मभावना क्लाउडिउसच्या कवितेत आढळते. मिलरच्या साध्या, सुंदर भावकविता लोकगीतांच्या जवळपास येतात. ह्या सर्व कवींपैकी ब्यूर्गर हा स्टॉर्म अँड स्ट्रेसला अधिक जवळचा. ब्यूर्गर हा त्याच्या लेनोर  (१७७३) ह्या बॅलडमुळे प्रसिद्धी पावला. ह्या बॅलडने वॉल्टर स्कॉटला प्रभावित केले होते.

अभिजाततावाद : स्टॉर्म अँड स्ट्रेस ही चळवळ हळूहळू क्षीण होत गेली. ह्या चळवळीत असलेले गटे आणि शिलर ह्यांसारखे श्रेष्ठ साहित्यिक अभिजाततावादाचा पुरस्कार करू लागले. १७७५ मध्ये व्हायमारच्या ड्यूकने गटेला आपल्या मंत्रिमंडळात घेतले होते. ड्यूकच्या नोकरीत असताना गटेला शासकीय जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागल्या. त्यामुळे शिस्त आणि संयम हे गुण त्याच्या ठायी विकसित झाले. १७८६–८८ ह्या काळात गटेचे वास्तव्य इटलीत होते. तेथे प्रबोधनकालीन श्रेष्ठ कलाकृती पाहिल्यानंतर अभिजाततावादी कला-साहित्यपरंपरांविषयी त्याला आदर वाटू लागला. जर्मन पुरातत्त्वज्ञ आणि कलासमीक्षक योहान व्हिंकेलमान ह्याच्या गेडांकेन युबर डी नाखआमुंग डेअर ग्रीशिशेन वेर्क  (१७५५, इं. शी. थॉट्स ऑन द इमिटेशन ऑफ ग्रीक वर्क्स) व गेशिश्ट डेअर कुन्स्ट डेस आल्टरटुम्स  (१७६४, इं. शी. हिस्टरी ऑफ द आर्ट ऑफ अँटिक्विटी) ह्या ग्रंथांचाही प्रभाव त्याच्यावर पडला. उदात्त साधेपणा आणि प्रशांत भव्यता ह्या अभिजाततावादी कलाकृतींच्या वैशिष्ट्यांचा तो गौरव करू लागला. ही नवी जाणीव त्याच्या इफिगेनीअ  (१७८७), एग्मोंड  (१७८८), तोरक्‍वातो तास्सो  (१७९०) ह्या नाट्यकृतींतून दिसून येते. व्हिल्हेल्म माइस्टर्स लेरयार  (४ खंड, १७९५–९६, इं. शी. व्हिल्हेल्म माइस्टर्स अप्रेंटिस्‌शिप) ही त्याची शैक्षणिक कादंबरीही त्या दृष्टीने लक्षणीय आहे.


डॉन कार्लोसच्या लेखनानंतर शिलर इतिहास आणि तत्त्वज्ञान ह्या विषयांकडे वळला. ह्या विषयांच्या अभ्यासातून त्याच्याही विचारांना वेगळे वळण मिळाले. स्वातंत्र्याच्या उथळ कल्पना सोडून देऊन संयम आणि स्वयंशिस्त निर्माण केली पाहिजे, असे तो प्रतिपादू लागला. जर्मन तत्त्वज्ञ कांट ह्याचा शिलरवर प्रभाव पडला आणि त्यातून तो सौंदर्यशास्त्राच्या अभ्यासाकडे वळला. तात्त्विक आशयाच्या सुंदर भावकविता त्याने लिहिल्या युबर आनमूट उंड व्युर्ड  (१७९३, इं. शी. ऑन ग्रेसफुलनेस अँड डिग्निटी) आणि युबर डी एस्थेटिश एर्त्सिहुंग डेस मेन्शन  (१७९५, इं. शी. ऑन द एस्थेटिक एज्युकेशन ऑफ मॅन) सारखे विवेचक ग्रंथ लिहिले. डेअर आब्फाल डेअर नीडरलांड  (१७८८, इं. शी. द रिव्होल्ट ऑफ द नेदरलँड्स) आणि डी गेशिश्ट डेस ड्रायसिगयेरिगेन क्रीगेस  (१८०२, इं. शी. द हिस्टरी ऑफ द थर्टी यीअर्स वॉर) हे त्याचे उल्लेखनीय इतिहासग्रंथ.

गटेच्या आग्रह-उत्तेजनाने शिलर पुन्हा ललित साहित्याकडे वळला व त्याने वालेन्श्टाइन  (१७९९), मारिआ स्टुअर्ट  (१८००), डी युंगफ्राउ फोन ओर्लेआन्स  (१८०१, इं. शी. द मेड ऑफ ओर्लेआन्स), डी ब्राउट फोन मेसिना  (१८०३, इं. शी. द ब्राइड ऑफ मेसिना) इ. श्रेष्ठ अभिजात नाट्यकृती रचिल्या. फाउस्टचा पहिला भाग गटेने पूर्ण करण्यास शिलरचे उत्तेजन कारणीभूत झाले. हेर्मान उंड डोरोथेआ  हे श्रेष्ठ महाकाव्यही गटेने लिहिले (१७९७, इं. शी. हेर्मान अँड डोरोथेआ).

जर्मन साहित्याच्या अभिजाततावादी कालखंडात गटे आणि शिलर ह्यांसारख्या काही श्रेष्ठ साहित्यिकांचा अपवाद वगळता, प्रतिभाशाली व्यक्ती फारशा आढळत नाहीत.

आउगुस्ट फोन कोट्सेबू (१७६१–१८१९) हा ह्या काळातील लोकप्रिय नाटककार. श्रेष्ठ दर्जाची प्रतिभा त्याच्यापाशी नव्हती परंतु रंगभूमीच्या गरजा काय आहेत, ह्याची उत्तम समज त्याला होती. मेन्शेनहास उंड रॉय  (१७८९, इं. शी. मिसँथ्रॉपी अँड रिपेंटन्स) आणि डी स्पानिअर इन पेरू  (१७९६, इं. शी. द स्पॅनिआर्ड्‌स इन पेरू) ही त्याची काही विशेष लोकप्रिय नाटके.

फ्रीड्रिख फोन माटिसोन, जी. एल्. कोझेगार्टेन, क्रिस्टोफ आउगुस्ट टीट्‌गे हे काही उल्लेखनीय कवी. माटिसोनवर गटिंगन कविमंडळाचा काही प्रभाव जाणवतो, तर कोझेगार्टेनवर फोसचा. टीट्‌गेची कविता बोधवादी आहे. कॅप्टन कुकबरोबर जगपर्यटनास गेलेल्या गओर्ग फोर्स्टरची प्रवासवर्णने उत्कृष्ट गद्यशैलीने नटलेली आहेत.

स्वच्छंदतावाद : गटे आणि शिलर ह्यांनी अभिजाततावादाचा आदर्श आपल्या साहित्यकृतींतून पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्या दोघांच्या हयातीतच अभिजाततावाद मंदतेज होऊन स्वच्छंदतावादी संप्रदाय उदयाला आला. अभिजाततावादी संप्रदायाचे प्रभावक्षेत्र समजल्या जाणाऱ्या बर्लिन शहरातच १७९८ मध्ये ⇨ लूटव्हिख टीक  (१७७३–१८५३), श्लेगेल बंधू, फ्रीड्रिख फोन हार्डेनबेर्ख ऊर्फ ⇨ नोव्हालिस  (१७७२–१८०१) ह्यांसारख्या साहित्यिकांनी एकत्र येऊन ह्या नव्या संप्रदायाची स्थापना केली. आथेनेउम  (१७९८–१८००) ह्या नावाचे एक मुखपत्रही त्यांनी चालू केले. १७९९ पासून येना हे शहर ह्या संप्रदायाचे प्रमुख केंद्र बनले.

स्वच्छंदतावादाचा उदय ज्या काळात झाला तो काळ नव्याच्या आगमनासाठी उत्सुक होता. केवळ कला-साहित्याच्याच नव्हे, तर जीवनाच्या विविध क्षेत्रांतील प्रस्थापित प्रातिनिधिक मूल्यांचा पुनर्विचार उमलत्या पिढीला आवश्यक वाटत होता. सान्ताच्या माध्यमातून अनंताचे आकलन करण्याची ईर्षा प्रबल झाली होती. काव्य, तत्त्वज्ञान, संगीत, राजकारण, धर्म इ. क्षेत्रांचे पृथक्‌त्व अप्रस्तुत वाटत होते. व्यक्तिवादाला प्राधान्य मिळू लागले होते. स्टॉर्म अँड स्ट्रस ह्या चळवळीनेही व्यक्तिवाद जोपासला होता पण ह्या चळवळीमागे परिपक्व विचार नव्हता. स्वच्छंदतावाद्यांनी व्यक्तिस्वातंत्र्य हे एक मूलभूत तत्त्व मानले असले, तरी तिच्या मागे व्यक्तिविकासाची प्रगल्भ जाणीव होती. व्यक्तिवादाच्या पायावर बुद्धी आणि भावना जीवन आणि कला ह्यांच्यात एक विलोभनीय सुसंवाद साधण्याचा स्वच्छंदतावाद्यांचा प्रयत्न होता. काव्य ही मानवाची मातृभाषा होय, असे हेर्डर म्हणत असे. स्वच्छंदतावाद्यांना काव्य हे विश्वव्यापी तत्त्व वाटत होते आणि निसर्ग, धर्म, विज्ञान, भाषा, संगीत, मानवी मनाची अज्ञात सृष्टी इत्यादींतून मिळणाऱ्या ह्या महान तत्त्वाच्या प्रत्ययाची अभिव्यक्ती करणे, हे त्यांना आपले कर्तव्य वाटत होते.


लूटव्हिख टीक हा स्वच्छंदतावादी चळवळीतील एक प्रमुख साहित्यिक. कादंबऱ्या, नाटके, समीक्षा, परीकथा इ. विविध प्रकारचे लेखन त्याने केले. शेक्सपिअर-साहित्याचा आणि एलिझाबेथकालीन अन्य इंग्रजी साहित्याचा त्याचा गाढ व्यासंग होता. परभाषेतील विविध साहित्यकृतींचे त्याने अनुवाद केले श्लेगेल बंधूंपैकी आउगुस्ट ह्यास शेक्सपिअरच्या नाट्यकृतींचे जर्मन अनुवाद करण्यासाठी मोलाचे साहाय्य दिले. टीकने केलेली शेक्सपिअरसमीक्षाही उल्लेखनीय आहे. स्वच्छंदतावादाची तात्त्विक भूमिका श्लेगेल बंधूंनी सिद्ध केलेली होती. आपल्या वाङ्‌मयीन प्रकृतीशी प्रामाणिक राहण्याचा प्रत्येक प्रतिभावंताला हक्क आहे, असे ते मानीत. आकलन व आस्वाद ही समीक्षेची आद्य कर्तव्ये होत, अशी त्यांची धारणा होती. फ्रीड्रिख श्लेगेलने लुसिंड (१७९९) ही कादंबरी लिहून मुक्त प्रेमाचा आणि भावविवशतेचा उद्‌घोष केला समीक्षात्मक लेखनही केले. आउगुस्टने केलेला शेक्सपिअरच्या नाट्यकृतींचा अनुवाद व व्हिएन्ना व बर्लिन येथे दिलेली कला-साहित्यावरील व्याख्याने महत्त्वाची आहेत. त्यांनी त्याला यूरोपीय कीर्ती प्राप्त करून दिली. व्हिल्हेल्म व्हाकेनरोडर ह्याने स्वच्छंदतावादी कलाकल्पना मांडण्यासाठी लिहिलेले हेर्त्सेन्सएअरगिसुंगेन आयनेस कुन्स्टलीबेण्डेन क्लोस्टरबुडर्स  (१७९७, इं. शी. एफ्यूजन्स ऑफ ॲन आर्ट-लव्हिंग फ्रायर) हे पुस्तक जर्मन स्वच्छंदतावादाची १७९८ मध्ये अधिकृतपणे स्थापना होण्याच्या आधीचे. कलानिर्मितीस त्याने धर्मकृत्याचे महत्त्व दिले आहे. ईश्वराचे गुणगान गात चित्रशिल्पादी कलाकृती निर्मिणाऱ्या मध्ययुगीन कलावंतांमध्ये त्याने संतत्व पाहिले. ह्या पुस्तकातील काही लेखन टीकचे आहे. नोव्हालिस हा श्रेष्ठ भावकवी. ह्युमनेन आन डी नाख्ट  (१८००, इं. शी. हिम्स टू नाइट) हे त्याचे एक उत्कृष्ट भावकाव्य. वेन इश ईन नूर हाब  ही ख्रिस्ताला आणि कुमारी मेरीला उद्देशून त्याने लिहिलेली सूक्तेही सुंदर आहेत. हायन्रिश फोन ओफ्टर-डिंगेन  ह्या त्याच्या कादंबरीने नीलपुष्पाच्या शोधात असलेला नायक दाखविलेला आहे. अप्राप्य ध्येयासाठी झुरणे हे स्वच्छंदतावाद्याचे एक लक्षणीय वैशिष्ट्य. ह्या कादंबरीतील नीलपुष्प हे एका अप्राप्य ध्येयाचेच प्रतीक होय. तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात ⇨फिक्टे  आणि ⇨शेलिंग  ह्या दोन तत्त्वज्ञांनी स्वच्छंदतावाद आणला, तर ⇨फ्रीड्रिख शायरमाखर  ह्या ईश्वरविद्यावेत्त्याने धर्मविचारात व्यक्तिवादाचे महत्त्व प्रतिपादिले.

