छायाप्रकाशन : (क्यारोस्कूरो). विशेषतः चित्रकलेत छाया आणि प्रकाश यांच्या कलात्मक संबंधाला उद्देशून ही संज्ञा वापरली जाते. ‘क्यारोस्कूरो ’ ही संज्ञा इटालियन असून ‘क्यारो’ म्हणजे प्रकाश आणि ‘ओस्कूरो’ म्हणजे छाया, असे तिचे मूळ अर्थ आहेत. काळा व पांढरा या रंगमूल्यांच्या दोन टोकांमध्ये सामावणाऱ्या विविध छटांचा वापर करून त्यातून सौंदर्यात्मक विरोध साधणे, ही कल्पना छायाप्रकाशनाच्या मुळाशी आहे. मुळात ही संज्ञा काष्ठठशांच्या बाबतीत वापरली जात असे. आजही आरेख्यक कलांच्या संदर्भात याच अर्थाने तिचा वापर केला जातो.

 लिओनार्दो दा व्हींची याने पहिल्यांदा जाणीवपूर्वक छायाप्रकाशनाचा प्रभावी उपयोग आपल्या चित्रांतून केला. तेव्हापासून छायाप्रकाशनाच्या कल्पनेला विशेष महत्त्व आले. काराव्हाद्जो या श्रेष्ठ चित्रकाराने उजळ प्रकाश आणि दाट छाया यांच्या कलात्मक योजनेने चित्रनिर्मितीत नाट्यात्मता आणून शिवाय त्रिमितीय परिणाम साधण्याचा यशस्वी प्रयत्न केला. रेम्ब्रँट याने तर छायाप्रकाशाच्या विरोधाला उच्च कलामूल्य प्राप्त करून दिले. छायाप्रकाशनामुळे चित्रित विषयाचे निरनिराळे घटक कमीअधिक उठावदार करून त्यांचे वेगवेगळे अर्थ व परिणाम साधले जातात. प्रकाशित वस्तूंशी संवादी अशा व अंधुकता कायम ठेवणाऱ्या छटांचाही वापर करण्यात येतो. त्यामुळे द्विमितीय अशा चित्रणाला घनता लाभून त्यातून त्रिमितीय प्रत्यय येऊ शकतो. दृक्‌प्रत्ययवादी चित्रकारांनी छायाप्रकाशाच्या विरोधापेक्षा प्रकाशाची चमक दाखविण्यावर भर दिला. ब्राकसारख्या आधुनिक चित्रकारांनी छायाप्रकाश हा मूळ वस्तूचाच एक स्वाभाविक गुण आहे, या दृष्टीने त्याचा प्रभावी उपयोग केला.

 पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून काष्ठठशांच्या तंत्रामध्ये छायाप्रकाशनाचा प्रभाव दिसून येतो. यासाठी निरनिराळे काष्ठठसे वापरून दाट छायेपासून उजळ प्रकाशापर्यंतच्या छटा चढत्या क्रमाने साधल्या जातात.

करंजकर, वा. व्यं.