जगन्नाथदास–२ : (अठरावे शतक). कर्नाटकातील एक प्रसिद्ध संतकवी. वैष्णव मताचा प्रसार करणारे संत कर्नाटकात ‘हरिदास’ वा ‘दास’ म्हणून ओळखले जातात. श्रीपादराय (सु. १५००) यांच्यापासून या दासकूट वा दासपरंपरेचा प्रारंभ मानला जातो. दास हे द्वैतवादी माध्व मताचे पुरस्कर्ते होते. दासपरंपरेच्या साहित्यात ⇨ पुरंदरदासांच्या (१४८४–१५६४) खालोखाल जगन्नाथदासांचे स्थान आहे. जगन्नाथदासांचा जन्म बागवटी (जि. रायचूर) ह्या गावी एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे मूळ नाव श्रीनिवास व सांप्रदायिक नाव जगन्नाथदास. वडिलांचे नाव नरसप्पा. मंत्रालय मठाचे प्रमुख आचार्य वरदेंद्रस्वामी यांच्याजवळ जगन्नाथदासांचे आरंभीचे शिक्षण झाले. नंतर ते विजयदासांचे अनुयायी बनले. जगन्नाथदास संस्कृतचे गाढे पंडित होते. कन्नड भाषेवर उत्कट प्रेम, निःसीम संप्रदायनिष्ठा, आत्यंतिक भक्ती आणि विशाल दृष्टी यांचा सुंदर समन्वय त्यांच्या व्यक्तिमत्त्वात झाला होता. त्यांच्या रचनेतही या गुणांचेच प्रतिबिंब उमटलेले दिसते.
हरिकथामृतसार हा महत्त्वाचा तात्त्विक व सांप्रदायिक ग्रंथ त्यांनी षट्पदी छंदात रचला असून त्यात सु. एक हजार षट्पदी व बत्तीस संधी (विभाग) आहेत. माध्व मताची तत्त्वे सुबोध व सुंदर शैलीत त्यांनी त्यात विशद केली आहेत. जगन्नाथदासांनी उच्चनीच, वंद्यनिंद्य अशा द्वंद्वांना बगल देऊन ‘सर्वत्र समदृष्टी’ ह्या कल्पनेवर भर दिला.
त्यांनी अनेक भक्तिपर पदे व काही कीर्तनेही रचिली आहेत. ती प्रासादिक व मार्मिक आहेत. भक्ताच्या देवाबाबतच्या प्रेमापेक्षा देवच भक्ताबाबत अधिक आस्था आणि प्रेम बाळगतो, हे दासतत्त्व त्यांनी आपल्या एका कीर्तनात सुंदर प्रकारे मांडले आहे. हरिस्तुती, गुरुस्तुती आणि आध्यात्मिक अनुभव त्यांच्या पदांत व कीर्तनांत व्यक्त झाले आहेत. माध्व मतानुयायी त्यांच्या हरिकथामृतसार ह्या ग्रंथाचे मोठ्या भक्तिभावाने पारायण करतात.
संदर्भ : Krishna Rao, M. V. Purandara and the Haridas Movement, Dharwar, 1966.
दिवेकर, गु. व्यं.