जंतुनाशके : (डिसइन्फेक्टंट्स). सूक्ष्मजंतूंचा नाश करणाऱ्या कारकांना विशेषतः रासायनिक पदार्थांना जंतूनाशके असे म्हणतात. त्यांच्यामध्ये सूक्ष्मजंतूच्या बीजाणूंचा (प्रजोत्पादक पेशींचा) नाश करण्याची शक्ती असतेच असे नाही. जंतुनाशके व ⇨ पूतिरोधके (अँटिसेप्टिक) हे दोन जरी समानअर्थी शब्द वाटत असले, तरी त्यांच्यात फरक आहे. जंतुनाशके ही निर्जीव पदार्थांच्या निर्जंतुकीकरणासाठी वापरत असल्यामुळे ती तीव्र व अधिक प्रमाणात वापरली तरी चालतात व म्हणूनच त्यांची किंमत कमी असावी लागते. याउलट पूतिरोधके सजीव प्राण्याच्या पृष्ठभागांवरील सूक्ष्मजंतूंचा नाश करण्याकरिता अगर त्यांची वाढ थांबविण्यासाठी वापरत असल्यामुळे ती अल्प व सौम्य प्रमाणात वापरावी लागतात, तसेच ती शरीराच्या संपर्कात वापरली जात असल्यामुळे किंमत जास्त असली, तरी ती निर्धोक असणे महत्त्वाचे असते.
रासायनिक पदार्थांशिवाय सूर्यप्रकाश, जंबुपार प्रारण (वर्णपटातील जांभळ्या रंगाच्या पलीकडील अदृश्य प्रारण), उष्णता, उच्च व नीच कंप्रतेचे (दर सेकंदाला होणाऱ्या आंदोलनांच्या संख्येचे) प्रवाह आणि क्ष-किरण हे भौतिक कारकही सूक्ष्मजंतूंचा) नाश करण्यासाठी परिणामकारक आहेत. त्यामुळे त्यांचाही जंतुनाशकांसारखा उपयोग होऊ शकतो.
इतिहास : निरनिराळ्या रोगांचा उद्भव व प्रसार सूक्ष्मजंतूंपासून होतो हे आपणास जरी एकोणिसाव्या शतकापासून माहीत असले, तरी रोगांना प्रतिबंध करण्याच्या काही पद्धती फार पूर्वीपासून प्रचलीत आहेत. पाणी उकळून प्यावे तसेच ते चांदीच्या किंवा तांब्याच्या भांड्यात साठवावे, हे पर्शियन लोकांना तसेच अलेक्झांडर राजाच्या सैनिकांना पूर्वीपासूनच माहीत होते. भारतातसुद्धा फार पूर्वीपासून पिण्याचे पाणी तांब्याच्या भांड्यात साठवण्याची पद्धती आहे. दुर्गंधी नाहीशी करून रोगाला आळा घालण्यासाठी धूप अगर चंदनाचा धूर करण्याची भारतीय पद्धती फार पुरातन आहे. तसेच पदार्थ खारवून वा वाळवून जास्त काळ टिकवून ठेवण्याची कलाही फार जुनी आहे. ईजिप्तमधील लोकांना मृत शरीरे मसाला भरून टिकविण्याची कलासुद्धा फार वर्षापासून अवगत होती. मात्र या सर्व गोष्टींना अनुभव वा रूढी यांचाच आधार होता. मात्र या प्रयत्नांना शास्त्रीय बैठक लुई पाश्चर या फ्रेंच शास्त्रज्ञांनी मिळवून दिली.