स्वच्छंदतावादाच्या उत्कर्षकाळातच ⇨फ्रिड्रिख हल्डरलीन  (१७७०–१८४३) हा श्रेष्ठ भावकवी होऊन गेला. जर्मनीतील स्वच्छंदतावादी संप्रदायाचा तो सदस्य नव्हता तथापि त्याचे आत्मनिष्ठ काव्य स्वच्छंदतावादाला जवळचे होते. प्राचीन ग्रीसच्या सांस्कृतिक वैभवाची त्याला ओढ होती. प्राचीन ग्रीसमध्ये होते, तसे आदर्श युग जर्मनीत अवतरावे अशी त्याची इच्छा होती तथापि ह्या अप्राप्य ध्येयामुळे अटळपणे येणारी निराशा त्याने अनुभवली. त्याच्या उत्कट पण चिंतनशील कविता त्याच्या हयातीत अनेकांना समजल्या नाहीत. ह्युपेरिओन  (१७९७) नावाची एक कादंबरीही त्याने लिहिली. तुर्कांच्या जोखडातून ग्रीसची मुक्तता करण्यासाठी झगडणाऱ्या एका ग्रीक तरुणाची ही कथा आहे.

झां पाउल रिक्टर ऊर्फ ⇨ झां पाउल  (१७६३–१८२५) हा ह्या काळातील एक उल्लेखनीय आणि लक्षणीय कादंबरीकार. झां पाउलच्या कादंबऱ्यांना घाट असा नव्हताच. त्याची गद्यशैलीही विक्षिप्त होती. त्याच्या कादंबऱ्या म्हणजे अभिजाततावादी सुसंबद्धतेचे विरुद्ध टोक होते. त्याची सहृदय विनोदबुद्धी मात्र त्यांतून स्पष्टपणे प्रत्ययास येते. ट्रिस्ट्रम शँडी  लिहिणारा इंग्रज कादंबरीकार ⇨लॉरेन्स स्टर्न  ह्याचा झां पाउलवर प्रभाव जाणवतो. हेस्पेरुस  (१७९५), टिटान  (१८००–०३), फ्लेगेलयार  (१८०४) ह्या त्याच्या काही उल्लेखनीय कादंबऱ्या. झां पाउलचे लेखन त्यातील नावीन्यामुळे त्याच्या काळात खूपच लोकप्रिय झाले होते.

एकोणिसावेशतक : लूटव्हिख टीक, श्लेगेल बंधू, नोव्हालिस आदींनी प्रवर्तिलेल्या जर्मन स्वच्छंदतावादाचे पहिले पर्व १८०४ च्या सुमारास संपले. १८०१ मध्ये नोव्हालिस मरण पावला आणि १८०४ मध्ये टीक दीर्घकालीन वास्तव्यासाठी इटलीत निघून गेला. त्यानंतर दोन वर्षांनी हायड्लबर्ग येथे स्वच्छंदतावादाचे दुसरे पर्व सुरू झाले. क्लेमेन्स ब्रेंटानो (१७७८–१८४२), आखिम फोन आर्निम (१७८१ – १८३१) आणि याकोप योझेफ फोन गरेस (१७७६–१८४८) हे त्याचे नेते होते. मध्ययुगात रमलेले पहिल्या पर्वातील साहित्यिक जर्मन जनतेपासून काहीसे दूरच होते. तथापि नव्या पर्वातील स्वच्छंदतावाद्यांनी चळवळीतील हे न्यून नाहीसे केले. स्वच्छंदतावादाला प्रखर राष्ट्रवादाचे एक प्रभावी परिमाण त्यांनी प्राप्त करून दिले. आपल्या कलाकल्पना जोपासताना प्रचलित काळाचे भान सुटू न देण्याची खबरदारी त्यांनी घेतली त्यामुळे जर्मन लोकजीवनावर त्यांचा पडलेला प्रभाव अधिक होता. इतिहासग्रंथ लिहून त्यांनी जर्मन जनतेत देशाच्या इतिहासाविषयीची आस्था जागृत केली. मध्ययुगीन साहित्याच्या आणि भाषाशास्त्राच्या आस्थेवाईक अभ्यासाचे मोल त्यांनी जाणले. राष्ट्रीय संचितातील एक मोलाचा ठेवा म्हणून लोकसाहित्याकडे त्यांनी पाहिले. ब्रेंटानोने आखिम फोन आर्निमच्या साहाय्याने डेस क्नाबेनवुंडरहोर्न  (१८०५, इं. शी. द बॉइज मॅजिक चार्म) हा जर्मन लोकगीतांचा संग्रह प्रसिद्ध केला. १८०७ मध्ये गरेसने डॉयचेन फोल्क्‌सब्यूशर  (इं. शी. जर्मन चॅपबुक्स) प्रसिद्ध केले. ⇨याकोप ग्रिम  (१७८५–१८६३) आणि व्हिल्हेल्म ग्रिम (१७८६–१८५९) ह्या दोघा बंधूंचा स्वच्छंदतावाद्यांशी संपर्क आलेला होता. याकोपने डॉयच ग्रामाटिक  (४ खंड, १८१९–३७) हा ऐतिहासिक आणि तौलनिक जर्मन व्याकरण-विषयक ग्रंथ लिहून जर्मानिक भाषाशास्त्राचा पाया घातला. कींडर उंड हाउसमेयर्शेन  (३ खंड, १८१२, १८१५, १८२२ इं. शी. हाउसहोल्ड टेल्स) हे ह्या बंधूंनी केलेले परीकथासंकलन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ठरले.

हायड्लबर्ग येथील स्वच्छंदतावाद्यांनी नेपोलियनविरुद्ध प्रतिकाराची भावना चेतवली. एर्न्स्ट मोरिट्स आर्न्ट, कार्ल टेओडोर कर्नर आणि माक्स फोन शेंकेनडोर्फ ह्यांसारख्या कवींच्या उत्कट देशभक्तिपर कवितांतून ती व्यक्त झालेली आहे.

ब्रेंटानो आणि आखिम फोन आर्निम हे १८०८ मध्ये हायड्लबर्ग सोडून बर्लिन येथे गेले आणि स्वच्छंदतावाद्यांचे हे दुसरे मंडळ विस्कळित झाले. तथापि बर्लिनमध्ये ह्या दोघांनी ए. फोन शामिसो आणि ⇨ योझेफ फोन आयकेन्‌डोर्फ  (१७८८–१८५७) ह्यांसारखे नवे साहित्यिक जमविले. जर्मन स्वच्छंदतावादाचे हे तिसरे पर्व. डी क्रोनेन वेश्टर  (१८१७, इं. शी. द गार्डिअन्स ऑफ द क्राउन) ही आपली उत्कृष्ट ऐतिहासिक कादंबरी आखिम फोन आर्निमने ह्याच पर्वात लिहिली. शामिसो हा फ्रेंच होता तथापि जर्मन भाषेत श्रेष्ठ दर्जाचे काव्यलेखन त्याने केले. मध्ययुगीन इतिहासावर, साध्यासुध्या जानपद विषयांवर त्याने सुंदर कविता रचिल्या. आयकेन्‌डोर्फ हा एक श्रेष्ठ कवी. जन्मभूमीबद्दलचा जिव्हाळा, निसर्गप्रेम, मनःशांतीची ओढ ही त्याच्या काव्याची काही लक्षणीय वैशिष्ट्ये. त्याची भाषा साधी पण गेयोत्कट आहे. आयकेन्‌डोर्फने कादंबऱ्याही लिहिल्या.


अन्य उल्लेखनीय कवींत ⇨फ्रीड्रिख ऱ्यूकर्ट  (१७८८–१८६६) आणि ⇨व्हिल्हेल्म म्यूलर   (१७९४ – १८२७) ह्यांचा अंतर्भाव होतो. ऱ्यूकर्ट हा पौर्वात्य भाषांचा अभ्यासकही होता. पौर्वात्य काव्यांपासून त्याने स्फूर्ती घेण्याचा प्रयत्न केला. ओस्टलिश रोजेन (१८२२) हा त्याचा काव्यसंग्रह त्या दृष्टीने उल्लेखनीय. म्यूलरने ग्रीसबद्दलचे आपले उत्कट प्रेम आपल्या भावकवितांतून व्यक्त केले. स्वातंत्र्यासाठी झगडणाऱ्या ग्रीक जनतेविषयी जर्मनीत सहानुभूती निर्माण करण्याचा त्याने प्रयत्न केला.

एकोणिसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात ⇨हाइन्रिख फोन क्लाइस्ट  (१७७७–१८११) ह्या प्रशियाच्या सर्वश्रेष्ठ नाटककाराने स्वच्छंदतावादी वळणाची नाटके लिहिली काव्यात्म कथा लिहिल्या. स्वच्छंदतावाद्यांच्या गटापासून मात्र क्लाइस्ट काहीसा अलिप्तच राहिला. अँफिट्रिऑन  (१८०७), डेअर त्सरब्रोखेन क्रूग  (१८०८, इं. शी. द ब्रोकन जार), डी हेरमान्सश्लाख्ट  (इं. शी. हर्मान्स बॅट्ल इन टोइटोबुर्क फॉरेस्ट), डेअर प्रिन्स फोन हामबुर्ग  (इं. शी. द प्रिन्स ऑफ हँबर्ग) ही त्याची काही उल्लेखनीय नाटके. ताणतणाव, हिंसा आणि नैराश्य ह्यांचे प्राबल्य त्याच्या नाट्यकृतींतून आढळते. गटेला त्याची नाटके आवडली नव्हती पण आज अभिव्यक्तिवाद्यांना आणि अस्तित्ववाद्यांना क्लाइस्टमध्ये आपला आद्य समानधर्मा दिसतो. क्लाइस्टने उत्कृष्ट कथाही लिहिल्या. ‘मिशाएल कोलहास’ ही त्याची दीर्घकथा जागतिक कथासाहित्यात मान्यता पावली आहे. त्साखारीआस व्हेर्नर हा असंतुलित प्रतिभेचा नाटककार. गूढवाद आणि नियतिवाद ह्यांनी तो भारलेला होता. डेअर २४ फेब्रुआर  (१८१०, इं. भा.  ट्‌वेंटिफोर ऑफ फेब्रुवारी, १९०३) ही त्याची विशेष उल्लेखनीय शोकात्मिका म्हणजे एक नियतिनाट्यच आहे.

एर्न्स्ट टेओडोर आमाडेउस होफ्मान  (१७७६–१८२२) ह्या कादंबरीकाराला अतिमानुष, भेदक विषयांचे आकर्षण होते. डी एलिक्झिअर डेस टॉयफेल्स  (२ खंड, १८१५–१६, इं. शी. द डेव्हिल्स एलिक्झिर्स) ही त्याची विख्यात कादंबरी.

स्वच्छंदतावादाचा प्रभाव हळूहळू क्षीण होत गेला. त्याचा अखेरचा टप्पा स्वेबीया येथे योहान लूटव्हिख ऊलांट ह्या कवीच्या नेतृत्वाखाली सुरू झाला. इतरत्र ऱ्हासाला लागलेल्या स्वच्छंदतावादी परंपरांची जपणूक करण्याचा हा प्रयत्न होता. युसटीनुस कर्नर, गुस्टाफ श्व्हाप, व्हिल्हेल्म व्हाइबलिंगर, व्हिल्हेल्म हाउफ आणि ⇨एडुआर्ट मरिके  (१८०४–७५) हे स्वेबीया येथील स्वच्छंदतावादी होत. श्रेष्ठ बॅलडरचनेबद्दल ऊलांटचा लौकिक झाला. जर्मनीचा इतिहास, भाषाशास्त्र आणि समकालीन राजकीय प्रश्न ह्यांबद्दल त्याला आस्था होती. कर्नरनेही बॅलड लिहिले परंतु ऊलांटची प्रतिभा त्याच्यापाशी नव्हती. श्व्हाप ह्याने संपादिलेले जर्मन फोल्क्सब्युशर (१८३६–३७) प्रसिद्ध आहे. त्याने लिहिलेली अनेक गीतेही लोकप्रिय झाली. व्हाइबलिंगरने ग्रीसवर उत्कृष्ट भावकविता लिहिल्या. हाउफ हा कथा-कादंबरीकार. वॉल्टर स्कॉटच्या ‘वेव्हर्ली कादंबऱ्यां’चा विशेष प्रभाव त्याच्यावर होता. मरिके हा चिंतनशील कवी. लोकगीतांशी नाते जोडणाऱ्या साध्यासुध्या भाषेत त्याने आपल्या उदात्तगंभीर भावकविता लिहिल्या. निसर्गाची आणि ग्रामजीवनाची हृद्य चित्रे त्याने आपल्या कवितांतून रंगविली. स्वेबीयन कविमंडळातील ऊलांट, कर्नर, हाउफ ह्यांसारख्या कवींपेक्षा त्याची कविता श्रेष्ठ दर्जाची होती.

