चोलमंडळ मद्रासमधील एक अभिनव अशी कलावंतांची वसाहत. १९६४ मध्ये के. सी. एस्. पणीक्कर यांच्या नेतृत्वाखाली ती स्थापन झाली. ही वसाहत म्हणजे चाळीस कलावंतानी एकत्र येऊन सहकारी तत्त्वावर केलेला एक यशस्वी प्रयोग होय. राज्यशासनानेही समुद्रकाठची सु. ४ हे. जागा देऊन या प्रयोगास मदत केली. कलावंतांना एकाच वेळी निर्वेध कलासाधना आणि निर्वाहापुरते अर्थार्जन करता यावे, हा हेतू चोलमंडळाच्या स्थापनेमागे आहे. या वसाहतीत प्रत्येक सभासद कलावंताला ‘झोपडीवजा स्टुडिओ ’बांधून देण्यात आला. बाहेरच्या कलावंतालाही येथे नाममात्र शुल्क देऊन स्टुडिओ मिळतो आणि अर्थार्जन होईल,असे कामही करता येते. दिवसातील काही तास प्रत्येक कलावंताला अर्थोत्पादक असे हस्तकलादी निर्मितीचे काम करावे लागते आणि उरलेला वेळ स्वतःच्या कलानिर्मितीसाठी वापरता येतो. चोलमंडळात तयार झालेल्या उपयुक्त कलावस्तू विकून जे उत्पन्न येते,ते ठराविक प्रमाणात अनुक्रमे संस्था,हस्तव्यवसायाची कच्ची सामग्री व कलावंताचा मोबदला यांत विभागण्यात येते. चोलमंडळाच्या कलावस्तूंना चांगली मागणीही आहे. दक्षिणेतील अनेक नवोदित कलावंत चोलमंडळाचा फायदा घेतात. त्यांनी निर्मिलेल्या वस्तूंची प्रदर्शनेही भरविली जातात. पारंपरिक द्राविडी वळणाचे कलात्मक घाट आधुनिक दृष्टीने हाताळल्यामुळे मंडळाच्या वस्तुनिर्मितीत उपयुक्तता आणि कलात्मकता यांचा सुरेख संगम दिसून येतो. चोलमंडळाशी निगडित असे जानकीराम,वासुदेव वगैरे कलावंत प्रसिद्ध असून ते आपल्या कलावस्तूंची आणि स्वतंत्र कलाकृतींची प्रदर्शनेही भारताच्या प्रमुख शहरी भरवू लागले आहेत. कलावंत आपली सामाजिक उपयुक्तता सिद्ध करून आपल्या चरितार्थाचे प्रश्न सोडवू शकतो तसेच तो संघटितपणे व सहकारवृत्तीने काम करू शकतो,ही गोष्ट चोलमंडळाच्या कार्याने सिद्ध झाली आहे. असे प्रयोग आता इतरत्रही होत आहेत.

सोलापूरकर,वि. मो.