जमुनिया : (याकूत, ॲमेथिस्ट). खनिज. निळा, निळसर जांभळा किंवा नीलशोण रंगाचा स्फटिकी क्वार्ट्‌झाचा प्रकार. कठिनता ७. वि. गु. २·६५–२·६६. पारदर्शक. हे मुख्यतः ज्वालामुखी खडकांमधील पोकळ्यांत सर्वत्र आढळते. महाराष्ट्रातील बेसाल्टी (कातळ) खडकांत, धारवाडी खडकांत तसेच जबलपूरनजीक, बशरक्षेत्र (पंजाब) वगैरे ठिकाणी जमुनिया सापडते. याचा रंग सर्वत्र सारखा नसल्याने वापरण्यापूर्वी खनिज तापवून तो सारखा करून घेतात. मात्र जास्त तापविल्यास रंग उदी, पिवळा, क्वचित हिरवा होतो व शेवटी निघून जातो. याचे खडे व मणी दागिन्यांत आणि शोभिवंत वस्तूंमध्ये वापरतात. जमुनियाने दारूची नशा टाळता येते, या समजुतीमधुन विषबाधेपासून निवारण करणारा खडा अशा अर्थाच्या ग्रीक शब्दावरून ॲमेथिस्ट हे इंग्रजी नाव आले आहे.

पहा : क्वॉर्ट्‌झ.

ठाकूर, अ. ना.