१८३२ मध्ये गटे मरण पावला आणि जर्मन साहित्यातील एक महान पर्व संपुष्टात आले. जर्मन अभिजाततावादाचा गटे हा अखेरचा श्रेष्ठ प्रतिनिधी. अभिजाततावादानंतर उदयाला आलेला स्वच्छंदतावादही आता ऱ्हासालाच लागलेला होता. त्याच्या परंपरांच्या जपणुकीचे स्वेबीयात प्रयत्न झाले, तरी इतरत्र त्याचा प्रभाव बव्हंशी संपला होता. ऑस्ट्रियात मेटरनिखच्या कारकीर्दीत विचारस्वातंत्र्याची गळचेपी चालू होती. त्यामुळे जर्मन साहित्यिकांत आणि विचारवंतांत वैफल्याची तीव्र जाणीव निर्माण झालेली होती. औद्योगिकीकरणाच्या आरंभापासून निर्माण झालेली सामाजिक अस्वस्थता जाणवत होती. भ्रमनिरासाचे वातावरण होते. राजकीय-सांस्कृतिक ध्येयांची पूर्तता होण्याची आशा दुरावली होती. ह्या नैराश्यजनक परिस्थितीचे प्रतिबिंब साहित्यातून पडू लागले.

आनास्टासिउस ग्ऱ्यून (आंटोन आलेक्झांडर फोन औअर्सपेर्ख) ह्याच्या श्पात्सिएरंगेग आइनेस वीनर पोएटेन  (१८३१, इं. शी. प्रॉमिनेड्स ऑफ अ व्हिएन्नीज पोएट) मधील कवितांतून मेटरनिखच्या दडपशाहीविरुद्ध प्रतिक्रिया व्यक्त झालेली आहे. ⇨ फ्रांट्स ग्रिल्पार्ट्‌सर  (१७९१–१८७२) ह्या ऑस्ट्रियन नाटककाराचे नाट्यलेखन ह्याच काळातले. निरंकुश, जुलुमी सत्तेची त्याला चीड होती. मेटरनिखच्या कारकीर्दीत विचारस्वातंत्र्यावर पडलेल्या बंधनांमुळे त्याने आपले काही लेखन प्रसिद्ध केले नाही. इच्छाशक्तीचे दौर्बल्य हा त्याच्या नाटकांतून लक्षणीयपणे येणारा विषय. औदासीन्याची छाया त्यांवर पडलेली आहे. ग्रिल्पार्ट्‌सरच्या नाट्यकृतींचे विषय स्वच्छंदतावादाला जवळचे असले, तरी त्याने त्यांना अभिजाततावादी घाट देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. कोय्‌निक ओटोकार्स ग्ल्युक उंड एंड  (१८२५, इं. भा. किंग ओटोकार, हिज राइझ अँड फॉल, १९३८), डेअर ट्राउम आइन लेबेन  (१८३४, इं. भा. अ ड्रीम इज लाइफ, १९४६), लिबुसा (१८७२) ह्या त्याच्या काही उल्लेखनीय नाट्यकृती. ग्रिल्पार्ट्‌सरने भावकविताही लिहिल्या. त्याच्या व्यक्तिगत दुःखांचा उत्कट आविष्कार त्यांत आढळतो. ग्रिल्पार्ट्‌सरच्या नाट्यकृतींतून प्रत्ययास येणारी नैराश्यवृत्ती ह्या काळातील अन्य काही नाटककारांच्या नाट्यलेखनातूनही दिसून येते. उदा., क्रिस्टिआन ग्राब आणि कार्ल गेओर्ग व्यूख्नर. परीकथांतील अद्‌भुतरम्य प्रसंगांवर फर्डिनांड रायमुंटने आपल्या सुखात्मिका रचिल्या, तथापि त्यांतूनही विषण्णतेचा एक अंतःसूर जाणवतोच. योहानेस नेस्ट्रॉयच्या सुखात्मिकांतून येणाऱ्या विनोदाचे लक्ष्य समाज आणि राजकारण हे होते.

नैराश्यवादाने पछाडलेल्या भावकवींत नीकोलाउस लेनाऊ (१८०२–५०) हा विशेष उल्लेखनीय. मानवी आकांक्षांचे वैयर्थ्य त्याच्या कवितांतून प्रभावीपणे व्यक्त झालेले आहे. आउगुस्ट ग्राफ फोन प्लाटेन ह्याने आपल्या सोनेट्‌ट आउस व्हेनेडिग  (१८२५, इं. भा. सॉनेट्स, १९२३) मध्ये परभाषासाहित्यातील सुनीतासारखा काव्यप्रकार जर्मन भाषेच्या प्रकृतीशी कौशल्याने जुळवून घेतला. ऱ्यूकर्टप्रमाणे प्लाटेननेही पौर्वात्य साहित्याचा अभ्यास केलेला होता. त्याच्या घासेलेन (१८२१) मध्ये पौर्वात्य छंदात रचिलेल्या त्याच्या कविता संगृहीत आहेत. नेटकी रचना आणि घोटीव शैली ही प्लाटेनच्या काव्यरचनेची वैशिष्ट्ये.

उत्कट धर्मभावना आणि सूक्ष्मवास्तव निसर्गचित्रण ही ⇨आनेट फोन ड्रोस्ट–ह्यूत्सहोफ  (१७९७ – १८४८) ह्या कवयित्रीच्या कवितेची लक्षणीय वैशिष्ट्ये. आधुनिक माणसाची परिवेदना आणि अस्वस्थ आत्मशोध तीतून प्रत्ययास येतात.

तरुणजर्मनी : स्वच्छंदतावाद्यांनी जर्मन राष्ट्रवादाला अधिक चैतन्यशील आणि प्रखर बनविले परंतु ह्या राष्ट्रवादातून निर्माण झालेली स्वप्ने नेपोलियनचा पराभव झाल्यानंतरही पूर्ण होऊ शकली नाहीत. उलट स्वातंत्र्याचा अपहार आणि वाढती दडपणूक अनुभवास आली. स्वच्छंदतावाद्यांच्या साहित्यातून उमटलेल्या स्वप्नाळू राष्ट्रवादाची आवाहकता नव्या आशा निर्माण करण्याच्या कामी अपुरी पडू लागली. सामाजिक-राजकीय परिस्थितीचा डोळसपणे विचार करण्याची प्रवृत्ती दृढावली. स्वच्छंदतावाद्यांनी राष्ट्रवादाचा आणि देशभक्तीचा उद्‌घोष केला, तरी एक प्रकारच्या अ-भौतिक आदर्शाची त्यांची ओढ कायमच राहिली. तथापि नव्या परिस्थितीच्या संदर्भात व्यावहारिक, भौतिक दृष्टीची आवश्यकता तीव्रतेने जाणवू लागली. सर्वदेशीय (कॉस्मॉपॉलिटन) दृष्टीचे परिमाण राष्ट्रवादाला लाभले पाहिजे, अशी धारणा निर्माण होऊ लागली. ह्या वातावरणात काही तरुण जर्मन साहित्यिक पुढे आले. ह्या साहित्यिकांचा गट नव्हता. त्यांच्यापैकी प्रत्येकजण स्वतंत्रपणेच आपले कार्य करीत होता त्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाला संघटित चळवळीचे स्वरूप नव्हते. तथापि ह्या नसलेल्या चळवळीचा ‘तरुण जर्मनी’ म्हणून उल्लेख करण्याची प्रथा पडली. ⇨हाइन्रिख हाइन  (१७९७–१८५६), लूडोल्फ व्हीनबार्ख, कार्ल गुट्सको, हाइन्रिख लाउबे, टेओडोर मुंट, लूटव्हिख बोर्न ही ‘तरुण जर्मनी’ मध्ये अंतर्भूत केली जाणारी काही नावे होत. उदारमतवाद आणि स्वातंत्र्यप्रेम ‘तरुण जर्मनां’ना मोलाचे वाटत होते. त्याबद्दल त्यांच्यापैकी काहींना अन्य देशांत परागंदा व्हावे लागले. १८३५ मध्ये सरकारने त्यांच्या लेखनावर कायद्याने बंदी आणली.


हाइन्रिख हाइन हा ‘तरुण जर्मनां’तील सर्वश्रेष्ठ साहित्यिक. आरंभी स्वच्छंदतावादाने प्रभावित झालेला हाइन पुढे ‘तरुण जर्मन’ बनला. त्याच्या उदारमतवादी प्रवृत्तीला जर्मनीत थारा नसल्यामुळे १८३१ मध्ये तो पॅरिसला आला. तेथे असताना जर्मन आणि फ्रेंच ह्यांच्यात अर्थपूर्ण सांस्कृतिक संवाद साधण्याचे कार्य तो करू लागला. फ्रेंचांनी आणि जर्मनांनी परस्परांच्या साहित्यविषयक भूमिका समजावून घ्याव्या, असे त्याला वाटे. जर्मनीवर त्याचे प्रेम असले, तरी परागंदा झाल्याची कडवट जाणीवही होती. ‘आट्टा ट्रोल’आणि ‘डॉइचलांड’ यांसारख्या काव्यांतून त्याने स्वदेशातील दांभिकतेवर उपरोधपूर्ण टीका केली राष्ट्रीय दुर्गुणांवर प्रहार केले. हाइन हा श्रेष्ठ कवी तसाच समर्थ गद्यलेखक. विशुद्ध भावनांची उत्कट अभिव्यक्ती साधणारी, भव्यतेची प्रचीती देणारी कविता त्याने समर्थपणे लिहिली तसेच सुंदर, सफाईदार ओघवत्या गद्यशैलीचा एक आदर्श निर्माण केला. राइझबिल्डर  (१८२६–३१) ही प्रवासचित्रे आणि डी रोमांटिश शूल  (१८३६, इं. शी. द रोमँटिक स्कूल) हे त्याचे दोन गद्यग्रंथ विशेष उल्लेखनीय होत.

‘तरुण जर्मनां’ पैकी लूडोल्फ व्हीनबार्ख ह्याने आपल्या लेखनातून सामाजिक-राजकीय प्रश्नांना भिडणाऱ्या नव्या साहित्याची आवश्यकता प्रतिपादन केली. कार्ल गुट्सको ह्याने आपल्या वाली डी त्स्वाइल्फरिन  (१८३५, इं. शी. डाउटिंग वाली) ह्या कादंबरीतून सांकेतिक नैतिक मूल्यांवर टीका केली. हाइन्रिख लाउबेच्या दस युंग ऑयरेपा  (१८३३, इं. शी. द यंग यूरोप) मध्ये सामाजिक जीवनाचे परिणामकारक विश्लेषण आले आहे. टेओडोर मुंटने आपल्या माडोन्ना आयन हायलिग  (१८३५) ह्या कादंबरीत परंपरानिष्ठ, सनातन धार्मिक मते आणि समकालीन नीतिमूल्ये ह्यांतून मुक्ती मिळविण्याची आस व्यक्त केली. लूटव्हिख बोर्न हा हाइनप्रमाणेच फ्रान्समध्ये परागंदा झालेला होता. त्याच्या ब्रीफ आउस पारीस  (१८३०–३३, इं. शी. लेटर्स फ्रॉम पॅरिस) मधून त्याची लोकशाहीवरील श्रद्धा आणि पददलितांबद्दलची सहानुभूती व्यक्त झालेली आहे. ही पत्रे जर्मन भाषेतील उत्कृष्ट गद्याचे नमुने आहेत. स्वदेशातील अन्यायावर मुंटनेही टीकाच केली.

स्थितिवादी : ‘तरुण जर्मनां’चे लेखन चालू असताना पारंपरिक, स्थितिवादी वृत्तीचे (कन्सर्‌व्हेटिव्ह) लेखक-कवी होतेच. इमान्यूएल गायबेल ह्याच्या देशभक्तिपर कवितांना त्या काळी लोकप्रियता लाभली असली, तरी त्यांची भाषा आणि त्यांतील प्रतिमा सांकेतिक आहेत. बव्हेरियाचा राजा दुसरा माक्‌सिमीलिआन ह्याच्या आश्रयाने उभ्या राहिलेल्या म्यूनिक संप्रदायातील गायबेल हा प्रमुख कवी. तरुण जर्मनांनी निर्माण केलेल्या वाङ्‌मयप्रवृत्तींना प्रतिरोध करण्यासाठी म्यूनिक येथे हा साहित्यसंप्रदाय स्थापण्यात आला होता. ⇨ पाउल हाइंझ  (१८३०–१९१४) ह्याच्या कादंबऱ्या घाटाच्या दृष्टीने सफाईदार असल्या, तरी त्यांची मांडणी सांकेतिकच आहे. हाइंझ हाही म्यूनिक संप्रदायातील एक प्रमुख साहित्यिक होय. १९१० साली साहित्याचे नोबेल पारितोषिक त्यास मिळाले. योझेफ व्हिक्टोर फोन शेफेल ह्याने डेअर ट्रोम्पेटर फोन सेयकिंगेन  (१८५३, इं. शी. द ट्रंपेटर ऑफ सेयकिंगेन) हे महाकाव्य व एकेहार्ट  (१८५५) ही ऐतिहासिक कादंबरी लिहिली. ह्या दोन्ही कृती त्या काळी फार लोकप्रिय होत्या.

