जझिया कर : मूळ इस्लामी धर्मशास्त्राप्रमाणे अश्रद्ध किंवा इस्लामेतर लोकांना इस्लामी राज्यांतून धर्मांतर किंवा मृत्युदंड यांशिवाय तिसरा पर्याय नाही. याला अपवाद फक्त ‘अह्मूल-एह्-किताबीं ’चा म्हणजे ज्यांचा एकमेव धर्मग्रंथ आहे अशा ज्यू किंवा ख्रिस्ती धर्मांच्या लोकांचा. त्यांना सक्तीचे धर्मांतर किंवा मृत्युदंड यांऐवजी जझिया (जिझया) हा दरडोई कर भरण्याची मुभा असे. वयात आलेल्या प्रत्येक धडधाकट पुरुषाला हा कर भरावा लागे. इस्लामी धर्मशास्त्राप्रमाणे प्रत्येक मुसलमानाला जरूर असेल तेव्हा जिहाद वा धर्मयुद्धात भाग घेणे आवश्यक असते. त्यामुळे जझिया भरणाऱ्या ज्यू-ख्रिस्ती लोकांना हा कर भरून आवश्यक अशा जिहादच्या सैन्यभरतीतून मुक्तता आणि संरक्षण मिळविता येई. भारत इस्लामी साम्राज्याखाली आल्यावर हिंदू हे ज्यूही नाहीत वा ख्रिस्तीही नाहीत त्यामुळे जझिया लादून धिम्मी किंवा दुय्यम दर्जाचे संरक्षित नागरिक म्हणून राहण्यास मुभा देणे धर्मशास्त्रानुसार विहित आहे की नाही, यावर मोठा वाद निर्माण झाला होता. शेवटी सुलतानांनी हिंदूंना धिम्मी म्हणून वागविण्याचे ठरविले आणि त्यांच्याकडून जझिया वसूल करण्यास सुरुवात केली. काही अपवाद सोडता बहुतेक सुलतानांनी व बादशाहांनी हिंदूंवर जझिया कर लादला होता. धर्मपंडितांच्या आग्रहामुळे हिंदूंकडून जझिया वसूल करताना त्याच्या तोंडावर थुंकणे इ. प्रकारे त्याची मांनहानी केली जाई. कारण इस्लामी धर्मशास्त्रानुसार हिंदूंना धिम्मी म्हणून देखील वागणूक देणे चुकीचे होते. सर्वांना मारून टाकणे अशक्य असल्यामुळेच त्यांच्या मानहानीचा पर्याय शोधण्यात आला.
करंदीकर, म. अ.