जप : जप म्हणजे अक्षर, शब्द, नाम, वाक्य, श्लोक अथवा मंत्र मनापासून उच्चारणे. धार्मिक संदर्भात जप म्हणजे मोठ्याने, हळू किंवा मनातल्या मनात मंत्राचा उच्चार करणे. जप तीन प्रकारचा : वाचिक, उपांशू व मानसिक. वाचिक म्हणजे वाणीने स्पष्ट म्हटलेला, दुसऱ्यास ऐकू जाणारा. यापेक्षा अधिक पुण्यकारक उपांशू जप होय. जिव्हेने अगदी हळू उच्चारायचा तो उपांशू जप होय. मानसिक जप म्हणजे मनातल्या मनात म्हणायचा. हा सर्वांत पुण्यकारक होय. वेदकालापासून यज्ञसंस्थेत होमादी कर्मकांड चालत असता काही विशिष्ट मंत्राचा किंवा मंत्रांचा जप करण्याची पद्धती पडली आहे. उपनयन संस्काराच्या वेळी आचार्याने सावित्री मंत्राचा उपदेश करावयाचा असतो. हा मंत्र बहुतेक गायत्री छंदात असतो, म्हणून त्यास गायत्री मंत्र म्हणतात. हिंदू, जैन, बौद्ध, शीख इ. भारतीय धर्मसंप्रदायांमध्ये संप्रदायाची दीक्षा ज्या व्यक्तीला देतात त्या व्यक्तीला इष्टदेवतेचा मंत्र जपण्याकरीता गुरूने द्यावयाचा असतो. यहुदी (ज्यू), ख्रिस्ती वा इस्लाम धर्मांमध्ये मंत्र जपाची पद्धती आहे. मंत्रामध्ये देवाची एक किंवा अनेक नावे किंवा गुणवाचक शब्द असतात. जप हा हाताच्या बोटांनी किंवा माळेतील मण्यांनी किंवा सूत्रातील म्हणजे दोरीतील गाठींनी मोजून हृदयापासून हळूहळू अथवा मनातल्या मनात शुचिर्भूत होऊन एकाग्र चित्ताने उच्चारावयाचा असतो.
जगातील सर्व धर्मांतील धार्मिक लोकांत जपमाला वापरण्याची पद्धती आहे. जपमालेत ३२, ९९, १०८ वा इतर संख्या असलेले मणी किंवा गाठी असतात. मणिसंख्या किंवा ग्रंथिसंख्या ही त्या त्या ठराविक असते. कित्येकांच्या संप्रदायाप्रमाणे मणिसंख्या वैकल्पिक असते, म्हणजे ठराविक निरनिराळ्या संख्येची असते. शैव, वैष्णव इत्यादिकांच्या जपमालेमध्ये साधारणपणे १०८ मणी असतात. शैव हे मुख्यतः रुद्राक्षांची माला करतात आणि वैष्णव तुळशीच्या लाकडाची माला करतात. कित्येकांच्या मालेमध्ये चंदनाच्या लाकडाचेही मणी असतात. प्रवाळ, मोती, विविध प्रकारची रत्ने यांच्याही जपमाला असतात. या जपमालेच्या द्वारे ‘ॐ नमः शिवाय’, ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ इ. विविध अक्षरसंख्येचे इष्टदेवतेचे मंत्र जपावयाचे असतात.
पातंजल योगसूत्रांमध्ये प्रणवाचा म्हणजे ‘ओम्’ काराचाच जप मुख्यतः करावयास सांगितला आहे. ॐ म्हणजे साक्षात परमेश्वर किंवा परब्रह्म होय. जप म्हणजे ईश्वराचे स्वरूप म्हणजेच प्रणवाचा अर्थ मनात सतत ठेवणे. जपाने पापक्षालन होते, इष्टदेवतेची कृपा होते, इष्टकामनेची सिद्धी होते, रोगनिवारण होते, अनिष्ठाचा निरास होतो अशा प्रकारची फलिते जपकर्माची सांगितली आहेत. जपमालेला ‘स्मरणी’ ही म्हणतात. कित्येक साधक ही स्मरणी गोमुखी नावाच्या पिशवीत ठेवून त्यातच हात झाकून घेऊन जप करीत असतात.
जप हे मानसिक कर्म आहे. यज्ञ, पूजा, आराधना, होमहवन इ. कर्मांचा जप हा एक प्रधान किंवा अंगभूत भाग असतो. काहींच्या मते संध्यावंदनातील जप हे प्रधान कर्म आहे. जप हे संध्यावंदनाशिवायही प्रधान कर्म असते. उदा., गायत्री पुरश्चरण. पूजा, स्तोत्र, होम इ. जपकर्माची अंगे म्हणून मानली जातात. इतर कोणतीही अंगे न आचरताच नुसता नामजपही चित्तशुद्धिकारक, पापनाशक, ईशकृपेचा साधक मानला आहे. संतवाङ्मयात असाच नाममहिमा वर्णिला आहे. भगवद्गीतेत सर्व यज्ञामध्ये जपयज्ञ हा माझी म्हणजे भगवंताची विभूती होय, असे म्हटले आहे. मनस्मृतीत जप हा सिद्धिकारक मानला असून इतर कर्मे करा अथवा न करा, असे म्हटले आहे.
जोशी, लक्ष्मणशास्त्री