जतिस्वरम् : एक दाक्षिणात्य संगीतप्रकार. ⇨ स्वरजतिप्रमाणेच पल्लवी अनुपल्लवी आणि चरण हे विभाग असलेला पण साहित्य (शब्दसंहिता) नसलेला हा प्रकार नृत्याबरोबर गायिला जातो. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी उदयास आलेल्या या प्रकारात स्वरनामांची निदर्शक अशी अक्षरे–सरगम–गायली जातात. स्वाती तिरुनल, पोन्नया, शिवनंदम् इत्यादींच्या जतिस्वरम्–रचना प्रसिद्ध आहेत. जतिस्वरम् हा प्रकार संगीतातील लयकारी या अंगाच्या दृष्टीने वेधक असतो. एका अनामिक रचनाकाराची बीलहरी रागातील ‘सा रे ग प ध सा नी ध’ अशी सुरू होणारी रचना हे या प्रकाराचे चांगले उदाहरण होय.

रंगाचारी, पद्मा (इं.) रानडे, अशोक (म.)