जयलाल : (सु. १८८५ — १९४९). प्रख्यात कथ्थक नर्तक. आडनाव मिश्रा. ते ⇨ कथ्थक नृत्यपरंपरेतील जयपूर घराण्याचे. तेथील एका नर्तक घराण्यात जन्म. प्रारंभीची साधना त्यांनी आपले वडील चुनीलाल यांच्या मार्गदर्शनाखाली केली. त्यानंतर लखनी घराण्यातील प्रसिद्ध नर्तक बिंदादीन महाराज आणि स्वतःचे चुलते दुर्गाप्रसाद यांच्याकडेही त्यांची साधना झाली. जयपूर घराण्यातील नृत्यशैलीमध्ये प्रावीण्य संपादन केल्यानंतर त्यांनी रायगड, शाहपूर, मनोहरपूर, मुंबई, कलकत्ता येथे तसेच नेपाळमध्ये नृत्याचे कार्यक्रम सादर करून नावलौकिक मिळविला. काही काळ ते जयपूर दरबारीही होते. जयलाल तबला व पखावज वादनातही निपुण होते, तसेच ते उत्तम संगीतज्ञही होते. त्यांनी कथ्थकमध्ये चक्रधारीवजा दीर्घ परनांची (नृत्ताचा म्हणजे केवळ तालबद्ध अंगविक्षेपांचा एक प्रकार) रचना करून तीतून विविध ने तालांचे अनेक बारकावे सादर केले. तद्वतच कथ्थकमध्ये वैचित्र्य आणून तालांच्या नाना कसरती व लालित्य यांची त्यास जोड दिली. कथ्थक नृत्यशैलीला त्यांनी दिलेली ही अमूल्य देणगी होय. तोड्यातुकड्यांची पढन्त तयार करणे, जोघपूर्ण नृत्यांगांची साथ कथ्थकला देणे तसेच न बोललयीतील अद्वितीयत्व ह्या सर्व वैशिष्ट्यांमुळे कथ्थकच्या इतिहासात त्यांचे स्थान मोठे आहे. जयलाल ह्यांनी आपला मुलगा रामगोपाल व मुलगी जयकुमारी यांनाही उत्तम नर्तक म्हणून तयार केले. कलकत्ता येथे त्यांचे निधन झाले.
वडगावकर, सुरेंद्र