सतराव्या शतकामध्ये लेव्हेनहूक यांनी सूक्ष्मदर्शक तयार करून सूक्ष्मजीवांचे अस्तित्व सिद्ध केले होते. त्यानंतरच्या काळात सूक्ष्मजीवांचे अस्तित्व व रोगाचा प्रादुर्भाव ह्यांविषयी अनेक शास्त्रज्ञांनी मौलिक विचार मांडले. पुढे १८२५ साली फ्रेंच शास्त्रज्ञ लाबारक यांनी जखमा बऱ्या करण्यासाठी प्रथमच सोडियम हायपोक्लोराइडाचा उपयोग करून दाखविला. १८४३ साली होम्स यांनी बाळंतरोग (प्रसूती ज्वर) संसर्गामुळे होतो, असे प्रतिपादिले व १८४७ साली सिमेलव्हाईस यांनी आपले हात कॅल्शियम क्लोराइडच्या विद्रावाने (विरंजक चूर्णाने) धुवून तो कसा टाळता येतो, ते दाखवून दिले. पाश्चर यांच्या शोधांमुळे रोग व रोगजंतू यांच्यातील परस्परसंबंध स्पष्ट झाले (१८६२). १८६७ साली लिस्टर यांनी शस्त्रक्रियेची उपकरणे व जागा जंतुविरहित करण्यासाठी फिनॉलाचा (कार्बॉलिक अम्लाचा) उपयोग यशस्वी रीतीने करून दाखविला. या माहितीमुळे सार्वजनिक आरोग्यासाठी व सांसर्गिक रोगांचा प्रसार थांबविण्यासाठी सूक्ष्मजंतूंचा नाश करणारी नवीन नवीन जंतुनाशके उपलब्ध झाली.
गुणधर्म व परिणाम : आदर्श जंतुनाशकामध्ये खालील गुणधर्म असावे लागतात. (१) सर्व सूक्ष्मजंतूंचा त्यांच्या बीजाणूंसह नाश करण्याची शक्ती त्यात असावी. (२) कमीत कमी वेळात सूक्ष्मजंतूंचा नाश करण्याची शक्ती त्यात असावी. (३) ते वापरण्यास सुलभ असावे. (४) निर्जीव वस्तूंची त्यामुळे खराबी होऊ नये, तसेच इतर सजीवांना ते अपायकारक नसावे. (५) लवणयुक्त पाण्याच्या सान्निध्याने त्यांची नाशकशक्ती कमी होऊ नये. (६) ते स्वस्त असावे.
जंतुनाशकाचा योग्य तो परिणाम होण्यासाठी त्याचा सूक्ष्मजंतूंमधील प्रथिनाशी वा एंझाइमाशी (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणाऱ्या प्रथिनयुक्त पदार्थाशी) संयोग व्हावा लागतो. अशा संयोगामुळे प्रथिन साखळते, अवक्षेपित होते (साक्याच्या रूपात खाली बसते) किंवा त्याचे नैसर्गिक स्वरूप तरी बदलते. परिणामी सूक्ष्मजंतूंचा नाश होतो.
जंतुनाशकाचे प्रमाण कमी होत गेल्यास प्रत्यक्ष सूक्ष्मजंतूंचा नाश होत नाही, परंतु असलेल्या सूक्ष्मजंतूंपासून होणारी नवीन सूक्ष्मजंतूंची निर्मिती जंतूनाशकामुळे थांबविली जाते. अशा जंतुनाशकाला सूक्ष्मजंतुरोधक म्हणतात. अशी सूक्ष्मजंतुरोधके डबाबंद पदार्थ टिकविण्यासाठी आणि अंतःक्षेपणाच्या (इंजेक्शनाच्या) कुपीतील औषधाचे बाहेरील सूक्ष्मजंतूंपासून रक्षण करण्यासाठी वापरली जातात.
गुणमापन : एखाद्या जंतुनाशकाचा (किंवा पूतिरोधकाचा) ठराविक परिस्थितीत किती प्रभाव पडेल, हे पुढील तीन गोष्टींवर अवलंबून असते : (१) संहती (विद्रावातील जंतुनाशकाचे प्रमाण), (२) वेळ व (३) तापमान. प्रत्येक जंतुनाशकाचा प्रभाव कमीत कमी किती संहतीपर्यंत असतो, हे पाहणे आवश्यक आहे. काहींचे कमी संहतीचे विद्राव परिणामकारक नसतात (उदा., कार्बॉलिक अम्ल), तर काहींचे कमी संहतीचे विद्रावही आपला प्रभाव टिकवून धरतात (उदा., पारायुक्त जंतुनाशके). सामान्यपणे जास्त संहतीचे विद्राव जलद क्रिया करतात. अपेक्षित वेळात निर्जंतुकीकरण होण्यासाठी किती संहतीचा विद्राव वापरावा, हे प्रयोगाने ठरवावे लागते. निरनिराळ्या जंतुनाशकांचे एकाच संहतीचे विद्राव वेगवेगळ्या गतींनी क्रिया करतात. क्लोरीन व आयोडीन विद्रावांची क्रिया जलद होते, तर पारायुक्त विद्रावाची क्रिया सावकाश होते. बहुतेकांची क्रिया वाढत्या तापमानाबरोबर वाढते, परंतु हायपोक्लोराइटासारखी द्रव्ये कमी तापमानातच वापरावी लागतात.