वास्तववाद : अठराव्या-एकोणिसाव्या शतकांत जर्मन साहित्यात अभिजाततावाद आणि स्वच्छंदतावाद ह्या दोन साहित्यसंप्रदायांचे उदयास्त झाले आणि हळूहळू ते साहित्य वास्तववादाकडे झुकू लागले. साहित्यकृतींतून दैनंदिन जीवनातील वास्तव प्रकटले पाहिजे, असा विचार वास्तववादाला पायाभूत होता. ह्या वाङ्‌मयीन स्थित्यंतराला विशिष्ट सामाजिक परिस्थितीही कारणीभूत होती. शहरीकरणाची आणि औद्योगिकीकरणाची प्रक्रिया सुरू झालेली होती. त्यांतून निर्माण झालेल्या सामाजिक प्रश्नांवर टीकात्मक भाष्ये होऊ लागली होती. कार्ल मार्क्सच्या दास कापिटाल  ह्या ग्रंथाचा पहिला खंड १८६७ मध्ये प्रकाशित झाला. वैज्ञानिक प्रगतीमुळे विकसित झालेला वस्तुनिष्ठ दृष्टिकोण माणसाचा विचार करताना वापरला जाऊ लागला. हेगेलच्या तत्त्वज्ञानाने इतिहाससंकल्पनेत तर्कशास्त्र आणून उभ्या केलेल्या बुद्धिवादाच्या चौकटीत स्वच्छंदतावादी आत्मनिष्ठेला वाव नव्हता. अशा परिस्थितीत जीवनातील समकालीन वास्तवतेचे भान हरवून चालणार नव्हते.

विशिष्ट प्रदेशातील जीवनाचे चित्रण साहित्यकृतींतून घडविण्याचे प्रयत्न झाले. त्यासाठी संबंधित प्रदेशांतील बोलींचा उपयोग करण्यात येऊ लागला. ऊट ड फ्रान्त्सोझेनेटयीड  (१८५९, इं. शी. ड्यूरिंग द टाइम ऑफ द फ्रेंच काँक्वेस्ट) आणि ऊट मिन स्त्रोमटयीड  (१८६४, इं. शी. ड्यूरिंग माय अप्रेंटिसशिप) ह्या फ्रिट्झ रॉइटर ह्याच्या लो जर्मन कादंबऱ्यांत बोलीभाषेचा प्रभावीपणे उपयोग करून घेण्यात आलेला आहे. प्रसन्न विनोद हे ह्या कादंबरीचे आणखी एक वैशिष्ट्य. रॉइटरने आपल्या कादंबऱ्यांसाठी लो जर्मनचा उपयोग केला ही गोष्ट विशेष महत्त्वाची. क्लाउस ग्रोट ह्या कवीने आपल्या काव्याभिव्यक्तीसाठी लो जर्मनचा उपयोग केला. त्याच्या क्विकबोर्न  (१८५३) ह्या कवितासंग्रहाने त्याला मोठी कीर्ती मिळवून दिली. ⇨येरेमीआस गोट्हेल्फ  (१७९७–१८५४) ह्या स्विस कादंबरीकाराने उली डेअर क्नेश्ट  (१८४१, इं. भा. अल्‌रिक द फार्म सर्व्हंट, १८८६) आणि उली डेअर प्रेश्टर  (१८४९, इं. शी. उली द फार्मर) ह्यांसारख्या आपल्या कादंबऱ्यांतून बर्न व त्याच्या आसमंतातील ग्रामीण जीवन ह्यांचे वास्तववादी दर्शन घडविले. स्विस शेतकऱ्यांच्या जीवनाचे सूक्ष्म निरीक्षण त्यांतून प्रत्ययास येते. बेर्टोल्ट आउअरबाख ह्याच्या श्वार्त्सवेय्‌ल्डर डोर्फगेशिश्टेन  (४ खंड, १८४३–५४, इं. भा. ब्लॅक फॉरेस्ट व्हिलेज स्टोरीज) मधून व कार्ल इमरमान ह्याच्या ‘डेअर ओबरहाफ’ ह्या दीर्घकथेतूनही कृषिजीवनाचे चित्रण आलेले आहे. वास्तववादी जर्मन साहित्यात पुढे बहरास आलेल्या ग्रामीण कथा-कादंबऱ्यांचे ते पूर्वसूरी म्हणता येतील. तथापि अशा प्रकारच्या साहित्याचा येरेमीआस गोट्हेल्फ हा पहिला महत्त्वपूर्ण प्रतिनिधी.

आडालबेर्ट श्टिफ्टर  (१८०५–६८) हा बोहीमियात जन्मलेला लेखक. तेथील निसर्गाने तो भारावून गेलेला होता. तेथील अरण्ये आणि डोंगरदऱ्या त्याच्या साहित्यातून सचेतन झाल्या आहेत. दैनंदिन जीवनातील घटनांतून भावगर्भ आशयाची प्रतीके त्याने पाहिली आणि आपल्या साहित्यकृतींतून ती प्रामाणिकपणे गोचर करण्याचा प्रयत्न केला. स्टुडिएन  (१८४४–५०, इं. शी. स्टडीज) आणि बुंटश्टाइन  (१८५३, इं. शी. स्टोन्स ऑफ मेनी कलर्स) हे त्याचे उल्लेखनीय कथासंग्रह. डेअर नाख्‌झोमर  (१८५७, इं. शी. द इंडियन समर) ही त्याची एक श्रेष्ठ कादंबरी. गटेच्या व्हिल्हेम माइस्टरप्रमाणे ह्या कादंबरीत एका तरुणाच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासाचे चित्रण आढळते. विटिको  (१८६५–६७) ह्या कादंबरीत त्याने मध्ययुगीन बोहीमियन इतिहासातील घटनांच्या प्रतीकातून न्याय आणि शांतता ह्यांच्या प्रस्थापनेसाठी चाललेल्या मानवाच्या लढ्याचे दर्शन घडविले. ओटो लूटव्हिख  (१८१३–६५) हा कादंबरीकार आणि नाटककार. त्याच्या वास्तववादी लेखनात मनःचित्रणाची जाणीव दिसून येते. त्स्विशेन हिमेल उंड एर्ड  (१८५६, इं. भा. बिट्‌वीन हेव्हन अँड अर्थ, १९२८) ह्या कादंबरीत एका कुटुंबातील दोन भावांतील संघर्ष प्रभावीपणे रंगविलेला आहे. डेअर एर्बफोय्‌र्स्टर  (१८५०, इं. शी. द हिरेडिटरी फॉरेस्टर) ह्या त्याच्या नाट्यकृतीत एका वनाधिकाऱ्याची शोकात्मिका परिणामकारकपणे मांडली आहे. शेक्सपिअरच्या नाट्यकृतींचा त्याने अभ्यास केला होता. शाक्सपिआर–स्टुडिएन  (१८७१, इं. शी. शेक्सपिअर स्टडीज) ह्या त्याच्या ग्रंथातून नाट्यकलातंत्राचे त्याचे उत्तम ज्ञान दिसून येते.


स्विस कथा-कादंबरीकार ⇨गोट्‌फ्रीट केलर  (१८१९–९०) ह्याच्या डेअर ग्ऱ्यून हाइन्रिख  (४ खंड, १८५४–५५, इं. भा. ग्रीन हेन्री ) ह्या कादंबरीतील कलावंत नायक आपल्या जीवनाचा हेतू आणि तत्त्वज्ञान शोधून काढण्याचा प्रयत्न करतो जीवनातील विविध अनुभव घेतो. कलावंताने दैनंदिन जीवनातील वास्तवाशी जुळवून घेण्याची आवश्यकता केलरने ह्या कादंबरीत दाखवून दिली आहे. ‘डी लॉयट फोन सेल्टवीला’ (१८५६–७४, इं. भा. द पीपल ऑफ सेल्टवीला, १९२९) ह्या कथेतून त्याच्या विनोदबुद्धीचा प्रत्यय येतो.

कवि-कथाकार ⇨टेओडोर श्टोर्म  (१८१७–८८) हा श्लेस्विगहोलस्टाइनचा रहिवासी. तेथील वातावरण त्याच्या साहित्यकृतींत आलेले आहे. त्याच्या आरंभीच्या कवितांवर आणि कथांवर स्वच्छंदतावादाचा प्रभाव असला, तरी हळूहळू त्याचे लेखन वास्तववादी झाले. जीवनाच्या क्षणभंगुरतेची उदास जाणीव मात्र त्याच्या एकूण लेखनाला व्यापून राहिल्याचे दिसते. व्हिलिबाल्ट आलेक्सिस, ⇨कोनराट फेर्डिनांट मायर  (१८२५–९८), गुस्टाफ फ्रायटाख ह्यांनी ऐतिहासिक कथा-कादंबऱ्या लिहिल्या. रोलांड फोन बेर्लिन  (१८४०, इं. शी. रोलांड ऑफ बर्लिन) आणि डेअर फाल्श वोल्डेमार  (१८४२, इं. शी. द राँग वोल्डेमार) ह्या ब्रांडनबुर्क-प्रशिया ह्यांच्या इतिहासावर व्हिलिबाल्ट आलेक्सिस ह्याने लिहिलेल्या कादंबऱ्या. त्याच्या कथांपैकी ‘डी होझेन डेस हेर्न फोन ब्रेडो’ (१८४६, इं. शी. द होस ऑफ मिस्टर फोन ब्रेडो) ही विनोदी कथा विशेष प्रसिद्ध आहे. सत्तालालसेपायी रसातळाला गेलेल्या थोरांचे चित्रण स्विस लेखक आणि कवी मायर ह्याने प्रभावीपणे केले आहे. प्रबोधनकालाविषयी त्याला आस्था होती. तीतूनच त्याच्या काही साहित्यकृतींना प्रेरणा लाभली. दस आमुलेट  (१८७३, इं. शी. द आर्मलेट), युर्ग येनाट्श  (१८७६), डेअर हायलिग  (१८८०, इं. शी. द सेंट), डी फरझुरवुंग डेस पेस्कारा  (१८८७, इं. शी. द टेंप्टेशन ऑफ पेस्कारा) ह्या त्याच्या काही उल्लेखनीय कथा-कादंबऱ्या. साहित्यकृतीच्या घाटाची उत्तम जाणीव आणि रेखीव, प्रासादिक शैली ही त्याच्या लेखनाची वैशिष्ट्ये. त्याने सुंदर भावकविताही लिहिल्या.

गुस्टाफ फ्रायटाख ह्याने डी आनेन  (१८७२–८१, इं. शी. द ॲन्सिस्टर्स) ह्या नावाने लिहिलेल्या आठ ऐतिहासिक कथा फारशा यशस्वी झाल्या नसल्या, तरी झोल उंड हाबेन  (१८५५, इं. शी. डेबिट अँड क्रेडिट) ह्या आपल्या कादंबरीत त्याने समकालीन आर्थिक-सामाजिक परिवर्तनांचे परिणामकारक चित्रण केले आहे. फ्रीड्रिख फोन श्पीलहागेन ह्यानेही आपल्या इन राइह उंड ग्लीड  (१८६७, इं. शी. इन रँक अँड फाइल), हामर उंड आंबोस  (१८६९, इं. शी. हॅमर अँड ॲन्‌व्हिल) ह्यांसारख्या कादंबऱ्यांतून समकालीन सामाजिक समस्या मांडल्या आहेत. ह्या कादंबऱ्यांना त्या काळी मोठी लोकप्रियता लाभलेली होती.

व्हिल्हेल्म राबने केलेले सामाजिक जीवनाचे विश्लेषण अधिक सखोल आहे. पारंपरिक मूल्यांचा हळूहळू विध्वंस होत असून जीवनात आणि इतिहासात अर्थ शोधण्याचा प्रयत्न व्यर्थ आहे, अशी त्याची धारणा जाणवते. डेअर हुंगरपास्टोर  (१८६४, इं. शी. द हंग्री पार्सन), आबू टेल्फान  (१८६८) आणि डेअर श्यूडरूंप  (१८७०, इं. शी. द प्लेग कार्ट) ह्या त्याच्या तीन कादंबऱ्या विशेष उल्लेखनीय आहेत. राब हा मूलतः निराशावादी असला, तरी आल्ट नेस्टर  (१८८०, इं. शी. ओल्ड नेस्ट्स) आणि श्टोपकुखेन  (१८९१, इं. शी. केक ईटर) ह्यांसारख्या नंतरच्या काही कृतींत त्याने जीवनाबद्दल बरेच अगत्य व्यक्त केलेले आहे. त्यांतून प्रत्ययास येणारी त्याची विनोदबुद्धीही लक्षणीय आहे.

व्हिल्हेल्म बुश हा श्रेष्ठ आणि लोकप्रिय विनोदकार. त्याचा विनोद साधा, सरळ पण खळखळून हसविणारा. आपल्या विनोदातून मानवी जीवनातील विसंगती त्याने मार्मिकपणे टिपल्या आहेत.

