चेहरा: कपाळावरील केशरेषेपासून हनुवटीपर्यंतच्या डोक्याच्या पुढील भागास चेहरा म्हणतात. त्यामध्ये कपाळ, डोळे, नाक, ओठ, गाल व हनुवटी यांचा समावेश होतो. चेहऱ्याच्या विविध भागांत रूप, रस आणि गंध या ज्ञानेंद्रियांची ग्राहकस्थाने आहेत. त्याचा अस्थिमय भाग १४ हाडे व ३२ दात मिळून बनला असून त्यावर स्नायू व त्वचा यांचे आच्छादन असते. चेहऱ्यास रक्तपुरवठा भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्यावरील जखमा लवकर बऱ्या होतात. काही भागातील नीला कर्परान्तर्गत (ज्यामध्ये मेंदू असतो अशा कवटीच्या भागाच्या आतील) नीलांशी जोडलेल्या असल्यामुळे तेथील रोग संक्रामण मेंदूपर्यंत पोहोचण्याचा धोका असतो. उदा., वरचा ओठ. चेहऱ्यावरील स्नायूंची हालचाल आननतंत्रिकेच्या (मेंदूपासून निघणाऱ्या सातव्या मज्जेच्या) शाखांतून येणाऱ्या संवेदनांमुळे होते. या हालचाली भावनादर्शक असतात.
प्राण्यांच्या क्रमविकासात (उत्क्रांतीत) चेहऱ्याचे डोक्याच्या आकारमानाशी असलेले प्रमाण बदलत गेलेले दिसते. डोक्याचा वरचा भाग हळूहळू मोठा होत गेला आणि जबडा व दात यांचे आकारमान कमी होत गेले. त्यामुळे घोडा, गाय वगैरे प्राण्यांत ‘तुंड’ पुढे आलेले दिसते तर मानवात ते कपाळरेषेच्या मागेच असते. मानवाचा चेहरा बाजूने पाहिल्यास उभा दिसतो, तर इतर प्राण्यांमध्ये तोंड व नाक बरेच पुढे आलेले दिसते.
चेहऱ्यामध्ये झालेल्या या बदलाचे कारण म्हणून असे सांगण्यात येते की, जसजशी बुद्धी प्रगल्भ होत गेली, तसतसा आदिमानव दातांचे काम हत्यारांच्या मदतीने करू लागला व त्यामुळे दात लहान होत गेले. मनुष्यप्राणी द्विपाद बनल्यानंतर डोक्याचे वजन कण्यावर अधिक सुलभपणे पेलण्याच्या दृष्टीने चेहऱ्याचा खालचा भाग मागे मागे गेला.
मानवातील डोक्याच्या वरच्या भागाची वाढ वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत जवळ जवळ ९० टक्के पूर्ण झालेली असते. चेहऱ्याची वाढ मात्र वयाच्या विसाव्या वर्षापर्यंत होत राहते. लहानपणी चेहरा बाजूने पाहिल्यास तो एकूण मस्तकाच्या १/५ एवढाच असतो, तर प्रौढपणी १/२ इतका होतो. नासाकोटरे (नाकातील पोकळ्या), दात, स्नायू वगैरेंची वाढ होत राहिल्यामुळे असा फरक होतो.
मानवाच्या मुख्य तीन वंशांमध्ये क्रमविकासानुसार चेहऱ्यामध्ये थोडे भेद उत्पन्न झालेले आहेत. कॉकेशियन लोकांत (आर्य लोकांत) चेहरा लांबट, नाक तरतरीत, नाकाचा कपाळाजवळचा भाग उंच व ओठ पातळ असतात. चेहऱ्यावर भरपूर केस असून बाजूने पाहिल्यास तो सरळ किंवा बहिर्गोल दिसतो. मंगोल वंशीयांत चेहरा लांबट व खूप रुंद असतो. गालांची हाडे उंच व खालचा जबडा उन्नत (उंचावलेला) असतो. नाक पसरट असून त्याचा कपाळाजवळील भाग बसका असतो. बाजूने पाहिल्यास चेहरा थापटका असून त्यावरील केस तुरळक असतात. निग्रोवंशीयांत चेहरा आखूड व अरुंद असून नाक पसरट असते व त्याचा कपाळाजवळचा भागही पसरट असतो. ओठ जाड असून चेहऱ्यावर केस कमी असतात. बाजूने पाहिल्यास चेहरा लांब असून खालचा जबडा पुढे आलेला दिसतो.
वर वर्णन केलेले चेहऱ्याचे गुणधर्म त्या त्या मानववंशातील प्रत्येक व्यक्तीत दिसतातच असे नाही.
मानवशास्त्रात मनुष्याच्या बुद्धिमत्तेच्या मोजमापासाठी चेहऱ्यावरील काही विशिष्ट स्थानापासून काल्पनिक रेषा काढतात. अशी एक रेघ कपाळाच्या सर्वांत पुढे आलेल्या भागापासून नाकपुडीच्या तळापर्यंत काढतात दुसरी रेघ कवटीच्या तळापासून नाकपुडीच्या तळापर्यंत काढतात. या दोन रेघांमध्ये जो कोन होतो त्यावरून व्यक्तीची बुद्धिमत्ता व वंश यांसंबंधी काही अनुमाने काढतात. हे अंदाज अर्थातच स्थूलमानाने केलेले असतात [→मस्तकमिति].
काही व्यक्तींमध्ये चेहऱ्याच्या विशिष्ट हालचाली विशिष्ट भागापुरत्या मर्यादित असलेल्या पण सतत होताना आढळतात. अशी हालचाल उदा., डावी किंवा उजवी भुवई उडणे, बहुधा सवयीचा परिणाम असतो. काही रोगांत चेहऱ्याच्या विशिष्ट हालचाली आढळून येतात. उदा., ⇨बालकंपवात. आननतंत्रिकांच्या काही विकृतींमध्येही अशा हालचाली दिसतात. कधीकधी अशा अतित्रासदायक हालचाली बंद पाडण्याकरिता त्या बाजूची आननतंत्रिका मुद्दाम बधिर करावी लागते.
अलीकडे चेहऱ्याचे सौंदर्य टिकवून ठेवण्याकरिता, विशेषेकरून स्त्रियांमध्ये, निरनिराळे उपचार केले जातात. त्यामध्ये सौंदर्यप्रसाधनाशिवाय चेहऱ्याचे मर्दन (साधी अथवा विद्युत् उपकरणे वापरून), मुखाच्छादने इत्यादींचा उपयोग करतात. चेहऱ्यावर बाह्योपचार म्हणून लावावयाच्या कोणत्याही सौंदर्यप्रसाधनात ‘त्वचापूरक’ द्रव्य नसते हे लक्षात घेण्यासारखे आहे. घाण काढून टाकणे, जंतुरहित करणे आणि त्वचेतील रक्तप्रवाह वाढविणे याच हेतूने ती लावली जातात. चेहऱ्यास लावावयाचे कोणतेही सौंदर्यप्रसाधन केव्हाही हानिकारक असता कामा नये [→सौंदर्यप्रसाधन]. चेहऱ्यावरील काही कायम दोष काढून टाकण्याकरिता किंवा इतर कारणांनी आलेली विद्रूपता नाहीशी करण्याकरिता पुनर्रचनात्मक (पूर्ववत रचना करणारी किंवा योग्य तो बदल करणारी) शस्त्रक्रिया उपयुक्त ठरली आहे.
ढमढेरे, वा. रा. भालेराव, य. त्र्यं.
“