निरनिराळ्या जंतुनाशकांच्या (व पूतिरोधकांच्या) प्रभावी तुलना करण्यासाठी काही निश्चित पद्धती शोधून काढण्यासाठी बऱ्याच संशोधकांनी प्रयत्न केले. कॉरव यांनी १८८१ साली प्रथमच त्यांची नाशकशक्ती अजमावण्यासाठी सांसर्गिक काळपुळीच्या (अँथ्रॅक्सच्या) बीजाणूंचा उपयोग केला. पुढे १९०३ साली रिडेल आणि वॉकर या शास्त्रज्ञांनी नाशकशक्ती अजमावण्याची प्रमाणबद्ध पद्धती तयार केली. ही ‘रिडेल-वॉकर’ पद्धती थोडाफार फेरफार करून आजही वापरली जाते.
जंतूनाशके वापरावयाच्या जागा अगर वस्तू बहुधा कार्बनी (जैव) पदार्थापासून अलिप्त राहू शकत नाहीत म्हणून १९०८ साली चिक व मार्टिन या शास्त्रज्ञांनी कार्बनी पदार्थ वापरून सुधारित पद्धती तयार केली. वेळोवेळी या पद्धतीमध्ये सुधारणा होत गेल्या व ती अधिकाधिक निर्दोष बनवण्याचे प्रयत्न होत गेले.
रिडेल-वॉकर चाचणी पद्धतीत विषमज्वराच्या रोगोत्पादक सूक्ष्मजंतूंच्या एका प्रमाणित मिश्रणावर प्रमाणित वेळात विवक्षित जंतुनाशक व फिनॉल यांच्या एकाच संहतीच्या विद्रावाचा काय परिणाम होतो, याची तुलना करण्यात येते. ही तुलना गुणांकात देतात. या गुणांकाला फिनॉल गुणांक, असे म्हणतात. ह्या पद्धतीनुसार फिनॉलाचा गुणांक एक धरला जातो. अशा तऱ्हेने निरनिराळ्या जंतुनाशकांची किंवा पूतिरोधकांची नाशकशक्ती फिनॉल गुणांकाच्या साहाय्याने निर्देशित करता येते व त्यावरून त्यांची साधारण संहतीशी तुलना करणे शक्य होते. रिडेल-वॉकर पद्धतीनुसार जंतुनाशकाचा ठरविलेला फिनॉल गुणांक त्याचा प्रत्यक्ष वापर करताना बदलणे शक्य असते. कारण प्रत्यक्षात एखादे जंतुनाशक मिश्र सूक्ष्मजंतूंवर क्रिया करत असते आणि शरीराच्या स्त्रावाच्या सान्निध्यात त्याच्या नाशकशक्तीवर थोडाफार परिणाम होण्याची शक्यता असते.
विविध प्रकारची कार्बनी व अकार्बनी रसायने जंतुनाशक म्हणून वापरली जातात. अकार्बनी प्रकारची प्रमुख रसायने पुढीलप्रमाणे आहेत : अम्ले, क्षार (अम्लाशी विक्रिया झाल्यास लवणे देणारे पदार्थ, अल्कली ) तांबे, चांदी व पारा यांची लवणे ओझोन, हायड्रोजन पेरॉक्साइड हे वायू आणि गंधकाची संयुगे. पाण्याच्या निर्जंतुकीकरणासाठी व मद्य तयार करण्याच्या कारखान्यातील किण्वनाच्या (आंबविण्याची क्रिया होत असणाऱ्या) खोलीतील हवेमध्ये असलेल्या सूक्ष्मजंतूंची संख्या कमी राखण्यासाठी ओझोन वापरतात. पोटॅशियम परमँगॅनेटाचा पिण्याचे पाणी जंतुरहित करण्यासाठी वापर होतो. आयोडोफॉर्म जखमा बांधण्यासाठी वापरले जाते व त्यातील आयोडीन जंतुनाशक म्हणून कार्य करते.