ऑस्ट्रियातील कथाकार फेर्डिनांट फोन झार आणि कादंबरीकर्त्री मारी फोन एब्नर-एशेनबाख ह्यांनी ऑस्ट्रियन समाजातील बूर्झ्वांचे आणि कृषक वर्गाचे वास्तववादी चित्रण केले आहे. ⇨ लूटव्हिक आन्त्सेनग्रूबर  (१८३९–८९) ह्याच्या नाट्यकृतींतून ऑस्ट्रियन ग्रामीण जीवनाचे वास्तववादी चित्रण आलेले आहे. डेअर फारर फोन किर्शफेल्ड  (१८७०, इं. शी. प्रीस्ट ऑफ किर्कफेल्ड) आणि दस फिअर्ट गेबोट  (१८७७, इं. भा. द फोर्थ कमांडमेंट, १९१२) ही त्याच्या विशेष उल्लेखनीय नाटकांपैकी काही होत. कादंबरीकार पेटर रोझेगर ह्याच्या इडिलेन आइनर उंटरगेहेंडेन वेल्ट  (१८९९, इं. शी. आय्‌डिल्स ऑफ अ व्हॅनिशिंग वर्ल्ड) ह्या कृतीत औद्योगिकीकरणातून निर्माण झालेल्या आधुनिक जीवनातील दुःखे दाखवून देण्याचा प्रयत्न आहे.

जर्मन साहित्यातील वास्तववादाचा प्रकर्ष ⇨फ्रीड्रिख हेब्बेल  (१८१३–६३) ह्याच्या नाट्यकृतींतून प्रत्ययास येतो. सूक्ष्म मनोविश्लेषण हे त्याच्या नाट्यकृतींचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य. जगाबरोबर संघर्ष करणाऱ्या स्वत्वनिष्ठ व्यक्तींच्या आयुष्याची होणारी शोकात्मिका त्याच्या नाट्यकृतींतून दिसते. युडिथ  (१८४०), हेरोडेस उंड मारिआम्न  (१८५०, इं. शी. हेरोड अँड मारिआम्न) आणि गायगेस उंड झाइन रिंग  (१८५६, इं. शी. गायगेस अँड हिज रिंग) ह्या त्याच्या शोकात्मिकांत तडजोड नाकारल्यामुळे पराभूत झालेल्या व्यक्ती त्याने रंगविल्या आहेत. आग्नेस बेर्नाउअरमध्ये राजकीय कारणांसाठी आग्नेस ह्या सुंदर तरुणीस ठार केले जाते. तिचे सौंदर्यच तिच्या नाशाला कारणीभूत होते. जर्मनांच्या नीबलुङगन्‌लीड  ह्या राष्ट्रीय महाकाव्यावर हेब्बेलने आपले डी नीबेलुङगेन  हे त्रिनाट्य (ट्रिलॉजी) लिहिले. आपल्या प्रकृत्यनुसार हेब्बेलने ह्या नाट्यकृतीत मूळ महाकाव्यकथेला मनोविश्लेषणपद्धतीने हाताळून तिचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. हेब्बेलने भावकविताही लिहिल्या.

प्रथम कवी म्हणून नावारूपास आलेला टेओडोर फोंटान उत्तरायुष्यात कादंबरीलेखनाकडे वळला. फोर डेम श्टुर्म  (१८७८, इं. शी. बिफोर द स्टॉर्म) ही त्याची पहिली कादंबरी. त्यानंतर लाद्युल्तेरा  (१८८२, इं. शी. द ॲडल्ट्रेस), इरूंगेन, विरूंगेन  (१८८८, इं. शी. ट्रायल्स अँड ट्रिब्यूलेशन्स), फ्राउ येनी ट्राइबेल  (१८९२), एफी ब्रीस्ट  (१८९५) आणि डेअर श्टेशलिन  (१८९९) ह्यांसारख्या उत्कृष्ट कादंबऱ्या त्याने लिहिल्या. सूक्ष्म निरीक्षण, प्रभावी व्यक्तिरेखन, सखोल मानसशास्त्रीय दृष्टी आणि सामाजिक समस्यांचे उत्तम आकलन फोंटानच्या कादंबऱ्यांतून प्रत्ययास येते. अटळपणे उद्ध्वस्त होत चाललेल्या जुन्या संस्कृती-मूल्यांकडे एक वस्तुस्थिती म्हणून उघड्या डोळ्यांनी पाहणारा फोंटान औद्योगिकीकरण, शहरीकरण इ. प्रक्रियांतून निर्माण झालेल्या सामाजिक परिस्थितीमधील न्यूने दाखवून देण्याचा प्रयत्न करतो.

फ्रीड्रिख नीत्शे  (१८४४–१९००) ह्या श्रेष्ठ तत्त्वज्ञाने जर्मन साहित्याच्या संदर्भातही मोलाची कामगिरी केली. डी गेबुर्ट डेअर ट्रागोय्‌डी आउस डेम गाइस्ट डेअर मुझीक  (१८७२, इं. शी. द बर्थ ऑफ ट्रॅजिडी आउट ऑफ द स्पिरिट ऑफ म्यूझिक) ह्या ग्रंथात अपोलो आणि डायोनायसस ह्यांच्या एकात्मतेतून कला संभवते, असा विचार नीत्शेने मांडला होता. अपोलो हे कलाकृतीच्या घाटाचे, यथामित आकृतिबंधाचे, संयमाचे आणि विवेकाचे प्रतीक तर डायोनायसस हे अनाकृततेचे (फॉर्मलेसनेस), अनियंत्रित भावनोद्रेकांचे आणि उत्कट आनंदाचे प्रतीक. ह्या दोहोंच्या एकसंधनातून ग्रीक शोकात्मिका निर्माण झाली, अशी नीत्शेची भूमिका होती. ह्या भूमिकेवर काही विद्वानांनी टीका केली, तरी अभिजाततावादी साहित्यकृतींच्या विचाराची एक वेगळी दिशा त्याने दाखवून दिली, हे निश्चित. विख्यात जर्मन संगीतकार ⇨रिखार्ट व्हाग्नर  (१८१३–८३) हा त्या वेळी आपल्या संगीतिका लिहीत होता. व्हाग्नर हा जर्मन साहित्यातील वास्तववादाच्या काळात वावरत असूनही वृत्तीने स्वच्छंदतावादीच होता. मध्ययुगीन जर्मन कथांचा आणि आख्यायिकांचा त्याने आपल्या संगीतिकांसाठी उपयोग करून त्या लोकप्रिय केल्या होत्या. नीत्शेने व्हाग्नरला आरंभी ग्रीक नाटककारांचा वारसदार मानले तथापि पुढे व्हाग्नरवर कठोर टीका केली. तत्त्वज्ञ ह्या नात्यानेही नीत्शेने पुढील साहित्याला प्रेरक असे विचार दिले.


निसर्गवाद : विख्यात फ्रेंच साहित्यिक ⇨एमिल झोला  (१८४०–१९०२) ह्याचा आदर्श पुढे ठेवून काही साहित्यिक ⇨ निसर्गवादाचा पुरस्कार करू लागले. कला-साहित्यात वैज्ञानिक वस्तुनिष्ठतेचा आग्रह निसर्गवाद्यांनी धरला. बर्लिनमध्ये हाइन्रिख हार्ट आणि यूलिउस हार्ट ह्या दोघा बंधूंनी आपल्या क्रिटिश वाफेनगेंय्‌ग  (१८८२–८४, इं. शी. क्रिटिकल जूस्ट्स) ह्या जर्नलमधून निसर्गवादी विचार मांडले. म्यूनिकमध्ये मिखाएल गेओर्ग कोनराट ह्याच्या डी गेशेलशाफ्ट  (१८८५–१९०२) ह्या नियतकालिकानेही निसर्गवादाची बाजू उचलून धरली. आर्नो होल्ट्स हा श्रेष्ठ निसर्गवादी भावकवी उदयाला आला. दस बूख डेअर त्साइट  (१८८६, इं. शी. द बुक ऑफ टाइम) आणि फांटासुस  (१८९८) ह्या त्याच्या काव्यसंग्रहांतून नव्या निसर्गवादी प्रवृत्ती प्रत्ययास येतात. योहानेस श्लाफ ह्या लेखकाच्या साहाय्याने त्याने पापा हॅम्लेट  हा तीन कथांचा संग्रह प्रसिद्ध केला. अत्यंत सूक्ष्म, तपशीलवार वर्णने ह्या कथांतून आलेली आहेत. त्यांपैकी ‘आइन टोड’ (इं. शी. डेथ) ही कथा विशेष उल्लेखनीय. द्वंद्वयुद्धात घायाळ होऊन मरणोन्मुख झालेल्या एका विद्यार्थ्याच्या बिछान्याभोवती त्याचे मित्र गोळा झालेले आहेत आणि ह्या परिस्थितीत एक रात्र कशी जाते, ह्याचे अत्यंत प्रभावी वर्णन त्या कथेत आलेले आहे. होल्ट्सने आपली वाङ्‌मयीन भूमिका डी कुन्स्ट, ईर वेझेन उंड ईर गेसेट्त्स  (१८९१, इं. शी. आर्ट, इट्स नेचर अँड लॉज) ह्या चिकित्सक लेखनातून मांडली.

जर्मन निसर्गवाद ⇨गेर्हार्ट हाउप्टमान  (१८६२–१९४६) ह्याच्या नाट्यकृतींतून प्रकर्षाने प्रकटला आहे. फोर झोन्नेनआउफगांग  (१८८९, इं. शी. बिफोर डॉन), डी वेबर  (१८९२, इं. शी. द वीव्हर्स), फ्लोरिआन गायर  (१८९६) ही त्याची काही उल्लेखनीय निसर्गवादी नाटके. ‘बिफोर डॉन’ मध्ये मद्यपानामुळे उद्ध्वस्त झालेल्या एका कुटुंबाचे चित्रण आहे, तर ‘द वीव्हर्स’ मध्ये गरीब विणकरांच्या दुःखाचे परिणामकारक दर्शन घडविलेले आहे. ह्या दोन्ही नाटकांत नायक नाही. ऐतिहासिक नाटकात निसर्गवादाचा प्रयोग करण्याच्या हेतूने हाउप्टमानने फ्लोरिआन गायर  लिहिले परंतु ते फारसे यशस्वी झाले नाही. निसर्गवादाच्या मर्यादा त्याला जाणवल्या होत्या. हान्नेलेस हिम्मेलफार्ट  (१८९४, इं. शी. द ॲसंप्शन ऑफ हान्नेल) ह्या नाट्यकृतीपासून तो प्रतीकवादाकडे वळला. डी फरझुंकेन ग्लोक  (१८९६, इं. शी. द संकन बेल) हे त्याने प्रतीकवादी तंत्राने लिहिलेले एक श्रेष्ठ नाटक होय.

हाउप्टमानने कादंबरीकार म्हणूनही यश मिळवले. डेअर नार इन क्रिस्टो, इमानुएल क्विंट  (१९१०, इं. भा. द फूल इन ख्राइस्ट, इमानुएल क्विंट, १९११) आणि आटलांटिस  (१९१२) ह्या त्याच्या उल्लेखनीय कादंबऱ्या. त्याच्या प्रभावी निवेदनशैलीचा प्रत्यय त्यांतून येतो. १९१२ मध्ये हाउप्टमानला साहित्याचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.

निसर्गवाद्यांपैकी अन्य उल्लेखनीय साहित्यिकांत ⇨ हेर्मान झूडरमान  (१८५७–१९२८), माक्स हाल्ब आणि गेर्हार्ट हाउप्टमानचा बंधू कार्ल हाउप्टमान ह्यांचा अंतर्भाव होतो. झूडरमानच्या डी एर  (१८८९, इं. भा. व्हॉट मनी कॅनॉट बाय, १९०६) ह्या नाटकाचा जर्मनीतील निसर्गवादी चळवळीतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून बोलबाला झाला होता. हायमाट  (१८९३, इं. भा. मॅग्डा, १८९६ मराठी रूपांतर गृहपाश, १९४०) ह्या त्याच्या दुसऱ्या एका नाटकात स्त्रीच्या समान हक्कांचा पुरस्कार त्याने केलेला आहे. मध्यमवर्गीय, बूर्झ्वा नीतिमूल्यांचा उपहास झूडरमानच्या ह्या दोन नाटकांतून दिसतो.

पौगंडावस्थेतील प्रेमावर आधारलेल्या युगेंड  (१८९३, इं. शी. यूथ) ह्या शोकात्मिकेसाठी माक्स हाल्ब हा ओळखला जातो. कार्ल हाउप्टमानने आपल्या आइनहार्ट डेअर लेय्‌शलर  (१९०७, इं. शी. आइनहार्ट द स्माइलर) ह्या कादंबरीत कलावंताच्या मानसिक संघर्षांचे चित्रण केले आहे. त्याने काही नाटकेही लिहिली.

