जगाधरी : हरयाणा राज्याच्या अंबाला जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ३५,०९४ रेल्वे कॉलनी ७,३३२ (१९७१). हे अंबाल्याच्या आग्नेयीस सु. ५५ किमी.वर आणि अंबाला-सहारनपूर यांना जोडणाऱ्या हमरस्त्यावर आहे. नादिरशाहच्या स्वारीत हे उद्‍ध्वस्त झाले होते. परंतु बुरियाच्या रायसिंगच्या प्रयत्नामुळे याचे पुनर्वसन झाले (१७८३). मोगल काळापासून हे कासे, तांबे आणि पितळ यांच्या भांड्यांसाठी प्रसिद्ध असून धान्य, कापड, लाकूड, टाकणखार, ऊस इत्यादींची ही प्रमुख बाजारपेठ आहे. तसेच येथे कापूस-पिंजणी कारखाने, कागद गिरणी, रासायनिक द्रव्यांचा कारखाना, हातमागावरील कापड विणणे आणि रंगविणे इ. अनेक उद्योगधंदे चालतात.

याच्या आग्नेयीस सु. ७ किमी.वरील सुध हे गाव नष्टप्राय झाले असले, तरी सातव्या शतकात ते बौद्धांचे आणि हिंदूंचे शिक्षणकेंद्र होते, असे म्हणतात.

कापडी, सुलभा