डांबर (कोल टार), फिनॉलचे अनुजात (एका संयुगापासून बनविलेली दुसरी संयुगे), पाइन तेल व क्वाटर्नरी अमोनियम संयुगे यांपासून मुख्यतः जंतुनाशके तयार केली जातात. यांशिवाय ॲक्रिडिनाचे अनुजातही अलीकडे महत्त्वाची जंतुनाशके म्हणून विशेषतः जखमा बांधण्यासाठी वापरात आले आहेत. जंतुनाशकांचे पुढील प्रकार महत्त्वाचे आहेत.
प्रकार : अल्कोहॉल : एथिल अल्कोहॉलाचा उपयोग जंतुनाशक तसेच पूतिरोधक म्हणून करतात. (उदा., कातडी किंवा तापमापक निर्जंतुक करण्यासाठी). पाण्यातील एथिल अल्कोहॉलाचे ७०% मिश्रण प्रभावी जंतुनाशक आहे. आयसोप्रोपिल अल्कोहॉलाचाही उपयोग जंतुनाशक किंवा पूतिरोधक म्हणून करतात. तसेच एथिल ग्लायकॉल व प्रोपिलीन ग्लायकॉल यांचा हवेतील सूक्ष्मजंतूंच्या नाशासाठी वापर करतात. बेंझिल अल्कोहॉलही जंतुनाशक म्हणून वापरले जाते.
फॉर्माल्डिहाइड : बाजारात उपलब्ध असलेल्या द्रवरूप फॉर्मॅलिनामध्ये फॉर्माल्डिहाइड वायू ३८ ते ४०% पाण्यात मिसळलेला असतो. हे जंतुनाशक द्रवरूपात किंवा वायुरूपात वापरतात. हे वापरण्यास सोईचे असून त्याचा इतर धातूंवर अगर धाग्यांवर दुष्परिणाम होत नसल्याने ते अनेक ठिकाणी वापरात आहे. वायुरूपात खोल्या, कपडे, गाद्या, शस्त्रक्रियेचे हातमोजे, दात घासण्याचे ब्रश इ. वस्तू निर्जंतुक करण्यासाठी वापरतात. गाद्या, कपडे अशा वस्तूंमध्ये हा वायू खोलवर पोहोचू शकत नसल्याने दुसरे जंतुनाशक उपलब्ध नसल्यासच हे वापरण्यात येते. उष्ण व दमट वातावरणामध्ये हे जंतुनाशक प्रभावी असल्याचे आढळते. त्यामुळे खोल्या निर्जंतुक करताना त्यांत उष्ण व दमट हवा खेळवली जाते. विकृतिवैज्ञानिक (रोगामुळे शरीरातील पेशीसमूहांवर व इंद्रियांवर झालेले परिणाम दर्शविणारे) नमुने सुरक्षितपणे टिकवण्यासाठी ४% फॉर्मॅलिनामध्ये ठेवतात. हा वायू किंवा त्याचा द्रव दाहक असून डोळे व श्वसनेंद्रियांना तो अपायकारक आहे.
एथिलीन ऑक्साइड : हा वायू फॉर्माल्डिहाइडापेक्षा सच्छिद्र वस्तूत सहजपणे अधिक खोलपर्यंत जाऊ शकतो. योग्य ती काळजी घेतल्यास निर्जंतुक केलेल्या वस्तूत तो रहात नाही. औषधि-व्यवसायातील यंत्रे–उपकरणे, औषध करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या खोल्या निर्जंतुक करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. हा वायू स्फोटक असल्याने ९० % कार्बन डाय-ऑक्साइड व १०% एथिलीन ऑक्साइड अशा मिश्रणात तो वापरतात. मैदा, सुके खोबरे, मसाले, कोकोचे चूर्ण इ. चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी हा वापरला जातो. परंतु याचा काही जीवनसत्त्वांवर व ॲमिनो अम्लांवर विपरीत परिणाम होतो. इतर जंतुनाशकांप्रमाणे या वायूचे प्रमाण आणि सान्निध्यकाल यांवर त्याची नाशकशक्ती अवलंबून असते.