विसावेशतक: ह्या शतकात वाङ्‌मयीन प्रयोगनिष्ठा जोपासली गेली. पारंपरिक अभिव्यक्तितंत्रांच्या मर्यादा अनेक साहित्यिकांना जाणवल्या. त्यांतून विमुक्त होऊन आपल्या स्वतंत्र सर्जनशीलतेचा ठसा उमटविण्याचा प्रयत्न साहित्यिक करू लागले. अर्थात ह्या प्रयोगशीलतेलाही एकोणिसाव्या शतकातील वाङ्‌मयीन संचिताचा भक्कम आधार होताच. शिवाय ह्या नव्या, प्रयोगशील प्रवृत्ती एकदम अवतरल्या नाहीत त्यांचा प्रभाव हळूहळूच गोचर होऊ लागला. एकोणिसाव्या शतकात प्रभावी ठरलेल्या निसर्गवादी संप्रदायांचे संस्कार ह्या शतकातील आरंभीच्या साहित्यावर जाणवतात. किंबहुना संस्कारवाद (इंप्रेशनिझम) हा ह्या शतकातील पहिला महत्त्वपूर्ण संप्रदाय निसर्गवादी संप्रदायाशी निकटचे नाते ठेवून होता, असे काही साहित्यकृतींवरून वाटते. अनुभवाचा लेखकाच्या मनावर झालेला केवळ संस्कार विश्लेषणावाचून अथवा स्पष्टीकरणात्मक तपशिलावाचून नमूद करून वाचकाला त्या अनुभवाची पुनर्निर्मिती स्वतःच्या मनात करावयास लावण्याचा आवाहक प्रयत्न संस्कारवादी साहित्यात केला जातो. हेर्मान बार ह्याने संस्कारवादाची उद्दिष्टे आणि भूमिका मांडली. बार हा ऑस्ट्रियन साहित्यिक. विविध संप्रदायांच्या प्रभावातून तो गेलेला होता. ‘त्सुर क्रिटिक डेअर मोडेर्न’ (१८९०) व ‘डी युबरविंडुंग डेस नाटुरालिस्मुस’ (१८९१, इं. शी. द डिस्‌प्लेसमेंट ऑफ नॅचरॅलिझम) हे दोन निबंध लिहून त्याने नव्या संस्कारवादी संप्रदायाची सूचना दिली. आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी संस्कारवादी साहित्यिकांनी आवश्यकतेनुसार नवी शब्दकळाही घडविली. रिखार्ट डेमेल ह्या जर्मन कवीने आपल्या कवितांतून संस्कारवादी शैली आणि निसर्गवादाला साजेसे विषय ह्यांचा समन्वय घडवून आणल्याचे दिसून येते. अधःपतित नागरी जीवन, जीवन आणि कामेच्छा ह्यांतील संघर्ष तो प्रभावीपणे व्यक्त करतो.

ह्या शतकारंभी ⇨गेओर्ग श्टेफान  (१८६८–१९३३) ह्या श्रेष्ठ कवीने आपले ‘गेओर्ग मंडळ’ स्थापन केले. सौंदर्यान्वेषी वृत्तीचा हा कवी होता. कवितेचा घाट घोटीव, कातीव असला पाहिजे, हा त्याचा आग्रह होता. कवी म्हणजे प्रेषित आणि काव्यनिर्मिती हाच धर्म असे गेओर्गने मानले. गेओर्गच्या कविता काही काळ अत्यंत खाजगीपणे प्रसिद्ध होत आणि आपल्या मंडळातील कवींवर त्याची पूर्ण हुकमत होती. कवितेतील शब्दांचा वर्णक्रम आणि विरामचिन्हे त्याने आपल्या इच्छेनुसार योजिलेली असत. फ्रेंच प्रतीकवाद्यांचा आणि प्री-राफेएलाइट कवींचा गेओर्गवर मोठा प्रभाव होता. ब्ल्येटर फ्युर डी कुन्स्ट  (१८९२–१९१९, इं. शी. पिरिऑडिकल फॉर आर्ट) हे गेओर्ग मंडळाचे मुखपत्र होते. विख्यात कवी ⇨हूगो फोन होफ्‌मान्स्टाल  (१८७४ –१९२९) ह्या कवीला आपल्या मंडळात अंतर्भूत करून घेण्याचा गेओर्गने प्रयत्न केला होता. जीवनाच्या क्षणभंगुरतेची जाणीव होफ्‌मान्स्टालच्या कवितेला व्यापून राहिलेली आहे. प्रकृतीने तो स्वच्छंदतावादी होता. त्याची काव्यशैली नादमधुर होती. उत्कट भावात्मकता हे त्याच्या कवितेचे आणखी एक लक्षणीय वैशिष्ट्य. तथापि उत्कट भावाभिव्यक्तीसाठी शब्दांचे माध्यम त्याला अपुरे वाटे. त्याने श्रेष्ठ नाट्यकृतीही लिहिल्या. त्याची नितळ, नादवती भाषा त्याच्या डेअर टोर उंड डेअर टोड  (१८९३, इं. शी. डेथ अँड द फूल) सारख्या नाटकांतूनही प्रत्ययास येते. नैतिक समस्यांचे त्याचे भान तीव्र आहे. एलेक्ट्रा  (१९०३) आणि ओय्‌डिपुस उंड डी श्पिंक्स  (१९०६, इं. शी. ईडिपस अँड द स्फिंक्स) ह्या नाट्यकृती लिहून त्याने ग्रीक नाटकांना आधुनिक रूप देण्याचा प्रयत्न केला. ⇨आर्टुर श्निट्‌स्लर  (१८६२–१९३१) ह्याच्या नाट्यकृतींतून सूक्ष्म मनोविश्लेषण आढळते. फ्रॉइडचा त्याच्यावर प्रभाव होता. लॉयटनाण्ट गुस्टल  (१९०१, इं. शी. नन बट द ब्रेव्ह) ह्या कादंबरीत त्याने संज्ञाप्रवाहपद्धतीचा उपयोग केला होता. ⇨रोबेर्ट मुसिल  (१८८०–१९४२) ह्याच्या डेअर मान ओन आयगेनशाफ्टेन  (३ खंड, १९३०–५२, इं. शी. अ नॉन्‌डिस्क्रिप्ट मॅन) ह्या कादंबरीतून बूर्झ्वांच्या जगातील कृत्रिमता आणि पोकळपणा प्रभावीपणे दाखवून दिलेला आहे.


प्रतीकवाद : ह्या शतकात प्रतीकवादाचा प्रभाव पडलेल्या साहित्यिकांत कवी ⇨रायनर मारीआ रिल्के  (१८७५–१९२६) आणि कथा-कादंबरीकार ⇨टोमास मान  (१८७५–१९५५) हे प्रमुख होत.

दस श्टुंडेनबुख (१९०५, इं. शी. द बुक ऑफ अवर्स) ह्या काव्यसंग्रहाने रिल्केला ख्याती प्राप्त करून दिली. त्यात रिल्केने आध्यात्मिक मूल्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. रिल्के रशियाला दोन वेळा जाऊन आला होता. तेथे टॉलस्टॉयसारख्या श्रेष्ठ मानवतावाद्यांचा प्रभाव त्याच्यावर पडला होता. भटकणारे संन्यासी त्याने रशियात पाहिले होते. उपर्युक्त काव्यसंग्रहावर रशियाभेटीचा प्रभाव जाणवतो. तथापि रिल्केची ईश्वरकल्पना त्याच्या कलेच्या साफल्याविषयीच्या कल्पनेशी व धडपडीशी निगडित झालेली होती. डी डुइनेझर एलेगीएन  (१९२३, इं. शी. डुइनोज एलिजीज) ही तो आपली सर्वश्रेष्ठ कृती मानत असे. दहा कवितांची ही माला. रिल्केचा आध्यात्मिक संघर्ष त्यांतून परिणामकारकपणे व्यक्त झालेला आहे. जीवन आणि मृत्यू ह्यांकडे एका महान साकल्याचे अंश म्हणून रिल्केने पाहिले. मानवी जीवनातील न्यूनांचे भान ठेवूनही त्याने त्याचा गौरव केला. डी सोनेट आन् ओर्फेउस  (१९२३, इं. शी. सॉनेट्स टू ऑर्फिअस) मध्ये त्याने कवितेच्या सामर्थ्याचा गौरव केला. त्यात ऑर्फिअस हा त्याचे स्वतःचे प्रतीक म्हणून आलेला आहे.

प्रतीकांचा आणि मिथ्यकथांचा आपल्या कथा-कादंबऱ्यांसाठी टोमास मानने उपयोग करून घेतला. गुंतागुंतीच्या कल्पनाही त्याने प्रभावी निवेदनशैलीने साकारल्या. यूरोपीय समाजाच्या ऱ्हासाचे वास्तव, सखोल, परिणामकारक चित्र त्याने आपल्या साहित्यातून रंगविले. डेअर त्साउबरबेर्ग  (१९२४, इं. शी. द मॅजिक माउंटन) ही कादंबरी त्या दृष्टीने लक्षणीय आहे. कलाकाराच्या समाजातील स्थानाचा विचार त्याच्या सर्वच लेखनात पुन्हा पुन्हा येताना दिसतो. ऱ्हासाच्या कल्पनेबद्दल मानला एक प्रकारचे आकर्षण वाटे आणि त्याच्या आरंभीच्या काही लेखनात कला ही ऱ्हासाचे प्रतीक म्हणूनच येते. बुड्‌डेनब्रुक्स  (१९०१) या त्याच्या श्रेष्ठ कादंबरीत एका खानदानी घराण्याच्या चार पिढ्यांचा ऱ्हास दाखविला आहे. कोय्‌निग्लिश होहाइट  (१९०९, इं. शी. रॉयल हायनेस) यात लोकसेवा आणि लोकहित ह्यांच्या विचारावर भर दिला आहे. राज्याचा त्याग करून देश वाचविणारा राजा ह्या कादंबरीत दाखविलेला आहे. डेअर टोड इन व्हेनेडिग  (१९१२, इं. शी. द डेथ इन व्हेनिस) ह्या कादंबरिकेत नेहमीचे जीवन व कलावंताचे जीवन यांतील संघर्ष दाखविला आहे. डोक्टोर फाउस्टुस  (१९४३) या कादंबरीत विसाव्या शतकातील सांस्कृतिक अधःपाताची जाणीव देऊन आजपर्यंतची चांगली मूल्ये राक्षसी शक्तींमुळे नष्ट होणार ही भीती व्यक्त केलेली आहे. टोनिओ क्रोयगर  (१९०३) आणि ट्रिस्टान  (१९०३) ह्या त्याच्या उल्लेखनीय कादंबरिका. टोमास मानने कथा-कादंबऱ्यांबरोबरच राजकीय-ऐतिहसिक-तात्त्विक स्वरूपाचे लेखनही केले. नीत्शे आणि शोपेनहौअर ह्या तत्त्वज्ञांचा त्याच्यावर प्रभाव होता. पहिल्या महायुद्धाच्या काळात त्याने राष्ट्रीय धोरणाचा पुरस्कार केला होता. तथापि नाझीवादाच्या उदयानंतर तो परागंदा झाला आणि लोकशाहीवादी विचारांचा त्याने उद्‌घोष केला. टोमास मानला १९२९ मध्ये साहित्याचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.

अन्यकादंबरीकार-नाटककार : टोमास मानचा भाऊ हाइन्रिख मान ह्याने सामाजिक-राजकीय विषयांवर उपरोधप्रचुर कादंबऱ्या लिहिल्या.  ⇨हेर्मान हेस  (१८७७–१९६२) ह्याच्या कादंबऱ्यांत नव-स्वच्छंदतावादी प्रवृत्ती दिसते. पेटर कामेन्त्सिंड  (१९०४), डेमिआन  (१९१९), स्टेप्पेन वोल्फ  (१९२७, इं, शी. द वुल्फ ऑफ द स्टेप्स), नार्त्सिस उंड गोल्डमुंड  (१९३०, इं. शी. डेथ अँड द लव्हर) आणि दस ग्लासपेर्लेनश्पील  (१९४३, इं. शी. द ग्लासपर्ल्‌स प्ले) ह्या त्याच्या उल्लेखनीय कादंबऱ्या. आध्यात्मिक व आधिभौतिक ह्यांच्यातील संघर्ष ‘डेथ अँड द लव्हर’ आणि ‘द ग्लासपर्ल्‌स प्ले’ मध्ये त्याने मांडलेला आहे. डेमिआनमध्ये प्रभावी मनोविश्लेषण आढळते. पौगंडावस्थेतील समस्या त्यात त्याने मांडल्या आहेत. मानवामधल्या पाशवी प्रवृत्ती आणि सांस्कृतिक बंधने ह्यांतील विरोध द वूल्फ ऑफ द स्टेप्समध्ये व्यक्त केला आहे. पेटर कामेन्त्सिंडमध्ये संवेदनशील कलावंताचे चित्रण आहे. माणसांच्या स्वभावातील द्वैत हेस परिणामकारकपणे दाखवून देतो. हेसला १९४६ मध्ये साहित्याचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.

रिकार्डा हूख ही एक उल्लेखनीय कादंबरीकर्त्री. स्वच्छंदतावादी वळणाच्या कादंबऱ्या तिने लिहिल्या. जर्मनीतील खानदानी कुटुंबांचा ऱ्हास हा तिच्या कादंबऱ्यांतील एक महत्त्वाचा विषय. तिने कथालेखनही केले.

श्टेफान त्स्वाइख  (१८८१–१९४२) ह्याच्या कादंबरीलेखनात सूक्ष्म मनोविश्लेषण आढळते. एर्स्टेस एर्लेबनिस  (१९११, इं. शी. फर्स्ट एक्स्पिरिअन्स), ड्रायमाइस्टर  (१९२०, इं. शी. थ्री मास्टर्स) आणि आमोक  (१९२२) ह्या त्याच्याविशेषउल्लेखनीयकादंबरिका. कोल्बेनहॉयरह्याने जीवनाच्या प्रश्नांचा जीवशास्त्रदृष्ट्या उलगडा करण्याच्या कामी ऐतिहासिक कथांचा उपयोग केला आहे.

