जंबुरी : (ईडलिंबू हिं. बडा निंबू, जंबिरा गु. मोटा लिंबू क. देवमदला सं. महा निंबू इं. लेमन, रफ लेमन लॅ. सिट्रस मेडिका प्रकार–लिमोनम कुल–रूटेसी). हा लहान वृक्ष भारतात लागवडीत आहे. जंबुरीचे झाड वेडेवाकडे तीन-साडेतीन मी. उंच वाढते. ते भारताच्या ईशान्य भागात समुद्रसपाटीपासून १,२०० मी. उंचीवरील प्रदेशात जंगली अवस्थेत वाढत असलेले आढळते. सामान्यतः महाराष्ट्रात लहान फळबागांमधून थोडी थोडी झाडे असतात. याच्या डहाळ्यांवर काटे असतात. याची अनेक लक्षणे ⇨सिट्रस वंशात व ⇨ रूटेसी  कुलात वर्णिल्याप्रमाणे आहेत. पानाचा देठ नाममात्र सपक्ष (पंखासारखा विस्तारित भाग असलेला) असतो. फुलाच्या पाकळ्या मागील बाजूस किंचित लालसर, जांभळट असतात. फळ आयत, अंडाकृती असून टोकास स्तनाग्राप्रमाणे असते फळाचा रंग पिवळा, साल जाड व मगज (गर) आंबट असतो. फळ महाळुंगापेक्षा लहान असते.

भारतातील लागवडीखालचे परदेशी प्रकार युरेका, व्हिला फ्रँका, लिस्बन, नेपाळी, ऑब्लाँग, माल्टा, नेपाळी गोल, इटालियन इ. आहेत. निरनिराळ्या प्रकारच्या निचऱ्याच्या जमिनींत कोरडवाहू अगर बागायती परिस्थितीत वाढून हे झाड भरपूर फळे देते. लागवड रोपे लावून करतात. रोपे सपाट वाफ्यात किंवा गादी वाफ्यावर तयार करतात. बियांसाठी निवडलेली फळे झाडावरच जास्त पिकू देतात. जंबुरीची फळे साधारणपणे जुलै ते सप्टेंबर या मुदतीत पिकतात. एकेका फळातून २५ पर्यंत बिया मिळतात. पेरलेले बी उगवायला २२ ते ८० पर्यंत दिवस लागतात. रोपांची योग्य वाढ झाल्यावर त्यांचा उपयोग विशेषतः संत्रे, मोसंबी, कागदी लिंबू वगैरे सिट्रस  वंशातील फळझाडांची डोळे भरून कलमे करण्यासाठी खुंट म्हणून करतात.

भारतात फळांचे लोणचे करतात, ते प्लीहावाढीवर (पानथरीच्या वाढीवर) उपयुक्त असते. पाश्चात्य देशांत फळांपासून जॅम, जेली, मार्मालेड वगैरे खाद्यपदार्थ बनवितात. फळांची साल दीपक (भूक वाढविणारी) व वायुनाशी असते. फळांचा रस आंबट असतो. तो स्कर्व्हीनाशक (क जीवनसत्त्वाच्या अभावामुळे येणारी अवस्था नाहीशी करणारा), प्रशीतकर (थंडावा देणारा) असतो. अतिसार, आमांश, संधिवात आणि थंडी-पडशावर जंबुरीच्या रसाचे सरबत प्यावयास देतात. मादक विषावरही उतारा म्हणून देतात. फळांपासून ‘स्क्वॉश’ आणि ‘लेमन सायरप’ बनवितात तसेच सायट्रिक अम्ल, पेक्टीन व लेमन ऑइल (तेल) सुद्धा मिळते. तेल काढलेल्या फळांच्या साली वाळवून, भरडून त्यांपासून गुरांसाठी खाद्यपदार्थ बनवितात.

 वर उल्लेखिलेला युरेका हा प्रकार अमेरिकेतील कॅलिफोर्नियात जोपासलेल्या लिंबाच्या रोपापासून उत्पन्न झालेला आहे. याला काटे नसतात. याची वाढ जलद होते, पण आकारमान लहानसर असते. याची जास्त लागवड इटलीत व अमेरिकेत समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागात करतात. भारतात बागेमध्ये किरकोळ प्रमाणात लागवड करतात. मशागत, लागवड, खतपाणी इ. कागदी लिंबाप्रमाणेच करतात. फळ जरा मोठ्या आकारमानाचे असून त्यातील रस आंबट व थोडा कडवट असतो. हा रस पेय म्हणून तसेच सायट्रिक अम्ल व पेक्टीन यांच्या उत्पादनासाठी वापरतात. या झाडापासून मिळणाऱ्या उत्पादनाचा निम्मा भाग ताज्या फळांच्या रूपात विकला जातो. 

ठोंबरे, म. वा. पाटील, ह. चिं.