गंधक व सल्फर डाय-ऑक्साइड : गंधक व गंधकाची धुरी यांचा जंतुनाशक म्हणून उपयोग अनेक शतकांपासून होत आहे. कलील (अतिसूक्ष्म कण लोंबकळत असलेल्या विशिष्ट प्रकारच्या द्रवाच्या) मिश्रणाच्या रूपातील गंधकाने बुरशीचा नाश होतो. सल्फर डाय-ऑक्साइडाचा आर्द्रतेशी संपर्क आल्यास सल्फ्यूरस अम्ल निर्माण होते व त्यामुळे सूक्ष्मजंतूंचा नाश होतो. ओल्या व सुक्या फळांवरील सूक्ष्मजंतूंचा नाश करण्यासाठी अजूनही सल्फर डाय-ऑक्साइडाचा वापर केला जातो.
क्लोरीन व क्लोरीनयुक्त रसायने : पिण्याचे पाणी निर्जंतुक करण्यासाठी क्लोरीन वायूचा उपयोग करतात. याकरिता साधारणतः १० लाख भागांना ०·१ ते ५ भाग असे याचे प्रमाण वापरण्यात येते. या प्रक्रियेपूर्वी पाणी गाळून घ्यावे लागते, तसे न केल्यास पाण्यातील कार्बनी पदार्थांचा क्लोरीन वायूशी संयोग होऊन त्यामुळे पाण्याला एक प्रकारचा वास येतो [ ⟶ क्लोरीन]. विरंजक चूर्णाचा (क्लोरिनेटेड लाइमचा) उपयोग मुख्यत्वे सांडपाणी, गटारे, मुताऱ्या स्वच्छ ठेवण्यासाठी व त्यांतील सूक्ष्मजंतूंचा नाश करण्यासाठी करतात. सोडियम हायपोक्लोराइटापासून क्लोरीन मुक्त होत असल्याने त्याचा इस्पितळ व घरगुती वापरात जंतुनाशक म्हणून उपयोग करतात. हॅलाझोन या क्लोरीनयुक्त जंतुनाशकाचा उपयोग घरगुती पिण्याचे पाणी शुद्ध करण्याकडे होतो.
आयोडीन व आयोडीनयुक्त रसायने : आयोडिनाचा प्रथिनांशी चटकन संयोग होत असल्याने ते एक प्रभावी जंतुनाशक आहे.
आयोडीन अल्कोहॉलामध्ये विरघळवून द्रवरूपात वापरतात. प्रायः त्याचा उपयोग पूतिरोधक म्हणून केला जातो. आयोडीन काही वेळा पाण्यातील रोगोत्पादक सूक्ष्मजंतूंचा नाश करण्यासाठी वापरतात. दुग्ध व्यवसायातील उपकरणे व प्रयोगशाळेतील प्राणी ठेवण्याच्या जागा निर्जंतुक करण्यासाठी आयडोफोअर (आयोडीनयुक्त मिश्रणे) वापरतात. शस्त्रक्रियेची साधने, घरातील भांडी वगैरे निर्जंतुक करण्यासाठीही आयोडीनचा वापर होतो.
ऑक्सिडीकरण घडवून आणणारी रसायने : हायड्रोजन पेरॉक्साइड व पोटॅशियम परमँगॅनेट ही रसायने जंतुनाशके म्हणून वापरली जात असली, तरी पूतिरोधक म्हणूनच जास्त वापरली जातात.
फिनॉल व त्यासदृश इतर रसायने : यांमध्ये मुख्यतः डांबरापासून तयार केलेली जंतुनाशके येतात. फिनॉल व त्यापासून तयार करण्यात आलेली बरीच जंतुनाशके वापरात आहेत. लायसॉल, सॅपोनेटेड क्रिसॉल, हेक्झॅक्लोरोफीन, क्रिसॉल इ. जंतुनाशके प्रचारात आहेत. डांबरापासून निघालेली फिनॉलसम अम्ले व तेले ह्यांपासून मिळणारी काळी व पांढरी द्रवरूप जंतुनाशके मोऱ्या, मुताऱ्या, फरशा तसेच रुग्णालयातील खोल्या स्वच्छ करण्यासाठी वापरतात.