गुस्टाव्ह फ्रेन्सेन, लूटव्हिख फिन्ख, लूटव्हिख थोमा, फ्रीड्रिख ग्रीज, फ्रीड्रिख लीनहार्ड इत्यादींनी मोठी शहरे, निरनिराळे प्रांत, प्रदेश ह्यांतील जीवनावर वास्तववादी कादंबरीलेखन करून प्रादेशिक साहित्य निर्माण केले.

पाउल एर्न्स्ट व व्हिल्हेल्म फोन शोल्त्स ह्यांसारख्या साहित्यिकांनी नव-अभिजाततावादाचा पुरस्कार केला. ब्रूनहिल्ड  (१९०९) आणि क्रीमहिल्ड  (१९१०) ह्यांसारखी एर्न्स्टची नाटके नव-अभिजाततावादी परंपरेतील आहेत. शोल्त्सवर मॉरिस माटरलिंक ह्या बेल्जियन नाटककाराचा प्रभाव जाणवतो.

अभिव्यक्तिवाद :पहिल्या महायुद्धाच्या काळात जर्मनीत ही नवी चळवळ उभी राहिली. १९१० च्या सुमारास जर्मनीतील नव्या पिढीने समकालीन संस्कृतीची समीक्षा आरंभिली होती आणि एका दिशाहीन वातावरणात आपण वावरतो आहोत, असेही तिला वाटू लागले होते. पहिले महायुद्ध १९१४ मध्ये पेटले. तथापि त्याची छाया जाणवत होती. सर्व बूर्झ्वा मूल्ये नष्ट झाल्याची जाणीव झाली होती आणि नव्या मूल्यांची आस निर्माण झाली होती. ह्या पार्श्वभूमीवर ⇨अभिव्यक्तिवादाचा उदय झाला. ह्या असंतोषाच्या सर्व संदर्भांबरोबरच हुसर्ल ह्या जर्मन तत्त्वज्ञाने प्रतिपादिलेला अंतःप्रज्ञावादी रूपविवेचनवाद, फ्रॉइडचे मनोविश्लेषण, स्ट्रिंडबर्ग ह्या स्वीडिश नाटककाराची नाटके ह्यांसारखे संदर्भही ह्या चळवळीच्या उदयामागे आहेत. संस्कारवादाला विरोधी म्हणून अभिव्यक्तिवाद पुढे आला. जीवनानुभवाच्या दृश्य व बुद्धिगम्य स्वरूपाखाली जी अनपेक्षित, चमत्कृतिपूर्ण अशी भावनात्मक सत्ये व अवस्था प्रतीत होतात, त्यांची आवेगपूर्ण, उत्कट व यथार्थ अभिव्यक्ती करणे हे अभिव्यक्तिवादी संप्रदायाचे उद्दिष्ट होते. फ्रांक व्हेदेकिंट (१८६४–१९१८) हा नाटककार चित्रपटीय क्षणचित्रतंत्राचा वापर करून कल्पनारंजित देखाव्यांची माला आपल्या नाटकांत उभी करीत असे. जर्मन अभिव्यक्तिवादी नाटकांचा तो पूर्वसूरी होय. राइनहार्ट योहान्नेस झॉर्ज (१८९२–१९१६) ह्याचे डेर बेटलर  (१९१२, इं. शी. द बेगर) हे खऱ्या अर्थाने पहिले अभिव्यक्तिवादी नाटक मानले जाते. अन्य अभिव्यक्तिवादी नाटककारांत वॉल्टर हाझेनक्लेव्हर, पाउल कोर्नफेल्ड, एर्न्स्ट बार्लाख हा मूर्तिकार, ऑस्कर कोकोश्का हा चित्रकार, ⇨एर्न्स्ट टोलर  (१८९३–१९३९), गेओर्ग कायझर ह्यांचा समावेश होतो. जर्मन नाटककार कार्ल गेओर्ग ब्यूखनर ह्याचे व्योझेक  (१८३६) हे नाटक अभिव्यक्तिवादी आहे. डी मशिनेन श्टुर्मर  (१९२२, इं. भा. द मशीन रेकर्स, १९२३) आणि मास मेन्श (१९२१, इं. भा. मॅन अँड द मासेस, १९२४) ही टोलरची दोन विशेष उल्लेखनीय अभिव्यक्तिवादी नाटके राजकीय विषयांवर आहेत. ध्येयवाद्यांचा भ्रमनिरास ह्या दोन्ही नाट्यकृतींतून दाखविलेला आहे. गेओर्ग कायझर हा अभिव्यक्तिवादी चळवळीतील एक प्रमुख साहित्यिक. प्रचलित समाजव्यवस्थेवर टीकात्मक भाष्य करण्यासाठी त्याने नाट्यकृतीचे माध्यम वापरले. डी कोराल  (१९१७, इं. शी. द कोरल) गास I  व गास II  (१९१८–२०, इं. शी. गास फर्स्ट, गास सेकंड) ही त्याची उल्लेखनीय नाटके. यंत्रयुगाचे मानवी जीवनावर होणारे भीषण परिणाम त्याने मांडले. माणूस हा केवळ ऑटोमॅटन होत आहे हे त्याने दाखविले. स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असलेल्या पात्रांऐवजी वर्गवाचक, प्रातिनिधिक स्वरूपाची पात्रे त्याने रंगभूमीवर उभी केली, हेही महत्त्वाचे आहे. विख्यात अमेरिकन नाटककार ⇨ यूजीन ओनील  (१८८८–१९५३) ह्याच्यावर कायझरचा प्रभाव पडला होता.


एर्न्स्ट स्टॅडलर, गेओर्ग हाइम, ⇨गेओर्ग ट्राक्ल  (१८८७–१९१४), ⇨फ्रांट्स व्हेर्फेल  (१८९०–१९४५), आउगुस्ट श्ट्राम, टेओडोर डायब्लर, गोट्फ्रीट बेन आणि एल्स लास्कर-शूलर ह्यांच्या कवितांतून अभिव्यक्तिवादी वैशिष्ट्ये प्रत्ययास येतात. मृत्यूच्या आणि विनाशाच्या जाणिवेची उदास छाया ट्राक्लच्या कवितेवर पडलेली आहे. आधुनिक संस्कृतीबद्दल त्याच्या मनात उद्‌वेग होता. निरर्थकतेची त्याला येणारी प्रचीती त्याच्या काव्यभाषेतूनही प्रतिबिंबित झालेली आहे. शब्द आणि प्रतिमा निखळलेल्या दुव्यांसारख्या असून केवळ काव्यलयीनेच त्या एकत्र जोडल्यासारख्या वाटतात. आउगुस्ट श्ट्रामची भाषाही तुटक, असंबद्ध आहे. भयाण सर्वनाशाचे चित्र हाइमनेही आपल्या कवितेतून उभे केले. आधुनिक शहरी जीवनातून येणारी अस्वस्थता स्टॅडलरच्या कवितेत आढळते. गोट्फ्रीट बेन हा व्यवसायाने वैद्य होता. त्याच्या कवितेत मानवी दुःखयातनांचे विच्छेदन वैद्यकीय वस्तुनिष्ठतेने केलेले आहे. पुढे तो शून्यवादाकडे वळला. एल्स लास्कर-शूलर ह्या कवयित्रीच्या कवितेत पौर्वात्य देशांची स्वप्नचित्रे आहेत. टेओडोर डायब्लर ह्याने दस नोर्डेलिश्ट  (१९१० – २१, इं. शी. लाइट फ्रॉम द नॉर्थ) ह्या महाकाव्यात सूर्य आणि पृथ्वी ह्यांचा संघर्ष रंगविला आहे. अभिव्यक्तिवाद्यांपैकी फ्रांट्स व्हेर्फेल ह्याची कविता विख्यात अमेरिकन कवी वॉल्ट व्हिटमन ह्याच्या कवितेशी नाते सांगणारी आहे. मानवतेवरील उत्कट प्रेम त्याने तीतून व्यक्त केले आहे. ‘ब्रूडर मेन्श’ –माणूस माझा बंधू–हा त्याचा उद्‌घोष होता. धर्मभावनेचा उत्कट सूर त्याच्या कवितांतून उमटलेला आहे. व्हेर्फेलने नाटके आणि कादंबऱ्याही लिहिल्या. डेअर श्पीगेलमेन्श  (१९२०, इं. शी. द मिरर–मॅन) ह्या त्रिनाट्यातून माणसाचा खरा स्वभाव आणि त्याने चेहऱ्यावर चढविलेला मुखवटा ह्यांतील विरोध प्रत्ययकारीपणे दाखविला आहे. धर्मभावना आणि नैतिक मूल्यांची जाणीव त्याच्या कथा-कादंबऱ्यांतूनही दिसून येते. श्रेष्ठ साहित्यिक ⇨ फ्रांट्स काफ्का  (१८८३–१९२४) ह्याने डेर प्रोत्सेस  (१९२५, इं. शी. द ट्रायल), डेस श्लोस  (१९२६, इं. शी. द कासल), अमेरिका  (१९२७) ह्या कादंबऱ्या व काही कथा लिहिल्या. त्याच्या लेखनातही काही अभिव्यक्तिवादी वैशिष्ट्ये दिसून येत असली, तरी त्याच्या प्रतिभेची स्वतंत्र प्रकृतिवैशिष्ट्ये विशेषत्वाने प्रत्ययास येतात. मानवी अस्तित्वाच्या मूलप्रश्नांचे काफ्काने आपल्या साहित्यकृतींतून प्रतीकात्म, प्रत्ययकारी दर्शन घडविले. भयनिराशेने कोंडमारा झालेले आधुनिक मानवी मनच त्याच्या कथा-कादंबऱ्यांतून विस्तारल्यासारखे वाटते. न्याय, सुरक्षितता ह्यांसारख्या मूलभूत मानवी अपेक्षांचे वैय्यर्थ्य काफ्काने आपल्या साहित्यातून भेदकपणे दाखवून दिले आहे. अस्तित्ववादी साहित्यिक म्हणूनही काफ्काचा उल्लेख केला जातो. ⇨ बेर्ट्रोल्ट ब्रेक्ट  (१८९८–१९५६) ह्याच्या नाटकांवर अभिव्यक्तिवादाचा प्रभाव जाणवत असला, तरी मार्क्सवादी दृष्टिकोण हे त्याच्या नाटकांचे एक विशेष लक्षणीय वैशिष्ट्य आहे. नाझींच्या राजवटीत त्याला परागंदा व्हावे लागले होते. ब्रेक्टच्या नाटकांत प्रचार असला, तरी त्यांची नाट्यवत्ता मोठी होती त्याने वापरलेले रंगतंत्रही वैशिष्ट्यपूर्ण होते. रंगभूमीवरील घटनांवर ध्वनिवर्धकातून निवेदकाने भाष्य करणे, नटांनी आपण कोण आहोत आणि काय करतो आहोत हे प्रेक्षकांना सांगणे इत्यादींचा त्यात अंतर्भाव होतो. मुट्टर कुराज उंड ईर किंडर  (१९४१, इं. शी. मदर करेज अँड हर चिल्ड्रन) ही त्याची विशेष लोकप्रिय व गाजलेली नाट्यकृती. तीत एका स्त्रीच्या कथेतून युद्धाची विध्वंसकता दाखविली आहे. डेअर गूट मेन्श फोन सेत्सुआन  (१९४३, इं. भा. द गुड वूमन ऑफ सेत्सुआन, १९४३), डेअर कौकाझिश क्रायडक्लाइस  (१९४७, इं. शी. कॉकेशियन चॉक सर्कल) ह्या त्याच्या अन्य उल्लेखनीय नाट्यकृती. ‘कॉकेशियन चॉक सर्कल’ चे मराठी रूपांतर चिं. त्र्यं. खानोलकर ह्यांनी अजब न्याय वर्तुळाचा  ह्या नावाने केले आहे. लेओनार्ट फ्रांक ह्याने डेअर मेन्श इश्ट गूट  (१९१७, इं. शी. मॅन इज गुड) या आपल्या कथासंग्रहातून युद्धविरोधी भूमिका मांडली आहे.

पहिल्यामहायुद्धानंतर : ह्या काळात अभिव्यक्तिवादाचा प्रभाव कमी होत गेला आणि ‘नॉय साखलिशकाइट’चा म्हणजेच नव्या वस्तुनिष्ठतेचा आग्रह सुरू झाला. युद्धोत्तर काळात एका कठोर वस्तुस्थितीला तोंड द्यावे लागले. चलनवाढ, महामंदी ह्यांसारख्या संकटांनी दारिद्र्य, बेकारी वाढली. नवमूल्यनिर्मितीच्या आकांक्षेतून उभ्या राहिलेल्या अभिव्यक्तिवादालाही मर्यादा आहेत, असे जाणवू लागले आणि एका नव्या, वस्तुनिष्ठ दृष्टिकोणातून परिस्थितीचे निर्विकार, अलिप्त विश्लेषण व मूल्यमापन करण्याची प्रवृत्ती दृढावली. तिच्या प्रभावाखाली लिहिल्या गेलेल्या कादंबऱ्यांत युद्धविषयक कादंबऱ्यांचे प्रमाण अर्थातच मोठे आहे. ⇨आर्नोल्ट त्स्वाइख  (१८८७–१९६८) ह्याची डेअर श्ट्राइट उम डेन सेर्जाआंटेन ग्रिशा  (१९२७, इं. शी. द केस ऑफ सार्जंट ग्रिशा) आणि ⇨ एरिख मारीआ रेमार्कच्या (१८९८–१९७०) इम वेस्टेन निश्टस नॉयेस  (१९२८, इं. शी. ऑल क्वाएट ऑन द वेस्टर्न फ्रंट) ह्या दोन प्रसिद्ध कादंबऱ्या ह्या संदर्भात विशेष उल्लेखनीय आहेत. युद्धातील अनुभवांचा भेदकपणा त्या प्रत्ययकारीपणे दाखवून देतात. हान्स फाल्लाडाने क्लाइनर मान वास नून ?  (१९३२, इं. शी. लिट्ल मॅन, व्हॉट नाऊ?) ह्या कादंबरीत महायुद्धोत्तर जर्मनीतील सामाजिक-राजकीय परिस्थितीवर विदारक भाष्य केलेले आहे.