धातुयुक्त रसायने : पारा व चांदी ह्यांपासून तयार केलेल्या कार्बनी व अकार्बनी रसायनांचा उपयोग सूक्ष्मजंतूंच्या प्रतिबंधासाठी आणि परिरक्षक म्हणूनच विशेषे करून होतो.
मर्क्युरिक क्लोराइडाचा उपयोग कागद, लाकूड, चामडे यांचे सूक्ष्मजंतू व बुरशीपासून संरक्षण करण्याकडे होतो. कार्बनी पारायुक्त पदार्थांमध्ये मर्क्युरीक्रोम, मरथायोलेट, फिनॉइल मर्क्युरिक नायट्रेट इ. असून त्यांचा परिरक्षक, जंतुनाशक व पूतिरोधक म्हणून उपयोग होतो.
कॉपर सल्फेटाचा (मोरचूदाचा) उपयोग साठवलेल्या पाण्यावरील शैवलांची वाढ थांबवण्यासाठी करतात.
क्वाटर्नरी अमोनियम संयुगे : १९३५ साली जर्मन शास्त्रज्ञ डोमाक यांनी झेफिरॉल (अल्किल डायमिथिल बेंझिल अमोनियम क्लोराइड) या द्रव्याचा शस्त्रक्रिया चिकित्सकांनी हात जंतुविरहित करण्याकरिता उपयोग करावा, असे सुचविले होते. या संयुगांचा उपयोग जंतुनाशके व सूक्ष्मजंतुरोधके म्हणून केलेला आढळतो. ही संयुगे अपायकारक तसेच दाहक नसून त्यांचा पुष्कळ सूक्ष्मजंतूंच्या तसेच बुरशींच्या नाशासाठी वापर करतात. रोक्काल, सेटव्हलॉन, सोपरीन इ. संयुगे वापरात आहेत. शस्त्रक्रियेपूर्वी हात निर्जंतुक करण्यासाठी, लोकरी आणि सुती चादरी स्वच्छ व निर्जंतुक करण्यासाठी, हॉटेलातील काचसामान, पेयांच्या बाटल्या, अंडी, जेवणाची भांडी इ. स्वच्छ करण्यासाठी त्यांचा उपयोग करतात.
साबण : जंतुनाशक साबणामध्ये फिनॉल, पाईन तेल, क्रिसॉल, मर्क्युरिक आयोडाइड इत्यादींचा समावेश केलेला असतो. तसेच हेक्झॅक्लोरोफिन (G11), टेट्रामिथिलथायरम डायसल्फाइड अशा जंतुनाश पदार्थांचा साबणामध्ये समावेश करण्यात येऊ लागला आहे.
जंतुनाशक साबण घन, द्रव, विद्राव व पायस (एकमेकांत न मिसळणाऱ्या दोन द्रवांचे मिश्रण) यांच्या रूपांत असतो. त्याचा दुर्गंधीनाशक व जंतुनाशक म्हणून उपयोग होतो. गालिचे, लाकडी सामान, फरश्या वगैरे स्वच्छ करण्यासाठी दवाखान्यांत आणि घरीही असे साबण वापरले जातात.
भारतीय उद्योग : भारतामध्ये दगडी कोळशापासून मिळणाऱ्या डांबरापासून काळी व पांढरी द्रवरूप जंतुनाशके मोठ्या प्रमाणावर तयार करण्यात येतात. यांशिवाय जंतुनाशक साबण, डेटॉल इ. विविध प्रकारची जंतुनाशकेही मुंबई, कलकत्ता इ. ठिकाणी तयार करण्यात येतात. भारतामध्ये जंतुनाशकांचे उत्पादन व व्यापार यांचे नियंत्रण १९४० च्या ⇨ औषध व सौंदर्यप्रसाधन अधिनियमानुसार केले जाते. भारतीय मानक संस्थेचे प्रमाणपत्रही अशा उत्पादनाला देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
संदर्भ : 1. Finch, W. E. Disinfectants, their Value and Uses, London, 1958.
2. Reddish, C. F., Ed. Antiseptics, Disinfectants, Fungicides and Chemical and Physical Sterilisation, Philadelphia, 1957.
3. Sykes, G. Disinfection and Sterilisation : Theory and practice, London, 1958.
ताम्हणे, र. ग.
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..