डेअर हाऊप्टमान फोन क्‌योपनिक (१९३१, इं. शी. द कॅप्टन ऑफ क्योपेनिक) ह्या आपल्या नाट्यकृतीत कार्ल त्सुकमायरने लष्करशाहीचा तीव्र उपरोध केला आहे. डेस टॉयफेल्स गेनेराल  (१९४६, इं. शी. द डेव्हिल्स जनरल) ह्या त्याच्या नंतरच्या नाटकात हिटलरच्या अन्यायी राजवटीची जाणीव झालेल्या एका सेनानीचे प्रभावी चित्र त्याने रेखाटले आहे. आपण एका सैतानाचे सेनानी आहोत, ही जाणीव झालेला एक जनरल अखेरीस आत्मघात करून घेतो, असे ह्या नाट्यकृतीत दाखविले आहे. बेर्लिन आलेक्सांडर प्लात्स  (१९२९, इं. शी. अलेक्झांडर स्क्वेअर, बर्लिन) मध्ये आल्फ्रेड डब्लीन ह्याने संज्ञाप्रवाहतंत्राचा प्रभावी उपयोग करून घेतला आहे. अभिव्यक्तिवादी प्रवृत्ती ह्या कादंबरीत आढळतात. एरिक केस्टनरने नाझींची सत्ता येण्यापूर्वीच्या जर्मनीतील परिस्थितीचे उपरोधपूर्ण चित्र फाबिअन, डी गेशिस्ट आयनेस मोरालिस्टेन  (१९३१, इं. शी. फाबिअन, द स्टोरी ऑफ अ मोरलिस्ट) ह्या कादंबरीत रंगविले आहे.

हेर्मान ब्रोख ह्याच्या डी श्लाफवांडलर (१९३१-३२, इं. शी. व स्लीपवॉकर्स) ह्या कादंबरीत्रयाचा (ट्रिलॉजी) उल्लेख आवश्यक आहे. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपासून महायुद्धापर्यंत जर्मन समाजाच्या झालेल्या ऱ्हासाचा हा इतिहासपट शैलीचे विविध प्रयोग करीत ब्रोखने उलगडीत नेला आहे. टोड डेस व्हर्जिल (१९४५, इं. शी. डेथ ऑफ व्हर्जिल) ह्या त्याच्या नंतरच्या कादंबरीत त्याने संज्ञाप्रवाहतंत्राचा परिणामकारक वापर केला. स्वप्नवास्तवांचे एकसंघन साधणाऱ्या विलक्षण प्रभावी शैलीत बोखने व्हर्जिलचे अखेरचे क्षण टिपले आहेत. ब्रोखच्या चिंतनशील व्यक्तिमत्त्वाचा व सामाजिक-राजकीय प्रश्नांसंबंधीच्या आस्थेचा ठसा त्याच्या साहित्यावर लक्षणीयपणे उमटलेला आहे. ⇨एर्स्ट युंगरचे (१८९५– ) इन श्टालगेविटर्न (१९२०, इं. शी. स्टॉर्म ऑफ स्टील) हे युद्धाचे स्वागत करणारे पुस्तक जर्मन राष्ट्रवादी तरुणांना स्फूर्तिदायक ठरले होते. एर्न्स्ट युंगरमध्ये नाझींना आपला समानधर्मा दिसत होता; तथापि युंगरने ‘आउफ डेन मार्मोरंक्लिप्पेन’ (१९३९, इं. शी. ऑन द मार्बल क्लिप्स) ही प्रतीकात्मक कथा लिहून संस्कृतीच्या श्रेष्ठ मूल्यांना पायदळी तुडविणाऱ्या शासनपद्धतीचा निषेध केला आणि नाझी राजवटीबद्दल नापसंती व्यक्त केली.


एर्न्स्टचा बंधू फ्रीड्रिख युंगर हा कवी होता. क्लोपश्टोक आणि हल्डरलीन ह्यांच्या कवितांचा प्रभाव त्याच्या कवितेवर जाणवतो. परंपरेचे तीव्र भान त्याने ठेवलेले आहे. आर. ए. श्रडर आणि योसेफ व्हाइनहेबर ह्यांच्यातही ते आढळते. अभिजाततावादी परंपरांचे पुनरुज्जीवन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आकृतिबंधाची जाणीव त्यांनी काळजीपूर्वक जोपासली.

स्विस कवी ⇨कार्ल श्पिटेलर  (१८४५–१९२४) ह्याला १९१९ मध्ये साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळाले. तथापि त्याच्या महत्त्वाच्या कृति–प्रोमेथॉयस उंड एपिमेथॉयस  आणि ओलिम्पिशर फऱ्यूलिंग  ही दोन महाकाव्ये–अनुक्रमे १८८१ आणि १९०५ मध्ये प्रसिद्ध झाली. नीत्शेच्या आल्झो श्प्राख् त्साराथुस्ट्रा  (१८८३) ह्या ग्रंथातील व्यक्तिवादी विचारसरणीशी जुळणारे तत्त्वज्ञान प्रोमेथॉयस … मध्ये आले आहे. नीत्शेचा हा ग्रंथ प्रसिद्ध होण्याआधी दोन वर्षे हे महाकाव्य प्रसिद्ध झाले होते. दुसऱ्या महाकाव्यात प्राचीन मिथ्यकथाधारे आदर्श स्वित्झर्लंडचे स्वप्नप्रतीक उभे केले आहे आणि शिवाशिवांतील संघर्ष दाखविला आहे.

कॅथलिक धर्मपंथाच्या मूल्यांचा प्रभाव असलेल्या साहित्यिकांत गेर्ट्रूट फोन ल फोर्ट ह्या कवयित्री-कादंबरीकर्त्रीचा आणि व्हेर्नर बेर्गेनग्ऱ्यून ह्या कथा-कादंबरीकाराचा समावेश होतो.

एमिल लूटव्हिख ह्याने गटे, लिंकन, नेपोलियन, बिस्मार्क इत्यादींची चरित्रे लिहिली. १९०६ ते १९४२ पर्यंत हे चरित्रलेखनाचे कार्य तो करीत होता.

दुसऱ्यामहायुद्धानंतरचेजर्मनसाहित्य : नाझी चळवळ विनाशक स्वरूपाची होती आणि तिचा परिणाम जर्मनीला भोगावा लागला. दुसऱ्या महायुद्धात जर्मनी पराभूत झाले त्याची फाळणी झाली. सामाजिक-आर्थिक जीवन उद्ध्वस्त झाले. ह्या परिस्थितीचा परिणाम साहित्यावरही झाला. दर्जेदार साहित्यनिर्मितीला अनुकूल असे वातावरण नंतर हळूहळू निर्माण झाले. नाझी राजवटीत अनेक साहित्यिकांच्या साहित्यावर बंदी आणण्यात आलेली होती. ते साहित्य युद्धोत्तर काळात प्रकाशात आले. नाझींच्या हातून मारली गेलेली गेर्ट्रूट कोल्मार ही एक श्रेष्ठ कवयित्री मरणोत्तर ख्याती पावली.

ओस्कार ल्योर्क आणि व्हिल्हेल्म लेमान ह्या दोन निसर्गकवींचा प्रभाव काव्यक्षेत्रात पडला. निसर्गाचे सूक्ष्म निरीक्षण त्यांच्या कवितेत आढळून येते. ‘डेअर आटेम डेअर एर्ड’ (१९३०) हे ओस्कार ल्योर्कचे काव्य प्रसिद्ध आहे. आनेट फोन ड्रोस्ट-ह्यूत्सहोफ ह्या कवयित्रीच्या परंपरेतला हा कवी वाटतो. डेअर ग्ऱ्यून गोट्ट  (१९४२, इं. शी. ग्रीन गॉड) हा लेमानचा एक उल्लेखनीय काव्यसंग्रह. लेमानची कविता वनस्पतिजीवनाशी आणि प्राणिसृष्टीशी इतकी एकरूप झालेली आहे, की तिच्या परिपूर्ण आकलनासाठी वनस्पतिशास्त्राचे व प्राणिजीवनाचे ज्ञान आवश्यक वाटते.

इंगबोर्ग बाखमान, रूडोल्फ हागेनश्टांग, कार्ल क्रोलो, हाइन्त्स पिओटेक, ग्यूंटर आइश आणि पाउल सेलान हे आणखी काही उल्लेखनीय कवी. आपापल्या परीने जर्मन काव्य समृद्ध करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. काव्याच्या आकृतिबंधाच्या संदर्भात ते प्रयोगशील होते. ह्या सर्वांत पाउल सेलान हा विशेष महत्त्वाचा. त्याची कविता तंत्राच्या दृष्टीने सफाईदार आहेच तथापि तिच्यात एक व्यापक आवाहनक्षमताही आहे.

माक्स फ्रिश आणि फ्रीड्रिख ड्यूरेनमाट ह्या दोन स्विस नाटककारांनी दुसऱ्या महायुद्धानंतरच्या जर्मन नाट्यवाङ्‌मयाला महत्त्वाचा हातभार लावला. नून झिंगेन झी वीडर  (१९४६) व आंडोरा  (१९६२) ही फ्रिशची नाटके म्हणजे आधुनिक जीवनातील नीतिनाट्येच (मोरालिटी प्लेज) होत. आधुनिक जगात बुद्धिमंतांचे स्थान काय, ह्याचा शोध फ्रिशने आपल्या कादंबऱ्यांतून घेतला. डेअर बेसूख डेअर आल्टेन डाम  (१९५५) हे ड्यूरेनमाटचे नाटक विख्यात आहे. अप्राप्य ध्येयांची निरर्थकता ड्यूरेनमाटने आपल्या नाटकांतून दाखवून दिली समाजातील तथाकथित प्रतिष्ठितांच्या दंभावर मार्मिकपणे बोट ठेवले.

हाइन्रिख ब्योल  (१९१७– ) हा श्रेष्ठ कादंबरीकार. युद्धोत्तर काळातील वैफल्याचे आणि विस्कटलेल्या जीवनाचे दर्शन ब्योल आपल्या कादंबऱ्यांतून प्रभावीपणे घडवितो. हाउस ओन ह्यूटर  (१९५४) ही कादंबरी त्या दृष्टीने विशेष उल्लेखनीय. युद्धात मारल्या गेलेल्यांच्या मुलांच्या आणि विधवांच्या उद्ध्वस्त जीवनाचे चित्रण तीत आले आहे. ब्योलला १९७२ चे नोबेल पारितोषिक देण्यात आले.

गेर्ड गायझरच्या श्लुसबाल  (१९५८) ह्या कादंबरीत नाझींच्या गुन्ह्यांबद्दल बेफिकिरी दाखविणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध आहे. डी ब्लेशट्रोमेल  (१९५९) ही ग्यूंटर ग्रास ह्याची एक उपरोधपूर्ण कादंबरी. एका वेड्याला डॅन्‌झिग हे शहर नाझीपूर्व आणि नाझी राजवटीच्या काळात कसे दिसले त्याचे वर्णन ह्या कादंबरीत आहे. जर्मनीच्या फाळणीमुळे निर्माण झालेला प्रश्न, ऊव योंझोन ह्याने आपल्या मूटमासुंगेन युबर याकोब  (१९५९) ह्या कादंबरीत मांडलेले आहेत.

संदर्भ : 1. Bertaux, Felix Trans. Trounstine, J. Panorama of German Literature from 1871 to 1931,  New York, 1935.

2. Bithell, Jethro, Modern German Literature : 1880–1950, London, 1959.

3. Bruford, W. H. Germany in the 18th Century, Cambridge, 1935.

4. Francke, Kuno, History of German Literature as Determined by Social Forces, New York, 1931.

5. Friedrich, Werner P. History of German Literature, New York, 1948.

6. Natan, Alex, German Men of Letters : 12 Critical Essays, London, 1961.

7. Robertson, J. G. History of German Literature, Edinburgh, 1931.

8. Rose, Ernest, A History of German Literature, New York, 1960.

9. Scherer, W. Trans. Conybeare, F. History of German Literature, Oxford, 1906.

10. Thomas, Calvin, History of German Literature, New York, 1928.

११. घारपुरे, न. का. जर्मन वाङ्‌मयाचा इतिहास, पुणे, १९७३.

१२. फ्रीड्रिख, व्हेर्नर पी. अनु. चापेकर, र. ना. जर्मन वाङ्‌मयेतिहासाची रूपरेषा, पुणे, १९७२.

कुलकर्णी, अ. र.; घारपुरे, न. का.